अखेर ममता कुलकर्णीने सुटकेचा श्वास सोडला. अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हा रद्द करण्याची तिची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली आणि ममताचा या गुन्ह्यात सहभाग होता हे सिद्ध करणारे पुरावेच नाहीत, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीने मुंबई उच्च न्यायालयात 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रे गहाळ झाल्याने त्यावर अनेक वर्ष सुनावणी होऊ शकली नव्हती.
या गहाळ झालेल्या कागदपत्रांचा शोध घेत असल्याची माहिती हायकोर्ट रजिस्ट्रारने न्यायालयाला दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवण्यात यावीत आणि दोन्ही पक्षकारांनी निबंधकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. मात्र ती सादर होऊ न शकल्याने अखेर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने ममता कुलकर्णीची याचिका स्वीकारत तिला दिलासा दिला.
ममता कुलकर्णीच्या निमित्ताने गुन्हेगारी विश्वाला ग्लॅमरचा चस्का आहे की, ग्लॅमरविश्वाला अंडरवर्ल्डचे आकर्षण आहे, यावर चर्चा करणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरीही, वास्तव हे आहे की, दोहोतल्या संबंधांतली सीमारेषा कायमच धूसर राहिली आहे.
सीमारेषेवरच्या याच धूसर प्रदेशात हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात थरारक कहाण्या जन्माला आल्या आहेत. यातलीच एक कहाणी आहे, ममता कुलकर्णी नामक नटीची. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबापासून सुरू होऊन तब्बल २० देशांत सुरू असलेल्या ड्रग्जच्या बदनाम धंद्यापर्यंत जाऊन पोहोचलेली.
या कहाणीत टॉपलेस फोटोशूटमुळे एकेकाळी गाजलेली, पण आता स्वत:ला ‘योगिनी' म्हणवणारी एकटी ममताच नाही, तर तिचा तथाकथित नवरा ड्रग्ज तस्कर विकी गोस्वामी आहे आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनही आहे. ममताचा हा प्रवास एका पातळीवर गुन्हेगारी विश्वातले लागेबांधे उघड करणारा आहेच, पण त्याहीपेक्षा पैसा, प्रसिद्धी आणि लोकप्रियता पेलू न शकलेल्या नटीच्या अध:पतनाचाही आहे…
‘टॉपलेस’ फोटोशुटपासूनच वादाला सुरूवात
ही घटना आहे, 1993 च्या सप्टेंबर महिन्यातली. फिल्मी गॉसिपगप्पांसाठी ओळखला जाणारा "स्टारडस्ट'चा अंक ब्लॅकमध्ये हातोहात तडाखेबंद विकला गेला होता! त्याला कारणही तितकेच सनसनाटी निर्माण करणारे ठरले होते. त्या वेळची उभरती नटी ममता कुलकर्णीने त्या अंकासाठी चक्क टॉपलेस फोटोशूट केले होते.

फोटोतल्या ममताने जिन्सची पँट तेवढी घातलेली होती, पण त्याचीही झिप उघडी होती आणि आपल्या दोन्ही हातांनी समोरचं अंग झाकलेलं होते. तो जमाना इंटरनेटचे नामोनिशाण नसण्याचा होता. "मी कधीही अंगप्रदर्शन करणार नाही'अशी घोषणा करून चित्रपटसृष्टीत दाखल होणाऱ्या नट्यांचा होता. त्यामुळे ममताचे टॉपलेस फोटो देणे, खळबळ माजवणारे ठरले होते.
तेे सेन्सेशनल छायाचित्र जयेश सेठ नावाच्या त्या काळी इंडस्ट्रीत दबदबा असलेल्या छायाचित्रकाराने टिपले होते. त्या संदर्भात जयेश म्हणाला होता - ‘स्टारडस्टच्या संपादकीय बैठकीत असे ठरले की, या नियतकालिकाच्या मुखपृष्ठासाठी एखाद्या नायिकेचे छायाचित्र काढले जावे, जी दिसायलाही सुंदर असेल, त्याचबरोबर उन्मादकही. म्हणूनच या छायाचित्रासाठी आम्ही अशा एका अभिनेत्रीच्या शोधात होतो, जी दिसायला सेक्सी असण्याबरोबरच निरागसही वाटेल.
