‘’त्याकाळी या सेटलमेंटमध्ये 800 पेक्षा अधिक कुटुंब राहायची. तीन तारांच्या कुंपणात आम्हाला ठेवण्यात आलं होतं… या तारेच्या कुंपण्याच्या आत दोन भाग होते, जास्त गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना डबल तारेच्या आत आणि उवरित सगळे बाहेर. सेटलेमंटच्या आतमध्ये छोट्या पानगवताच्या झोपड्या होत्या, त्यात आम्ही राहायचो.
तारेच्या कुंपणात असलेल्या या सेटलमेंट नावाच्या वस्तीत आम्ही सगळं करायचो, म्हणजे शिकायचो, खायचो, प्यायचो, खेळायचो… पण जे काही करायचो ते कुंपण्याच्या आतच. तारेच्या कुंपणापलीकडे असलेल्या जगात जाण्याची आम्हाला परवानगी नव्हती… कारण ‘त्यांच्या’ मते आम्ही जन्मजात गुन्हेगार होतो. असाच शिक्का आमच्या कपाळावर मारण्यात आला होता. बाहेरच्या जगासाठी आम्ही समाज विघातक होतो.’’
सोलापूर शहरात आजही अस्तित्वात असलेल्या सेटलमेंट नावाच्या वस्तीत राहणारे 85 वर्षांचे भगवान गायकवाड माहिती देताना भुतकाळात पोहचले होते. आजही या सेटलमेंट परिसरात 75 वर्षांपूर्वीचे अवशेष आढळतात.

(जुन्या शाळेचे अवशेष)
सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये आजही ते अवशेष शिल्लक आहेत
सेटलमेंट… अर्थात एक खुला तुरुंग. ब्रिटिशांच्या कल्पक डोक्यातून निघालेली एक भयावह योजना. प्राचीन काळापासून आपल्या देशात अनेक लोकसमूह भटके जीवन जगत आहेत. ब्रिटिश राजवटीत म्हणजे साधारण अठरा -एकोणिसाव्या शतकात इंग्रज अधिकाऱ्यांनी 'जंगल कायदा' आणला. यामुळे जंगलावर / निसर्गावर पूर्णपणे आश्रित असलेल्या आदिवासी, भटक्या समूहांची प्रचंड कोंडी झाली. इंग्रजांनी सत्तेच्या आणि शस्त्राच्या जोरावर या समूहाला शरण आणण्याचा आणि त्यांचा नैसर्गिक प्रदेश काबीज करण्याचा घाट घातला.
इंग्रजांच्या या नीतीविरुद्ध आदिवासी आणि भटक्यांनी जोरदार प्रतिकार केला. बंगाल, ओरिसा वगैरे राज्यात त्याकाळी मोठे बंड झाले होते. भलेभले संस्थानिक इंग्रजांना शरण गेल्यानंतरही आदिवासी, भटक्यांनी मात्र इंग्रजांना जेरीस आणले होते.
पुढे 'आर्म्स अॅक्ट' पास करण्यात आल्यामुळेही मोठा संघर्ष निर्माण झाला. या असंतोषातूनच 1857 चे बंड झाले. या बंडात आदिवासी आणि भटक्यांची कामगिरी लक्षणीय होती. हे लोक शरण येत नाहीत, हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी कायदा सुव्यवस्थेच्या नावावर 1871 साली 'गुन्हेगार जमाती कायदा' (criminal tribes act) आणला आणि या कायद्यांतर्गत देशातील सुमारे 198 जमातींना कायदेशीर गुन्हेगार ठरविण्यात आले. या कायद्यामुळे या जमातीवर 'चोर' किंवा 'गुन्हेगार' असण्याचा शिक्का मारला गेला.

या जमातीत जन्माला आलेला प्रत्येक जण गुन्हेगार ठरला. या कायद्यामुळे पोलिसांना आणि गावकऱ्यांनाही भटक्या- आदिवासींना क्रूरपणे छळण्याचा जणू अधिकृत परवानाच मिळाला. या घटनेचा परिणाम असा झाला की, भटक्या विमुक्तांचे कौटुंबिक / सामाजिक स्वास्थ्य नष्ट झाले. त्यांची भौतिक आणि मानसिक शांतता भंग पावली. कोणत्याही गावात तीन दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांना थांबता येत नव्हते. पोलीस पाटलांकडे रात्री-अपरात्री जाऊन हजेरी लावणे किंवा किंवा त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंची, प्राण्यांची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले.
