गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. यवतमाळ मधील माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली होती. पदयात्रेसाठी गेलेल्या 200 जणांना अन्नातून विषबाधा झाली, ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भातसई येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत 109 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली, नांदेडमध्ये दीड हजार भाविकांना प्रसादातून विषबाधा झाली तर, लोणावळ्यामधे चाऱ्यामध्ये काही तरी खाण्यात आल्या कारणाने 146 बकऱ्यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात जवळपास 2000 जणांना विषबाधा झाली आहे. पण, प्रत्येकवेळी कोणीतरी अन्नात विष कालवलच असेल असं नाही. कधीकधी आपल्या चुकाही अन्नाला विषारी करतात. अन्न कसे विषारी होते? अन्न विषबाधा म्हणजे काय? आणि ती का होते? याबद्दल जाणून घेऊयात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी जवळपास 16 लाख लोकांना अन्नातून विषबाधा होते किंवा खराब अन्न खाल्यामुळे ते आजारी तरी पडतात. जगभरात दूषित अन्न खाल्यामुळे दरदिवशी सरासरी 340 मुलांवर जीव गमावण्याची वेळ येते. आपल्या अगदी रोजच्या आहारातल्या पदार्थांमुळेही आपल्याला विषबाधा होऊ शकते. त्यामुळेच कोणते पदार्थ कसे खावेत, ते शिजवण्याच्या पद्धती काय असल्या पाहिजेत, कोणते पदार्थ टाळावेत याची नीट माहिती असणं गरजेचं आहे.
एमजीएम हॉस्पिटलचे डीन डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मते, “शिळ्या अन्नामधून विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. दिवेसंदिवस आपला कल पॅकेज्ड आणि जंक फूड खाण्याकडे वाढत चालला आहे. बऱ्याच हॉटेल अन्नपदार्थ आधीच मसाला लावून फ्रिजरमध्ये स्टोर करून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या पासून खाद्यपदार्थ बंमवाली जातात. हे फक्त हॉटेल मधेच नाही तर घरांपर्यंत देखील पोहचलं आहे. वेळ वाचावा म्हणून आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायचा. हल्ली ताजं करून खाण्याची पद्धत खूप कमी झालीये आणि या सर्व प्रकारामध्ये विषबाधेचे प्रमाण वाढत चालले आहे.”
अन्नातील अशुद्धता पोटात पोहोचल्यामुळे अन्न विषबाधा होते. दोन वेगवेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांचे सेवन केल्यानेही विषबाधा होऊ शकते. तर कधी अन्न जास्त काळ ठेवल्याने ते विषारी होते. अनेकवेळा घाणेरडे पाणी पिण्यामुळे, न धुतलेली फळे किंवा भाज्या खाल्ल्याने देखील अन्नातून विषबाधा होते.

एमजीएम हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ. अजय काळे यांनी अन्नातून विषबाधेच्या प्रकारासंबंधी बाईमाणूसशी बोलतांना असे सांगितले की, “विषबाधेशी संबंधित कारणे बघायला गेलं तर पहिलं आहे स्वच्छता. आपण बाहेर काही खाल्लं आणि त्यात जर विषाणू किंवा जिवाणू सारखे काही घटक असले तर त्यामुळे विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. दुसरीगोष्ट म्हणजे की ऋतूंचा पण मोठा परिणाम आपल्या अन्नावर होतो. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. त्यामुळे ते जितके ताजे खाता येईल तेवढे चांगले. पाश्चराइज्ड केलेलं दूध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांमुळेही विषबाधा होऊ शकते. कारण कच्च्या दुधात ई. कोलाई, कँपिलोबॅक्टर, क्रिप्टोस्पोरिडियम, लिस्टेरिया आणि साल्मोनेला सारखे जीवाणू असतात. पाश्चराइज्ड न केलेल्या दुधापासून बनवलेलं आइस्क्रीम आणि दहीसुद्धा हानीकारक ठरू शकतं.
रोजच्या आहारातून ही विषबाधा आपल्याला होऊ शकते. जर अन्न व्यवस्थित शिजवलेलं नसेल किंवा जो कोणी व्यक्ती अन्न बनवत आहे त्या व्यक्तीने हात स्वच्छ धुतलेले आहे का? किंवा त्या व्यक्तीच्या हाताला जर काही इन्फेकशन झालं असेल तर अन्न बनवतांना किटाणू अन्नात जाऊ शकतात आणि त्यातूनही विषबाधा होऊ शकते. शिळा भाजीपाला असेल किंवा अन्न बनवतांना दूषित पाणी वापरले तरी देखील रोजच्या आहारात आपल्याला विषबाधा होऊ शकते. आपला सकस आहार जो आहे वरण, भात, भाजी-पोळी आणि सलाड हा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे पण तो आहार शिजवण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. कुठलं ही अन्नपदार्थ बघितलं तर एका ठराविक वेळेपर्यंत आपण त्याचे सेवन करू शकतो. उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्याकारणाने अन्न हे लवकर खराब होतं. ठराविक वेळ निघून गेल्यानंतर त्या अन्नामध्ये विशेष बॅक्टरीयाचा शिरकाव होतो. त्यामुळे ही विषबाधा होते. अन्न बनवतांना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे ती न घेतल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विषबाधेसारखे प्रकार घडतात. अनेक ठिकाणी जर दोन ते तीन हजार लोकांसाठी अन्न बनवायचं असेल तर ते खूप वेळेआधी बनवून ठेवलेलं असतं. बनवून ठेवल्यानंतर दहा ते बारा तासानंतर ते अन्न खाल्लं जातं जे आरोग्यासाठी धोकादायक असते.”

या गोष्टी लक्षात ठेवा
- कोरडे मसाले आणि धान्यांमध्ये बुरशी सहज आढळते. म्हणून ते वापरण्यापूर्वी ते तपासा.
- नमकीन आणि बिस्किटे सारखे स्नॅक्स नेहमी घट्ट डब्यात ठेवा.
- जुने मसाले नियमितपणे तपासत राहा की त्यात बुरशी आहे का?
- दही, दूध आणि टोमॅटो यासारख्या गोष्टी नेहमी फ्रीझरमध्ये ठेवा.
- किचनमध्ये चॉपिंग बोर्ड आणि लाटणे पोळपाट सारखी धुवा आणि मग वापरा.
- पीठ आणि उरलेल्या भाज्या नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. खाण्यापूर्वी नेहमी तपासा.






