भारतीय समाजात जसजशी प्रगती होत आहे, तसतशी शिक्षण आणि नोकरी-व्यवसायांत स्त्रियांचा सहभाग वाढत आहे. गाव, लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये शिक्षण आणि व्यवसायाच्या जास्त संधी असतात. त्यामुळे गावातील मुलं-मुली इथं येतात. शिक्षणासाठी वस्तीगृहांची सोय यांना मिळून जाते. पण नोकरी-व्यवसायात मात्र असं काही होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची राहण्याची सोय स्वतःच करावी लागते. हे सोपं काम नसतं. मुलींसाठी तर ही गोष्ट जास्तच कठीण होते. त्यातही एकल महिलांना नव्या ठिकाणी घर शोधतांना फारच त्रास होतो. वेगवेगळी आव्हानंही येतात.
तुझं नाव शबाना असतं तर घर भाड्याने दिलं नसतं…
25 वर्षीय मनीषा ही उत्तर प्रदेश, मऊ येथील आहे. ती कानपूरला शिकायला आली आहे. तिच्या कॉलेजमध्ये हॉस्टेलची व्यवस्था आहे पण तिथे लोडशेडींग खूप असल्यामुळे तिने भाड्याचं घर घेण्याचा निर्णय घेतला. ती सांगते, “मी जेव्हा घर शोधत होते तेव्हा माझ्यासोबत एक मुस्लिम मैत्रिणही होती. ती मला घर शोधण्यासाठी मदत करत होती. एका ठिकाणी आम्ही पोहोचलो तर घर मालकाने मला माझं नाव आणि जात विचारली.
त्यावर मी म्हटलं की तुम्ही फक्त विशिष्ट जातींच्या लोकांनाच घर भाड्यानं देता का? त्यावर ते म्हणाले आता तुझं नाव मनीषा आहे तर तुला देऊ. पण तुझं नाव शबाना असतं तर दिलं नसतं. मुसलमान नॉनवेज खातात म्हणून.”

(प्रातिनिधिक छायाचित्र)
घर शोधण्यासाठी अलवरच्या निमसरकारी संस्थेत काम करणाऱ्या रुबीनालाही (नाव बदललंय) खूप त्रास झाला. ती म्हणते, “माझ्यासाठी घर शोधणं हा एक कठीण अनुभव होता. मला इतका त्रास होऊ लागला की वाटलं, नोकरी सोडावी आणि गावी निघून जावं. कधी वाटायचं की गावी माझं घर आहे आणि इथं शहरात मला भाड्याचं घर मिळणंही कठीण झालंय. घर शोधण्यासाठी मला चार महिने लागले.
अनेक लोक माझं नाव ऐकूण मला नकार द्यायचे. जेव्हा मी सांगायचे की मी नॉनवेज खात नाही, बनवतही नाही, तर कोणाचा विश्वास बसायचा नाही. दुसरं म्हणजे अनेकांना वाटतं की मुसलमान कचरा खूप करतात. किंवा एकटी मुलगी आहे तर तिच्याकडे मुलं येणंजाणं करतील. यामुळेही अडचणी आल्या. एकदा मी सवर्ण लोकांच्या वस्तीत शिरले. माझे कपडे पाहून त्यांना मी मुसलमान असल्याचा संशय आला नाही. त्यामुळे त्यांनी मला खोली दाखवली.
पण जेव्हा त्यांनी मला माझं नाव विचारलं आणि त्यांना समजलं की मी मुस्लिम आहे तेव्हा त्यांनी लगेच मला घराबाहेर काढलं. इतकंच नाही तर माझ्यासमोरच बादलीतून पाणी आणून खोली धुतली. मला ही गोष्ट आजही खूप त्रास देते.” रूबीना सांगते की अनेकदा अलवरमध्ये घर मालिक स्पष्टपणे सांगतात की इथं भावालाही येण्याची परवानगी नसेल. एकदा तर काही कारण नसताना एका घर मालकाने तिला घर खाली करायला सांगितलं.
‘मुलांना अनुमती नाही, केवळ सुसंस्कृत मुलींसाठी’
घर शोधण्याच्या मोहिमेत घर मालक अनेकदा फालतू प्रश्नांची लड पेटवतात. ते व्यक्तिगत असतात, बेकारही असतात. पुण्यातल्या डॉक्टर ऐश्वर्यानं आपला अनुभव सांगताना म्हटलं, “मी पुण्यात भाड्यानं घर शोधत होते. मी जेव्हा फोन करते तेव्हा माझ्या नाजूक आवाजामुळे अनेकांना मी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी वाटते आणि ते मग तू-तू करून बोलू लागतात.
