उन्हाळ्यातील सुट्टीची एक संध्याकाळ आणि रस्त्यावर मुलांचं आरडाओरडा करत खेळणं सुरू असतानाच त्यांच्यातील एक मुलगी जोरजोरात रडू लागते आणि बाकी मुलं तिला चिडवताना दिसतात. सारी मुलं त्या मुलीला तिच्या जातीवरून आणि रंगावरून चिडवत असतात.
नंतर जेव्हा हा गोंधळ शांत झाला आणि त्यातील एका मुलाला विचारलं की तुला हे कोणी सांगितलं तर त्यानं म्हटलं की, बाबांनी सांगितलं की ती या या जातीची आहे म्हणून तिचा रंग असा आहे. या गोष्टीतून दिसून येतं की कशा प्रकारे वर्ग, जाति यांच्या आधारावर रंग-रुपाचे अंदाज व सौंदर्याचे निकष ठरवले जातात आणि देहनिंदा (बॉडी शेमिंग) केली जाते.
लहानपणापासूनच आमच्या मनात एक विशिष्ट आकार, रंग-रुप यांनी मढलेल्या शरीराची ओळख करून देण्यात येते. विशेषतः वर्ग-समूह यांच्याबाबत एक पारंपरिक विचारसरणी रुजवण्यात येते की एका विशिष्ट वर्गाचे लोक असे दिसतात. या जातीचा संदर्भ सौंदर्याशी आहे. टीव्ही, इंटरनेट, सिनेमा अशा विचारसरणीला समाजात आपल्याकडून आणखी घट्ट करतात.
अशा बॉडी शेमिंगच्या विचारांना लहान मुलांमध्येही कळत-नकळत रुजवण्यात येतं. बॉडी शेमिंग म्हणजे कोणत्याही व्यक्तिच्या रंग, रुप, शारिरीक आकार, वजन यावरून त्या व्यक्तीला लाज वाटेल, अशा पद्धतीने तिच्यावर शेरेबाजी करणे होय. बॉडी शेमिंग बहुधा स्त्रियांसोबत जास्त होताना दिसते.
ब्राह्मणवादी समाजात स्त्रिया, तरुणी, लहान मुलींनाही याचा सामना करावा लागतो. तरुणी आणि स्त्रियांना अनेकदा म्हटलं जातं, “..काळी-सावळी आहेस, सुंदर नाहीस, वजन किती वाढलंय तुझं, शरीरावर किती केस आहेत तुझ्या, चेहऱ्याला काही लावत का नाही तू..” अशा अस्वस्थ करणाऱ्या टोमण्यांना, बोलण्याला त्यांना सामोरं जावं लागतं.

अशा पद्धतीची वक्तव्ये आपल्या समाजात रुढ असलेल्या ब्राह्मणवादी पारंपरिक मानसिकतेकडे खुणावते ज्याच्या आधारे परिघावरील समुदाय, दलित महिला व मुली यांची त्यांचा वर्ग तसेच जातिय आधारावर बॉडी शेमिंग केली जाते ज्यामुळे त्यांना हिंसा, अपमान, ताणतणाव यांचा सामना करावा लागतो.
इतिहास काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या शरीराकडे एक वस्तू म्हणूनच पाहिलं गेलं आहे ज्याचा वेगवेगळ्या वर्गातील स्त्रियांनी कधीतरी आपआपल्या पातळीवर अनुभव घेतलेला असतो. काहींनी आहे त्या शरीरासह पराधीन होऊन आयुष्य काढलं तर काहींनी या सामाजिक मानदंडाच्या विरोधात विद्रोह केला.
स्त्रियांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या शरीराचं काय महत्त्व आहे याकडे आंतरविभागीय दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. खरं तर आपल्या समाजात वेगवेगळ्या जाति, वर्ग, क्षेत्र, धर्मातील स्त्रियांच्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रित केलं जातं. त्यामुळे परिघावरील समुहातील स्त्रियांची बॉडी शेमिंग हा एक सामाजिक-राजकीय मुद्दा आहे कारण तथाकथीत सवर्ण समुहाच्या वर्चस्ववादी राजकीय व सामाजिक वातावरणातून अशा प्रकारची विचारसरणी समाजात कायम ठेवण्यास मदत मिळत आली आहे.
जगभरातच अशा प्रकारची अनेक उदाहरणं मिळतात की कशा पद्धतीने सौंदर्याचे तथाकथीत मापदंड मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी वर्गाने नियंत्रित केले आहेत. आपल्याला इथे एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की सत्तेवर नेहमीच एका जातिवंत, विशेषाधिकार प्राप्त वर्गाचंच प्रभुत्व राहिलेलं आहे. भारतीय समाजापेक्षा वेगळ्या असलेल्या देशांमध्येही अशा प्रथा होत्या ज्यातून स्त्रीचं शरीर विशिष्ट प्रकारेच असावं अशी अपेक्षा ठेवण्यात यायची.