आधी आम्ही माधुरी, जुही चावला या त्याकाळच्या आघाडीच्या अभिनेत्रींशी संपर्क साधला, पण त्यांनी अशा प्रकारचे छायाचित्र काढण्यासाठी साफ नकार दिला. कारण स्पष्ट होतं, कारकीर्द बहरात असताना त्यांना कोणतेही वादविवाद नको होते. त्यामुळे मग आम्ही नव्या नटीचा शोध सुरु केला. त्या शोधयात्रेत गवसली, ती ममता कुलकर्णी! जेव्हा "स्टारडस्ट'ने तिच्याशी संपर्क साधला, तेव्हा तर तीही चक्रावली.'
‘ममता काहीशी नर्व्हस होती. ती आम्हाला म्हणाली की, टॉपलेस छायाचित्र काढून घेण्यात किती जोखीम आहे, याची मला फारशी कल्पना नाही. जर ही जोखीम उचलल्यानंतर त्यातून काही चांगले निपजणार असेल, तर ठीक. पण जर हे प्रकरण उलटले, तर मला कायमचे चित्रपटसृष्टीच्या बाहेर जावे लागेल, वर मला घरातूनही हाकलून देतील.'
पण प्रत्यक्षात घडले उलटेच. ममताच्या या टॉपलेस फोटोशूटनंतर ‘स्टारडस्ट’वर उड्या पडल्या. या मासिकाची एक प्रत त्यावेळी 20 रुपयाला मिळायची. पण ती ब्लॅकमध्ये १०० रुपयांपर्यंत विकली गेली. ममता कुलकर्णीचे हे फोटोशूट "बोल्ड' असले तरी "ब्युटिफूल'ही आहे, अशी तारीफ आमीर खानपासून अनिल कपूरपर्यंतच्या सर्व आघाडीच्या अभिनेत्यांनी केली.
टॉपलेस छायाचित्रामुळे ममता कुलकर्णीचे कौतुक करणारे लोक जसे चित्रपटसृष्टीत होते, तसे जाहीर माफी माग आणि मोकळी हो, असे सल्ला देणारेही होते. कारण, ‘टॉपलेस छायाचित्रामुळे ममता कुलकर्णीची सगळीकडे इतकी छी-थू होऊ लागली होती. अखेर तिने काही दिवस घराबाहेर पडणेच बंद केले होते. नव्हे, या छायाचित्राबद्दल जाहीर माफी मागण्याची तिने तयारीही केली होती.
पण, त्याआधी तिला माधुरी दीक्षितचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथ याचा फोन आला होता. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याने ममता कुलकर्णीला निमंत्रण दिले होते. छायाचित्रावरुन उठलेल्या वादळानंतर ममता कुलकर्णी जाहीर समारंभांमध्ये जाण्याचेही टाळू लागली होती, पण ती राकेशनाथने दिलेल्या निमंत्रणाचा अव्हेर मात्र करु शकली नव्हती.
ममता कार्यक्रमाला गेली. तिला रिक्कू राकेशनाथने व्यासपीठावर बोलावले. ती व्यासपीठावर जाताच प्रेक्षकांमधील युवकांनी तिच्यावर जणू फुलांचा वर्षावच सुरु केला. ते युवक जोरजोराने चित्कारत होते - ममता! वी लव यू…
छोटा राजनचा राजकुमार संतोषीला फोन गेला आणि…
या धामधुमीत राजकुमार संतोषीने ‘चायना गेट' या चित्रपटासाठी ममताला करारबद्ध केले. एकीकडे "चायना गेट'चे चित्रीकरण सुरु झाले आणि ममताच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबत चर्चा होऊ लागली. नेमका हा वाद उद्द्भवल्याने ममता कुलकर्णीला चित्रपटातून काढून टाकण्याचा विचार राजकुमार संतोषीने केला. मात्र त्यावेळच्या कुजबुजीनुसार अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा संतोषीला फोन गेला. संतोषीने आपला विचार बदलला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपाटून आपटला.
त्यानंतर ममताने थेट संतोषीवर विनयभंगाचा आरोप केला. अर्थातच, संतोषीने हा आरोप फेटाळून लावला. मग, चित्रपटातल्या माझ्या भूमिकेला संतोषीने सूडबुद्धीने कात्री लावली ...हेतूत: छम्मा-छम्मा हे एकमेव आयटम साँग उर्मिला मातोंडकरला दिले... अशीही आरोपांची बत्ती ममताने लावली. पण या सगळ्या वादगांने संतोषीचं काही गेलं नाही. ममताचं करिअर मात्र डामाडोल होण्यास सुरुवात झाली. अंडरवर्ल्डशी तिच्या असलेल्या कथित संबंधांमुळे दिग्दर्शक, अभिनेता तिच्याबरोबर काम करण्याकरिता अनुत्सुक दिसू लागले.
