अमेरिका ही एक महाशक्ती आहे. आता चीन तिला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे पण असं वाटत नाही की, नजिकच्या भविष्यात चीनला हे यश मिळू शकेल. येत्या काळातही अमेरिकेची लोकशाहीची समज, तिथलं विकसीत तंत्रज्ञान, भांडवलशाहीच्या पायावर उभी असलेली आर्थिक समृद्धी याचा जगभर डंका गाजत राहिल यात शंका नाही.
अशा अमेरिकेची उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या अश्वेत नागरिक कमला हॅरीस यांची निवड होणं सर्व भारतीयांसाठी विशेषतः भारतीय महिलांसाठी अभिमानाचा क्षण होता. त्या अमेरिकेच्या पहिल्या अश्वेत महिला उपराष्ट्रपती आहेत आणि आता डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत.
कमला हॅरीस यांची निवड अनेक अर्थानं विलक्षण आहे. ती आशियाई आहे, भारतीय वंशाची आहे, अश्वेत आणि ब्राह्मणही आहे. एका भारतीय ब्राह्मणानं, अमेरिकेत, जो वांशिक भेदभावासाठी ओळखला जातो, तिथं आपली ओळख एक अश्वेत म्हणूनही द्यावी हे असामान्य आहे.
फार काळ उलटला नाहीये जेव्हा बाया तर सोडाच पण ब्राह्मण पुरूषही विदेशात जायचे नाहीत कारण समुद्र ओलांडण्याला त्यांच्या धर्माची बंदी होती. अमेरिकेत गेलेले भारतीय पारशी भीकाजी बलसारा यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागला होता.
1909 मध्ये त्यांना नागरिकत्व मिळालं. न्यायालयानं म्हटलं की पारशी लोक गोरे असतात म्हणून त्यांना नागरिकता द्यायला हरकत नाही. भीकाजी यांच्या आधी काही शिख लोकही तिथं गेले होते. अनेक दशकं तिथं त्यांनी अवैध प्रवासी मजूर म्हणून कामही केलं पण त्यांना नागरिकत्व मिळालं नाही. 1913 मध्ये ए. के. मुजुमदार या ब्राह्मणाला पहिल्यांदाच अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं.
त्यासाठी त्यांनाही न्यायालयीन लढा द्यावा लागला. मुजुमदार यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं होतं की, ते आर्य वंशाचे आहेत आणि या दृष्टीने ते कॉकेशियन अमेरिकी वंशाच्या बरोबर आहेत. न्यायालयानं त्यांचा हा तर्क मान्य केला. अमेरिकेत तेव्हा वांशिक भेदभाव तितकाच मजबूत होता जितका भारतात जातिवाद.
कमला यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव
कमला हॅरीस यांचे आजोबा पी. व्ही. राजगोपालन एक पारंपरिक तामिळी ब्राह्मण होते. 1940 व 1950 च्या दशकात पेरियार रामास्वामी नायकर यांच्या ब्राह्मण विरोधी आंदोलनामुळे तामिळनाडूतील अनेक मध्यमवर्गीय आणि इंग्रजी भाषेचे जाणकार ब्राह्मण विदेशात जाऊ लागले. 1950-60 च्या दशकात जे भारतीय युवक उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते त्यापैकी काहींनीच तिथं राहण्याचा निर्णय घेतला होता.
यात महिलांची संख्या अर्थातच कमी होती. कमला यांची आई, श्यामला राजगोपालन या 1958 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले इथं अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका अश्वेत विद्यार्थ्याशी लग्न केलं. डोनाल्ड जेस्पर हॅरीस हा जमैकाचा होता. सामान्य तामिळी ब्राह्मण वैष्णव असतात आणि कट्टर शाकाहारी असतात.
त्यामुळे श्यामला यांना हॅरीस यांच्याशी जुळवून घेणं कठीणच गेलं असणार. पण ती सक्षम युवती होती आणि तिच्या वडिलांनीही तिच्या निर्णयात तिला पाठींबा दिला असेलच. पण हा विवाह फार काळ टिकला नाही. पण त्यानंतरही श्यामला यांनी कमला आणि माया या दोन मुलींसोबत अश्वेत लोकांच्या नागरी अधिकारांसाठी संघर्ष सुरूच ठेवला. त्यांनी आपल्या पतीचं आडनावही ठेवलं. हा देखील क्रांतिकारी निर्णय होता. कोणत्याही भारतीय, त्यातही कट्टर तामिळी ब्राह्मण महिलेकडून अशी अपेक्षा सहसा नसते.
1960 मध्ये जेव्हा मार्टिन ल्युथर किंग यांनी अश्वेत लोकांच्या नागरी अधिकारांसाठी अमेरिकेत लढा उभारला तेव्हा श्यामला त्यात सहभागी झाल्या होत्या. 
कमला यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव होता. कमला यांनी त्यांच्या 'द ट्रुथ वी होल्ड' नावाच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केल आहे. "माझ्या आईला चांगल्या प्रकारे जाणीव होती की, ती दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवत आहेत.
आपण ज्या भूमीचा स्वीकार केला आहे, ती आपल्या मुलींकडे कृष्णवर्णीय मुली म्हणूनच बघेल हेही त्यांना माहिती होती. त्यामुळं आम्ही आत्मविश्वासपूर्ण कृष्णवर्णीय महिला बनावं याची काळजी त्यांनी घेतली."
