हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील राखीगढी येथील ही एप्रिलची एक उष्ण दुपार आहे आणि पाच लोकांचं एक कुटुंब सिंधू खोरे संस्कृतीशी संबंधीत पुरातात्विक स्थळावर पोहोचलं आहे. दिल्लीहून इथवरची 170 किमीची त्यांची यात्रा उत्साहाने भरलेली होती. इतिहासात मागे जाणं, त्या नदीचे पुरावे बघणं जिचा भारतात दोनशे वर्षांपासून शोध घेतला जात आहे, सर्वांत महत्त्वपूर्ण नदी- सरस्वती. पण ते खोदल्या गेलेल्या टेकडीच्या दिशेनं जाताच त्यांचा उत्साह ओसरतो. सरस्वती नदीच्या वैभवशाली खुणांऐवजी त्यांना दिसतं एक निरूत्साही खेडेगाव, येतो शेणाचा वास, गोवऱ्यांचे ढिग, चरणारी गाढवं, गायी-म्हशी. त्या ऐतिहासिक स्थळावर आता लोकांनी अतिक्रमण केलं आहे, ज्यातून भारताचा इतिहास बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. इथं कोणाचं लक्ष नाही. 4-5 हजार वर्षांपूर्वी आटलेल्या, नाहीशा झालेल्या सरस्वतीचा शोध घेण्याची मोहिमही नाहीशी झाली आहे. ज्यावर आधी काम केलं होतं त्यांतली 60 टक्के स्थळं नष्ट झाली आहेत.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील नद्यांच्या ठिकाणी असलेले पुरातत्त्वीय अवशेष सरस्वतीची कथा सांगण्यासाठी मदत करू शकतात. पण ज्या वेगाने या नदीचं पात्र नष्ट होत आहे त्यामुळे उत्तर हडप्पा काळ आणि वैदिक काळाला जोडणारे पुरावे शोधण्याची मोहिमही संकटात सापडली आहे. या स्थळांवर होणाऱ्या अतिक्रमणातून एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की सर्वांत महत्त्वाची गोष्ट काय आहे, इतिहास की जगणं? “आमच्या अनेक पिढ्या इथं वाढल्या आहेत. आता हे राष्ट्रीय महत्त्वाचं स्थळ झालं आहे. आम्हाला आनंदच आहे याचा. पण आमची काळजी कोण घेणार आहे? आम्ही इथले मूळ निवासी आहोत. आम्हाला इथून हाकलण्याची गोष्ट केली जात आहे. आमच्याकडे गुरंढोरं आहेत. त्यांना आम्ही कुठं नेणार?” रोजंदारीवर जगणारे राजेश सिरोही विचारतात. राजेश संरक्षित टेकडी क्रमांक तीनवर राहतात. त्यांचं घर तिथं आहे. पण त्यात काहीही बदल करायला आता पुरातत्व खात्याची अनुमती गरजेची आहे. केवळ जीवंत लोकच इतिहास नष्ट करण्यात सहभागी नाहीत. मागील वर्षी एकाच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक लोकांनी टेकडी क्रमांक एकचं कुलुप तोडून टाकलं होतं. त्यावरून त्यांच्यात आणि पुरातत्व खात्याच्या लोकांमध्ये भांडणंही झाली. ही पहिलीच घटना नव्हती.
साऱ्या जगातून लोक येतात पण आमचं जगणं बदलत नाही…
राजेशनं टेकडीवर पसरलेली मातीची भांडी दाखवत म्हटलं, “साऱ्या जगातून लोक इथं आमचं गाव बघायला येतात, इथला इतिहास समजून घ्यायला येतात. पण त्यामुळे आमचं जगणं बदललं नाही. आता सरकार आम्हाला इथून हाकलतच आहे.” पण पुरातत्व खात्याचे अधिकारी लोकांच्या या धारणेकडे आव्हान म्हणून बघतात आणि वारसा संरक्षण ही एक सातत्यानं सुरू असलेली प्रक्रिया समजतात. भारतीय पुरातत्व खात्याचे महासंचालक टी. जे. एलोन म्हणतात की, “इथल्या लोकांनी एका रात्रीतून अनेक टेकड्या सपाट करून टाकल्या. ही नित्याचीच गोष्ट आहे. अशा स्थळांचं रक्षण करणं ही राज्याची आणि केंद्राची जबाबदारी असते. आम्ही फक्त या स्थळांची देखभाल करत असतो.”

