काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळे नियमानुसार ते वायनाड लोकसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. ही घटना एका वेगळ्या राजकीय समीकरणाला गती देणारी आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. केरळमधील राजकीय वातावरण पाहता त्या निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. काँग्रेसच्या महासचिव असलेल्या आणि यापूर्वी संकटमोचक म्हणून काम केलेल्या प्रियंका आता प्रत्यक्षात संसदीय राजकारणात येत आहेत. गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या त्या दहाव्या सदस्य आहेत.
काँग्रेस दक्षिण भारतात प्रबळ होती. उत्तर भारतात तिचे अस्तित्त्व फार नव्हते. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्याने या वेळी जागा वाढल्या आहेत. रायबरेलीची जागा ठेवून वायनाडचा राजीनामा द्यायचा आणि तिथून प्रियंका यांना निवडून आणून दक्षिण आणि उत्तर भारतात काँग्रेसचा पाया अधिक मजबूत करायचा, असा हेतू त्यामागे आहे. वायनाडची जागा सोडून देशातील सर्वात मोठे राजकीय राज्य आणि गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशासह हिंदी भाषक राज्य आपलेसे करण्याचा राहुल यांचा प्रयत्मन आहे. गांधी घराण्याला माहीत आहे, की उत्तर प्रदेशातील आपली गमावलेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली संधी नाही.
वायनाड सुरक्षित मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने उत्तर प्रदेशात देशातील सर्वोत्तम कामगिरी केली.राहुल यांनी जरी आता वायनाडमधून राजीनामा देण्याची घोषणा केली असली, तरी हा निर्णय दहा दिवसांपूर्वी घेण्यात आला होता.सोमवारची बैठक ही निव्वळ औपचारिकता होती. बैठकीत बहुतांश नेत्यांनी सांगितले, की राहुल यांनी दक्षिण भारतात काँग्रेस मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. आता उत्तर भारताची म्हणजेच हिंदी पट्टा मजबूत करण्याची वेळ आहे. काँग्रेसला देशात एकहाती सरकार बनवायचे असेल, तर त्यांना हिंदी हृदयभूमी जिंकावी लागेल. त्यामुळे राहुल उत्तर भारताचे नेतृत्व करतील, तर प्रियंका दक्षिण भारताचे नेतृत्व करतील, असा निर्णय पक्षाने घेतला. प्रियंका दक्षिणेत गेल्याने काँग्रेसविषयी लोकांमध्ये नाराजी राहणार नाही. याशिवाय काँग्रेसची पकडही अबाधित राहणार आहे.

गांधी घराण्याच्या आत्तापर्यंतच्या राजकारणावर नजर टाकली, तर पक्षप्रमुखांनी नेहमीच अमेठी किंवा रायबरेलीतून देशाचे राजकारण चालवले आहे. या दोन्ही जागा कुटुंबासाठी लकी मानल्या जातात. राहुल दोन ठिकाणांहून निवडून आल्याने कोणत्या जागेचा राजीनामा द्यायचा याबाबत त्यांच्या मनात द्नंद्व निर्माण झाले असेल;परंतु पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया यांनी राहुल यांना वायनाडपेक्षा रायबरेली का महत्त्वाची आहे, हे समजावून सांगितले. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ऐंशी जागा असून या राज्यात काँग्रेसचा पाया मजबूत करायचा असेल,तर रायबरेलीची खासदारकी महत्त्वाची आहे, हे त्यांचे म्हणे त्यांना पटले.
उत्तर प्रदेशातील गणिते
मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी, एच. डी. देवेगौडा असे काही मोजके पंतप्रधान वगळले, तर बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशातील होते. मोदी गुजरातचे असले, तरी ते वाराणसीतून निवडून येतात. ही पार्श्वभूमी एकदा लक्षात घेतली, तर राहुल यांनी वायनाडचा राजीनामा का दिला, हे लक्षात येईल. सोनिया यांनी रायबरेलीच्या जनतेला ‘मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे’ असे म्हटले होते. त्यांचे ते भावनिक आवाहन परिणामकारक ठरले. राहुल यांना रायबरेलीमध्ये वायनाडपेक्षा मोठा विजय मिळाला. अशा परिस्थितीत रायबरेली सोडल्यास उत्तर प्रदेशात चुकीचा संदेश गेला असता. एवढेच नाही, तर गांधी घराण्याच्या प्रमुखाने नेहमीच उत्तर प्रदेशातून राजकारण केले. वडील राजीव गांधी अमेठीतून, तर आजोबा जवाहरलाल नेहरू अलाहाबादमधून निवडणूक लढवत होते.
रायबरेली ही त्यांची आई सोनिया, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी यांची जागा आहे. हिंदी पट्टा आणि देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर भारतातील राज्यांमध्ये लोकसभेच्या 543 पैकी 350 जागा हिंदी भाषिक बहुसंख्य राज्यांमधून येतात. येथे 2019 मध्ये भाजपला 170 हून अधिक जागा मिळाल्या होत्या आणि भाजपने एकहाती सरकार स्थापन केले होते. काँग्रेसचाही असाच विचार आहे, की केंद्रात एकहाती सरकार बनवायचे असेल, तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये आणि विशेषत: उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत बनवावा लागेल, कारण आघाडीच्या जोरावर जास्त काळ ते सत्तेवर राहू शकत नाही.उत्तर प्रदेशात या वेळी काँग्रेसला 9.4 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेससाठी ही संजीवनी आहे. 2019 मध्ये काँग्रेसला फक्त 6.36 टक्के मते आणि एक जागा मिळाली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 2.33 टक्के मते आणि दोन जागा मिळाल्या.

