“ब्रेकअपनंतर पुरुष सहसा सिंगलच रहातो आणि मुली बॅकअप प्लॅनशिवाय ब्रेकअप करत नाहीत..” असं अत्यंत बेसलेस विधान इन्स्टाग्राम व्हिडिओवर एका सुंदर युवतीकडून ऐकलं. ती आयुष्याबद्दल सल्ला देत होती. अनेकजणांना हे खरं वाटलेलं असू शकतं. अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करणारे सोशल मिडियावरचे “ज्ञानी (?) इन्फ्लुएन्सर्स” हा अत्यंत घातक प्रकार सर्व बाबतीत बोकाळला आहे.
नातेसंबंध, डाएट प्लॅन्स याबाबत तज्ञांचं अजिबात न ऐकणारे टीनएजर्स इन्फ्लुएन्सर्सना देव मानून त्यांचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे वागतात. इटिंग डिसआॉर्डर्स, डिप्रेशन असे मनोविकार वाढण्यामागे हे अभ्यास न करता, त्या क्षेत्रातलं शिक्षण न घेता भराभर रील्स करणारे इन्फ्लुएन्सर्स हे प्रमुख कारण आहे.
“यह गम होगा तो कितने गम ना होंगे..” हे प्रेमाच्या सुरुवातीला वाटतं. पण ब्रेकअप झाल्यानंतरचा गम, दु:ख सहन करणं सगळ्यांनाच अवघड असतं. बर्मिंगहॅम विद्यापीठानं केलेल्या 96 देशांमधल्या 5000 लोकांवर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार कोणीच ब्रेकअपनंतर ओके नसतं. प्रतवारी करायची झाली तर पुरुषांना भावनिक आणि शारिरिक वेदना स्त्रियांपेक्षा कमी जाणवतात. मात्र त्या नात्यात पुरुष कमी अडकलेला असतो हे त्याचं कारण नव्हे.
क्रेग मॉरिस हा या सर्वेक्षणाचा अभ्यासक म्हणतो, उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पालकत्वाची भूमिका स्त्रीला जास्त प्रमाणात निभवायची असते. त्यामुळे तिच्यासाठी जोडीदाराची निवड जास्त विचारपूर्वक केली जाते. कमिटमेंट दीर्घकाळ टिकावी असा तिच्या मनात विचार असतो. त्यामुळे तुम्ही निवड केलेला पुरुष तुम्हाला नाकारतो याचा त्यांना जास्त त्रास होऊ शकतो.

(प्रातिनिधिक छायाचित्र)
ब्रेकअपनंतरचा त्रास अधिक कुणाला होतो?
मात्र पुरुषांना याचा त्रास होत नाही असं अजिबात नाही. फक्त ते ब्रेकअपचं दु:ख वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. पुरुषांना राग ही भावना जास्त सतावते, ते स्वत:ला इजा करुन घेण्याची शक्यता जास्त असते. स्त्रिया साधारणपणे नैराश्य या भावनेकडे वळतात.
ब्रेकअपमध्ये स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही सर्वात जास्त त्रास असतो तो नकाराचा. तुम्हाला कोणीतरी नकार दिलेला असेल; ब्रेकअप अचानक समोर आला असेल; नातं कमिटमेंटच्या बाबत बरंच पुढे गेलेलं असेल तर जास्त त्रास होतो. इगो दुखावला जाणं यानं आपलं स्वत:चं मोल उरलं नाही, आपण कुठेच फिट होत नाही असं वाटायला लागतं. या परिस्थितीत घडलेल्या गोष्टींबद्दल, घटनांबद्दल मनात सतत विचार येतात. त्यावर रवंथ करुन आपलं कुठे चुकलं हे शोधलं जातं. दु:ख, राग, अस्वस्थता, चिंता आणि शोक या भावना उचंबळून येतात.
ब्रेकअप शारीरिक वेदनांनाही आमंत्रण देतो. जागरणं, अतिताण यानं डोकेदुखीपासून, भूक न लागणं आणि प्रतिकारशक्ती कमी होणं अनेक शारीरिक आजार जडतात. काहीही करण्यात रस वाटत नाही. याला डोपामाईन आणि आॉक्सिटोसिन या आनंदाच्या, प्रेरणेच्या भावना जागृत करणारी मेंदूतली रसायनं कमी स्त्रवतात हे कारण असतं.
आपण जोडीदाराबरोबर पाहिलेली स्वप्नं, आशाआकांक्षा, एकत्र आयुष्य जगण्याची इच्छा या सगळ्याला छेद गेल्यामुळे मनात तीव्र कोलाहल माजतो. काही ठिकाणं, गंध, गाणी, चित्रपट अशा प्रत्येक वेळी पार्टनरची आठवण वेदना देऊन जाते. आपल्या रोमॅंटिक पार्टनरसोबत, बेस्ट फ्रेंडसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायची सवय असते. ती संपते. मनातल्या गोष्टी बोलायला कोणी उरलं नाही असं वाटतं. एक पोकळी निर्माण होते.
ब्रेकअप किंवा घटस्फोट लग्न, मुलं, सोबत म्हातारं होणं अशा सगळ्या आदर्शवादी संकल्पनांची मोडतोड करतो. स्वप्नं संपून जातात. घटस्फोटानंतर आर्थिक फटके बसले असतील तर आयुष्यच बदलून जातं.