त्यांचा भयंकर छळ सुरू झाला. त्यांच्या स्त्रिया आणि मुलींवर अत्याचार होऊ लागले. केवळ संशयावरून त्यांना जनावरांप्रमाणे मारहाण करण्यापासून थेट हत्येपर्यंत - अनेक घटना घडल्या. 'गुन्हेगार जमाती कायदा' मानगुटीवर बसल्यामुळे 'न्याय मागायचा कुणाकडे?' असा प्रश्न निर्माण झाला. या कायद्यामुळे स्थानिक प्रशासनाला अमर्याद अधिकार प्राप्त झाले आणि त्यांनी या कायद्याचा अत्यंत निर्दयीपणे वापर केला.
माणूस म्हणून जगण्याचा हक्कच हिरावून घेतला
माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला गेला. स्थिरता नसल्यामुळे भीक मागणे किंवा छोट्या-मोठ्या चोऱ्या करणे याशिवाय अन्य कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरला नाही. पुढे इंग्रजांनी 1924 साली 'सेटलमेंट ऍक्ट' पास करून भटक्या विमुक्तांना 'सेटलमेंट कॅम्प' मध्ये भरती केले. देशभरात सुमारे बावन्न सेंटर निर्माण करण्यात आले. ज्याद्वारे त्यांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला. (शाळा, रोजगार, जमीन कसणे इत्यादी) 'फ्री कॉलनीज' या नावाने या वसाहती ओळखल्या जात होत्या. अर्थात इथूनही त्यांना मुक्ती नव्हतीच.

पुढे 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारत सरकारने ह्या जमातींना गुन्हेगार ठरविणारा कायदा रद्द केला. स्वातंत्र्यानंतर 'गुन्हेगार जमात कायदा','गुन्हेगारी जमाती वसाहतीकरण कायदा' हे दोन्ही कायदे रद्द केले. 31 ऑगस्ट 1952 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 'गुन्हेगारी' जमातीना काटेरी तारेतून मुक्त केलं. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूनी भाषणात म्हणाले 'आज तुम्हाला मी मुक्त करीत असल्याने तुम्ही विशेष मुक्त आहात.
म्हणून तुम्हाला आजपासून विमुक्त नावाने संबोधण्यात येईल .'विमुक्त जमातींना तारेच्या कुंपणातून मुक्त करण्यात आले. म्हणून तो दिवस गुन्हेगार जमातीसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. पुढे 1960 साली पंतप्रधान नेहरूंनी सोलापूर शहरातील या सेटलमेंटला भेट दिली होती.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र राज्या यांच्यातर्फे 72 व्या विमुक्त दिनाच्या निमित्ताने राज्यभरात संवाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा सोलापूर शहरातील सेटलमेंट वस्तीत पोहचल्यानंतर 'सेटलमेंट जेल' मधील लोकांचे अनुभव,आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ने घेतला.
राज कपूर सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये आले होते
सेटलेमेंटमध्ये अनेक वर्षांपासून राहणारे भगवान गायकवाड सांगतात, गुन्हेगार जमात कायद्यानुसार आठशेच्या वर कुटूंब सोलापूर सेटलमेंटमध्ये होती. तीन तारेच्या कूपनमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं होत.पहिली सिंगल तार होती. त्याच्या आतमध्ये दोन भाग होते. जास्त गुन्हे केलेल्या गुन्हेगाराला डब्बल तारेमध्ये आणि राहिलेले सगळे बाहेर.. आतमध्ये. खूप कडक बंदोबस्त असायचा. मी त्यावेळी लहान होतो, शाळेत जात होतो . शाळेत नाही गेलं तर मोठी शिक्षा देत होते.काहीतरी जुगाड करत होतो. 'सेटलमेंट जेल कसं होतं हे पाहण्यासाठी त्याकाळी राज कपूर सोलापूरात आले होते. त्यानंतर त्यांनी 'जिस देश मी गंगा बहती है. हा सिनेमा काढला होता.

