"मला माझ्या मुलींसाठी आई -बाबा दोन्ही व्हायचं आहे. त्यामुळे समाजाने मला कितीही टोमणे मारले,बरे वाईट बोले तरी मी डगमगणार नाही. 'गंजून मरण्यापेक्षा मुलींसाठी झिजून मरेन.' पण मागे हटणार नाही. माझ्या बरोबर अनेक महिलांना सोबत घेऊन त्यांना सक्षम करेन."
हे शब्द होते पुण्यातील वनिता हजारे यांचे. वनिता ताई यांचं सायकॉलॉजीमध्ये शिक्षण झालं आहे. त्या एका सामाजिक संस्थेमध्ये समुपदेशक म्हणून काम करतात. तसेच सोशल वर्कर ही आहेत. वनिता ताईंचा नवरा एका फॅक्टरीत नोकरीला होते.
एकंदरीत सुखात आनंदात चाकोरीबद्ध 'हम दो हमारे दो' असा त्यांचा जीवन प्रवास सुरु होता. परंतु अचानक 2020 साली कोविड आला आणि त्यात वनिता ताईंचा नवरा गेला. सर्व होत्याचं नव्हतं झालं.
'कोविडने माझ्या नवऱ्याला घेऊन गेला. त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच हादरली होती. नवरा गेल्यावर कोण सोबत नव्हतं, त्यामुळे नवऱ्याचा दहावा, तेरावा मुलींना सोबत घेऊन केला. सोबतीला कोणीच नव्हतं'. हे सांगताना ताईंच्या डोळ्यातून पाणी येत होत तरी डोळ्यात आत्मविश्वासाची चमक होती.
वनिता ताई सांगतात, 'नवरा गेल्यावर मी एक वर्ष डिप्रेशनमध्ये होते. रात्रीची झोप लागत नव्हती, जेवण जात नव्हतं. अचानक एक दिवस छातीती खूप दुखू लागलं. त्यावेळी मला दवाखान्यात न्याव लागलं. माझी अवस्था बघून दोन्ही मुली रडू लागल्या. मुलींचे हुंदके मला सहन झाले नाहीत. मुलींनी वडील गमावले आहेत. त्यात मी टेन्शन घेतलं कि मुलींचं भविष्य अंधारातच चाचपडत राहील. मुलींना कोणीच वाली राहणार नाही.

तेव्हाच मी ठरवलं मला दोन्ही भूमिका न डगमगता खंबीरपणे निभवायच्या आहेत. मी माझ्या दुखण्यावर मात केली अन कामाला लागले. कोविडमध्ये नवरा गेलेल्या महिलांना महानगरपालिकेकडून पन्नास हजार रुपये मिळणार होते.त्यासाठी कागदपत्रे लागणार होते. ती सर्व कामे मी केली. सायबर कॅफेत ऑनलाईन अर्ज करायला जात होते.
सायबर कॅफेत कधी ही घरा बाहेर न पडणाऱ्या महिला ही येत होत्या. ज्यांचं शिक्षण झालं नाही अशा ही महिला होत्या. त्यामुळे अर्ज भरताना महिलांना अडचणी यायच्या. मी त्यांना मदत करत होते. बऱ्याच महिलांना महानगर पालिकेच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यावेळी मी विचार केला. सर्वच महिलांना वेगवगेळ्या योजनांची माहिती मिळावी यासाठी सोशल मीडियाचा वापर केला तर सर्वच महिलांना मदत होईल.
सध्या बऱ्यापैकी महिला व्हाट्सअँप वापरतात. तेच लक्षात घेऊन एक व्हॉटस अँप ग्रुप काढला. मी एका संस्थेत काम करत असल्यामुळे या सर्व गोष्टी मला माहित होत्या.माझ्याकडे असलेली माहिती महिलांना मिळाली तर त्यांना फायदा होईल म्हणून छोटासा प्रयत्न केला.'
सुरुवातीला महिला ग्रुप मध्ये ऍड करण्यासाठी नंबर देत नव्हत्या परंतु वनिता ताईंचे सामाजिक काम बघून हळूहळू संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या महिला त्यात ॲड होऊ लागल्या. त्यातच त्यांना त्यांचा वर्गमित्र अशोक कुटे यांनी हेरंब कुलकर्णी सरांच्या कामाविषयी माहिती दिली. सरांशी संपर्क साधून एकल महिलांना अजून काही मदत करता येईल का याविषयी चर्चा केलय ताई सांगतात.
व्हाट्सअँप ग्रुपमुळे आम्ही एकमेकींचा आधार बनलो ...
'एकल महिलांसाठी असणाऱ्या महानगरपालिकेच्या योजना, काही स्वयंरोजगाराचे कलासेस, मुलांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात. आपल्या बरोबर त्यांना हि लाभ घेता यावा. यासाठी व्हाट्सअँप ग्रुप काढला. सुरुवातीला ग्रुपमध्ये आठ- दहाच महिला सहभागी झाल्या. महिला स्वतःचा मोबाईल नंबर द्यायला तयार नव्हत्या.

