गावातल्या शेतात तीन-चार बायका काम करत असताना एक तरुण त्यांच्याजवळ येतो आणि त्याच्या व्हिडीओमध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. त्यानंतर लगेचच त्या बायका डोक्यावरील पदर नीट करून, चेहऱ्यावर स्मित हास्य आणून तरुणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या कॅमेरासमोर उभे राहतात. 32 वर्षांचा युटयूबर जय वर्मा त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो आणि पुढे निघून जातो.
गावात आणखी थोडं पुढे गेल्यावर एक ग्रुप त्यांचा सेटअप लावण्यात व्यग्र दिसतो. त्या ग्रुपमधील 26 वर्षीय राजेश दिवार हिप हॉप डान्स करतो आणि त्याचा व्हिडीओ दुसरा मुलगा मोबाइलमध्ये रेकॉर्ड करतो.
ही सर्व दृश्ये आहेत छत्तीसगडमधल्या रायपूरजवळच्या तुलसी या गावातील. तसं हे गाव इतर सर्वसामान्य गावांसारखंच आहे. पण त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ही ओळख म्हणजे ‘युट्यूब कॅपिटल’. या लेखाच्या सुरुवातीला ज्या काही दृश्यांचं वर्णन केलंय, ती सर्व दृश्ये गावकऱ्यांनी युट्यूबवरील कंटेट तयार करण्यासाठी टिपली आहेत.
युट्युबवालं गाव, साऱ्या पंचक्रोशीत चर्चा
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून फक्त एक तासाच्या अंतरावर तुलसी हे छोटेसे गाव आहे. या गावाने भारतातील ‘युट्यूब व्हिलेज’ म्हणून नाव कमावले आहे. या गावातील 4,000 रहिवाशांपैकी 1,000 हून अधिक रहिवासी यूट्यूबसाठी कंटेंट तयार करतात. 2016 मध्ये जय आणि ज्ञानेंद्र शुक्ला या दोन रहिवाशांनी व्हिडिओ कंटेंट निर्मितीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ एडिटिंग किंवा डिजिटल निर्मितीचा कोणताही अनुभव नसलेले जय, शिक्षक आहेत, तर ज्ञानेंद्र माजी नेटवर्क इंजिनिअर.
जय आणि ज्ञानेंद्र यांना सुरुवातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कॉपीराइट समस्यांमुळे व्हिडिओ अनेकदा काढून टाकले जात होते. तसेच त्यांच्याकडे पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. पण, न डगमगता, त्यांनी चिकाटी दाखवली आणि 2018 मध्ये, युट्यूबवर ‘बीइंग छत्तीसगढिया’ हे चॅनल लाँच झाल्यानंतर त्यांच्या चिकाटीला फळ मिळाले.
एका लहान, प्रायोगिक उपक्रमाच्या रूपात सुरू झालेले हे चॅनेल लवकरच खूप मोठे झाले. या चॅनेलला हजारो सबस्क्राइबर्स मिळाले आणि निर्मात्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. याबाबत ज्ञानेंद्र यांनी बेटर इंडियाला माहिती दिली होती. असे वृत्त मनी कंट्रेलने दिले आहे.
तुलसीतील व्हिडिओ कंटेंट क्रिएटर्स, त्यांचे व्हिडिओ सर्वांना पाहता येतील असे आणि त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसेल याची काळजी घेतात. त्यांच्या व्हिडिओंमध्ये बहुतेकदा परंपरा, शेती, स्थानिक निवडणुका, गावातील रीतिरिवाज आणि परंपरा जपण्यावर लक्ष केंद्रित केलेल असते.
महिन्याची कमाई
आज, तुलसीमधील व्हिडिओ क्रिएटर्सचे युट्यूबवर सुमारे 40 चॅनेल्स आहेत, ज्यांची संख्या वाढतच चालली आहे. ‘बॅक बेंचर्स क्रिएशन’ (24,800+ सबस्क्राइबर्स) आणि ‘निमगा छत्तीसगढिया’ (9,200+ सबस्क्राइबर्स) सारखे चॅनेल्स लोकप्रिय होत आहेत. बहुतेक चॅनेल युट्यूब जाहिरातींच्या उत्पन्नातून महिन्याला 20,000-40,000 रुपये कमवतात. जाहिरातींव्यतिरिक्त, काही निर्मात्यांना छोट्या-मोठ्या जाहिराती आणि उत्पादनांच्या जाहिरातींसाठी करार मिळाले आहेत.