विरोधी पक्षनेता उत्तर प्रदेशचा असावा, अशी काँग्रेसजणांची इच्छा आहे. राहुल यांना संसदेत विरोधी पक्षनेते व्हावे लागेल, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, असे खर्गे यांनी म्हटले होते. याचा अर्थ राहुल विरोधी पक्षनेते होणार हे निश्चित मानले जात आहे. रायबरेलीची जागा कायम ठेवण्यामागील काँग्रेसची एक कल्पना अशी आहे, की विरोधी पक्षनेताही पंतप्रधान ज्या राज्यातून येईल त्या राज्याचाच असेल. यामुळे राहुल यांना राष्ट्रीय मीडिया आणि लोकांमध्ये राहण्याची अधिक संधी मिळेल. राहुल उत्तर प्रदेशात अधिक सक्रिय झाले, तर ते मोदी यांच्यांशी अधिक स्पर्धा करू शकतील. उत्तर प्रदेशचे प्रश्न राहुल सभागृहात मांडू शकतील. यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा जनसंपर्क आणखी वाढेल. तसेच हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत होईल. काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने जनतेत येतील. इतकेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस भाजपला पर्याय बनू शकेल.
कुटुंबाचे दक्षिणेशी नाते
प्रियंका समर्थक काहींनी राहुल यांनी वायनाड सोडू नये आणि प्रियंकांनी रायबरेलीतून पोटनिवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती; परंतु प्रियंकांनी ते मान्य केले नाही. नामांकनाच्या एक दिवस आधी राहुल रायबरेलीतून निवडणूक लढवणार, असे गांधी परिवाराने ठरवले होते. प्रियंका आणि त्यांचा पती रॉबर्ट या दोघांनाही रायबरेलीतून निवडणूक लढवायची इच्छा होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रियंका यांना समजावून सांगितले, की घराणेशाहीच्या आरोपामुळे काँग्रेस कमकुवत होईल. संपूर्ण कुटुंब निवडणूक लढविण्याऐवजी राहुल यांना ब्रँड करणे आवश्यक आहे. हे प्रियंकांनाही पटले. त्यामुळेच प्रियंका यांनी वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याचे मान्य केले..
वास्तविक, प्रियंका यांनी वाराणसीत मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा होती; मात्र अखेरच्या क्षणी निर्णय बदलण्यात आला. राहुल यांनी रायबरेलीतील आपल्या एका भाषणात याकडे लक्ष वेधले होते. राहुल यांनी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर दक्षिणेत काँग्रेस सातत्याने मजबूत होत गेली. विशेषतः केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केरळमध्ये 20 पैकी 14, तामिळनाडूमध्ये 9 आणि कर्नाटकमध्ये 9 जागा मिळाल्या. आता राहुल यांना उत्तर भारत, विशेषत: हिंदी पट्टा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, परंतु दक्षिणही कोणत्याही किंमतीवर गमावू इच्छित नाही.

राहुल यांच्या सांगण्यावरून प्रियंका यांनी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवण्यास होकार दिल्याचे सांगितले जाते. प्रियंका संसदेत पोहोचल्याने काँग्रेसला ऊर्जा मिळेल. प्रियंका यांनी या वेळी ज्या उत्साहाने प्रचार केला, मंगळसूत्राबाबतचे उत्तर असो की मुस्लिम आरक्षण; त्यांनी मोदी आणि भाजप नेत्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यांनी परिपक्वता दाखवली. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सभागृहाबाहेर पडले आहेत किंवा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत त्यांच्या सभागृहात येण्याने पक्षाची विचारधारा अधिक मजबूत होणार आहे.
संसदेत नवे सत्ताकेंद्र?
प्रियंका संसदेत आल्याने राहुल आता भाजपसमोर एकटे पडणार नाहीत. प्रियंकांची वक्तृत्व आणि बोलण्याची शैली अतिशय नीटनेटकी आहे. त्यामुळे प्रियंका संसदेत पोहोचल्यावर सभागृहात नव्या काँग्रेसची झलक पाहायला मिळणार आहे. त्यांचे संसदेत येणे हा काँग्रेससाठी मास्टर स्ट्रोक असेल. राहुल यांना आगामी काळात उत्तर प्रदेशात आपले नेटवर्क वाढवायचे आहे. ते संपूर्ण राज्यात जनसंपर्क अभियान सुरू करू शकतात. काँग्रेसने ज्या जागांवर निवडणूक लढवली आहे, त्या जागांवरही पदयात्रा काढू शकतात. ते ग्राउंड वर्कवर भर देतील. उत्तर प्रदेशात मोठ्या घटनांच्या ठिकाणीही ते जाऊ शकतील. यामुळे त्यांचा सार्वजनिक संपर्क आणि पक्षाचा पाठिंबा वाढेल.
येत्या काही दिवसांत हे दोघे भाऊ-बहीण आपली सक्रियता आणखी वाढवू शकतात. राहुल आणि प्रियंका उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पाठिंबा वाढवण्यासोबतच अखिलेश यांच्याशी असलेल्या आघाडीची पूर्ण काळजी घेतील. प्रियंका आणि राहुल मोठ्या प्रसंगात, घटनांत अखिलेश याच्यासोबत असतील. अखिलेश यांना लोकसभेत राहुल त्यांच्या शेजारची जागा देऊ शकतात. समाजवादी पक्ष सध्या देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. राजकीय अवकाश व्यापताना मित्राचे अवकाश कमी होणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावी लागेल.






