दोन वेळा ‘गोल्डन क्रो’ ॲवॉर्ड जिंकणाऱ्या वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालचे लग्न यावेळी होता होता राहिले. ‘तारक मेहता’ या शोमध्ये गेल्या आठवड्यात पोपटालच्या बाबतीत सगळं जुळून आलं होतं. म्हणजे स्वाभाविकपणे पोपटलालला मुलगी पसंत होती, मुलीनेही पोपटलालला आपला भावी नवरा म्हणून स्वीकारलं होतं, साखरपुडाही ठरला मात्र अचानक असं काही घडलं की डॉ. हाथी यांच्या सांगण्यावरून पोपटलालने स्वत:हून हे लग्न मोडले.
यावेळी पोपटलालचे लग्न मोडण्याचे कारण वैद्यकीय आजाराचे होते. या आजाराला वैद्यकीय भाषेत म्हणतात थॅलेसेमिया (Thalassemia)... असा काय आहे हा थॅलेसेमियाचा आजार आणि याबद्दल आपल्याला किती माहिती आहे हेच यानिमित्ताने आपण जाणून घेणार आहोत.
काही मुलांमध्ये थॅलेसेमिया (Thalassemia) हा आजार सामान्यतः जन्मापासूनच आढळतो. साधारणतः लहान वयातच या विकाराची लक्षणे आढळतात. शरीरात रक्तनिर्मितीत अडथळा आल्यानं थॅलेसेमिया हा आजार उद्भवतो. थॅलेसेमिया हा रक्तातील अनुवांशिक विकार आहे.
मायनर थॅलेसेमिया आणि मेजर थॅलेसेमिया असे या आजाराचे दोन प्रकार आहेत. या रुग्णांना सातत्याने रक्ताची गरज असते. मायनर थॅलेसेमिया असणारी मुले सर्वसामान्य आयुष्य जगतात. पण ज्या मुलांमध्ये मेजर थॅलेसेमिया आढळतो, त्यांना 21 दिवसांनंतर किंवा महिन्याभरानंतर रक्त द्यावे लागते.

थॅलेसेमिया अनुवांशिक विकार असल्यानं तरुण-तरुणींनी विवाह करण्यापूर्वी तसंच अपत्य जन्माला घालण्यापूर्वी थॅलेसेमियाशी संबंधित चाचणी करून घेणे आवश्यक आहे. कारण आई-वडिलांमुळे हा आजार त्यांच्या बाळालाही होण्याचा धोका असतो. जाणून घेऊया या आजाराबाबतची माहिती…
थॅलेसेमिया म्हणजे काय?
- थॅलेसेमिया हा एक रक्तविकार आहे. यामध्ये लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य पद्धतीनं होत नाही. सोबतच या पेशींचे आयुष्य देखील कमी असते.
- याच कारणामुळे मुलांना प्रत्येक २१ दिवसांनंतर कमीत-कमी एक युनिट रक्त देण्याची आवश्यकता असते.
- या आजारानं ग्रस्त असलेली मुले जास्त काळ जगू शकत नाही.
- काही मुले या आजारापासून बचावली तरीही त्यांना अन्य आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते.
थॅलेसेमियामध्ये नेमके काय होते?
- आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी (White Blood Cell) आणि लाल रक्त पेशींचा (Red Blood Cell) समावेश असतो. पांढऱ्या रक्त पेशी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी कार्य करतात. तर लाल रक्त पेशी शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा (Hemoglobin) स्तर टिकवून ठेवण्याचे कार्य करते.
- पण थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये लाल रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्या गतीनं या पेशींची निर्मिती होणे आवश्यक असते, त्या गतीनं लाल रक्त पेशी शरीरामध्ये तयार होत नाहीत.
रुग्णांना यासाठी असते रक्ताची गरज
- शरीरातील लाल रक्त पेशींचे आयुष्य जवळपास 120 दिवसांचे असते. पण थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये या पेशींचे केवळ 20 दिवसांचेच आयुष्य असते.

- या रुग्णांच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी पुरेशा प्रमाणात नसतात.
- यामुळे रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते.
- शरीरातील रक्त कमी झाल्यानंतर औषधोपचार किंवा रक्त चढवूनही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवले तरीही ते फार काळ टिकून राहत नाही. यामुळेच त्यांना वारंवार रक्त देण्याची आवश्यकता असते.
कशी होते या आजाराची लागण
- थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. आई किंवा वडील या आजारानं ग्रस्त असल्यास त्यांच्या मुलांनाही हा विकार होऊ शकतो. यामुळेच खबरदारी म्हणून विवाहापूर्वी या आजाराशी संबंधित वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यातील धोके टाळले जातील.
- आईवडिलांमध्ये या आजाराची सौम्य लक्षणे असली तरीही मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता अधिक असते. परिणामी मुलांमध्ये या आजाराची स्थिती गंभीर स्वरुपातील असू शकते.
- पण आई किंवा वडिलांपैकी एका व्यक्तीमध्ये या आजाराची सौम्य लक्षणे आढळल्यास मुलांना आजाराची लागणं होण्याची शक्यता कमी असते. किंवा लागण झाल्यास ते अपत्य सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगू शकते.
थॅलेसेमियाची लक्षणे
- साधारणतः मुलांची नखे गुलाबी रंगाची असतात. पण या आजारानं ग्रस्त असणाऱ्या मुलांची नखे पाहिल्यास शरीरात रक्ताचा अभाव असल्याचे लगेचच दिसून येते.
- मुलांच्या डोळ्यांच्या बाहुल्याचा पांढरा भाग पिवळसर दिसतो.
- मुलांच्या जीभेचा रंग बदलतो आणि मुलांच्या विकासातही अडथळा निर्माण होतो.
- त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो.

शरीराच्या आतमध्ये होणारे बदल
- शरीराबाहेरील बदलाप्रमाणे मुलांच्या शरीराच्या आतही बदल होऊ लागतात.
- आतड्या, जबडा, यकृत आणि दात येताना होणाऱ्या समस्येचा यात समावेश असतो.
तुमच्या शरीरात रक्त कमी आहे का?
थॅलेसेमिया मेजर आजाराची तीव्रता अधिक असते. अशा मुलांना जन्मापासूनच रक्त चढवण्याची आवश्यकता असते. शरीरामध्ये लाल रक्त पेशी जास्त प्रमाणात नसल्यानं हिमोग्लोबीनचे प्रमाणच वाढत नाही. काही व्यक्ती शरीरात रक्त कमी असण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात.
पण वेळीच सावध व्हा आणि तपासणी करून घ्या. अशा थॅलेसेमिया मायनर असलेल्या महिला आणि पुरुषामुळे त्यांच्या विवाहानंतर मुलांना मेजर थॅलेसेमिया होण्याची भीती असते.






