- अलमिना खातून
सहा वर्षांपूर्वी पाकिस्तान सोडल्यानंतर, धानी ठाकूरकडे पहिल्यांदाच स्वतःसाठी व मुलींसाठी भारतात तयार झालेले कपडे विकत घेण्यासाठी पैसे होते. दिल्लीच्या आदर्श नगरात हिंदू शरणार्थी म्हणून राहणाऱ्या धानीसाठी हा आनंदाचा क्षण होता. वेळ काढण्यासाठी ती जी दुलई (रजई) विणते त्यांना विकून आता हजारो रुपये मिळतात. दुलईला बाजारात मोठी मागणी आहे. एक दुलई ती तीन महिन्यात तयार करतात ज्याला बाजारात 4 हजार रुपये मिळू शकतात.
धानी 2018 मध्ये आदर्श नगरातील शरणार्थी शिबीरात राहायला आली होती. ती म्हणते, “हे काम सिंध संस्कृतीची ओळख दाखवतं. आम्ही ही कला तिथं शिकलो आणि प्रत्येक पिढीत जपून ठेवली. सिंधची प्रत्येक बाई यात वाकबगार असते.” अशा रल्ली दुलई विकूनच त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळत आहे. एका खोलीत अनेक वयाच्या बायका एकत्र बसून आपापली दुलई शिवण्याचं काम करतात. आजी, आई आणि मुलगी एकत्रच शिवणयंत्रावर हे काम करतात. गप्पा मारतात, हसतात, काम करतात. मुलं शाळेत गेली नसली की तीही या कामात मदत करतात. दुलईचं पॅचवर्क, एप्लिक, विणकाम, रंग यांचे आकार ठरलेले असतात.
त्यावर फुलं असतात, पानं असतात, काही वेळेस त्यात हत्ती, घोडे, उंटही दिसून येतात. धानीसोबत आणखी सहा बायका हे काम करतात ज्यांना रुबल नागी आर्ट फाऊंडेशनकडून विकण्यात येतं. काही दुलया 15 हजार रुपयापर्यंत विकल्या जातात. प्रत्येक दुलई वेगळी असते. धानी एका दुलईवरील लाल फुलांकडे नजर टाकत सांगते, “मला एक फुल विणायला आठवडा लागला. पूर्ण दुलई तीन महिन्यात तयार होते.” 
… आणि पाकिस्तानच्या हिंदू शरणार्थींना जगण्याचा मार्ग मिळाला
दुलई विकण्याचा व्यवसाय योगायोगाने सुरू झाला. 2022 मध्ये विज्युअल आर्टीस्ट रुबल नागी, आदर्श नगरात काम करत होत्या. मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणं आणि एक शैक्षणिक कार्यक्रम चालवण्यात त्या मदत करत होत्या. एकदा त्यांनी धानीच्या घरी एक दुलई पाहिली. त्याचं विणकाम, रंगकाम त्यांना प्रभावित करून गेलं. त्यांनी मग या बायकांशी बोलून एक व्यवहार ठरवला. नागी आता एका ठराविक किमतीला दुलई विकत घेतात आणि आपल्या ‘स्टुडीयो सक्षम’ या ऑनलाईन शॉपवर विकतात.
त्यांची एनजीओ स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देते. नागी सांगतात, “या दुलईवरील धाग्याचं काम, नक्षी, विणकाम हे भारतीय कलेपेक्षा वेगळं आहे. यातून एक वेगळी संस्कृति दिसून येते. लोकांना ते आवडत आहे.” पण धानी आणि इतर बायकांना वाटतंय की त्यांच्या कामासाठी त्यांना योग्य किंमत अजून मिळत नाही आहे. धानी सांगते, “आम्हाला अजूनही असं वाटतं की आम्ही जे करतोय त्यासाठी आम्हाला फार कमी पैसे मिळत आहेत. एक दुलई तयार करण्यासाठी वेळ आणि मेहनत जास्त लागते. पण आशा आहे की आमचं काम जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आमच्या कामाची योग्य किंमत आम्हाला मिळेल.” बाकी बायका यावर सहमती दर्शवतात.
सिंध संस्कृतीची ओळख असलेली नक्षीदार दुलई
या दुलईसाठी लागणारे धागे पाकिस्तानातून येतात. धानी सांगते, “भारतात ज्या दुलई मिळतात त्यांचे धागे आमच्या विणकामासाठी जास्त जाड असतात. त्यामुळे आमचे नातेवाईक किंवा मित्र भारतात येत असतील तर त्यांना आम्ही हे धागे पाकिस्तानातून आणायला सांगतो.” बायका घरातील कामं आटपून दुलई तयार करायला लागतात. पुरुष कामावर जातात. धानीच्या दिराकडे ई-रिक्षा आहे.
दुसरा एक नातेवाईक मोबाईलची कव्हर्स-ग्लासेस विकतो. 47 वर्षीय कमल लाल 2016 मध्ये भारतात आले होते. तेव्हापासून ते आदर्श नगरात राहत आहेत. 2017 मध्ये त्यांनी ई-रिक्षा विकत घेतली. कमल लाल सांगतात की, आम्ही नेहमीच भारताला आपलं घर समजलं आहे. आणि आता लोक आमचा स्वीकार करत आहेत त्यामुळे ही आता आमची जमीन वाटत आहे.
