15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र्य झाला. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्टला पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन स्वतंत्र देश बनला. मात्र, या दोन्ही देशांचे विभाजन केले जाईल हा निर्णय महिनाभर आधीच 3 जून 1947 ला घेण्यात आला होता. पण हे विभाजन इतकं सोपे नव्हतं, कारण बऱ्याच गोष्टींची वाटणी होणार होती आणि फक्त 73 दिवस बाकी होते.
भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी सार्वजनिक पैसा, पाणी आणि जमीन यांच्यासह अशा अनेक गोष्टींची विभागणी करण्यात आली ज्यावर विश्वास ठेवण कठीण आहे. फाळणीमुळे १ कोटी लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं. हे अजूनही जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं स्थलांतर होतं.
भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती करणे हे तितके सोपे काम नव्हते. हे कठीण काम पार पाडण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी सर सिरिल रॅडक्लिफ या ब्रिटीश वकिलावर सोपवली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे विभाजन करणारी सीमारेषा रेखाटण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
रॅडक्लिफ यांनी हे काम पटकन करून टाकले. देशाचे विभाजन करण्यासाठी रॅडक्लिफ यांनी नकाशावर फक्त एक रेषा काढली होती, असे काही ऐतिहासिक अहवाल सांगतात. याच आधारावर प्रत्यक्षातही विभाजन करण्यात आले. रॅडक्लिफने भारताच्या भूमीवर जात, धर्म, संस्कृती या सगळ्या गोष्टींचा विचार न करता दोन्ही देशांच्या सीमा कागदावर उतरवल्या.
जमिनीचे विभाजन करता आले, मात्र संपत्ती, सैन्य, पैसे आणि इतर काही गोष्टींची वाटणी करणे तितकेही सोपे नव्हते. 16 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन आणि इतरांशी सल्लामसलत करून गव्हर्नर-जनरल जेनकिन्स यांनी ‘पंजाब पार्टीशन कमिटी’ या समितीची स्थापना केली. देशाची फाळणी करून संपत्ती आणि तत्सम सगळ्याच साहित्यांची न्याय्य वाटणी करणे हे या समितीचे काम होते.

पैसे, सैन्य, इतर प्रशासकीय सेवा आणि कार्यालयीन वस्तूंची वाटणी करण्याची मुख्य जबाबदारी या समितीकडे होती. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नंतर या समितीचे नामकरण ‘पार्टिशन कौन्सिल’ असे करण्यात आले. या समितीमध्ये काँग्रेसकडून सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद; तर ऑल इंडिया मुस्लीम लीगकडून लियाकत अली खान आणि अब्दुर रब निश्तर यांचा समावेश होता. नंतर या समितीमध्ये निश्तर यांच्याऐवजी मुहम्मद अली जीना यांचा समावेश झाला.
तोपर्यंत ब्रिटिशांच्या अखत्यारित असलेल्या भारताचे विभाजन करण्यासाठी या समितीकडे फक्त 70 दिवस होते. इतका कमी कालावधी उपलब्ध असताना, या समितीच्या खांद्यावर देशातील सर्व विभागांची मालमत्ता तसेच आर्थिक बाबींची विभागणी करण्याचे महत्कार्य सोपवण्यात आले होते.
अशा परिस्थितीत जाणून घेऊ की, भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी अशा कोणत्या गोष्टींची वाटणी करण्यात आली होती.
1- भारत-पाक विभाजनाच्या वेळी, पहिला दावा देशाच्या नावाने करण्यात आला. या नावावर भारताने दावा केला की, आम्हाला ‘भारत’ नावाचा अधिकार असेल. मात्र, पाकिस्तानी प्रतिनिधीने यावर आक्षेप घेतला, पण नंतर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
2- भारत-पाक विभाजनादरम्यान, सार्वजनिक पैशाचे पाणी-जमीन यांची वाटणी तर होतीच पण सोबतच सर्व कार्यालयांची कॉपी-पुस्तके, टेबल-खुर्च्यांपासून टाइपरायटर आणि पेन्सिलची सुद्धा वाटणी करण्यात आली.
3- भारतात असलेल्या ‘राष्ट्रीय ग्रंथालय’ च्या पुस्तकांचे देखील वाटप केले गेले. या दरम्यान, ग्रंथालयाच्या एका शब्दकोशाला फाडून दोन्ही देशांमध्ये अर्ध-अर्ध वाटण्यात आले. याशिवाय, ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका’ ला देखील वाटण्यात आले.
4 – भारत-पाक विभाजनादरम्यान, पगडी, बल्ब, पेन, काठी, बासरी, टेबल, खुर्ची, रायफल या छोट्या छोट्या गोष्टींचेही वाटप करण्यात आले.
5- भारत-पाक विभाजनाच्या वेळी, लोकसंख्येच्या आधारावर सगळ्यात आधी रूपया वाटण्यात आला. बँकांमध्ये असलेल्या पैशांपैकी भारताला 82.5 टक्के आणि पाकिस्तानला 17.5 टक्के रक्कम मिळाली. तर जंगम मालमत्तेचा भारताला 80 टक्के वाटा मिळाला आणि पाकिस्तानला 20 टक्के.
6- स्वातंत्र्यानंतर, भारतात राहिलेल्या ब्रिटिश व्हॉईसरॉयच्या बग्ग्यां नाणे फेकून वाटल्या गेल्या. या दरम्यान 6 बग्ग्या भारताला आणि 6 पाकिस्तानला देण्यात आल्या. नाणेफेक जिंकल्यावर भारताला ही बग्गी मिळाली.

7- भारत-पाकच्या फाळणीच्या वेळी, ज्यांच्या क्षेत्रात रस्ते आणि रेल्वे होत्या त्या तर वाटल्या गेल्याच, सोबत रेल्वेचे डबे, इंजिन, बुलडोझर आणि ट्रक यांचही वाटप करण्यात आलं.
8 -भारत-पाक फाळणीच्या वेळी अशी एक गोष्ट घडली ज्याबद्दल कधीही वाद झाला नाही. ती वस्तू होती वाइन. या दरम्यान, सर्व दारू व्यवसाय भारताच्या भागात आले, मुस्लिम देश पाकिस्तानने दारू मागितली नाही.
9- जेव्हा व्हॉईसरायच्या सन्मान आणि शाही दर्जानुसार त्याच्या फेरफटक्यासाठी बनवलेली सोनेरी आणि पांढरी ट्रेन भारताच्या वाट्याला आली, तेव्हा भारतीय सैन्यदलाच्या कमांडर-इन-चीफ आणि पाकिस्तानचे राज्यपाल यांची वैयक्तिक वाहने पाकिस्तानला मिळाली.
10- भारतीय सैन्याची फाळणी सर्वात दुःखद होती. 25 लाखांच्या फौजेचे विभाजन करण्यासाठी, सर्व सैनिकांना एक फॉर्म देण्यात आला, कोणाला कोठे जायचे आहे? या दरम्यान, हिंदू आणि शीख सैनिकांनी भारताची निवड करणं योग्य मानलं.
11 – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे ‘गुप्तचर विभाग’ मध्ये कोणतेही रेकॉर्ड शेअर केले गेले नाही. गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की या विभागाचा एकही कागद आणि पेन पाकिस्तानात जाऊ देणार नाही.






