मे 2017 मध्ये, मध्य प्रदेशातील असिस्टंट लोको पायलट मीना (नाव बदललंय) यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सोबतच तापही चढला. त्या जवळच्या रेल्वे रुग्णालयात गेल्या तेव्हा त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनी सांगितलं की, त्यांना वाटलं की त्यापूर्वी दोन-तीनदा त्यांना जसा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास झाला होता तसंच हे असेल.
पण यावेळेसचा त्रास वेगळा होता. त्यांच्या किडनीत गळू झालं होतं ज्यात पस साठला होता. त्याच्यावर लगेच उपचार झाले नसते तर त्यामुळे आतील अवयवांना नुकसान पोहोचून त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता. मीना यांनी लगेच त्यावर उपचार सुरू केले. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळेच हा गळू तयार झाला होता. वेळीच उपचार केल्यामुळे पुढचा धोका टळला.
महिला लोको पायलट्सना ‘युरिनरी इन्फेक्शन’ का होतं…?
मीना लांब पल्ल्याची मालगाडी चालवते. मालगाडी चालवणाऱ्या मीना यांना दीर्घकालीन कामाची सवय आहे, जे कधीकधी 12 तासापर्यंतही चालू शकतं आणि या वेळेत त्यांना बाथरूममध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे त्या कमी पाणी पितात आणि तासनतास आपली लघवी दाबून धरतात. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. मीनासारख्या महिला लोको पायलट्सना अनेकदा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास सामान्यपणे होतच असतो.

देशभरात जवळपास 33 महिला लोको पायलट या त्रासातून गेल्या आहेत. स्वच्छतागृहांची अव्यवस्था आणि कामाचे जास्त तास यामुळे महिला लोको पायलट्स युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, युटेराईन फायब्रॉईड्स, उच्च रक्तदाब, इतकंच नाहीतर काही वेळेस गर्भपातालाही सामोऱ्या गेल्या आहेत.
1990 च्या दशकापासून भारतीय रेल्वेनं लोको पायलटसाठी क्रू केबिनमध्ये टॉयलेटची व्यवस्था सुरू केली. पण त्यांची संख्या अजूनही फारच कमी आहे. मीना सांगतात की, टॉयलेट असलं तरीही अनेकदा त्यात पाण्याची व्यवस्था नसते किंवा पाणीच नसतं. त्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्याचा धोका वाढतो. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात महिला लोका पायलट्सनी रेल्वे बोर्डाला एक पत्र लिहून कळवलं की बाथरुम नसल्यामुळे कामावर परिणाम होतो, लक्ष लागत नाही आणि सुरक्षा धोक्यात येते.
एकूण 2 हजार महिला लोको पायलट, परंतू आता त्यांना जॉब बदलून हवाय
उत्तर प्रदेशच्या लोको पायलट समीरा सांगतात की, केवळ रेल्वेतच टॉयलेट्स नाहीत असं नाही. स्टेशनवरही लॉबी रुममध्ये स्त्रियांसाठी वेगळी टॉयलेट्स नसतात. स्टेशन प्लॅटफॉर्मवरील किंवा रनिंग रुममधील टॉयलेटचा वापर करायचा म्हटलं तर जाण्यायेण्यासाठी दहा-पंधरा मिनिटं लागतात. रेल्वे बोर्डाला पाठवलेल्या पत्रात महिला लोको पायलट्सनी लिहिलंय की, आरोग्याच्या प्रश्नासोबतच त्यांना आपल्या जीविताचीही काळजी वाटते. दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझंही त्यांच्यावर असतं.
लोको पायलटपेक्षा त्यांना अन्य कामं दिली जावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या भारतात दोन हजार महिला लोको पायलट आहेत. यातील दीड हजारांहून जास्तींनी या पत्रावर सही करत आपल्या कामात बदल करण्याची मागणी केली आहे. 2018 पासून या स्त्रियांनी रेल्वेकडे या मागण्यांचा पाठपुरावा सुरू केला आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यावर विचार करण्याचा आश्वासन दिलं पण ज्यावर प्रत्यक्षात अजून काही झालं नाही.