14 फेब्रुवारी 2025 रोजी युट्यूबचा 20 वा वर्धापन दिन होता. काही वृत्तांनुसार प्रत्येक महिन्याला सुमारे 2.5 अब्ज लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात आणि भारत हा युट्यूबच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांमध्ये युट्यूबने केवळ वेब विश्वात बदल घडवून आणले नाहीत, तर आपला विचार करण्याचा संपूर्ण दृष्टीकोनच बदलला आहे. युट्यूबचा जगावर किती परिणाम होतोय, हे दाखवण्यासाठी तुलसी गाव हे सर्वोत्तम उदाहरण आहे. काहींचं तर संपूर्ण आयुष्यच ऑनलाइन व्हिडीओभोवती फिरतंय.
“युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्याच्या कामात गुंतलेली मुलं ही सहसा वाईट सवयी किंवा गुन्हेगारीच्या आहारी जात नाहीयेत. आमच्या गावातील कंटेंट क्रिएटर्सचा आम्हाला खूप अभिमान आहे”, असं तुलसी गावातील शेतकरी नेत्राम यादव ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
सुरुवात कशी झाली?
2018 मध्ये जय वर्मा आणि त्याचा मित्र ग्यानेंद्र शुक्ला या दोघांनी मिळून ‘बीईंग छत्तीसगढियाँ’ या नावाने युट्यूब चॅनल सुरू केलं. तिथूनच तुलसी गावाच्या परिवर्तनाची गोष्ट सुरू झाली. “आम्हाला आमच्या रोजच्या आयुष्यातून समाधान मिळत नव्हतं. आम्हाला आमच्या क्रिएटिव्हीचा वापर करून काहीतरी नवीन करायचं होतं”, असं वर्मा सांगतो.
या दोघांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले पहिले दोन व्हिडीओ विशेष काही चालले नाहीत. पण यांचा तिसरा व्हिडीओ युट्यूबवर तुफान व्हायरल झाला होता. ‘व्हॅलेंटाइन डे’ला बजरंग दलाकडून एका तरुण जोडप्याला मार देतानाचा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओवर छत्तीसगडच्या स्टाइलने उपरोधिक कॉमेंट्री करण्यात आली होती आणि तीच नेटकऱ्यांना खूप आवडली होती. विनोदासोबतच त्यात सामाजिक संदेशसुद्धा होता.
या व्हायरल व्हिडीओमुळे दोघांना अवघ्या काही महिन्यांतच हजारो फॉलोअर्स मिळाले. हळूहळू ‘बीईंग छत्तीसगढियाँ’ या युट्यूब चॅनलच्या सबस्क्राइबर्सची संख्या 1 लाख 25 हजारांवर पोहोचली आणि त्याची एकूण व्ह्यूअरशिप 260 दशलक्षांपेक्षा अधिक झाली. ही मुलं सोशल मीडियावर खूप वेळ घालवल्याने सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांना चिंता होऊ लागली होती.
मात्र जसजसे युट्यूबकडून पैसे मिळू लागले, तसतशी त्यांची ही चिंता कमी होत गेली. “आम्ही महिन्याला 30 हजार रुपयांपेक्षा अधिक (सुमारे 346 डॉलर) कमवत होतो. आम्हाला व्हिडीओसाठी मदत करणाऱ्यांनाही आम्ही हे पैसे देऊ लागलो. नंतर आम्ही दोघांनी पूर्णवेळ कंटेंट क्रिएट करता यावा यासाठी नोकरी सोडली”, शुक्लाने सांगितलं.
युटयूबमुळे गावात घडला बदल
वर्मा आणि शुक्ला या दोन तरुणांच्या यशामुळे तुलसी गावातील इतरांनाही प्रेरणा मिळाली. या दोघांनी केवळ त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी व्हिडीओ बनवले नाहीत, तर इतरांनाही एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग यांचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर इतर गावकऱ्यांनीही स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले आणि काहींनी कंटेंट क्रिएशनसाठी इतरांना मदत केली. गावात होणारा हा बदल तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी पुरेसं होतं. गावातील कंटेंट क्रिएटर्सच्या यशाने प्रभावित होऊन राज्य सरकारने 2023 मध्ये तुलसी गावात अत्याधुनिक स्टुडिओ स्थापन केला.
तुलसीसह रायपूर जिल्ह्यातील माजी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ नागरी सेवक सर्वेश्वर भुरे म्हणतात, “मला हा स्टुडिओ गावकऱ्यांना देऊन ग्रामीण आणि शहरी जीवनातील दरी भरून काढायची होती. त्यांचे व्हिडीओ प्रभावी आहेत. त्यातील थीम जबरदस्त असतात. म्हणूनच ते लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचतात. गावात स्टुडिओ उभारणं हा त्यांना प्रेरणा देण्यासाठीचा एक मार्ग होता.”
