उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील एक-दोन नाही तर सुमारे 35 गावांमध्ये लांडग्यांनी दहशत पसरवली. आतापर्यंत लांडग्यांच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेल्यामुळे गावकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या बळींमध्ये चिमुकल्यांचा समावेश असून 25 पेक्षा अधिक लोक लांडग्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. यातल्या सहा लांडग्यांच्या टोळीतील पाच लांडग्यांना जेव्हा उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांनी पकडलं तेव्हाच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला… हे लांडगे लोकांवर, विशेषतः लहान मुलांवर हल्ले करत असल्याचा संशय होता.
देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे संरक्षण जीववैज्ञानिक, शहीर खान या लांडग्यांना पकडण्यात वनविभागाची मदत करत होते. मागील आठवड्यात त्यांनी म्हटलं होतं की, चांगली बातमी ही आहे की मागील आठवड्यात कोणताही हल्ला झालेला नाही. पण त्यानंतर लगेच जिल्ह्यात तीन हल्ल्यांची सूचना मिळाली. 10 आणि 11 सप्टेंबरला दोन मुली आणि एका महिलेवर हल्ला झाला. एक हल्ला झाल्यानंतर काही दिवस जायचे आणि पुन्हा हल्ले व्हायचे. त्यामुळे पोलिसांनी आता हल्लेखोर जनावरांना पकडलं असलं तरीही लोक मात्र भयमुक्त झालेले नाहीत.
स्थानिक मनोज कुमार शुक्ला म्हणतात की, “हल्लेखोर जनावर हे पकडण्यात आलेल्या लांडग्यापेक्षा वेगळं आहे. पकडला गेलेला पाचवा लांडगा कालच आम्ही पाहिला होता. लोकांच्या जवळून जातांना त्यानं त्यांच्यावर हल्ला केला नाही. दुसरा लांडगा आहे जो राहून राहून हल्ले करतोय, तो आता पुढच्या आठवड्यात हल्ला नक्कीच करेल.”

‘ऑपरेशन भेडिया’ हा नेमका काय प्रकार आहे?
अली अहमद यांच्या घरासमोरूनच त्यांच्या एक वर्षांच्या मुलाला वन्य प्राणी उचलून घेऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच मिळाला. त्याआधी लांडग्यांच्या हल्ल्यात दहा लोक मारले गेले होते. यात नऊ लहान मुले आहेत. 35 लोक जखमीही झाले आहेत. बहराईचचे प्रभागीय वनाधिकारी अजीत प्रताप सिंह यांच्यानुसार पहिली घटना 23 मार्चला घडली.
मग जुलैमध्ये काही हल्ले झाले. त्यानंतर विभागाने एक लांडगा आणि त्याच्या पिल्लाला पकडलं. पण त्यानंतरही हल्ले होतच राहिले. शेवटी जनावरांना पकडण्यासाठी आणि स्थानिकांना बाहेर काढण्यासाठी वनविभागाने जुलै महिन्यात ‘ऑपरेशन लांडगा’ सुरू केलं.
स्थानिक आणि वनाधिकारी कोणत्याही पुराव्याशिवाय लांडग्यांना या हल्ल्यांसाठी जबाबदार ठरवत आहेत. संरक्षणवादी वाय. व्ही. झाला म्हणतात, “कोणताही डीएनए पुरावा नाही, छायाचित्र नाही, लांडग्यांच्या पायांचे ठसेही सापडलेले नाहीत. काही ठिकाणी पायांचे ठसेच मिळाले नाहीत.” पण वन विभाग या भागात ड्रोनच्या सहाय्याने काढलेल्या लांडग्यांच्या एका समुहाच्या छायाचित्रावरून त्यांना या हल्ल्यांसाठी जबाबदार ठरवत आहे. अजीत प्रताप सिंह म्हणतात, “हल्ले झालेल्या ठिकाणी हे लांडगे असल्याची माहिती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की तेच यासाठी जबाबदार आहेत.”