श्यामला यांनी आपल्या पतीचा, ख्रिश्चन धर्म स्विकारला पण त्यानंतरही त्या मंदिरांत जायच्या. तरुण कमला एक चांगली क्वॉयर गायिका (चर्चमध्ये भक्ती गीतं गाणारी) झाली. त्यांच्या प्रॉटेस्टंट धर्मामुळे त्या आधी राज्याच्या एटर्नी, मग सिनेटर आणि शेवटी उपराष्ट्रपती होऊ शकल्या. अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन हे कॅथोलिक आहेत पण त्त्यांनीही याच कारणामुळे कमला यांची निवड केली असावी.
कमला यांच्या यशात कोणाचं योगदान सर्वांत जास्त असेल? त्यांचे आजोबा, आई यांचं यश की त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना मिळालेलं इंग्रजीचं शिक्षण? कल्पना करा की त्यांच्या या तीन पिढया संस्कृतलाच धरून बसल्या असत्या तर काय झालं असतं? त्या आज कुठे असत्या? कमला आज उपराष्ट्रपती आहेत आणि आता राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत आहेत.
गर्भपात आणि कृष्णवर्णियांच्या मुद्द्यांवर थेट मतं…
व्हाइट हाऊसमध्ये असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर काम केलं. बायडन प्रशासनाच्या सर्वात यशस्वी कामांमध्ये हॅरिस यांचा मोलाचा वाटा होता. गर्भापातवरील बंदीमुळं महिलांच्या शरिरावर होणाऱ्या दुष्परिणामांकडं लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं. स्वतःच्या शरिराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना असावा, ही भूमिका त्यांनी अगदी ठामपणे मांडली.

सिनेटच्या इतिहासात उपराष्ट्राध्याक्षानं केलेल्या सर्वाधिक टाय ब्रेकिंग मतांचा विक्रमही कमला हॅरिस यांनी केला. महागाई आणि कोव्हिड सारख्या विषयांवरील महत्त्वाच्या कायद्यांवर त्यांचं मत निर्णायक ठरलं. त्याचवेळी अमेरिकन नागरिकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवण्यात त्यांना यश आलं नाही. अनेक प्रकारे त्यांना टीकेचा सामना करावा लागला.
अमेरिका-मॅक्सिको सीमेवर होणऱ्या प्रचंड स्थलांतरामुळं बायडन प्रशासनावर प्रचंड टीका होत होती. त्याचं मूळ शोधण्याची जबाबदारी बायडन यांनी हॅरिस यांनाच दिली होती. पण बायडेन यांच्या विजयाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागल्यानंतर मात्र कमला हॅरिस यांना मिळणारा पाठिंबा वाढायला सुरुवात झाली होती.
कमला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या नावाचा अर्थ सांगताना भारतीय संस्कृतीचा उल्लेख केला आहे. त्या लिहितात की, "माझ्या नावाचा अर्थ 'कमळाचं फुल'असा आहे. भारतीय संस्कृतीत याचं खूप जास्त महत्त्वं आहे. कमळाचं रोप पाण्याखाली असतं. तर फुल पाण्याच्या वरच्या भागात फुलतं. तर याची मुळं नदीच्या तळापर्यंत रुजलेली असतात," असं त्यांनी म्हटलं होतं.
कमला हॅरीस यांचं यश भारतीयांसाठीही एक धडा
कमला यांनी 2014 मध्ये लग्न केलं त्यावेळी त्यांनी भारतीय आणि ज्यू अशा दोन्ही पद्धतीनं विधी केल्या होत्या. कमला यांनी डगलस यांना फुलांचा हार घातला तर डगलस यांनी ज्यू परंपरेनुसार काच फोडली होती. कमला हॅरिस यांच्यासोबतचा एक व्हिडिओ भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉमेडियन आणि अभिनेत्री मिंडी कॅलिंग यांनी पोस्ट केला होता.
त्यात कमला आणि कॅलिंग कुकींग करताना दिसल्या होत्या. त्यात त्यांनी त्यांच्या भारतीय पार्श्वभूमीबाबत चर्चा केली होती. यात कॅलिंग यांनी दक्षिण भारतीय पदार्थांबाबत विचारलं असता कमला यांनी अनेक दक्षिण भारतीय पदार्थांची नावं घेतली. कर्ड राईस, डाळ, इडली हे खाऊनच मोठ्या झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कमला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात घरी भारतीय बिर्याणी आणि स्पॅगेटी बोलोगनीज असे सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असल्याचं लिहिलं आहे.
कमला हॅरीस यांचं यश भारतीयांसाठीही एक धडा आहे. त्या भारतीय आहेत म्हणून नाही, किंवा अश्वेत किंवा आशियाई आहेत म्हणून नाही तर, त्या ब्राह्मण पृष्ठभूमी असलेल्या अश्वेत आहेत. त्या सर्व माणसांच्या समानतेचा अधिकार मान्य करतात, त्यांची धार्मिक श्रद्धा आहे की देवानं सर्व माणसांना समान दृष्टीनं तयार केलं आहे, मग त्याचं लिंग, वंश, रंग, जाति, वर्ग काहीही असो.
बराक ओबामा यांच्यानंतर त्यांचं नाव अशी अश्वेत-भारतीय व्यक्ती म्हणून नमूद होईल जिने लोकशाही जगात असामान्य यश मिळवलं आहे. भारतीय बायकांना हे देखील श्यामला राजगोपालन यांच्याकडून शिकायला हवं की त्यांना जर जात आणि वांशिक भेदभाव याच्याविरोधात काम करायचं असेल तर ते पूर्ण शक्तीनं करायला हवं.






