वैज्ञानिक सूचना प्रसारक एल्सवियर यांच्या सर्वेक्षणानुसार, महिला संशोधकांच्या वृद्धी दरात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अहवालात म्हटलं गेलंय की या क्षेत्रातील लैंगिक समानता जागतिक पातळीवरील मान्य स्तरापासून फारच दूर आहे.
शोध आणि नवोत्पादन यात लैंगिक समानतेच्या दिशेनं प्रगती – 2024 समीक्षा नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय की मागील दशकात इजिप्त आणि नेदरलँड यांच्यानंतर सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचा सहभागात देशातील वार्षिक वृद्धी दर दोन टक्के राहिला आहे. अहवालात विभिन्न विषय आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये 20 वर्षांच्या कालावधीत समावेशकता आणि वैविध्याची तपासणी केली गेली.
यातून समजलंय की भारतात सक्रिय संशोधकांमध्ये सध्या 33 टक्के स्त्रिया आहेत. जापानमध्ये 22 टक्के आणि इजिप्तमध्ये 30 टक्के स्त्रिया आहेत. भारत सध्या जगात संशोधनात्मक उत्पादनाचा तिसरा मोठा उत्पादक आहे. विज्ञान क्षेत्रांत कैक शतकं पुरुषांचं वर्चस्व राहिलेलं आहे. स्त्रियांना यात प्रोत्साहन दिलं गेल्यानंतरही विज्ञान आणि तंत्रज्ञानात त्यांची संख्या अजूनही कमीच आहे.
स्टेम अर्थात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग व मॅथेमॅटीक्स यात स्त्रियांची कमी संख्या असणं ही देशातील धोरण निर्मात्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. पण पूर्वीपेक्षा आता यात वाढ झालेली दिसून येते. महिला पदवीधरांची संख्या 2014-15 च्या 38.4 टक्क्यांवरून 2021-22 मध्ये 42.6 टक्के वाढली आहे.
भारतात जगातील सर्वांत जास्त महिला स्टेम पदवीधर आहेत. पण विश्व बँकेच्या आकडेवारीनुसार, महिला स्टेम पदवीधरांच्या मोठ्या संख्येनंतरही भारतात स्टेम कार्यक्षेत्रांमध्ये स्त्रियांची संख्या 27 टक्के इतकीच आहे. विज्ञानात करियर करणं ही एक दीर्घकालीन यात्रा असते.

बाकीच्या पदवीधारकांच्या तुलनेत हे फार वेगळं असतं जिथं मुलींना तीन वर्ष यासाठी सवलत मिळते की लग्न होईपर्यंत जेवढं शिकता येईल शिकून घ्यावं. पण विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रांत करियर करताना पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. त्यानंतर पोस्टडॉक्टरल संशोधन यानंतरच करियर सुरू होतं.
भारतात सक्रिय संशोधकांमध्ये 33 टक्के स्त्रिया
मुली आपली ही अभ्यासयात्रा पूर्ण करताना 30-32 वर्षांच्या होऊन जातात. त्यानंतर त्या स्थायी नोकरीसाठी प्रयत्न करतात. याच काळात भारतीय मुलींवर लग्न करून घर चालवण्याची जबाबदारी येण्याचा दबाव सर्वांत जास्त असतो. मुलींसाठी लग्न म्हणजे आपलं घर, नोकरीची जागा सोडून दुसऱ्या जागी राहणं, जिथं त्यांना पुन्हा नव्यानं त्यांचं करियर सुरू करावं लागतं.
लग्नानंतर अनेकदा सासरची मंडळीच तिच्या करियरचा निर्णय घेतात कारण, दोन ठिकाणी राहून घर-नोकरी करण्याविषयी भारतीय कुटुंब सहसा तयार नसतात आणि हे सोपंही नसतं. द लाईफ ऑफ सायंसेस मध्ये आलेल्या एका मुलाखतीत अनेक महिला वैज्ञानिकांनी याविषयी सहमती दर्शवली आहे की एकाच क्षेत्रातील जोडीदार असेल तर त्याचा फायदा होतो.
विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रात, कारण त्यांना याची समज असते की विज्ञानाच्या क्षेत्रात करियर करणं म्हणजे नक्की काय असतं. भारतीय पितृसत्ताक समाज, केवळ लग्नाच्या बाबतीतच नाही तर मुलांच्या बाबतीतही स्त्रियांकडून हीच अपेक्षा ठेवतो की त्या स्वाभाविकपणे या पर्यायाची निवड करतील. मुल होणं हा एक महत्वपूर्ण बदल असतो ज्यातून स्त्रियांना जावं लागतं.
2010 च्या एका अभ्यासानुसार विज्ञान क्षेत्रांत एकल पुरुषांच्या तुलनेत एकल स्त्रियांची संख्या जास्त होती. मुल नसलेल्या स्त्रियांची संख्याही मुल नसलेल्या पुरुषांपेक्षा जास्तच होती. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रांत काम करत असल्या तरीही त्यांच्याकडून घराची, मुलांची जबाबदारी घेण्याची अपेक्षा ठेवण्यात येतेच.