चीनमध्ये एका वर्गाच्या स्त्रियांमध्ये लहान पाय असण्याची प्रथा होती ज्यातून त्यांचे पाय बांधण्यात यायचे. लहान पाय असणं हा त्या स्त्रियांसाठी स्टेटस सिंबॉल होता पण यातून त्यांना हिंसा आणि शोषण यांनाच सामोरं जावं लागायचं.
नाओमी वुल्फने ‘द ब्यूटी मिथ’ मध्ये लिहिलं आहे की, सौंदर्याचे निकष स्त्रियांवर खोल प्रभाव टाकतात ज्यामुळे त्या आत्मघृणा किंवा आत्मसन्मानाने भरतात.
त्या पुढे लिहितात, “सौंदर्याचे निकष स्वर्गातून उतरत नाहीत तर वास्तवातून येत असतात आणि त्यातून एका विशिष्ट उद्देशाची पूर्ती केली जाते.”बॉडी शेमिंग ही एक सामाजिक समस्या आहे जिचे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर तसेच आत्मसन्मानावर खोल प्रभाव पडतात. वेगवेगळ्या वर्गातील, जातिंमधील स्त्रियांवर याचा विभिन्न प्रकारे परिणाम होतो.
दलित आणि आदिवासी स्त्रियांना त्यांच्या त्वचेचा रंग, शारिरीक ठेवण, पारंपरिक वेषभूषा यावरून भेदभाव, उपहास यांचा सामना करावा लागतो कारण मुख्य प्रवाहातील सौंदर्य निकषात त्या बसत नाहीत. दुसरीकडे तथाकथीत सवर्ण स्त्रियांवरही सौंदर्य निकषांचा दबाव असतो ज्यातून त्यांच्यावर वजन, रंग, शारिरीक ठेवण परफेक्ट असण्याचा दबाव राहतो.
पश्चिमी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील इंदु शर्मा देहनिंदेविषयीचा तिचा अनुभव सांगताना म्हणते, “मी दिसायला खूप रोड आहे. माझा रंगही काळा आहे. त्यामुळे लोक अनेकदा म्हणतात की तू ब्राह्मण वाटत नाहीस, ब्राह्मण इतके काळे नसतात. या शेरेबाजीमुळे मला कॉलेजात आणि नंतरही खूप त्रास झाला.
एकीकडे घरातून जातीय श्रेष्ठत्वाची भावना माझ्यात रुजवली होती तर बाहेर मला जे अनुभव येत होते त्यामुळे मला माझ्या या जातिचीच लाज वाटू लागली. काही काळानं मी या गोष्टीकडे वेगळ्या नजरेनं पाहू लागले पण तोवर खूप उशीर झाला होता आणि माझा बराचसा महत्त्वाचा वेळ या गोष्टींमागे वाया गेला होता.”
समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील स्त्रियांना शरीराचा देखभाल व सौंदर्याचे निकष पाळता येत नसल्यामुळे त्यांनाही अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. त्यांचे कपडे, त्वचेची काळजी, सामान्य जीवनशैली यावरून त्यांना अपमानित केलं जातं.
दुसरीकडे मध्यम आणि उच्च वर्गातील स्त्रियांवर सडपातळ आणि फिट असण्याचा दबाव असतो. ज्या यात कमी पडतात त्यांना आळशी, बेशिस्त समजलं जातं.
कविता दलित समाजातून येते. आपल्या कुटुंबातील ती पहिली पदवीधर आहे आणि एका सायबर कॅफेत पार्टटाईम काम करते. ती सांगते, “माझे कपडे, शरीर, वागणूक यावरून मला कायमच टोमणे ऐकायला मिळतात. तू हे खातेस म्हणून लठ्ठ झाली आहेस, आपलं वजन जरा कंट्रोल कर. मुलींचं असं शरीर असणं चांगलं नाही. वयापेक्षा तू जास्त मोठी दिसतेस. नीट कपडे घालत जा. केसांना तेल का लावतेस, त्यांना अशा पद्धतीने कशाला बांधतेस, अशा अनेक गोष्टी नेहमीच ऐकवल्या जातात. मी जिथे काम करते तिथं दलित समाजातील आणि त्यातही मुलगी अशी मी एकटीच आहे. मला सारे असे बोलतात आणि मग गमतीनं म्हटलं असं म्हणतात.”
अनेक संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले आहेत की गरीब वर्गातील स्त्रियांना त्यांचे कपडे, रंग, शारिरीक ठेवण यावरून बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. पैसा नसल्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहातील सौंदर्याचे निकष पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
दुसरीकडे आर्थिक संपन्न स्त्रियांवर हे निकष पूर्ण करण्याचा दबाव असतो ज्यात त्या पिचल्या जातात. त्यात अपेक्षेप्रमाणे यश आलं नाही तर त्यांनाही टीका सहन करावी लागते. काळासोबत सौंदर्याचे काही निकष बदलले असले तरीही अजूनही ते स्त्री शोषणाचे कारक आहेत.