ओळख नसणाऱ्या व्यक्तीला मोबाईल नंबर कसा द्यायचा. म्हणून देत नव्हत्या. महिलांना भीती वाटत होत. ते साहजिकच होत. मोबाईल नंबर घेऊन कोणी त्रास दिला तर. याची भीती होती. हळूहळू माहित होईल तस महिला सहभागी होऊ लागल्या. सध्या ग्रुपमध्ये तीनशे - चारशे महिला आहेत. महिलांना वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळू लागली.
कोणाला आर्थिक मदत पाहिजे असेल.त्या संबंधित वेगवेगळ्या संस्था,एनजीओतर्फे मदत मिळत गेली. महिला जोडू लागल्या. मग मी मागे हटले नाही. माझं काम मी जोमाने सुरु केल्याचं 'ताई सांगतात.
'हेरंब सरांच एक मोठं पाठबळ मिळालं. सरांच्या माध्यमातून एकल महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणाऱ्या संस्था, एनजीओशी जोडले गेले. वेगवगेळ्या, एनजीओशी संपर्क करून शंभर एक एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी आर्थिक मदत मिळवली.
विपला फाउंडेशनकडून पस्तीस मुलांना शिक्षणासाठी तीन वर्षाचे एकूण दिड लाख रुपये मिळवून देण्यासाठी मदत केली. तसेच विपलाकडून तीस महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी पंधरा हजार मिळवून दिले. काही संस्थांनी महिलांना शिलाई मशीन दिल्या. स्पर्श संस्थेने माझ्या घरात पंधरा दिवसाचा उद्योग व्यवसाय प्रशिक्षणाचा कोर्स घेतला .वीस महिलांचा ब्युटी पार्लरचा कोर्स घेतला.
महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत. महिलानी आर्थिक स्वावलंबन व्हावं. हाच उद्देश होता.' वनिता ताई सांगतात.
महिलांना एकत्र करून वेगवेगळ्या योजनांची माहिती, आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रवास वनिता ताईंना सोपा नव्हता. समाज वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होता. नवरा गेला आणि हि बाई कशाला फिरते सर्वाना मदत करत. हिला एव्हडं काय पडलं आहे दुसऱ्याचं.

दोन मुली आहेत त्यांचा सांभाळ करत बसायचं सोडून हि काम करत बसले. वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे मारत होते, चुकीचे मेसेजेस करत होते. सगळं सहन करत त्यांनी महिलांसाठी काम करण्याचा सोडलं नाही. ताईंनी घरामध्ये एकल महिलांच्या मदतीसाठी 'बी पॉझिटिव्ह कौन्सिलिंग सेंटर' सुरु केलं आहे. भरपूर महिलांना त्यांच्या माध्यमातून मदत होत आहे.
एका सायबर कॅफेत महिलांची ओळख होते. त्यांच्या अडचणी समस्या तिला कळतात. त्या समस्या स्वतःच्याच आहेत अशा समजून त्यांच्या मदतीसाठी स्वतःच्या घरामध्ये एक सेंटर सुरू करते, ही गोष्ट अनेक महिलांना प्रेरणादायी आहे.