पाच-सात वर्षांच्या काळात बड्या स्टार्ससोबत टेचात चमकलेल्या ममताने 2002 मध्ये "कभी तुम कभी हम' या चित्रपटात प्रभावहीन भूमिका साकारली आणि तोच तिच्या करिअरचा शेवटही ठरला. कारण, त्यानंतर ती बॉलिवूडमधूनच गायब झाली, ती कधीच परतली नाही...
...अचानक ममता कुलकर्णीं हे नाव चर्चेत आलं. अचानकच तिच्यावर आरोपांची सरबत्ती सुरु झाली. ती ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणात गुंतली असल्याचे छातीठोकपणे सांगितले जाऊ लागले. अखेर ममताने तोंड उघडले. इ-मेलवर तिने २०१६ रोजी एका नियतकािलकाला मुलाखत दिली. ती अशी -
प्रश्न : आपके पती क्या काम करते है?
ममता : पहले आप मेरे पती से जुडी क्या जानकारी जानते है, वो जरुरी है बताना. मैं यानी ममता अपना नाम ऐसे किसी आदमी के साथ नही जोडना चाहती, जो ड्रग के बिजनेस में हो. जब मै उनसे मिली थी, मुझे पता नही था, तब वो क्या था? लेकिन जब से मै उससे मिली, तब से मैंने कभी उसका ड्रग्स से कोई लेना देना नही देखा.
प्रश्न : उनका नाम हमेशा ड्रग्स के साथ ही क्यों जोडा जाता है?
ममता : मैं नही जानती. आप लोग लिखते है, दिखाते है, आपको ज्यादा पता होगा. इसकी जानकारी मुझे अपने एक दोस्त से हुई, मै जब सुबह उठी, तो एक दोस्तने इफेड्रिन विवाद के बारे मे बताया. ये क्या था? एक कफ सीरप. वे दवाई को लेकर मुद्दा बना रहे थे. मै ठाणे पुलिस को बताना चाहती हूं, की बेवजह मेरा नाम खींचा जा रहा है...
प्रश्न : क्या इफेड्रिन को ड्रग बनाने मे उपयोग किया जा सकता है?
ममता : नही किया जा सकता.
प्रश्न : क्या आप किशोर राठौड, मनोज जैन जयमुखी को नही जानती?
ममता : मैने उन्हे कभी नही देखा. मै उन्हें नहीं जानती...
प्रश्न : अभी विक्की कहां है? केन्या मे?
ममता : वह केन्या में है. इस बकवास में उसका कोई हाथ नही है. मुझे लगता है, कि लोग खुद को बचाने के लिए उसके नाम का इस्तेमाल कर रहे हैं. मनोज और अन्य लोग उसे फंसाने के लिए ऐसा कर रहे है, पहले भी वो इन सब मामलों से साफ निकला था...
प्रश्न : उनका नाम ड्रग्स के बिजनेस के साथ क्यों जोडा जाता है?
ममता : नही उसने कुछ नही किया है. आप जानते हैं, मै आध्यात्मिक पथ पर हूं. मै ड्रग्ज से नफरत करती हूँ, उनसे जो इसे बिजनेस के रुप में उपयोग करते है...
तब्बल दोन हजार कोटींच्या ड्रग्जमध्ये अडकली
चार प्रसंगांत, टोकाची चार रुपं घेऊन समोर आलेली ममता कुलकर्णी. ममताचे आयुष्य कधीच सरळ रेषेत नव्हते. मुळात, ती नाकासमोर चालणारी मुलगीच नव्हती. 1990 च्या दशकात ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या ममतावर जून 2016 मध्ये एक वादळ घोंघावू लागले.
दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये ममता गुंतली असल्याचा निष्कर्ष ठाणे पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासादरम्यान काढला होता. 2016 च्या एप्रिल महिन्यात ठाणे पोलिसांनी सोलापूर येथील एक फार्मा कंपनी ‘एव्हॉन लाइफसायन्सेस लिमिटेड’च्या शाखेतून सुमारे 20 टन इफिड्रिन हे औषधी द्रव्य जप्त केले होते.