(भगवान गायकवाड)
इंग्रज मुळातच चतुर... स्वातंत्र्यपूर्व काळाचा अदिवासींचा लढा, 1857 चा उठाव आणि रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणारे मजुर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ब्रिटिशांनी 1871 साली बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत एक कायदा तयार केला. हा कायदा होता गुन्हेगार जमाती कायदा आणि तो तयार केला टी. व्ही. स्टिफन्स नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने. भटक्या जमातींचा बंदोबस्त करण्यासाठी खास हा कायदा तयार करण्यात आला. या कायद्याअंतर्गत भटक्या आणि आदिवासी जमातीच्या अनेक जातींचा त्यात समावेश करण्यात आला आणि सबंध देशभर भटक्या जमातींची धरपकड सुरू झाली.
दिल्ली, मध्यप्रदेश, बंगाल, तामिळनाडू, मद्रास, गुजरातमध्ये अहमदाबाद, झाबवा, हैदराबाद, गुलबर्गा, महाराष्ट्रात अंबरनाथ, सोलापूर, गोकाक अशा अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी सेटलमेंट म्हणजे खुला कैदखाना बांधले. भटक्या जमातीच्या महिलांना, चिल्ल्यापिल्ल्यांना जबरदस्तीने या कैदखान्यात डांबून ठेवले आणि पुरुषांना मजुर बनवून रेल्वे ट्रॅकच्या कामावर जुंपले. सेटलमेंटमधील अवस्था तर खुपच भयावह होती. ही सेटलमेंट्स खुली असली तरी ते एकप्रकारचे तुरुंग होते.
तुरुंगाचे नियम जाचक होते. या तुरुंगात जन्मलेल्या बाळालाही ते नियम बंधनकारक असत. सेटलमेंट्समध्ये रोज सकाळी व संध्याकाळी हजेरी असायची. पुन्हा रात्री-बेरात्री पोलिस झोपडीत येऊन पांघरून ओढून माणसं बघून जात. रोज सकाळी मोजदाद करून बाहेर कामावर सोडलं जायचं. इतर गावी जायचं असल्यास व्यवस्थापनाची परवानगी घेणं अनिवार्य होतं. ज्या गावात जायचं तिथल्या पाटलाला व्यवस्थापकाने दिलेला पास द्यावा लागायचा. परतताना पाटलाकडून पास घेऊन येणं बंधनकारक होते.
या ठिकाणी दिवसभर कापडगिरण्या आणि सुतगिरण्या चालायच्या आणि दिवसातले 12-12 तास महिलांना, मुलांना काम करावं लागायचं. गुन्हेगारी जमाती कायद्यांतर्गत भटक्या जातींची संख्या वाढतच गेली. जेव्हा 1952 साली हा कायदा भारत सरकारने रद्द केला तेव्हा या कायद्याची झळ तब्बल 191 भटक्या जातींना बसली होती.

(कमल जाधव)
‘’आम्हाला तारेतले लोक म्हणून ओळखायचे’’
याच सेटलमेंटमध्ये राहणारी सुनीता जाधव ही साहेबराव जाधव यांची मुलगी. साहेबराव जाधव वस्तीवर 'विमोचित बालिका वसतीगृह' चालवत होते. सुनीता जाधव सांगतात, 'आम्हाला तारेतले लोक म्हणून ओळखायचे. अगोदर लोक वस्तीत यायला घाबरत होते. आता थोडीफार तर सुधारणा झाली आहे. आमच्या तीन पिढ्या इथेच गेल्या. आमच्या वस्तीतील मुलं शिकू लागलेत.
माझे वडील साहेबराव जाधव हे 'हरिजन सेवक संघात' नोकरीला होते. त्यांच्या माध्यमातून बारा वसतिगृह चालवत होते. लामोटी, कोनाळी आश्रम शाळा,सोलापूर जिल्ह्यातील छोट्या छोट्या खेड्यात काम करत होते. 'सेटलमेंट' भागात असणाऱ्या वसतिगृहात माझी आई कमल साहेबराव जाधव वॉर्डन म्हणून काम करत होत्या. वसतिगृहात हणमंत गायकवाड हे जेवण बनवायचे काम करत होते.
देवप्पा हे पाणी भरण्याचे काम करायचे. 'विमोचित बालिका वस्तीगृहात तीस - पस्तीस मुली होत्या. वसतिगृहाला सव्वा रुपया भाडे होते. माझ्या वडिलांनी आईचे दागिने विकून वसतिगृहात रेशन भरलं आहे. वसतिगृहात सातवीपर्यंत शिक्षण मुली घेत होत्या. हरिभाऊ देवकर यांच्याबरोबर माझे वडील चळवळीत काम करत होते. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या सत्काराच्यावेळी माझे वडील मला घेऊन गेले होते.
