आपल्या देशामध्ये महिला सुरक्षेसंबंधी किती ही कायदे असले तरी देखील महिलांच्या सुरक्षेबाबतीत भारतात परिस्तिथी किती चिंताजनक आहे हे काही वेगळे सांगायला नको. देशामध्ये दरदिवशी 87 बलात्काराच्या घटना घडतात. जिच्यावर बलात्कार झाला तिचे समोर काय होते? तिच्या आरोपींना शिक्षा मिळते का?
त्या पिडीतेकडे समाज कोणत्या नजरेने बघतो? या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला काहीच माहित नसते. भारतात बलात्काराची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या अजमेर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याच अजमेर शहरातून ज्या शहरात 1992 मध्ये शेकडो मुलींवर बलात्कार झाला होता.

अजमेर शहरात गेल्या वर्षी सामूहिक बलात्कार झालेल्या 12वीच्या विद्यार्थिनीला शाळेने बोर्डाच्या परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारली आहे. जर ती परीक्षेला बसली तर ‘शाळेचे वातावरण खराब होईल,’ असे शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिला सांगितले, असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ऑक्टोबर 2023 मध्ये पीडित विद्यार्थीनीवर तिचे काका आणि इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने पीडित विद्यार्थीनीला शाळेत न येण्याचा सल्ला दिला. तिने घरूनच अभ्यास करावा, जेणेकरून शाळेचे वातावरण खराब होणार नाही, असे शाळेने सुचविले होते, अशी माहिती पीडित मुलीने अंजली शर्मा यांना दिली. त्यानंतर जेव्हा बारावीची परीक्षा जाहीर झाली, तेव्हा पीडित विद्यार्थीनी आपले हॉलतिकीट आणण्यासाठी शाळेत गेली. पण, ती आता शाळेची विद्यार्थीनी नाही, असे तिला सांगण्यात आले. इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही तिच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता.

पीडितेच्या आरोपानंतर खळबळ उडाली. बाल कल्याण आयोगानेही या प्रकरणात आता लक्ष घातले आहे. मात्र शाळेने वेगळीच भूमिका घेतली. सदर पीडित विद्यार्थीनी मागच्या चार महिन्यांपासून शाळेत आलेली नसल्यामुळे तिला परीक्षेस बसू देण्याची परवानगी दिली नाही, असे शाळेच्या वतीने सांगितले गेले. पीडित मुलीने दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षेस बसण्याचा प्रयत्न केल्यानंतर या शाळेने तिला बाल कल्याण आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. बाल कल्याण विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली असून खटला दाखल केला आहे. तसेच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बाल कल्याण आयोगाच्या अध्यक्षा अंजली शर्मा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, पीडित विद्यार्थीनी अभ्यासात अतिशय हुशार आहे. दहावीच्या परीक्षेत तिने 97 टक्के गूण मिळविले होते. जर तिला बारावीच्या परिक्षेला बसू दिले तर ती नक्कीच चांगले गूण मिळवेल. पण शाळेच्या निष्काळजीपणामुळे तिचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.