पश्चिम बंगाल येथे कांचनजंघा एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर लोको पायलट्सचा संघर्ष पुढे आला. या अपघातात 10 लोक ठार झाले. रेल्वे प्रशासनाने अपघातात मृत झालेल्या लोको पायलटवर अपघाताची जबाबदारी टाकली. पण नंतर चौकशीनंतर हा आरोप मागे घेतला. लोको पायलट्सचा मुद्दा तापण्यासाठी विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेणं प्रमुख कारण ठरलं. त्यामुळे सर्वांचंच लोको पायलटकडे लक्ष गेलं. राहुल गांधींनी जो व्हिडीयो शेअर केला त्यात अनेकांनी त्यांच्या कामातील अडचणींविषयी सांगितलं आहे.

पुरुष लोको पायलट्सच्या प्रश्नांकडे यामुळे लोकांचं लक्ष गेलं खरं पण स्त्रियांना याहून जास्त त्रास सोसावा लागतो. मीना सांगतात की रेल्वेच्या हे लक्षातच येत नाहीये की महिला लोको पायलट्ससाठी नियम आणि सुविधा यांच्यात काही बदल करण्याची गरज आहे म्हणून. उदा. रेल्वे इंजिनच्या केबिनमध्ये चढण्यासाठी असणारी शिडी इतकी उंच असते की त्यावर चढण्यासाठी त्यांना उडी घेऊन चढावं लागतं.
मालगाड्यांमध्ये ही अडचण जास्त जाणवते कारण त्या प्लॅटफॉर्मवर सहसा थांबत नाहीत. भारतीय महिलांची सरासरी उंची पाच फुट असते. त्यांची उंची लक्षात घेऊन या शिड्या तयार करण्यात आलेल्या नाहीत, असं समीरा सांगतात.
महिला लोको पायलट्ससाठी नियम बदलण्याची गरज वाटत नाही
जुही सांगतात की, इंजिनमधून उतरताना आम्हाला सरळ खाली उडी तरी मारावी लागते किंवा मग हातांनी लोंबकळावं लागतं. जून 2023 मध्ये त्या खाली उडी मारत असताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्यांचा खांदा दुखावला. त्यांना महिनाभर आराम करावा लागला आणि कामावर परतल्यावरही महिनाभर त्यांनी ऑफिसमध्येच काम केलं. त्यांचा खांदा या वेळेतही पूर्णपणे बरा झाला नाही. त्यांनी काही दिवस ऑफिसचं काम वाढवून मागितलं.
त्यांना काही दिवसांची वाढ मिळालीही पण शेवटी त्यांना पुन्हा मालगाडी चालवण्याच्या कामावर रुजू व्हावं लागलं. काही दिवसांतच त्यांचं दुखणं बळावलं आणि त्यांना पुन्हा सुट्टी घ्यावी लागली. पण त्यांना हव्या तेवढ्या सुट्ट्या मिळू शकल्या नाहीत कारण रेल्वे हॉस्पिटलने त्या त्यांच्या कामासाठी योग्य असल्याचं घोषित केलं होतं.
त्या सांगतात, “मला माझ्या कामावर पुन्हा रूजू व्हावं लागलं. पण मी जेव्हा खासगी दवाखान्यात गेले तेव्हा त्यांनी मला एमआरआय करण्याचा सल्ला दिला.” त्यांना जास्तीच्या आजारपणाच्या सुट्ट्या मिळाल्या नाहीत. त्याऐवजी मातृत्त्व काळातल्या सुट्ट्या घेण्यास त्यांना सांगण्यात आलं.