त्याचीच किंमत दोन हजार कोटी रुपये होती. इफिड्रीन हे दमा व खोकल्यावरील औषधांमध्ये वापरले जाणारे एक द्रव्य. याच्या वापरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही बंधने लादली आहेत. तस्कर या इफिड्रिनचा उपयोग क्रिस्टल ‘मेथ’ नावाचे एक पार्टी ड्रग तयार करण्यासाठी करीत असल्याचा संशय ठाणे पोलिसांना होता.
पुढे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामी व त्याची पत्नी ममता कुलकर्णी गुंतली असल्याचेही ठाणे पोलिसांचे ठाम म्हणणे होते. तसा गुन्हाही ठाणे पोलिसांनी दाखल केला होता. विकी व ममता यांच्या शोधात असलेल्या पोलिसांनी इंटरपोलमार्फत ममता व विकी गोस्वामी यांच्या नावाने "रेड कॉर्नर नोटीस'ही त्यासाठी जारी केली.
या सगळ्या तस्करी प्रकरणाचा म्होरक्या मनोज जैन होता. तो एव्हॉन लाइफसायन्सेस लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. मनोज जैन, गुजरातच्या एका माजी काँग्रेस आमदाराचा मुलगा किशोर राठौड, पुनीत शृंगी, केमिस्ट बाबासाहेब धोत्रे आदी आरोपींनी केनियामध्ये ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी व डॉ. अब्दुल्ला यांची भेट घेतली होती.
त्या भेटीत ठरल्यानुसार गुजरातमधून केनियाला 30 टन इफिड्रिन पाठवण्यात येणार होते. हे प्रकरण मीडियामधून उघड झाले आणि त्या दिवसापासून ममता कुलकर्णीचे नाव बदनाम होत राहिले…
अमीर खानच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा
1992 मध्ये राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "तिरंगा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ममता कुलकर्णी हिचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. तिचे वडील सरकारी नोकरीत होते. आई गृहिणी. आणि मोलिना व मिथिला या दोन बहिणी.
बॉलिवूडमध्ये ममताने आशिक आवारा, वक्त हमारा है, करण -अर्जुन, सबसे बडा खिलाडी, बाजी, बेकाबू, छुपा रुस्तम : ए म्युझिकल थ्रिलर अशा हिट चित्रपटांतून भूमिका केल्या. ‘आशिक आवारा’ या चित्रपटासाठी तिला "फिल्मफेअर न्यू फेस अवॉर्ड'ही मिळाले होते. अर्थात, अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड रुपाचीच त्या काळी अधिक चर्चा रंगत होती. समकालीन अभिनेते व दिग्दर्शकांबरोबर तिचे नाव जोडले जात होते.
"बाजी'च्या शूटिंगदरम्यान ती आमिर खानच्या प्रेमात पडल्याच्या चर्चेला ऊत आला होता. आमिर खानला इंप्रेस करण्यासाठी ममता सेटवर पुस्तकात डोकं घालून बसत असल्याचे अनेकांनी बघितले होते. ‘नसीब’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यान रागाच्या भरात तिने स्पॉटबॉयच्या थोबाडीत मारल्याच्या बातमीने तिची उन्मत्त नि उद्याम अशी प्रतिमा तयार झाली होती.
पण बोल्डनेस हीच तिची खरी ओळख होती. हिंदीबरोबरच ममताने तामिळ, तेलुगु, मल्याळी, कन्नड, बंगाली चित्रपटांतही कामे केली होती. खरं तर बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी डोंगा पुलिस (1991), प्रेमशिखरम (1992) या तेलुगु चित्रपटांमध्ये ममता दिसली होती. म्हणजेच, बऱ्यापैकी ग्लॅमरचा अनुभव घेऊनच ती हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेली होती.
त्यावेळी तिच्या फिल्मी आयुष्यात एका पाठोपाठ एक वादळ निर्माण होत गेले. त्यातील स्टारडस्ट नियतकालिकातील टॉपलेस फोटोमुळे उठलेले वादळ, तसे मोठे होते. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच ममता कुलकर्णीच्या घराबाहेर तिच्या विरोधात काही संघटनांनी जोरदार निदर्शने केली. ममता कुलकर्णीवर खटला दाखल करण्यात आला. या खटल्याचा 2000 मध्ये निकाल लागला.
ममताला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला . तुरुंगाचीही काही काळ तिला हवा खावी लागल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या. एका क्षणी टॉपलेस छायाचित्राच्या वादंगाने इतके उग्र स्वरुप धारण केले होते, की खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ममता एकदा बुरखा घालून कोर्टरुममध्ये जाणे भाग पडले.