हवामान बदलामुळे वन्य प्राण्यांचे अधिवास संकटात आल्यानंतर हे हल्ले सुरू झाल्याचं निदान आधी करण्यात आलं होतं. घाघरा नदीच्या काठावरील लहान बेटांवर राहणाऱ्या लांडग्यांची घरं मुसळधार पावसामुळे वाहून गेली. त्यानंतर ते मानवी वस्तीत शिरल्याचं म्हटलं जातं.

गावकऱ्यांनी लांडगा समजून जंगली कुत्रे, कोल्हे यांनाही मारून टाकले
नेपाळच्या सीमेवरील बहराईच जिल्ह्यात जंगलं आणि घाघरा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गावांमध्ये सध्या अफवांचा बाजार भरलेला आहे. गावांमधील शाळा बंद आहेत आणि गावकरी रात्रभर जागून गस्त घालतात. लोडशेडिंगमुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढतात. अली अहमद सांगतात की, गावकरी रात्री दोन-अडिचपर्यंत गस्त घालतात. बायका आणि मुलं घरी झोपतात. ते पुढे म्हणतात की त्यांचा मुलगा गेल्यावरही लोक अशीच गस्त काही दिवस घालत होते. नंतर ती बंद झाली.
जंगली कुत्री, कोल्हे आणि लांडगे यांच्यातील अंतर न समजल्याने लोकांचा राग या सर्वांवरच निघाला. त्यात काही कोल्हे बळी पडले. वैज्ञानिकांनी नंतर कोल्हे आणि लांडगे यांच्यातील अंतर दाखवणारे काही व्हिडीयो सोशल मीडियावर टाकले. दुसरीकडे सनसनाटी बातम्या देणाऱ्या माध्यमांनी परिस्थिती आणखी गंभीर केली. काहींनी लोकांनी मारलेल्या जनावरांची दृश्ये दाखवली तर काहींनी लांडग्यांना खूनी ठरवून अतिरंजित चित्रण केलं.
खान सांगतात, “लांडगे नरभक्षक नसतात. शक्यता आहे की त्यांनी घाबरून मुलांवर हल्ले केलेत किंवा झुडूपात लपलेली हिरणं अथवा ससे समजून. गावांमध्ये मुलं नेहमीच झाडाझुडूपांत शौचासाठी जात असतात.” लांडगे एरव्ही लाजाळू आणि लपून राहणारे प्राणी असतात. ते सहसा मानवी वस्तीत शिरत नाहीत. तरीही लांडग्यांचे हल्ले होत आले आहेत.

बहराईचमध्ये दहशत लांडग्यांचीच की इतर कुठल्या जनावराची?
काहींचं म्हणणं आहे की, बळींच्या जखमांवरील डीएनए तपासणीतून हे हल्ले लांडग्यांचेच आहेत असे संकेत मिळाले आहेत. पण वनविभागानं याची पुष्टी केली नाही. पर्यावरणतज्ञ इरावती माजगावकर सांगतात की, काही शोधपत्रकार परिस्थितीची नेमकी स्थिती समजण्यासाठी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती गोळा करण्याच्या तयारीत आहेत. पर्यावरणतज्ञ अभी तमीम वनक, सांगतात की, डीएनए परिक्षणांची पुष्टी होण्याआधीच लांडग्यांना हल्लेखोर ठरवणं, त्यांच्याविषयी भडक बातम्या देणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे.
यामुळे लांडग्यांच्या आधीच कमी होत जाणाऱ्या संख्येवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. भारतीय लांडगा सध्या नष्ट होण्याच्या धोक्यात आला आहे. देशात त्याची संख्या फक्त ३ हजार इतकीच राहिली आहे. लांडगे बहुधा शेतीच्या, शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांच्या आसपास राहतात. बदला घेण्यासाठी केलेले हल्ले आणि मानवीय शत्रूता यामुळे त्यांची संख्या खालावत आहे. हल्लेखोर जनावर नेमकं कोण आहे याविषयी अजूनही केवळ अफवाच आहेत.