माझे वडील बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत फिरले आहेत. पंडित नेहरू आले होते त्यावेळी मी नव्हते. राजीव गांधी आले होते त्यावेळी होते. राजीव गांधी यांनी सेटलमेंट भागात पिण्याच्या पाण्याचे नळाची सोय केली. सायकलचा कारखाना काढायचं ठरवून गेले होते. ते अजून झालं नाही. सुशीलकुमार शिंदे यांनी घर देणार आहेत म्हणून पावत्या फाडल्या पण अजून काहीच झाले नाही..'
याच सेटलमेंटमध्ये असलेल्या शाळेचे मुख्याध्यपक विष्णू सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, 'ब्रिटिशांनी तब्बल 198 जमातींना गुन्हेगार यादीत समाविष्ट केले आणि 1909 मध्ये सेटलमेंट निर्माण केल्या. भारतात 52 सेटलमेंट निर्माण केल्या. त्यापैकी महाराष्ट्रात चेन्नई, विजापूर, हुबळी, मुंढवा,अंबरनाथ, सोलापूर अशा भागात या सेटलमेंट होत्या. सोलापूर सेटलमेंटमध्ये एकूण नऊ जमाती होत्या. कंजरभाट, कैकाडी, छप्परबंद, भाट, राजपूत भामटा, पारधी, मांग गारुडी तर काही उत्तर भारतातून आणि राजस्थानच्या पट्यातून होत्या.

(जुन्या शाळेचे अवशेष)
आज सोलापूरमध्ये जे कारागृह आहे त्याच्या पाठीमागे 'क्रिमिनल ऍक्टची जमीन होती. त्या वेळेला प्रभाग सिस्टीम होती. तेव्हा तिथे काझी नावाचे आमदार होते. सोलापूर त्यावेळी 16 कसब्याचं गाव होतं. त्याच्या मध्यभागी गुन्हेगार लोकांची वस्ती योग्य नाही असे म्हणत या काझींनी तेव्हा मुंबई विधिमंडळात आवाज उठवला होता. त्याची दखल घेत ब्रिटिशांनी साडेचारशे एकर जमीन घेऊन खरेदी करून त्या ठिकाणी वस्ती स्थलांतरित केली.
विष्णू गायकवाड पुढे म्हणाले की, तीन तारेच्या आत लोकांना ठेवण्यात आलं. दिवसातून तीन वेळा त्यांना हजेरी द्यावी लागायची. अक्षरशः तो कोंडवाडा होता. अमानुष पद्धतीने लोकांना वागवत होते. सामान्य लोकांचे जे हक्क होते, ते सुद्धा मिळत नव्हते. लोकांना रात्री-बेरात्री उठवायचे. पती -पत्नी झोपलेले असताना सुद्धा रात्रीचे उठवायचे त्यावेळी हजेरी द्यावी लागायची. दिवसभर लोकांना मजूर म्हणून कामाला घेऊन जायचे. मजुरी म्हणून धान्य,तेल,पीठ देत होते.
जेल कमिशन समितीला त्यावेळी असं लक्षात आलं की या सेटलमेंटमध्ये विशिष्ट जमातीचे लोक पकडलेले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. सोलापूर सेटलमेंटमध्ये लोकांना काम मिळावं म्हणून शिक्षणासाठी शाळा उभारल्या गेल्या. आजही ती शाळा सुरु आहे. कुशल कामगार तयार करण्यासाठी कारखाने तयार करण्यात आले होते. काही चांगल्या गोष्टी ब्रिटिशांनी त्यावेळी केल्या होत्या.
ज्याचे वर्तन चांगले असायचे त्यांना बाहेर कामाला जायला परवानगी होती. पण काही अटी होत्या. वहीमध्ये कुठे जाणार.जायची वेळ, यायची वेळ असं नमूद करावं लागायचं. लोकांनी खूप हालअपेष्टा सहन केल्या. त्यानंतरच्या भीमराव गुरुजी, नगरकर,मोपरे या मंडळींनी उठाव करण्याचा प्रयत्न केला. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मदत केली. सेटलमेंट मध्ये लादलेल्या जाचक अटीच्या विरोधात पहिला मोर्चा सोलापुरातून निघाला होता.