भारताविषयी बोलताना रेबेका जाईल्स सांगतात की काळासोबत सौंदर्याचे निकष कसे बदलले आहेत. 1980 च्या दशकापर्यंत कामुक आणि सुडौल स्त्रियांना सुंदर समजलं जायचं. त्यानंतर गोरी आणि सडपातळ स्त्री सुंदर समजली जाऊ लागली.
जाईल्स वर्तमानपत्रांतील लग्नाच्या जाहिरातींचा उल्लेख करत सांगतात की, तिथं गोरा रंग अपेक्षिला जातो, काळा नाही. भारतीय सौंदर्यवादाचे निकष ठरवण्यात वसाहतवाद आणि बाजार दोन्हींचा मोठा हात आहे. त्यामुळे स्त्रियांची सामाजिक स्थिती प्रत्येक वर्गातच प्रभावित झाली आहे.
दिल्लीची वर्षा प्रकाश दलित वर्गातून येते. बॉडी शेमिंग आणि वर्ग-जाति याविषयी ती सांगते, “मी समाजाच्या तथाकथीत साचेबद्ध सौंदर्यात बसत नाही त्यामुळे मला शाळेपासून ते कॉलेजपर्यंत नेहमी विचारलं गेलंय की माझी जात कोणती आहे. लोकांची ही मानसिकताच झाली आहे की ते कपडे, वागण्या-बोलण्याची पद्धत, रंग, रुप यावरून त्यांच्या ज्ञानाचीही पारख करतात.
यातून त्यांचा वर्ग, जाति याविषयी तर्क करतात. मला नेहमी विचारलं जातं की मी कुठे राहते. माझ्या नावातील प्रकाश पाहून त्यांना नवल वाटतं. त्यांना माझं आडनाव जाणून घ्यायचं असतं. जेव्हा मी सांगते की मी दलित आहे तेव्हा ते म्हणतात की मी दलित वाटत नाही.

मला हे ऐकून खूप वाईट वाटतं कारण या लोकांच्या मनात अशी धारणा आहे की दलित लोक झोपडपट्ट्यांत राहतात, ते घाणेरडे असतात, काळे असतात, वगैरे. आपल्या इथं लोकांना कसं वाढवलं जातं हे यावरून दिसून येतं.”
हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बॉयोलॉजी’च्या वैज्ञानिकांनी, ‘जर्नल ऑफ इनव्हेस्टिगेटीव्ह डर्मेटोलॉजी’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, त्वचेचा रंग आणि जात यांच्यातील संबंध शोधण्यासाठी वेगवेगळ्या 52 प्रदेशातील 1825 लोकांची तपासणी केली. त्यांच्या लक्षात आलं की वेगवेगळ्या सामाजिक स्तरात त्वचेचा रंग वेगवेगळा आढळून आला.
नोएल मरियम जॉर्ज या जात आणि सौंदर्य निकष यांच्यातील संबंधाविषयी सांगतात की, “तथाकथीत सवर्ण स्त्रियांनी, पुरुषी आणि असभ्य समजल्या गेलेल्या दलित स्त्रियांपासून वेगळं दिसण्यासाठी आपल्या स्त्रीत्वाला वेगळा आकार दिला.”
ट्रान्ससमुहातही ती व्यक्ती ज्या लिंगाची असेल त्याप्रमाणे दिसण्याचा तिच्यावर मोठा दबाव असतो. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या परीघावर असलेल्या या स्त्रियांना स्त्री दिसण्यासाठी महागडे उपचार करणं शक्य होत नाही. त्यांच्याकडे तशी सामाजिक व आर्थिक ताकद नसते.
काळा रंग, जाड शरीर, पुरूषीपणा यामुळे त्यांना अनेकदा देहनिंदेला सामोरं जावं लागतं. स्त्रियांच्या शरीराला वेगवेगळ्या आधारावर वाटून त्यांच्या जगण्यातील अनेक स्तर प्रभावित केले जातात. भेदभाव आणि रंगभेद यांच्यामुळे स्त्री शरीर हा स्त्रीवादाच्या शोधातील महत्त्वाचा टप्पा राहिला आहे.
कारण त्यांना कैक शतकं सांस्कृतिक, जातिय, वर्गीय, लैंगिक आधारावर पराधीन जगणं जगावं लागलं. स्त्री शरीरासोबत केला जाणारा हा व्यवहार हेच दर्शवतो की त्यांचं शरीर, आकार, त्यांची कामं यांना सामाजिक विचारसरणी आणि इच्छेनुसार अनुकूल केलं जातं, ज्यातून या स्त्रियांचं केवळ शोषणच होतं, त्यांना कोणताही लाभ होत नाही.
सौजन्य - फेमिनिजम ऑफ इंडिया
अनुवाद - प्रतिक पुरी