एकाच पिसाळलेल्या लांडग्याने केलेला हा हल्ला आहे की अन्नाच्या कमतरतेमुळे लांडग्यांची टोळी हे हल्ले करित आहे, हे स्पष्ट व्हायचं आहे. झाला म्हणतात, हे एखादं अपंग, अशक्त जनावरही असू शकतं जे आता शिकार करू शकत नाही. पण लहान मुलांची शिकार करणं त्याला सोपं आहे. काहीजण लांडगा आणि जंगली कुत्रा यांच्या संकरातून निघालेल्या प्राण्याकडे बोट दाखवतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हे संकरीत प्राणी आढळले आहेत.
बदलत्या परिस्थितीमुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होण्यास सुरूवात होते. पण या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वनविभाग तैयार का नव्हता ही चिंतेची बाब आहे. परिस्थितीतील बदल ही काही आजची गोष्ट नाही. त्यामुळे वनविभागाने आधीच सावध राहून याविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज होती जे झालं नाही. पण सिंह म्हणतात की, लांडगे असे हल्ले करत नसतात, त्यामुळे वनविभागही चक्रावून गेला होता.
लांडगे नेहमीच माणसांसोबत राहत आले आहेत आणि ते केवळ पाळीव जनावरांचीच शिकार करतात. सिंह म्हणतात, “ते बकऱ्या आणि वासरू लांबवायचे. उसाच्या आणि धानाच्या शेतांत त्यांना लपायला चांगली जागा होती. ते लहान प्राणी मारतात. पण यावेळेस त्यांनी मुलांना मारायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांना त्यांच्या मुलांना घरीच ठेवायला सांगितलं ज्यामुळे लांडगे त्यांची नेहमीची शिकार करतील.”

बदललेली शेतीची पद्धत आणि लांडग्यांचा अधिवास
तराई भागातील जंगलं आणि गवताची मैदानं आता शेतीत बदलत आहेत. लांडगे यातही दीर्घकाळापासून धनगरांसोबत राहत आले आहेत. ते कधी कधी गाय-म्हशी मारतात पण एरव्ही लहान प्राणी आणि कठीण काळात फळं खाऊन किंवा उंदीर मारून जगतात. इथले गावकरी स्वतःच मागासलेले आहेत. अनेकांना घरं नाहीत. ते उघड्यावरच झोपतात. त्यामुळेही जनावरं त्यांची शिकार करायला उद्युक्त होतात. आपल्या मुलांपेक्षा ते आपल्या पाळीव जनावरांच्या सुरक्षेची जास्त व्यवस्था ठेवतात. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत.
वन्यजीवतज्ञ म्हणतात की आता सध्याच्या संरक्षण प्रणालीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. भारतात वन्यजीव आणि माणसं दीर्घकाळापासून एकत्र राहिलेले आहेत. जंगली जनावरं केवळ जंगलातंच राहतील ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. वनक सांगतात, “जसजसे वन्यजीव संरक्षणाचे परिणाम दिसू लागतील, आम्हाला अधिक संभावित संघर्षांसाठी तयार राहावं लागेल.” वनक या भागांमध्ये वन्यजीव स्वयंसेवी संस्थांसाठी फंडींग आणि सहायता देण्याच्या बाजूने आहेत. त्यांनी वनविभागासोबत सहमतीने काम करणं अपेक्षित आहे.
एखाद्या आपत्तीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्याची शिफारसही ते करतात. दुसरीकडे बहराईच वन विभाग या घटनांकडे भविष्यातील पशू-मनुष्य संघर्षाची केस-स्टडी म्हणून बघतोय. सिंह सांगतात, “वनविभागाची कार्यक्षमता वाढली आहे. पायाचे ठसे ओळखणे, जाळी लावणे, पिंजऱ्यांचा चांगला उपयोग करणे यात वनकर्मचारी आता सक्षम झाले आहेत. या ऑपरेशनच्या वेळी आमच्यातील मागच्या अनेक उणीवा आम्ही दूर केल्या. याचा भविष्यात आम्हाला फायदाच होणार आहे.”
(सौजन्य - मोंगाबे इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