महिला लोको पायलट्सना गरोदरपणात जास्त त्रास सोसावा लागतो. ऑक्टोबर 2021 मध्ये समीरा जेव्हा कामावर बाहेर होत्या तेव्हा त्यांना समजलं की त्यांची मासिक पाळी सुरू झालीय. त्यात अडथळे येत आहेत हे लक्षात आल्यावर त्या डॉक्टरांकडे गेल्या. तिथे त्यांना समजलं की त्या गरोदर होत्या आणि त्यांचा गर्भपात झालाय. तिशीतल्या समीरांना बाळ हवं होतं त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.
त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न केले. 2023 मध्ये तिसऱ्या महिन्याच्या गरोदरपणात पुन्हा त्यांचा गर्भपात झाला. त्या सैरभैर झाल्या. त्या म्हणतात, “मी सर्व काळजी घेत होते. भारी काम करणं टाळत होते. पण तुम्ही गरोदर असताना तुमचं काम करणं अवघडच जातं.” त्यांनी पुन्हा एकदा गरोदर होण्याचा निर्णय घेण्याआधी रेल्वेकडे ऑफिस वर्कची मागणी केली, जी धुडकावण्यात आली. निराश होऊन त्यांनी वर्षभर बिनपगारी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणतात, “मला पुन्हा एकदा गर्भपात नको होता. जर रेल्वेला खरंच स्त्रियांचा सहभाग हवा आहे तर त्यांनी त्यांच्या अशा नाजूक गरजेच्या वेळी सुलभ कामे देण्याची सोयही करायला हवी.”

गरोदर महिला लोको पायलट्सच्या समस्या अधिक गंभीर
रेल्वेला पाठवण्यात आलेल्या पत्रातही हा मुद्दा उठवण्यात आला होता. कामाचं स्वरूप जड असल्यामुळे अनेक महिला लोको पायलट्स त्यांच्या गरोदरपणात गर्भपाताला सामोऱ्या जातात. कोणतीही विश्रांती न घेता सतत 6-11 तास काम करणं कोणत्याही गरोदर बाईला शक्य नाही. कारण गरोदरपणात त्यांच्यात कमी शक्ती असते, त्यांना चक्कर येतात, त्यांची चीडचीड वाढते, त्या आजारी पडतात.
अशा अवस्थेत इंजिनमध्ये चढणं-उतरणं, तपासणी करणं, अशा गोष्टी एका गरोदर बाईला सोप्या जात नाहीत. अनेकींना आपल्या शिल्लक सुट्ट्या वापराव्या लागतात किंवा मग बिनपगारी सुट्ट्या घ्याव्या लागतात. हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.
समीरा सध्या त्यांच्या तिसऱ्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात आहेत. त्यांना सुरूवातीला ऑफिस काम सोपवण्यात आलं. त्यानंतर चालक कामावर जायला सांगण्यात आलं. त्यांनी याला हरकत घेतली तेव्हा रेल्वे रुग्णालयाने आणि प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्या आपल्या त्रासाचा विनाकारण बाऊ करत आहेत असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना आत्ताच मातृत्त्व काळातील सुट्ट्या घ्यवा लागल्या आहेत. या जानेवारीत संपतील. त्यानंतर आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
कारण त्यांची सासूबाई आजारी असते. समीराचे पती सैन्यात आहेत त्यामुळे क्वचितच घरी येऊ शकतात. मुलाची काळजी घेण्यासाठी मी कोणालातरी ठेवू शकते पण लहानग्या बाळाला आपल्या आईची जास्त गरज असते आणि काम करत असताना मला दिवसेंदिवस बाहेरच राहावं लागतं, असं त्या सांगतात. समीरा सांगतात की त्यांना अशा महिला लोको पायलट माहिती आहेत ज्यांचे तीन किंवा चार गर्भपात झाले आहेत. याचा आमच्यावर मानसिक परिणाम होतो असं त्या म्हणतात. त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. त्यासाठी रेल्वेकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही असं त्या सांगतात.