पाकिस्तानात अल्पसंख्यक असल्यामुळे ठाकूरांना जमीन विकत घेणे, व्यवसाय सुरू करणे किंवा आपल्या धर्माचं पालन करण्यापासून रोकण्यात आलं होतं. पण धानीच्या कामामुळे त्यांना आता भारतात काम करण्याची संधी आहे हे दिसून आलंय. सध्या 300 हून जास्त हिंदू कुटुंबिय आदर्श नगरात राहताहेत. 2018 मध्ये यातील बहुतेक लोक सिंध मधून आले होते. अनेकांना तिथलं जगणं आता आठवत नाही. धानीची वहिनी माली सांगते, “आम्ही पाकिस्तानातून आपली कला घेऊन आलोय, जुन्या आठवणी नाही.”
पाकिस्तानच्या आठवणी अंगावर काटा आणणाऱ्या
पण आदर्श नगरातील जगणं कठीण आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2022 मध्ये त्यांना विज मिळाली. स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, शिक्षण आणि नागरिकता मिळवण्यासाठी ते आता लढत आहेत. धानीची सासू गुलाल सांगते, “आम्ही इथं अनेक गोष्टींसाठी लढतोय. पण इथं स्वातंत्र्य आहे. आपल्या धर्माचं पालन आम्ही करू शकतो. मंदिरात जाऊ शकतो आणि कोणी आम्हाला त्यावर प्रश्न विचारत नाही.” आदर्श नगरात आधार कार्ड सर्वांत किंमती गोष्ट आहे. त्याच्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नाही. धानीची मोठी मुलगी नंदिनी 15 वर्षांची आहे. 2021 मध्ये तिला आधार कार्ड मिळाल्यावरच सरकारी शाळेत तिचा प्रवेश होऊ शकला. नंदिनी तिच्या वर्गात अलगथलग पडली आहे.
‘पाकिस्तानी मुलगी’ म्हणून तिची इथं ओळख आहे त्यामुळे कोणी तिच्याशी फार बोलत नाही. पण वर्गातील मुलींना तिच्या तिथल्या जगण्याविषयी उत्सुकता आहे. पण आई-वडिलांप्रमाणे नंदिनीलाही पाकिस्तानच्या आठवणी नकोशा आहेत. शाळेतला पहिला दिवस तिच्यासाठी तणावाचा होता. ती सांगते, “मी खूप घाबरली होती. मी विचार करत होते की कोणी मला विचारलं की मी कुठून आले आहे आणि इथं काय करत आहे तर काय होईल? मला परत पाकिस्तानात जावं लागेल का?” पण कोणीही तिला भारत सोडण्याविषयी म्हटलं नाही. धानीची लहान मुलगी ईश्वरीया त्याच शाळेत शिकते आणि तिचाही असाच अनुभव आहे.
पाकिस्तानातून आलेली असल्यामुळे इतर मुलं तिच्यापासून जरा दूरच राहतात. भाषा हा आणखी एक मुद्दा आहे. सिंधमधून आली असल्यामुळे इतरांप्रमाणे त्या सिंधी व उर्दूत पारंगत आहेत. हिंदी बोलणं त्यांना कठीण जातं. ती म्हणते, “हिंदी येत नसल्यामुळे कोणाशी मैत्री करणं कठीण जात होतं. कारण कोणी काही विचारलं तर मला बोलता यायचं नाही. पण आता मी चांगलं हिंदी बोलते. पुस्तकं वाचून आणि इतर मुलांशी बोलून मी हिंदी शिकले आहे.” 
आधार कार्ड नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न
पण अनेक शरणार्थी मुलांसाठी आधार कार्ड नसल्यामुळे शाळेत प्रवेश घेणं अजूनही कठीण गोष्ट आहे. त्यांच्या मदतीसाठी धानीचा नवरा विक्रम ठाकूर याने खासगी वर्ग सुरू केले आहे. तो पाकिस्तानात एका सरकारी शाळेत शिक्षक होता. त्याच्या प्रयत्नांना ‘रुबल नागी आर्ट फाऊंडेशन’ने मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांच्या इथं आता जवळपास 400 मुलं शिकायला येतात.
शाळेत रितसर प्रवेश मिळेपर्यंत त्यांना इथं गरजेपूरतं शिकवलं जातं. विक्रम सांगतो, “मला मुलांना शिकवायची इच्छा होतीच. अगदी मी कुठेही असलो तरीही. त्यामुळेच मी इथं आधी झोपडपट्टीतील मुलांना शिकवू लागलो. मग एनजीओशी जोडला गेलो.” धानी, गुलाल आणि इतर बायकांना इथल्या वातावरणात मिसळणं जास्त गरजेचं वाटतं. पुरुष कामावर जातात आणि मुलं शाळेत जातात पण त्यांना शिबिरापासून बाहेर जाता येत नाही.
माली सांगते, “आम्ही आठवड्याचा बाजार करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जातो. तेव्हा आम्ही घरचे आमचे पारंपरिक कपडे घालत नाही. आम्ही भारतीय दिसण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे साडी घालतो. घरी घागरा व ब्लाऊज घालतो.” शरणार्थी शिबिरात भाजपचे झेंडे लागलेले आहेत. त्यावर पंतप्रधान यांचे आभार मानलेले आहेत ज्यांनी ‘नागरिकता संशोधन कायदा’ करून भारताबाहेरील हिंदूंना भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला. गुलाल सांगतात, “मला आपलं वोटींग कार्ड बनवायचं आहे. कारण मला मोदींना वोट द्यायचं आहे. आम्ही हिंदू त्यांच्यामुळे इथं आहोत आणि आता आम्ही स्वतःला भारतीय म्हणवू शकतो.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






