पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरची रहिवासी ४५ वर्षीय नीलम वाढत्या वयासोबत वाढणारं वजन आणि शारिरीक कार्यक्षमता कमी होण्यामुळं काळजीत आहेत. तरीही घरून बाहेर जाऊन स्वतःसाठी व्यायामासाठी काही वेळ काढण्यास ती असमर्थ आहे.
घरकामं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही. त्या म्हणतात, “वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांसाठी फिजीकल एक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. पण हे सारं माहिती असूनही माझा सारा वेळ सकाळपासून रात्रीपर्यंत घरकामं करण्यातच निघून जातो. इच्छा असूनही स्वतःसाठी काही करणं मला कठीण जात आहे.”
ही फक्त नीलमची समस्या नाही तर भारतातील बहुसंख्य बाया स्वतःसाठी वेळ काढण्यात आणि व्यायाम करण्यासाठी मागे पडतात. मेडिकल जर्नल ‘द लँसेट ग्लोबल हेल्थ’ मध्ये आलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील 57 टक्के स्त्रियांमधील शारिरीक हरकतींचा स्तर अपूरा आहे.
पुरुषांसाठी ही टक्केवारी 42 टक्के इतकी आहे. दक्षिण आशिया भागात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये शारिरीक हरकती न करण्याची समस्या साधारणपणे 14 टक्के जास्त आहे. भारतीयांमध्ये 2000 साली 22.3 टक्के तर 2022 साली हे प्रमाण 49.4 टक्के इतकं वाढलं होतं. याचा अर्थ भारतीयांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला नाही तर 2030 पर्यंत 60 टक्के लोक शारिरीकदृष्ट्या अस्वस्थ असतील. शरीराला नियमित व्यायाम न दिल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
अहवाल सांगतो, व्यायाम न केल्याने महिलांना अनेक विकार
अभ्यासानुसार उच्च वर्गामध्ये दक्षिण आशिया भागात 45 टक्के आणि आशिया-प्रशांत भागात 48 टक्के लोकांमध्ये शारिरीक व्यायामाचा अभाव दिसून आला आहे. शारिरीक रुपाने अस्वस्थ देशांमध्ये भारत 195 देशांत 12व्या स्थानावर आहे.
जगात 31.3 टक्के लोक शारिरीक व्यायाम करण्यापासून वंचित आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सल्ल्यानुसार शारिरीक दृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येक माणसाला दर आठवड्याला किमान 150-300 मिनिट व्यायाम करायला पाहिजे. त्यामुळे ह्रदयरोग, टाईप टू डायबेटिस, डिमेंशिया, स्तनाचा कर्करोग अशा आजारांची शक्यता कमी होते.
‘द हिंदू’मध्ये आलेल्या ‘द लँसेट डायबेटिस अँड एंडोक्रेनोलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-इंडिया डायबेटिस-2023’ च्या अहवालावरील बातमीनुसार 2021 मध्ये भारतात 101 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त होते. त्याच वर्षी 315 दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त होते.
254 दशलक्ष लोकांमध्ये लठ्ठपणा आणि 185 दशलक्ष लोकांमध्ये वाढीव कोलेस्ट्रॉलचा धोका होता. व्यायाम न केल्यामुळे स्त्रियांमध्ये हे आजार होण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसून आले आहे.
सामाजिक परिस्थिती, लैंगिक भूमिका यामुळे व्यायामावर बंधनं
भारतात स्त्रिया व्यायामाकडे कमी लक्ष देऊ शकतात ही गोष्ट कधीच सिद्ध झाली आहे. त्यांची सामाजिक परिस्थिती, लैंगिक भूमिका यामुळे त्यांच्या व्यायामावर बंधनं येतात. दुसरं असं की भारतात असा एक गैरसमज आहे की बाया घरकामं करतात तर तोच त्यांच्यासाठी व्यायामाचा एक चांगला मार्ग आहे.
भारताची स्थिती नेपाळ, बांग्लादेश, भूतान यांच्यापेक्षाही खराब आहे. भारतात स्त्रियांना व्यायाम करण्यात अनेक सामाजिक-सांस्कृतिक अडथळे असतात. भारतात केवळ 3 टक्के बाया नियमितपणे व्यायाम करतात असं आढळून आलं आहे. मेरठ येथे राहणारी 31 वर्षीय नेहानं तिच्या व्यायामात आलेले अडथळे सांगताना म्हटलं, “लग्नाआधी मला सांगितलं जायचं की वजनावर नियंत्रण ठेव म्हणून. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.