मागील दशकभरात सरस्वती नदी परियोजनेत मोठी सरकारी गुंतवणूक झाली असली तरीही भगवानपूरा, तरखानवाला डेरा, दौलतपूरा, काशीथल इत्यादी जागा उध्वस्त होत आहेत. सतलज-यमुना लिंक कालव्यातून आलेल्या पूरानं हरियाणातील जोगने खेडा धुवून निघालं. राजस्थानात बालू, मिताथल, बरोर या जागा ज्या सरस्वत नदीच्या किनाऱ्यावर होत्या असं म्हटलं जातं, नाहीशा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजस्थानातील तरखानवाला डेरा येथील टेकडी लोकांनी सपाट केली आहे. तिथं आता शेती केली जाते. पूर्वी इथं एका लहानशा प्रदर्शनी कक्षात स्थळाचा इतिहास आणि नवीन शोधांची माहिती दिली जायची. एका फलकावर राखीगढीतल्या हडप्पाकालीन टेकड्यांची चित्रं आहेत ज्याच्याखाली प्राचीन दृषद्वती नदीचं खोरं दाखवण्यात आलं आहे. इथल्या ‘विजिटर बुक’मध्ये एकानं लिहिलंय, “सनातन भारतीय संस्कृती जवळून बघण्याची एक अपूर्व संधी.” याच वर्षी मार्चमध्ये पुरातत्व खात्यानं 18 जागांना संरक्षित स्मारकांच्या यादीतून काढून टाकलं कारण त्या विकासाच्या प्रक्रियेत नष्ट झाल्या आहेत. यातील अनेक जागा इथल्या लोकांच्या पिढीजात जमिनीवर होत्या. चंदीगढ सर्कलचे पुरातत्वतज्ञ कामेई अथेलियू काबोई सांगतात, “आम्ही राहिलेल्या जागांची सुरक्षा करत आहोत आणि स्थानिकांना तिथं शेती न करण्यासाठी सांगतोय. आम्ही मुख्यालयालाही यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. यात मिताथल आणि राखीगढीची 7 व्या क्रमांकाची टेकडीही आहे.” यातील बहुतेक स्थळांवर स्थानिकांच्या मालकी हक्काच्या जमिनी आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. एलोन म्हणतात की “लोकांना त्यांच्या ऐतिहासिक वारशाविषयी जागृत करणं गरजेचं आहे. पण लोकांना जगण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे वाटतात.”
बालू टेकडी ऐतिहासिक स्थळांपैकीच एक आहे. सरस्वती नदीशी जोडलेली ती महत्त्वाची टेकडी आहे. तिथं आजही जुन्या काळची मातीची भांडी, बांगड्या दिसतात. सोबतीला वर्तमान काळातील कचरा, एक ट्यूबवेल, एक सडक, एक मंदिरही दिसतं. कैथल जिल्ह्यातील बालू टेकडी राखीगढीपासून 55 किमी दूर आहे. याचा बहुतेक भाग स्थानिकांच्या राहणीमानामुळे नष्ट झाला आहे. 1979 साली इथं उत्खनन झालं होतं तेव्हा 4.50 मीटर जाड मातीच्या हडप्पाकालीन भिंती इथं आढळल्या होत्या. आता तिथं लोकांनी शेतीसाठी जागा तयार केली आहे. जेव्हा उत्खनन सुरू करण्यात आलं तेव्हा स्थानिकांना आनंद झाला होता कारण पुरातत्व खात्याच्या लोकांनी त्यांना कामावर ठेवलं होतं. 82 वर्षांचे राजेंद्र कुमार त्या दिवसांची आठवण करत सांगतात, आम्हाला तेव्हा फक्त टेकडीची माहिती होती. त्यामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे हे नव्हतं माहीत. लोक उत्खनन बघण्यासाठी रोज यायचे. आता लोकांना यात काडीचाही रस उरलेला नाही. बालू टेकडी संरक्षित स्मारकांच्या यादीत येत नव्हती त्यामुळेही इथं पुरातत्व खातं काही करू शकलं नाही.