तिने बुरख्याचा वापर केल्याने मुस्लिम समाजातील काही लोकांचाही पारा चढला. त्यांनी लगोलग ममताविरोधात फतवाही जारी केला होता.
टाॅपलेस छायाचित्रामुळे जशी तिच्यावर टीका होत होती, तशी ती दुसऱ्या बाजूला फेमससुद्धा होऊ लागली होती. रिक्कू राकेशनाथने तिला एका जाहीर कार्यक्रमात बोलावले तेव्हा, तिला युवकांमधील आपल्या लोकप्रियतेचे दर्शन घडले होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील साधीसुधी पण गोंडस मुलगी, आता एकदम उन्मादक रुपात लोकांसमोर उभी होती.
परिणामी, बॉलिवूडचे निर्माता-दिग्दर्शक तिच्याकडे रांग लावून होते. जेमतेम कारकिर्दीमध्ये तिने बॉलिवूडच्या तीनही प्रसिद्ध खानांबरोबर म्हणजे आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान यांच्याबरोबर चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. 1995 हे तिच्या कारकिर्दीतले सर्वात यशस्वी वर्ष ठरले होते.
यावर्षी तिचे सात चित्रपट झळकले. याच वर्षी ‘बाजी'मध्ये ममताने आमीर खान व ‘करण अर्जुन'मध्ये तिने सलमान खान व शाहरुख खानबरोबर काम केले. त्याशिवाय ‘सबसे बडा खिलाडी'मध्ये अक्षयकुमार हा तिचा नायक होता. यातल्या ‘मांग मेरी भरो’ या सेन्शुअस गाण्याने तर कहर केला होता. अचानक बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची तेव्हा गणना होऊ लागली होती.
परंतु, येनकेनप्रकारेण यश मिळवण्याच्या जणू ममताने धडाका लावला होता, मात्र तिला हे झटपट आलेले यश पचवता आले नाही. चित्रपटबाह्य गुंत्यात ती गुंतत गेली. 1990 च्या दशकाच्या अखेरीस ती आणि ड्रग माफिया विकी गोस्वामी (तिचा कथित विद्यमान पती) एकमेकांच्या संपर्कात आले. तिथून पुढे आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.
मधल्या काळात तिच्या लग्नाबद्दलही अनेक वावड्या उठल्या. आपण ममताशी लग्न केलेले नाही, असे एका बाजूला विकी गोस्वामी सांगे, तर दुसऱ्या बाजूला आपले विकीशी लग्न झाले असल्याचे मुलाखतींतून जाहीर करे.
विकी गोस्वामी मुरलेला स्मगलर
विकी ममताचा नवरा होता की नाही, याबाबत तेव्हा संभ्रम नक्कीच होता, मात्र विकी हा मुरलेला तस्कर होता, हे पोलीस दप्तरी नोंदलेले होते. हा विकी गोस्वामी गुजरातमधल्या साबरकांठा जिल्ह्यातला. त्याचे वडील आनंदगिरी गोस्वामी डीएसपी पदावरुन निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब अहमदाबाद शहरातील पाल्डी भागातील कृष्णकुंज सोसायटीमध्ये राहायला गेले.
विकीच्या तस्करीची सुरुवात झाली, ती दारु तस्करीतून. असेही म्हणतात की, विकी दारु तस्करीत गुंतलेला असल्यामुळे त्याचे वडील आनंदगिरी यांना डीएसपी पदावरुन निलंबित करण्यात आले होते.
दारु तस्करीच्या प्रकरणात विकीवर आरोप होतेच, पण अहमदाबादमध्ये मारहाणीच्या घटनांमध्ये त्याच्यावर काही गुन्हेही दाखल झाले होते. त्याच दरम्यान अहमदाबाद शहरातील पाल्डी भागात विकीची ओळख बिपिन पांचालशी झाली होती. त्याने विकीला मेथाक्वालोन म्हणजेच मँड्रेक्स या नशिल्या ड्रगची ओळख करून दिली होती. त्यानंतरच विकीने मँड्रेक्सची तस्करी सुरु केली.