(प्रातिनिधिक छायाचित्र)
ब्रेकअपनंतरचे चुकीचे मार्ग
ब्रेकअपनंतर चुकीच्या उपायांनी त्यावर अनेकजण मात करु पहातात. दुस-या नात्यात घाईघाईनं उडी मारायला पहाणं. यातून जखम भरुन यायला वेळ मिळत नाही; दारु, ड्रग्ज किंवा चुकीच्या सवयीत दु:ख बुडवायचा प्रयत्न करणं; लगोलग ब्रेकअपची जखम भरुन येण्याची अपेक्षा करणं; आपण सगळं विसरुन ठीकठाक झालो आहोत अशी भलावण करणं; ब्रेकअप झालेल्या व्यक्तीनं परत येऊन बोलून, नीटपणे नातं संपवावं अशी अपेक्षा करत रहाणं; सोडून गेल्याबद्दल जोडीदाराचा सूड घेण्याची भावना बाळगणं; एकटं, एकाकी रहाणं आणि मी कसा / कशी एकटं राहून माझ्यावर दु:खाचे डोंगर कोसळलेत हे जोडीदाराला दाखवून देईन असं वागणं; जोडीदाराकडे न राहवून परत जाणं. जे नातं जमलं नाही म्हणून तुटलं तिकडे धाव घेण्यात अर्थ नाही; हे ब्रेकअपनंतरचे चुकीचे मार्ग आहेत.
अशावेळी काय करावं?
एकतर वेदना सहन करावी. ती वेदना दाबून टाकणं किंवा बंदिस्त करणं हे करु नये. रडणं, मोकळं होणं ही ब्रेकअपची जखम भरुन येण्याची प्रक्रिया आहे. ब्रेकअपनंतरची पोकळी मान्य करावी. एकटं राहून भूतकाळातल्या गोष्टी आठवल्यानंतर त्यांच्याकडे शांतपणे पहाता येण्याची क्षमता वाढू शकते.
प्रत्येकाला कधी ना कधी नकाराला, डावललं जाणं या प्रक्रियेला तोंड द्यावंच लागतं. आपण एकमेव नाही, आपण पुरेसे चांगले नाही, आपण इतरांना हवं तसं प्रेम देऊ शकत नाही आणि आपल्याला कधीच इतरांकडून काही लाभणार नाही असा ब्रेकअपचा अर्थ नसतो.
स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला शिकावं. पुरेशी झोप, पोषक आहार, हव्या त्या गोष्टींमध्ये मन रमवता येणं हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं आपल्याला जमायला हवं. स्वत:वर अन्याय न करता, स्वत:शी प्रेमळपणानं वागणं जमायला हवं. चालणं, सायकलिंग, योगा असे व्यायाम सुरु करावेत. अति दारु पिणं वगैरे गोष्टींमुळे वेदना काहीकाळ बधीर होते. तो मार्ग दीर्घकाळ उपयोगाचा नाही.

(प्रातिनिधिक छायाचित्र)
मदत करणारी माणसं आजूबाजूला असतात. त्यांची मदत जरु घ्यावी. तुमच्याबद्दल मनोमन निष्कर्ष न काढणा-या, पूर्वग्रहदूषित नसलेल्या जवळच्या मित्रांशी, कुटुंबियांशी संवाद साधा. ब्रेकअप झालेल्या व्यक्तीचे फोटो, भेटवस्तू कुरवाळत बसण्यापेक्षा बंद खोक्यात ठेवावेत. ते समोर ठेवून आठवत बसण्यात काहीच अर्थ नसतो. मनातल्या भावना प्रामाणिकपणानं लिहून काढणं हा महत्वाचा उपाय ठरतो.
मुख्य म्हणजे, ब्रेकअप झाल्यानंतरच्या सर्व वेदना ख-या असल्या तरी त्या आयुष्याभर उरणार नसतात. पण ती जखम घाईघाईनं भरुन येईल अशी अपेक्षा करु नका. त्यानं अनेक गोष्टी मनात घर करुन रहाणार आहेत. एक एक गोष्ट आठवणं, ती चघळणं, त्यातून अखेरीस शांतपणे बाहेर येणं याला वेळ लागणारच आहे, तो द्या. गरज पडल्या समुपदेशकाची मदत घ्या. नवीन नातं जास्त प्रगल्भपणे, प्रेमानं निभावता येईल इतकी स्वत:ची उन्नती या प्रक्रियेत करुन घ्यावी. आपल्याला नात्यातून काय हवं आहे याचा विचार करा.
तो विचार न करता नवीन नात्याकडे धाव घेणं म्हणजे काय खरेदी करायचं आहे याचा विचार न करता ॲमेझॉनवर शॉपिंग करायला जाणं असा असतो.
ब्रेकअपनंतर त्यातून बाहेर पडणं आणि भावनिक प्रगती करुन घेणं हे दमछाक करणारं असतं. मात्र जे घडलं त्याच्याकडे सकारात्मकतेनं पहाण्याची, स्वत:ला समजून घेण्याची तुमची किती इच्छा आहे त्यावर हे अवलंबून असतं. स्वत:वर काम करणं आणि आपली भावनिक उन्नती करुन घेणं यासाठी ब्रेकअप ही उत्तम संधी असते असंही काही अभ्यासक मानतात.
(साभार - निलांबरी जोशी यांच्या फेसबुक वॉलवरून)