सरस्वती नदीचा इतिहास आणि अतिक्रमण
ऋग्वेदात सरस्वती नदीचा महान नदी म्हणून उल्लेख मिळतो. संशोधनांतून दावा करण्यात आलाय की तिचा उगम गढवालच्या बंदरपूंछ ग्लेशियरमधून झाला होता. पंजाब, हरियाणा, राजस्थान मधून वाहत गुजराथला खंबातच्या खाडीत ती मिसळायची. ती हजारो वर्षांपूर्वी नष्ट झाल्याचं मानलं जातं. हरियाणा सरकारने सरस्वती नदी शोधमोहिमेसाठी 2017 मध्ये कुरुक्षेत्र विश्वविद्यालयात स्वतंत्र केंद्रच उभारलं. सरस्वतीचा शोध घेण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत पण तिच्या काठावरच्या प्राचीन स्थळांचं संरक्षण करण्यासाठी काही केलं जात नाहीये. इथल्या अतिक्रमणांमुळे पुरातत्व शोधकांच्या कामावर पाणी फेरलं जात आहे. भूवैज्ञानिक प्रा. ए. आर. चौधरी म्हणतात, “सरस्वती नदी हरियाणातील लोकांच्या मनात पूर्वीपासूनच आहे. पण 2014 नंतर जेव्हा आम्ही नदीच्या प्राचीन प्रवाहांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रीत केलं तेव्हा लोकांमध्ये उत्साह वाढला. आम्ही नदीच्या 3200 किमी लांबीचा मार्गाची ओळख केली आहे.” हरियाणा, पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे अमित खत्री म्हणतात, “जुन्या स्थळांचं रक्षण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. पण आमचं लक्ष सर्वांत महत्त्वाच्या पुरातत्व जागांवर असतं. लहान स्थळ प्राधान्ययादीत खाली असतात. आम्ही आता संरक्षण योजनांमध्ये विस्तार करतोय, ऐतिहासिक स्थळांच्या उत्खणनावर भर देतोय आणि ग्राऊंड पीनेट्रेटिंग रडारसारखी आधुनिक यंत्रणा त्यात वापरत आहोत. हेरीटेज टुरच्या माध्यमातून या स्थळांची लोकप्रियता वाढवावी लागेल. ज्यामुळे त्यांची उपेक्षा होणार नाही.” मागील वर्षी एका संसदीय समितीने प्राचीन स्थळांवरील अतिक्रमणं हटवण्यासाठी सध्याच्या नियमांत बदल करण्याची सूचना केली होती. पण त्यासंदर्भात काही करण्यात आलं नाही.
हरियाणा-हिमाचल सीमेवरील यमुनानगर मधील अनेक गावांच्या बाहेर मोठमोठे बोर्ड लागले आहेत ज्यावर वैदिक सरस्वती नदीचा मार्ग दाखवण्यात आला आहे. इथल्या लोकांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे. 2015 मध्ये मुगलवाली गावात (नदीच्या उगमाजवळचं गाव) झालेल्या उत्खननात नदीपात्राचे अवशेष सापडले होते. चौधरी यांच्या टीमने मनरेगा मजूरांच्या मदतीने हे खोदकाम केलं होतं. अजूनही लोकांना त्या दिवसांची आठवण आहे की त्यांच्या गावाला देशपातळीवर त्यामुळे किती प्रसिद्धी मिळाली होती म्हणून. मुगलवालीचे निवासी अमित कुमार सांगतात, “आम्ही सरस्वतीच्या उगमापासून काही किमी अंतरावरच आहोत. ही आटली आहे एवढंच आम्हाला माहिती आहे. पण तिचा एक प्रवाह अजूनही आमच्या गावातून जाताना दिसतो.” ते म्हणतात की “या नदीचं पुनर्जीवन व्हायला हवं कारण ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे.” श्रद्धा, राज्य यंत्रणा, पुरातत्वीय पुरावे असूनही गुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या पुनरुद्धाराच्या आवश्यकतेवर आणि त्यासाठी खर्च केल्या गेलेल्या पैशांवर प्रश्न विचारले गेले आहेत. वरिष्ठ पुरातत्ववाद्यांनी या प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे की यावर प्रचंड पैसा खर्च करण्यापेक्षा त्यावर योग्य काम करणं अपेक्षित आहे. एकाने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं की, “आम्ही आमच्या वैभवशाली इतिहासाविषयी खूप काही बोलत असतो. पण जेव्हा वेळ येते तेव्हा सरकार जास्त लक्ष देत नाही. एकीकडे आम्ही गुप्त झालेल्या नदीचा शोध घेत आहोत आणि दुसरीकडे तिच्या तीरावरील महत्त्वाची स्थळं एकामागून एक नष्ट होत आहेत, अतिक्रमिली जात आहेत.”