सुरक्षेचे प्रश्नही गंभीर
आरोग्याच्या प्रश्नासोबत सुरक्षेचे प्रश्नही आहेत. अनेकदा महिला लोको पायलट असुरक्षित वातावरणात काम करतात. मीना सांगतात, “आम्हाला अनेकदा रात्रीच्या वेळी चेन पुलिंगच्या घटना हाताळाव्या लागतात, काही टेक्निकल इश्यू असेल तर तो बघावा लागतो. कोणतीही वेळ असो, जागा असो, आम्हाला या गोष्टी सांभाळाव्याच लागतात. बऱ्याचदा या जागा आणि वेळा स्त्रियांसाठी सुरक्षित नसतात.” काही वेळेस काही प्रवाशी तक्रारी करतात की बाई गाडी चालवते म्हणून गाडी हळूहळू जातेय किंवा अनेकदा थांबते आहे.
अशा वेळी त्यांची परिस्थिती मोठी कठीण होते. एकदा मीना यांनी दगडफेकीचा अनुभवही घेतला आहे जो रेल्वेच्या बाबतीत अनेकदा घडतो. काही वेळेस कामाच्या ठिकाणी जाणंही कठीण होऊन बसतं. समीरा हेडक्वॉर्टर स्टेशनपासून कित्येक तासांच्या अंतरावर राहतात.

त्यामुळे निदान रात्रीच्या वेळी तरी पिक-अप सुविधा असावी अशी त्यांनी मागणी केली होती. किंवा रात्रीचं काम देण्यात येऊ नये अशीही विनंती त्यांची होती. पण ती फेटाळण्यात आली. पहाटे दोन वाजता माझ्या राहण्याच्या ठिकाणाहून कामावर हजर राहणं मला शक्य नसतं कारण वाहतुकीची साधनं नसतात त्यामुळे मला गैरहजर राहावं लागतं, असं समीरा सांगतात.
कामाचे दीर्घ आणि अनपेक्षित तास असल्यामुळे या महिला लोको पायलटच्या कौटुंबिक जगण्यावरही परिणाम होतो, विशेषतः त्यांना मुलं असतील तर हा परिणाम जास्त असतो. जुही सांगतात की, पुरुषांना कामावर जाताना त्यांच्या बायका डबा बनवून देतात, मुलांना सांभाळतात. पण आम्हाला या सर्व गोष्टी स्वतःच सांभाळून पुन्हा कामावरही जावं लागतं. एका असिस्टंट लोको पायलटने आठ वर्षांत पदोन्नती मिळत असतांनाही ती घेतली नाही.
मी आधीच माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम करतेय. लोको पायलटचं काम मला करता येणार नाही याची मला जाणीव आहे. माझ्या सहकाऱ्याचा संघर्ष मी रोजच बघते त्यामुळे मी जिथे आहे तिथेच राहण्याचा निर्णय घेतलाय, असं त्यांनी सांगितलं. जोवर या महिला लोको पायलटच्या समस्या सोडवण्यात येत नाहीत तोवर कामात काही बदल करवून घेणं या पलिकडे त्यांच्याकडे दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. समीरा सांगतात की त्यांचे पुरुष सहकारी म्हणतात, हे काम स्त्रियांसाठी नाही.
त्यांनाच ते फार अवघड जातं. पण तरीही समीरा यांचा विश्वास आहे की रेल्वेनं ठरवलं तर या समस्यांवर उपाय केले जाऊ शकतात. पण हे पुरुषांचं जग आहे आणि त्यांना यात काही बदल करायची इच्छा नाही, असं त्या सांगतात. जुही याला दुजोरा देत म्हणतात की, महिला लोको पायलट हव्यात असं सर्वांनाच वाटतं पण प्रत्यक्षात त्यांच्या अडचणी सोडवण्यात कोणालाच रस नाही.
(सौजन्य - स्क्रोल इन)
अनुवाद - प्रतिक पुरी