वैज्ञानिक संमेलनांमध्ये स्त्रियांचा सहभाग कमी
आजच्या रोजच्या आयुष्यातील तंत्रज्ञानाच्या व्यापक उपयोगामुळे, स्टेम शिक्षणाला सशक्त आणि सर्वसमावेशक विकासासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी आवश्यक घटक मानलं जातं. शाश्वत विकास अजेंडा 2030 मध्ये स्टेम मध्ये स्त्रियांना समान प्रतिनिधित्व आणि सहभागीता याचंही कलम आहे. भारतीय विज्ञान जगात सर्वच पातळ्यांवर महिला संशोधकांची उणीव भासते.
त्यांचं प्रतिनिधित्वच कमी नाही तर त्यांना दिलं जाणारं महत्त्वही कमीच असतं. त्यांना कमी मार्गदर्शन मिळतं, पुरस्कार, अनुदान, पदोन्नती या सर्वच बाबतीत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बायसवॉचइंडियाच्या आकडेवारीनुसार स्त्रियांना वैज्ञानिक संमेलनांमध्ये फार कमी वेळा बोलावलं जातं, इतकंच नाही तर विविध स्टेम विषयांमध्ये स्त्रियांची संख्या कमी आहे आणि त्यांच्याबाबतीत लिंगाधारीत भेदभावही केला जातो.
जून 2020 ते ऑगस्ट 2021 या दरम्यान आयोजित विविध 293 स्टेम संमेलनांत 114 मध्ये (39 टक्के) एकही महिला वक्ता नव्हती. 175 संमेलनांत (60 टक्के) पुरुषांच्या तुलनेत स्त्री वक्त्यांची संख्या फारच कमी होती. स्त्रियांची संख्या त्याच क्षेत्रांत जास्त होती ज्यात स्त्रियांचं असणं सामाजिक धारणेला अनुकूल आहे. उदा. सर्व वैज्ञानिक उप-क्षेत्रांतून जीवविज्ञानात महिला फॅकल्टींची संख्या सर्वांत जास्त असते कारण त्याला परंपरेनं सॉफ्ट सायंस समजलं जातं.
पण इंजिनियरिंग, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायंस, फिजिक्स यात महिला फॅकल्टींची संख्या दर केवळ 0.1 इतकाच आहे. आयआयएससी आणि आयआयटी सारख्या उच्च प्रतिष्ठीत संस्थांमध्येही महिला फॅकल्टीची संख्या पुरुषांच्या तुलनेत फारच कमी आहे.
भारतात एकूण 56,747 महिला संशोधिका
भारतात एकूण 56,747 महिला संशोधिका आहेत ज्या देशातील एकूण संशोधकांच्या 16.6 टक्के इतक्या भरतात. तत्कालीन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रीने म्हटलं होतं की महिला संशोधकांसाठी प्रोत्साहन आणि शिष्यवृत्ती वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. भारताचा विज्ञानातील सर्वोच्च पुरस्कार, शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार मागील दोन वर्षांपासून एकाही महिलेला मिळालेला नाही.
1958 साली हे पुरस्कार सुरू झाल्यानंतर आणि असीमा चॅटर्जी हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिला महिला संशोधक ठरल्यानंतर, इतक्या वर्षांत दिल्या गेलेल्या एकूण 592 भटनागर पुरस्कारांमध्ये केवळ 20 महिला विजेत्या आहेत. विज्ञान क्षेत्रांत महिलांसाठी अनेक योजना सुरू आहेत.

याचा उद्देश मुलींना विज्ञानासाठी प्रोत्साहीत करणे आणि मुलांच्या देखरेखीसाठी करियरमधून विश्रांती घेतलेल्या महिलांना पुन्हा येण्यापुरत्याच मर्यादित आहेत. पुनर्प्रवेश योजना असल्या तरी अनेक महिला वैज्ञानिकांना यात स्थायी नोकरी मिळालेली नाही. एखाद्या पदासाठी असलेल्या वयाच्या मर्यादाही त्यांना मारक ठरत आहेत.
समाजात आणखी एक विचारसरणी अशीही आहे की बाया विज्ञान आणि गणितात चांगल्या नसतात. पण भारतात विज्ञान विषय घेणाऱ्या मुलींची संख्या कमी नाही. तरीही मुलींना अनेकदा विज्ञानाऐवजी अन्य क्षेत्रात जाण्यास सांगितलं जातं, जी त्यांच्यासाठी सोपी आहेत असं लोकांना वाटतं किंवा जी कमी खर्चाची असतात.
बहुतांशी प्रमुख संशोधन संस्था या शहरी भागात असतात किंवा शहरांपासून दूर असतात. तिथं जाण्यासाठी प्रवास करणं आणि वारंवार जाणंयेणं करणं महिलांसाठी अनेकदा अडचणीचं ठरतं. प्रवासखर्च वाढतो, वेळ लागतो आणि त्यांच्या संरक्षणाचाही मुद्दा असतो. एका सरकारी आकडेवारीनुसार भारतात संशोधन आणि विकास प्रक्रियेत केवळ 18.6 टक्के स्त्री संशोधिका आहेत.
स्त्रियांची इतकी कमी संख्या असण्याचं कारण त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये अनेकदा व्यत्यय येतो, त्यांना अनेकदा कामावरून सुट्टीही घ्यावी लागते. एका स्त्रीला यशस्वी करिअर करण्यासाठी एका मोठ्या आणि सशक्त आधार यंत्रणेची गरज भासते.
यात आई-वडिल, घरातील अन्य लोक, जोडीदार, सहकर्मी, सल्लागार, मित्र इत्यादींचा समावेश असायला हवा. स्त्रियांना या क्षेत्रांत प्रवेश घेण्यासाठी तसेच इथं चांगलं करिअर करण्यासाठी त्यांना सहायता करण्यासाठी, जनजागृतीसोबतच सांस्कृतिक व सामाजिक पूर्वग्रहांसोबत लढण्याचीही गरज आहे.
यासाठी धोरणकर्त्यांना तशा योजना तयार कराव्या लागतील, यात स्त्रियांसाठी विशेष शिष्यवृत्ती असतील, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन असेल, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळेल, समाजात त्यांना चांगलं वातावरण व प्रतिष्ठा मिळेल, यासाठी आपल्या सर्वांनाच जबाबदारी घ्यावी लागेल.
अनुवाद - प्रतिक पुरी