पण चौधरींकडे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच्या भिंतीवर लावल्या गेलेल्या पोस्टरवर सरस्वतीचा शोध घेण्याचं स्पष्ट कारण आहे, “भारतीय संस्कृतीची पौराणिकता, खोल दडलेला पाण्याचा आणि खनिजांचा साठा शोधण्यासाठी, तसेच आमच्या संस्कृतीसाठी ही नदी खूपच महत्त्वाची आहे,” ते सांगतात. चौधरींनी दावा केलाय की त्यांनी सरस्वतीच्या सर्व प्राचीन प्रवाहांची ओळख केली आहे. ते म्हणतात, “जमिनीत असलेल्या आर्द्रतेच्या आधारावर प्राचीन प्रवाहांची ओळख केली जाऊ शकते. आम्ही रिमोट सेंसिंग टेक्निकचाही उपयोग केला आहे. याच प्रवाहांमध्ये पूर आल्यास अतिरिक्त पाणी सोडून त्यावर नियंत्रण आणता येऊ शकतं.” यमुनानगर पूरप्रवण क्षेत्रातील जिल्हा आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार हरियाणातील सीसवाल, राखीगढी, भिर्राना, कुणाल, बालू, बनावली इत्यादी पुरातात्विक अवशेष सरस्वती नदीच्या प्राचीन प्रवाहापासून जेमतेम पाचशे मीटर्सच्या आतच वसलेले आहेत.

राखीगढीत टेकडी क्रमांक एक पासून फक्त काही मीटर अंतरावरच एक विशाल संग्रहालय तयार होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 च्या बजेटमध्ये यासाठी विशेष निधी दिला आहे. पण हा इतिहासाला सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा आणि त्यांच्या कल्पनांना तथाकथीत वैभवशाली भूतकाळाशी जोडण्याचा पहिलाच प्रयत्न नाही की ज्यातून भविष्यातील राजकीय लाभ मिळू शकतो. 2002 मध्ये वाजपेयी सरकारने सरस्वती नदीच्या काठावरील अवशेषांच्या स्थळांवर ‘अतिथी सूचना केंद्र’ उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कालीबंगा, रोपड, थानेसर अशा काहीच ठिकाणी त्याची अंमलबजावणी होऊ शकली. एक पुरातत्त्व विशेषज्ञ सांगतात, “राज्य शासनाला या ठिकाणी अवशेषांचं जतन करण्यासाठी कठोरपणे काम करणं गरजेचं आहे. पण फक्त मोठ्या प्रसिद्ध जागांनाच महत्व दिलं जातं ज्यामुळे इतर लहान अप्रसिद्ध ठिकाणं दुर्लक्षित राहतात.”
कुरुक्षेत्रपासून 19 किमी दूर असलेल्या भगवानपुरा येथील अवशेषांनाही राज्य शासनाच्या बेफिक्रीमुळे नुकसान झालं आहे. आणीबाणीच्या काळात 1976 मध्ये इथं आर. एस. बिष्त आणि जे. पी. जोशी यांनी उत्खणन केलं होतं. त्यातून हडप्पा आणि चित्रित धूसर मृदभांडी वापरणारी संस्कृती यांच्यात संबंध असल्याचे पुरावे आढळले होते. भगवानपूराचे बाबू राम यांनी त्यात मजूर म्हणून इतर स्थानिकांसोबत काम केलं होतं. पुरातत्व खात्यानं त्यांना दोन रुपये रोजंदारी दिली होती. त्यांनी पहिल्यांदाच तेव्हा एक रुपयाचं नाणं पाहिलं होतं. आज गावातील फक्त थोड्याच लोकांना माहिती आहे की 40 वर्षांपूर्वी त्यांच्या वस्तीपासून फक्त 350 मीटर अंतरावर 25 फुट उंचीची एक टेकडी होती ज्यात सरस्वती नदीशी संबंधीत काही पुरावे होते म्हणून. आता ती सपाट झाली आहे. बाबू राम सांगतात, “खोदकाम केल्यानंतर काही वर्षांतच जमिनीच्या मूळ मालकांनी तिथली माती उकरायला आणि त्यावर शेती करायला सुरूवात केली. लोक तेव्हा टेकडीवर चढायचे, उतरायचे. आता या जागेवर एक टेकडी होती हे सांगूनही यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.”
अनुवाद – प्रतिक पुरी
(साभार – द प्रिंट)






