2023 हे पृथ्वीचं सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदीत झालंय. ‘नासा’चे माजी हवामान वैज्ञानिक जेम्स हेन्सन आणि इतर शास्त्रज्ञांचा कयास आहे की 2024 हे पहिलं वर्ष असेल जेव्हा तापमान सरासरीपेक्षा दीड अंशानं जास्त असेल. या शास्त्रज्ञांनी दिलेला हा इशारा आपली वास्तविकता आहे. काळासोबतच हवामान बदलाची समस्या गंभीर होत चालली आहे. औद्योगिकीकरणानंतर हवामानावर नकारात्मक प्रभाव पडला आहे. ऋतूंवर याचा परिणाम झाला आहे. कुठे महापूर तर कुठे दुष्काळ अशा समस्या येत आहेत. भूकंप, त्सूनामी, उष्णतेच्या लाटा अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. मागील काही वर्षांपासून उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2020 मध्ये दिलेल्या अहवालानुसार 1901 ते 2018 या काळात भारतातील सरासरी तापमान 0.7 अंशाने वाढले आहे. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवरच 2015 मध्ये पॅरीस येथे संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद भरली होती. यात जागतिक तापमान वाढ ही औद्योगिकपूर्व जगातील तापमानापेक्षा दीड अंश कमी ठेवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. कोणत्याही अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव परीघावरच्या वंचित गरीब लोकांवर इतरांच्या तुलनेत जास्त पडत असतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया उष्णतेविषयी अधिक संवेदनशील असतात. त्याचा त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव जास्त पडत असतो.

मागील 30 वर्षांत उष्णतेच्या लाटांच्या एकूण कालावधीत 3 दिवसांनी वाढ झालेली आहे. वर्ष 2060 पर्यंत हा अवधी 12 ते 18 दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागानं म्हटलंय की 1901 नंतर 2022 चा मार्च महिना हा सर्वाधिक उष्ण राहिला आहे. मार्च महिन्यात देशातील 60 टक्के भागात सरासरीपेक्षा जास्त उष्ण तापमानाची नोंद झाली होती. जागतिक हवामान विज्ञान संघटनेच्या अंदाजानुसार, जेव्हा एखाद्या भागातील तापमान त्याच्या कमाल तापमानापेक्षा 5 दिवस 5 टक्क्यांहून जास्त असतं तेव्हा तिथं उष्णतेची लाट आहे असं समजण्यात येतं.
उष्णतेमुळे स्त्रियांच्या मृत्यूचा दर पुरुषांपेक्षा अधिक
भारतीय हवामान विभागानुसार जेव्हा एखाद्या भागात सरासरीपेक्षा 5 ते 6 अंश जास्त तापमान बराच काळ असतं तेव्हा उष्णतेची लाट आहे असं समजण्यात येतं. या अति उष्णतेने स्त्रिया सर्वांत जास्त प्रभावित होतात. 2000-2010 या काळात उष्णतेनं झालेल्या मृत्युंमध्ये पुरुषांचा मृत्यू दर 23.11 टक्क्यांवरून 19 टक्के इतका खाली उतरला होता. पण स्त्रियांच्या बाबतीत हाच मृत्यू दर 2010-19 या काळात 4.63 टक्क्यांवरून 9.84 इतका वाढला होता. भारत, अमेरिका, नायजेरीया येथील स्त्रियांवर केलेल्या एका अभ्यासातून असं आढळलं आहे की, अति उष्णतेमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर आणि आर्थिक संधींवर नकारात्मक प्रभाव पडत असतो. उष्णतेमुळे स्त्रियांना दरवर्षी 120 अब्ज डॉलर्सचं नुकसान सोसावं लागत आहे. यात मजूरीवरचं काम जोडलं तर हे दिसून आलं की पुरूषांना जिथे 76 टक्के आर्थिक नुकसान होत आहे तिथेच स्त्रियांना 260 टक्के नुकसान होत आहे. उष्णतेच्या परिणामातील ही लैंगिक असमानता चिंताजनक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार हवामान बदलांमुळे 2050 पर्यंत 15.83 कोटी स्त्रिया गरीबीत ढकलल्या जाऊ शकतात. पुरुषांच्या तुलनेत ही संख्या 1.6 कोटीने जास्त आहे.