गावात जेव्हा मी सकाळी फिरायला किंवा व्यायाम करायला जायचे तेव्हा मला कोणत्याच बाईची सोबत मिळाली नाही. सकाळी जायचं असेल तर अंधारातच जावं लागायचं आणि पाच वाजेपर्यंत घरी परतावं लागे. कॉलेज आणि घरकामाच्या रगाड्यात दिवस गेल्यानंतर सकाळी लवकर उठणं मला शक्य नव्हतं त्यामुळे मी नियमितपणे याला वेळ देऊ शकले नाही.
गावात असताना मी कधीही सकाळी फिरायला जाऊ शकली नाही. सोबतही मिळाली नाही कोणाची. एकटं जाण्याची परवानगी नव्हती. घराच्या गच्चीवर संध्याकाळीच जायला मिळायचं. तिथंही मला पुरेसा व्यायाम करायला मिळायचा नाही.”
स्त्रियांमध्ये व्यायाम करण्याची प्रवृत्ती कमी असण्यामागे सांस्कृतिक अडथळे असतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, सांस्कृतिक, सामाजिक मान्यता, आर्थिक कारणंही असतात. शिक्षण आणि लैंगिक भूमिकाही यात अडथळे आणू शकतात. स्त्रिया जे घरकाम करतात तोच व्यायाम आहे असं समजून किंवा स्त्रियांनी घराबाहेर एकटं पडणं, फिरायला जाणं, व्यायाम करणं या गोष्टींसाठी समाज अजूनही तयार नाही.
पश्चिम उत्तर प्रदेशच्या 60 वर्षीय पूनम सांगतात, “मी रोज सकाळी साडेचारलाच उठते. त्यानंतर 12 वाजेपर्यंत सतत कामच सुरू असतं. घरातली सारी कामं करण्यात वेळ निघून जातो. यात व्यायामाला जागाच नसते. कधी शरीरात कुठं दुखलंखुपलं तर वाटतं की व्यायाम करायला हवा पण नंतर पुन्हा दुर्लक्ष होतं.
घरकामालाच व्यायाम समजून काम चालवते.” शहर असो गाव असो, बायकांची हीच परिस्थिती आहे. वेळ मिळत नाही म्हणून व्यायाम करत नाही ही सगळ्यांचीच समान तक्रार आहे.
सेंट लुईस युनिवर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि स्त्रियांच्या शारिरीक व्यायामाविषयी पुस्तक लिहिणाऱ्या, प्रा. एमी आयलर म्हणतात, “स्त्रिया इतरांची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त असतात की स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. कुटुंबाप्रती त्यांचं समर्पण त्यांच्या शारिरीक व्यायामात एक अडथळा होऊन बसतो. सामाजिक मान्यतेचा अभाव आणि सुरक्षित वातावरण नसणं यामुळेही स्त्रियांना व्यायाम करता येऊ शकत नाही.”
स्त्रियांचं व्यायाम कमी करणं आणि शारिरीक सक्रियता कमी असणं यामुळे त्यांच्यात ब्राह्मणवादी पितृसत्ते अंतर्गत त्यांच्यात घरात राहणं आणि नित्याच्या घरगुती कामांनाच व्यायाम समजण्याची भावना रुजवली जाते. लॅटीन, अमेरिकी-भारतीय आणि आफ्रीकी-अमेरिकी स्त्रियांचं म्हणणं आहे की, सामाजिक दबावामुळे त्या व्यायाम करू शकत नाहीत.
त्यांना वाटतं की समाज त्यांच्याकडून आधी इतरांची काळजी घेण्याची अपेक्षा करतो. या बायका बहुधा संयुक्त कुटुंबातील असतात जिथं अनेक लोक राहतात ज्यामुळे तिथं कामंही जास्त असतात. अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की व्यायाम करून बायकांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. अनेक आजारांतून त्या वाचू शकतात ज्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवू शकतो किंवा त्या अपंग होऊ शकतात. व्यायाम न करण्यामुळे होणारे आजार महिलांमध्ये सामान्यपणे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
‘अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकॉलॉजी’ यांच्या अभ्यासानुसार, शारिरीक व्यायामामुळे ह्रदयाशी संबंधीत आजार कमी होतात, बीपी, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही व्यायामानं मदत होते. मेनोपॉज आणि प्री-मेनोपॉज मधून जाणाऱ्या बायकांमध्ये ऑस्टियोपोरोसिस कमी करण्यासाठी व्यायाम उपयोगी ठरू शकतो.
‘जर्नल ऑफ कार्डियोपल्मोनरी रिहॅबिलिटीशन’च्या 2003 च्या अहवालानुसार, नियमित रुपाने केलेल्या थोड्याशा व्यायामानंही शारिरीक अवस्था सुधारते, भावनिक अवस्था सुधारते. व्यायाम न केल्यामुळे जे शारिरीक आजार होतात ते कमी होण्यात व्यायामामुळे मदत होते.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