90च्या दशकात विकी करीत असलेल्या मँड्रेक्स तस्करीचे साम्राज्य आफ्रिकी देशांपर्यंत पसरले होते. 1993 मध्ये बिपीन पांचालला पोलिसांनी अटक केल्यानंतर विकी मुंबईला निघून गेला. गुन्हेगारी विश्वातल्या इतर अनेक गुंडांप्रमाणे विकी हिंदी चित्रपटांचा मोठा शौकिन होता.
पोलिसांच्या माहितीनुसार विकी मुंबईतील हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये मँड्रेक्सचा पुरवठा करायचा. त्यामुळे बॉलिवूडबरोबरच मुंबईतील अंडरवर्ल्डबरोबरही त्याचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्या तो खास वर्तुळातील बनला. याच दरम्यान कधी तरी विकी गोस्वामीची ममता कुलकर्णीशी ओळख झाली. आणि नेमके त्याचवेळी ममता कुलकर्णीची चित्रपट कारकीर्द घसरणीला लागलेली होती. ममता मायानगरीतून माफियानगरीत शिरू लागली होती…
मलेशियामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत
विकी गोस्वामीशिवाय छोटा राजनशीही ममताचे नाव जोडले गेले होते. ममता भारतातून निघून थेट मलेशियाला छोटा राजनकडे पोहोचली होती. मलेशियातील एका शहरात ती छोटा राजनबरोबर राहात होती, असा भारतीय गुप्तचर संस्थांचा तेव्हाही दावा होता. गुप्तचर यंत्रणेतल्या खबऱ्यांनुसार ममता ही छोटा राजनच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
पण ममता ही मुंबई पोलिसांची ‘डबल एजंट’ आहे, प्रेमाचे नाटक करुन आपली सगळी बित्तमबातमी ती मुंबई पोलिसांना पुरवते आहे , असा छोटा राजनला संशय होता. एक दिवस तडकाफडकी ममताची मलेशियातून पाठवणी झाली. तिकडे छोटा राजनने आपले राहण्याचे ठिकाणही बदलले. मात्र, छोटा राजनने असे दूर लोटल्यानंतर त्याच्याकडून ममता कुलकर्णी सरळ मुंबईला आलीच नाही. ती छोटा राजनकडून निघाल्यानंतर दुबईला गेली.
तिथे छोटा राजनला ओळखणाऱ्या एका गृहस्थाने ममताला मदत केली. तो होता, दस्तुरखुद्द विकी गोस्वामी! विकी छोटा राजनचा धंदा सांभाळत असेे. ममता व विकीची गाठ अशी वेळोवेळी पडतच गेली आणि त्यातून गुन्हेगेारी नेक्सस आकारास येत गेले. विकी गोस्वामी जेव्हा मुंबईत होता, तेव्हा त्याची अमली पदार्थांची तस्करी करण्याची एक खास पद्धत होती. ठाणे अँटी एक्स्टॉर्शन सेलचे अधिकारी आणि एकेकाळी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून गाजलेले प्रदीप शर्मा सांगतात, ‘मी जेव्हा क्राइम ब्रँचमध्ये कार्यरत होतो तेव्हा काळ्या सुटकेसमधून अमली पदार्थांची कशी तस्करी केली जाते, याची माहिती आमच्या हाती लागलेली होती.
खबऱ्यांकडूनच ही खास खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी मुंबई विमानतळावर एका खास काळ्या सुटकेसची चर्चा जोरात व्हायची. ही सुटकेस कोण घेऊन यायचे हे अजूनही उलगडलेले नाही. परंतु विमानतळावर या काळ्या सुटकेसची कधीही तपासणी व्हायची नाही. लोडर या सुटकेस विमानामध्ये लोड करायचे. ती सुटकेस विमानतळावर घेऊन आलेला माणूस मग तिथून निघून जायचा.’
प्रदीप शर्मा आणि दया नायक हे मागावर
ही खबर मिळाल्यानंतर प्रदीप शर्मा आणि दया नायक या पोलिस अधिकाऱ्यांनी या काळ्या सुटकेसचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या टीममधील काही लोकांनी विमानतळावर लोडर म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र, सर्वच सुटकेसचा रंग बहुधा काळाच असायचा. त्यामुळे तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या सुटकेस कोणत्या हे शोधणे खूपच कठीण बनायचे.