हिंसा, लैंगिक अत्याचार आणि मानसिक तणाव यात वाढ
2010 ते 2018 या काळात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ येथील 1,94,871 स्त्रियांचा एक सर्वे करण्यात आला. यातून हा निष्कर्ष निघाला की अति उष्णतेमुळे स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारात वाढ होत आहे. भारतात याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. वार्षिक तापमानात एक अंशाने वाढ झाल्यावर स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसा, लैंगिक अत्याचार आणि मानसिक तणाव यात 6.3 टक्के वाढ झालेली दिसली आहे. भारतीय स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक हिंसाचारात 8 टक्के आणि लैंगिक अत्याचारात 7.6 टक्के वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे रिपोर्ट ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये स्त्रियांच्या विरोधात झालेल्या अपराधांची संख्या 4,45,256 इतकी होती, जी मागच्या वर्षीपेक्षा 4 टक्के जास्त होती.
गरोदर बायका हवामान बदलामुळे जास्त प्रभावित
गरोदर बायका तर हवामान बदलामुळे जास्तच प्रभावित होत असतात. त्यांना जास्तीची काळजी घेण्याची गरज असते पण खरी गोष्ट हीच आहे की असं घडत नाही. उष्णतेच्या लाटांचा गरोदर बायकांवर आणि त्यांच्या गर्भावर नकारात्मक परिणाम घडत असल्याचं दिसत आहे. जागतिक पातळीवर दर 16व्या सेकंदाला एका मृत बाळाचा जन्म होतो आणि दरवर्षी 1.5 कोटी मुलं अकाली जन्माला येतात. जगातील वेगवेगळ्या भागांतील 27 देशांमध्ये गरोदर स्त्रियांवरील उष्णतेच्या लाटांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला आहे. यातून लक्षात आलंय की ताममानात 1 अंशाने वाढ झाली तरी अकालजन्म आणि मृत बाळांच्या जन्माचा धोका 5 टक्क्यांनी वाढतो. बाळ कमी वजनाचं जन्मतं. त्यातून पुढे त्याला अनेक आजार जडतात. गरोदर राहिल्यामुळे गरोदर बायकांच्या शरीरातील उष्णता तशीही वाढलेली असतेच. त्यात या जास्तीच्या उष्णतेची भर पडते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

घटना लागू झाल्यानंतरही आपल्या देशात अजूनही पितृसत्ताक वृत्ती प्रभावी आहे. गोष्ट आरोग्याची असो वा खाण्यापिण्याची असो, स्त्रियांच्या बाबतीत कायमच गौण व्यवहार केला गेला आहे. बहुतांश घरांमध्ये त्यांच्यावरच घरातील सारी कामं करण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर त्यांचे खूपच हाल होतात. चौरस पौष्टीक आहार राहूच द्या, पण त्यांना ताजं जेवणही मिळतही नाही. उष्टं, शिळं अन्न, तेही पोटभर न मिळणारं, खाऊन त्या जगतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता दुबळते. भौतिक साधनं, उदा. कार, एसी, इत्यादींचा उपयोग करण्यातही त्यांना मागेच राहावं लागतं. विनामोबदला घरची कामं करणाऱ्या या बायका आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकत नाहीत. त्यामुळे पौष्टीक आहार, आरोग्य यात त्यांना निर्णय घेण्याचाही कोणताही अधिकार नसतो. कोणत्याही संकटात संवेदनशील आणि लवचीक समुदाय सर्वांत आधी प्रभावीत होत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष उपाय करण्याची गरज असते. अति उष्णतेमुळे स्त्रियांच्या शारिरीक, मानसिक, आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 2013 मध्ये अहमदाबाद मध्ये हीट एक्शन प्लॅन लागू करण्यात आला होता. असं करणारं हे पहिलं भारतीय शहर होतं. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या मृत्युंमध्ये 1 हजाराने घट झालेली आढळून आली.
याच प्रमाणे ‘स्वयंरोजगार महिला संघटने’चा ‘एक्स्ट्रीम हीट इन्कम एन्शुरन्स’ पण एक प्रभावी उपाय आहे ज्यातून उष्णतेच्या लाटांमुळे स्त्रियांच्या आर्थिक कमाईत जी घट येते त्याच्या भरपाईसाठी ही योजना लागू करण्यात आली. अशा पद्धतीच्या विशेष योजना संवेदनशील समुहांसाठी विशेषतः स्त्रियांसाठी सरकारने चालवण्याची नितांत आवश्यकता आहे. शासनासोबतच समाजानेही यात पुढाकार घेऊन काम करणं गरेजचं आहे. समाजातील पितृसत्ताक व्यवस्थेवर दीर्घकालीन काम करण्याची गरज आहे ज्यामुळे लैंगिक भेदभाव कमी होतील आणि सर्वलिंगीय व्यक्तींना समान संधी आणि सुविधा मिळण्याची खात्री मिळेल.
अनुवाद – प्रतिक पुरी