गावात बनलेल्या या स्टुडिओचा गावकऱ्यांनी युट्यूबवरील व्हिडीओ बनवण्यासाठी पुरेपूर वापर केला. पाहता पाहता युट्यूबने तुलसी गावातील शेकडो तरुणांसाठी उपजीविकेचं साधन निर्माण केलं. त्यामुळे प्रादेशिक मनोरंजन उद्योगाला चालना मिळाली आणि छोट्याशा गावातील तरुण मंडळी यांची जगभरात लोकप्रिय युट्यूबर्स म्हणून ओळख होऊ लागली.
पिंकी साहू झाली व्हायरल
तुलसी गावात अनेक युट्यूब स्टार्स उदयाला आले आणि त्यात 27 वर्षीय पिंकी साहूने बाजी मारली. ग्रामीण भागातल्या पिंकीचं अभिनेत्री आणि डान्सर बनण्याचं स्वप्न होतं. कुटुंबीय आणि शेजारीपाजाऱ्यांच्या टीकांनी खचून न जाता पिंकी तिच्या डान्सचे व्हिडीओ इन्स्टाग्राम रिल्स आणि युट्यूब शॉर्ट्सवर पोस्ट करत राहिली.
‘बीईंग छत्तीसगढियाँ’ या युट्यूब चॅनलच्या मालकाने जेव्हा तिचा व्हिडीओ पाहिला, तेव्हा त्याने स्वत:च्या प्रॉडक्शनसाठी तिला कामावर घेतलं. तिथूनच पिंकीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि तिला चित्रपटांच्याही ऑफर्स मिळू लागल्या.
तुलसीमधील आणखी एक रहिवासी आदित्य भागेल याने कॉलेजमध्ये असताना वर्मा आणि शुक्ला यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वर्षभरात त्याचे वीस हजारहून अधिक फॉलोअर्स झाले आणि युट्यूबद्वारे त्याने पैसे कमवायला सुरुवात केली.
अखेर त्यालाही ‘बीईंग छत्तीसगढियाँ’च्या टीममध्ये लेखन आणि दिग्दर्शनाचं काम मिळालं. आदित्यचं यश इथवरच थांबलं नाही. तर त्याला एका आगामी बिग बजेट चित्रपटासाठी पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी मिळाली. युट्यूब नसता तर हे सर्वकाही शक्य झालं असतं, अशी तुलसी गावकऱ्यांची भावना आहे.
युट्यूबमुळे गावकरी महिला बनल्या कंटेंट क्रिएटर्स
युट्यूबने तुलसी गावातील महिलांच्या आयुष्यातही अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. सुरुवातीला या गावातील महिला युट्यूब व्हिडीओसाठी त्यांच्या मुलांची मदत करायचे. पण आता त्यांचे स्वत:चे युटयूब चॅनल्स आहेत. ही गोष्ट एकेकाळी कल्पनेपलीकडची होती. युट्यूबसाठी व्हिडीओ बनवण्याच्या कामाकडे या गावातील गावकरी अत्यंत गांभीर्याने पाहतात. तितक्याच गांभीर्याने ते इतरांनाही मदत करतात.
कोविड 19 महामारीच्या काळात भारतात ग्रामीण भागात कंटेंट क्रिएटर्सची संख्या खूप वाढली होती. सुरुवातीला टिकटॉकवर हे व्हिडीओ पोस्ट केले जायचे. मात्र 2020 मध्ये टिकटॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर नेटकरी इन्स्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्सकडे मोठ्या प्रमाणात वळले. लॉकडाऊनमध्ये महिला कंटेंट क्रिएटर्सचाही आकडा झपाट्याने वाढला. काहींनी त्यातून स्वत:चा बिझनेस सुरू केला.
युट्यूबमुळे यशस्वी आणि स्वावलंबी बनलेली पिंकी साहू आता तुलसी गावातील इतर मुलींनाही प्रेरणा देते. “जर मी माझी स्वप्नं पूर्ण करू शकले, तर त्याही करू शकतात. मुलींनी मोठी स्वप्नं पाहणं आणि उच्च ध्येय गाठणं हा माझ्या प्रवासाचा सर्वांत महत्त्वपूर्ण भाग आहे. आता गावातील इतर मुलीसुद्धा निर्माती बनण्याची आकांक्षा बाळगतात”, असं ती म्हणाली.
आजवर सोशल मीडियाचे तोटे अनेकांनी सांगितले असतील. डिजिटल डिटॉक्स किंवा डिजिटल ब्रेक या नव्या संकल्पनाही तुमच्या कानांवर पडल्या असतील. परंतु सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास छोट्यातल्या छोट्या गावातही आर्थिक आणि सामाजिक बदल घडू शकतो, हे तुलसीच्या गावकऱ्यांनी सिद्ध केलंय.