पण अथक शोधानंतर एक गोष्ट पुढे आली की, या काळ्या सुटकेस आठवड्यातून तीनदा मुंबई विमानतळावर पाठविल्या जातात. त्या मुंबईहून आफ्रिकेला पाठविल्या जातात. त्याच रंगाच्या सुटकेस आफ्रिकी देशांतून मुंबईलाही पाठविल्या जातात. या सुटकेस विमानतळावर असल्या की, त्यांच्या आजूबाजूला कोणीही फारसे फिरकायचे नाही. मात्र रात्र झाली, की त्या सुटकेस आहेत त्या ठिकाणावरुन गायब व्हायच्या.
अशा संशयाच्या फेऱ्यात अडकलेल्या काही काळ्या सुटकेस मुंबई क्राइम ब्रँचने जेव्हा पहिल्यांदा उघडल्या, तर त्यात मँड्रेक्स सापडले. त्यानंतर मग कसून तपास सुरु झाला. या तस्करीत विजय गिरी उर्फ विकी गोस्वामीचा हात असल्याची बाब पुढे आली. मात्र या प्रकरणात विक्की गोस्वामीला कधीच अटक करता आली नाही. तसे भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
विकी गोस्वामी भारतातून निसटला
विकी गोस्वामी मुंबईत ज्या मँड्रेक्स तस्करीत गुंतला होता, त्याविषयी "इंडियन एक्स्प्रेस'मध्ये एक बातमी छापून आली होती. त्या बातमीनुसार मँड्रेक्स हे त्यावेळचे महत्वाचे पार्टी ड्रग होते. मँड्रेक्सचा एक थेंब जरी रक्तात मिसळला, तर त्या माणसाला एकदम तणावमुक्त झाल्यासारखे वाटू लागते.
त्याला बेहद्द नशा चढते. त्यानंतर तो गाढ झोपी जातो. आफ्रिकेच्या देशांत मँड्रेक्सचे अनेकांना व्यसन लागले आहे. त्या देशांतील शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थी मँड्रेक्सच्या व्यसनात अडकले आहेत. मँड्रेक्सच्या धंद्यातील हा मोठा फायदा पाहूनच विकी गोस्वामी झांबियामध्ये स्थायिक झाला, असे म्हटले गेलेे.
झांबियामधील काही बड्या धेंडांना हाताशी धरुन त्याने एका कंपनीची स्थापना केली. मँड्रेक्स बनविण्यासाठी या कंपनीचा उपयोग करण्याचे त्याने ठरविले. मात्र विकी झांबियामध्ये फार काळ राहिला नाही. विकी करत असलेली ड्रगनिर्मिती व तस्करीची खबर झांबियाच्या अधिकाऱ्यांना लागताच, विकीने दक्षिण आफ्रिकेत पलायन केले.
दक्षिण आफ्रिकेतील एक साप्ताहिक ‘द मेल अँड गार्डियन' अनुसार विकीने तिथे ड्रगचे मोठे नेटवर्क उभे केले होते. त्यातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळवली. महागड्या गाड्या, प्रायव्हेट जेट विमान खरेदी करण्याइतका तो श्रीमंत झाला. मात्र दक्षिण आफ्रिकेतही त्याची डाळ फार दिवस शिजू शकली नाही. झांबियाप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही तो पोलिसांच्या नजरेत आला.
आता आपले काही खरे नाही, हे लक्षात आल्यावर 1996 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेतून विकी दुबईला पळून गेला. त्यावेळी मुंबईतील अंडरवर्ल्डसाठी दुबई हे नंदनवन बनलेले होते. तिथेही विकी सुरक्षित नव्हता. 1997 मध्ये ड्रग तस्करीच्या आरोपाखाली दुबई पोलिसांनी विकीला अटक केली. दुबई न्यायालयाने त्याला 25 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
पण त्यानंतर विकीबद्दल फारशा बातम्या कुठे आल्या नाहीत. नाही म्हणता एक दोन वेळा असे वृत्त प्रकाशित झाले की, दुबईमध्ये तुरुंगात असलेल्या विकीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. तुरुंगातच त्याने कधीतरी ममता कुलकर्णीशी इस्लामी पद्धतीने विवाह केला, असेही एका बातमीत म्हटले गेलेे.
मात्र,या बातम्यांचा विकी व ममता कुलकर्णी यांनी साफ शब्दांत इन्कार केला होता. ठाणे येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात विकी व ममता गुंतले असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आल्यानंतर जे वादळ उठले, त्यानंतर विकीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी माझी हितचिंतक असल्याचे सांगितले होते. नोव्हेंबर 2012 ला विकीची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर त्याने दुबई सोडले.