मी जेव्हा सांगते की मी डॉक्टर आहे तर त्यांचा पुढचा प्रश्न असतो की मी अजून लग्न का केलं नाही किंवा मला लग्न करायचं आहे की नाही. मला हा प्रश्न फारच असभ्य वाटतो. घर भाड्यानं देतांना मालकाच्या अनेक अटी असतात. विशेष करून एकल बायांसाठी. मी जेव्हा फेसबुकवर घर शोधत होते तेव्हा घरांच्या जाहिरातींमध्ये अनेकदा, ‘मुलांना अनुमती नाही, केवळ सुसंस्कृत मुलींसाठी,’ असा उल्लेख असायचा.
एखादा माणूस आपल्या खोलीत काय करतोय याच्याशी घरमालकाला काय करायचंय? तुम्ही आम्हाला घर देता याचा अर्थ तुम्ही आमचं जगणंही कंट्रोल कराल का? माझ्याकडे पैसा आहे त्यामुळे मी महागड्या फ्लॅटमध्येही राहू शकते. पण प्रत्येक मुलीला, बाईला हे शक्य नसतं. ही आपल्या समाजाची एक दुःखद बाजू आहे.”

(प्रातिनिधिक छायाचित्र)
घर मालक ज्या अटी-प्रतिबंध लावतात त्याविषयी बँगलोरची 34 वर्षीय शिक्षिका अमृता (नाव बदललंय) सांगते, “घर शोधत असताना काही माणसं स्पष्टपणे सांगत नाही की त्यांना माझ्या मित्रांच्या येण्याजाण्यावर हरकत आहे. ते ही गोष्ट फिरवून विचारतात. म्हणजे, तुझे मित्र मग इथे नेहमीच येतील का? त्यांना माझ्या पुरुष मित्रांविषयी जास्त चिंता असते हे माझ्या लक्षात येतं.
माझे मित्र आले तरी त्यांच्याशी त्यांना काही घेणं-देणं असण्याचं कारण नाही.” ती पुढे सांगते की शिक्षिका असल्यामुळे तिला पगार कमी आहे त्यामुळे तिला बजेटमध्ये बसणारं घर पाहिजे. पण बँगलोरमध्ये साध्या घरांचं भाडंही खूप असतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणी घर शोधणं फार महाग आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जर आपण या मुलींना सांगितलेल्या आव्हानांचा विचार केला तर दिसेल की काही गोष्टी मुलांसाठी, मुलींसाठी सारख्याच आहेत. उदा. भिन्नलिंगी मित्रांच्या येण्यावर प्रतिबंध, वाढतं भाडं, खाण्यापिण्यावरच्या हरकती इत्यादी. पण त्यासोबतच अनेकदा घर मालक मुलींसाठी हेही निश्चित करतात की त्यांनी किती वाजता घरी परत यावं.
घर शोधताना एकल बायकांना जास्तकरून पुरुष मालकांसोबतच बोलावं लागतं. कारण तेच अशा कामात जास्त करून असतात. मग ते घर मालक असो वा ब्रोकर असोत. ही माणसं असेही व्यक्तिगत प्रश्न विचारतात जे विचारण्याची गरज नसते. काही बायकांना थोड्या काळासाठीच घर भाड्यानं हवं असतं. घर मालकांनी त्या बाईला सुरक्षित घर देणं इतकंच करणं अपेक्षित आहे. तिच्या व्यक्तिगत आयुष्यात दखल देण्याचा त्यांना अधिकार नाही की गरजही नाही.
घर शोधतांना बायांनाही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदा. शेजारीपाजारी कशी परिस्थिती आहे? तिथे जाण्यायेण्याची नीट सोय आहे की नाही? दाराची कुलूपं नीट आहेत का? आत कुठे लपवलेले कॅमेरे तर नाहीत ना? जिथे सुरक्षा रक्षक आहे अशा ठिकाणी शक्यतो घर घेणं घरी एखाद्या कामासाठी कोणाला बोलावलं तर आपण घरात एकटं न राहणं आणि घराचे दरवाजे उघडे ठेवणं घर अगदीच एकट्या ठिकाणी नाही याचाही विचार करावा.
घर मालकासोबत असलेल्या आपल्या नात्याविषयीही जागरूक राहावं. घर मालक आपला गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्यावी. घर मालक अनेकदा अचानकच घर खाली करायला लावतात. आजकाल किमान 11 महिन्यांचं लिव्ह एग्रीमेंट केलं जातं. त्यामुळे घर मालक घर खाली करण्याची जबरदस्ती करू शकत नाही. अर्थात याला अपवाद आहेत.
याशिवाय तुमच्या परवानगीशिवाय घर मालक तुमच्या जागेवर कधीही येणंजाणं करू शकत नाही. त्यानं तुमच्या प्रायव्हसीचा आदर करणं अपेक्षित आहे. तो तुमचा अधिकार आहे. असं न झाल्यास तुम्ही, स्त्री-पुरुष कोणीही असला तरी कायद्याचा आधार घेवू शकता.
सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया
अनुवाद - प्रतिक पुरी