तो केनियामध्ये राहू लागला. पण चोराची चोरीची सवय कधीही सुटत नाही. 2014 च्या ऑक्टोबर महिन्यात केनियातील ड्रग तस्कर बक्ताश अकाशा याच्याबरोबर विकी गोस्वामीलाही अटक करण्यात आली. या प्रकरणी त्याला जामीन जरुर मिळाला, पण पुन्हा ते आरोपी होण्याचे, तुरुंगाची हवा खाण्याचे, न्यायालयात जाण्याचे सारे भोग वाट्याला आलेच.

या सगळ्या प्रवासात ममता विकीसोबत स्वरुपात राहिली. असं म्हणतात की, ममता व विकी गोस्वामी यांचा ड्रग्ज तस्करीचा धंदा वीस देशांत पसरला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे दोघेही आपली नावे बदलून हा धंदा करत आहेत. अनेक देशांत ममता कुलकर्णी वेगवेगळ्या नावांनी वावरत राहिली.
अनेक आंतरराष्ट्रीय तस्करांशी तिचा पती विकी गोस्वामी नव्हे तर दस्तुरखुद्द ममता कुलकर्णी िडलिंग करते,असेही पोलिसांचे म्हणणे राहिले आहे. अफगाणिस्तानातील माफिया ममता कुलकर्णीच्या शब्दाबाहेर नाहीत. तिची संमती असल्याशिवाय हे माफिया पाकिस्तान, दुबईला अफूचा एक दाणाही पाठवत नाहीत. विकीचा अंमली पदार्थ तस्करीचा धंदा ममता कुलकर्णीने वाढविला आहे. गेल्या तीन वर्षांत चार हजार कोटींपर्यंत त्यांच्या या धंद्याची उलाढाल पोहोचली आहे, पोलिसांच्या म्हणण्यानुसार इथवर हे सारे येऊन पोहोचले.
आपल्या धंद्याबाबत खूपच गदारोळ माजू लागल्यानंतर ममता कुलकर्णीने आपले बस्तान केिनयातून अमेरिकेला हलविले. त्यानंतर ती अमेरिकेतून आखाती देशांत पोहोचली. भारतीय गुप्तचर संस्थांना ती कोणत्या देशात राहाते, याचा छडा अजूनही लावता आलेला नसला तरी ती दुबईमध्ये राहात असावी, असा त्यांना दाट संशय आहे. फरार ममता अमेरिकेत राहात असताना तेथील तपासयंत्रणांनी तिला ताब्यात घ्यावे,म्हणून भारताने काही प्रयत्न केले होते.
मात्र, जून 2017 मध्ये अमेरिकी प्रशासनाने ममताविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने तिला अटक करण्यास व तिचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास साफ नकार दिला होता. अमेरिकेत तिच्याविरुद्ध एकाही प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही, ही बाब तेव्हा तिच्या पथ्यावर पडली होती. तरीही ठाणे पोलिसांनी हार मानलेली नाही. तिला व विकीला पकडण्यासाठी कायदेशीर बाजू लढवत शेवटी इंटरपोलला या दोघांवर रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यासाठी भारताने भाग पाडले आहे... तिच्या विरोधात अडीच हजार पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
आता साध्वी बनून राहते ममता कुलकर्णी…
राज कपूरच्या "राम तेरी गंगा मैली'मुळे गाजलेली मंदाकिनीही दाऊदच्या नादाला लागून अशीच भरकटली तो काळ होता, 1990 च्या दशकाचाच. ममताही भरकटली ती याच काळात. मंदाकिनी आता राहाते मुंबईत. तिचा तिबेटी नवरा डॉ. कगयूर टी. रिंपोचे ठाकूर याच्या समवेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. ती तिबेटी योगाचे क्लासेस चालवते. अध्यात्मिक मार्गाला लागली आहे.
दलाई लामांची शिष्या बनली आहे… ममता कुलकर्णी सांगायला अध्यात्मिक वगैरे बनली असली, तरीही गूढ ठिकाणी राहते. गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवून असते. तपास यंत्रणा तिच्या मागावर असतात. तरीही ती स्वत:ला ‘योगिनी’ म्हणवून घेते. एक-मंदाकिनी गुन्हेगारी जाळ्यातून सुटून सन्मार्गाला लागली आहे, एक-ममता स्वत:ला योगिनी म्हणवून घेत गुन्हेगारी जाळ्यात गुरफटत चालली आहे…






