लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघाच्या आखाड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढण्याची हिंमत सहजासहजी कोणी करणार नाही, मात्र यंदा मोदींविरुद्ध एक अशी व्यक्ती उभी आहे ज्यांच्या नावाचा करिष्मा फक्त भारतातच नव्हे तर देश-विदेशातही मोठ्या स्तरावर आहे. विशेषत: अध्यात्मिक विश्वात त्या व्यक्तीच्या प्रवचनाला भाविक अतिशय मोठ्या संख्येने सहभागी होतात.

किन्नर निर्मोही आखाड्याची या देशातील पहिली ‘महामंडलेश्वर’ हिमांगी सखी हे ते नाव असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून नरेंद्र मोदींविरुद्ध तृतीयपंथी असलेल्या हिमांगी यांना अखिल भारत हिंदू महासभेने तिकिट दिले आहे. वाराणसीत बाबा विश्वनाथ यांचे आशीर्वाद घेऊन हिमांगी सखी त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. हिमांगी या तृतीयपंथींच्या सन्मान व अधिकारासाठी लढत आहेत. वाराणसीच्या उमेदवार हिमांगी सखी म्हणाल्या की, तृतीयपंथींना त्यांचा अधिकार व सन्मान देण्यासाठीच त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पंतप्रधानांचा “बेटी बचाओ-बेटी पढाओ” हा नारा चांगला आहे मात्र “तृतीयपंथी वाचवा-तृतीयपंथींना शिकवा” याची आवश्यकता विचारात घेतली नाही. हिमांगी यांची मागणी आहे की, तृतीयपंथींना सुध्दा नौकरी, लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये आरक्षित जागा मिळाल्या पाहिजे ज्याद्वारे ते संसदेत जाऊन आपल्या व्यथा मांडू शकतील.
पहिले किन्नर पुराण लिहित आहेत हिमांगी सखी…
हिमांगी सखी आज जगभरात भागवत गीता, शिव पुराण आणि गरुड पुराणाची कथा सांगते. भागवत कथा सांगण्यासाठी त्या मॉरिशस, बँकॉक, सिंगापूर आणि दुबई येथे जातात. ज 2019 मध्ये पशुपतीपीठाचे महाराज गौरी शंकर यांनी त्यांना प्रयागराज कुंभ येथे महामंडलेश्वर ही पदवी दिली. आता त्यांच्या आयुष्यावर महामंडलेश्वर नावाचा चित्रपटही येत आहे. हिमांगी सखी जगातील पहिले किन्नर पुराण लिहित आहे, जे लवकरच सर्वांच्या हातात येईल.

पहिल्या ‘महामंडलेश्वर’ हिमांगी सखी यांचा प्रवास इतका सोपा नव्हता.
हिमांगी सखी आज जरी किन्नर निर्मोही आखाड्याच्या पहिल्या ‘महामंडलेश्वर’ असल्या तरी या सिंहासनावर विराजमान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. ‘दै. भास्कर’शी बोलताना हिमांगी सखी म्हणतात,’’ माझा जन्म गुजरातच्या वडोदरा येथे झाला, पण आम्ही लहानपणीच मुंबईत आलो. वडील चित्रपट वितरक, मोहन स्टुडिओचे भागीदार आणि विश्वकर्मा फिल्म्स कंपनीचे मालक होते. तर आई डॉक्टर होती. त्या काळात आमच्याकडे टीव्ही, ॲम्बेसेडर कार सगळं काही होतं. रेखा, अमिताभ बच्चन, जितेंद्र, संजय दत्त या सेलिब्रिटींना मी खूप जवळून पाहिलंय, पण हे ऐश्वर्याचे दिवस फार काळ टिकले नाही. एके दिवशी वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेले. तेव्हा मी तिसरीत होते. माझी बहीण माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान होती. वडील गुजराती आणि आई पंजाबी. दोघांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला होता. वडिलांच्या अचानक जाण्याने आई गुमसुम राहायला लागली आणि आम्ही परत मुंबईत दाखल झालो.

वयाच्या १२व्या वर्षी झाला बलात्कार…
हळूहळू त्यांच्याकडचे पैसे संपू लागले आणि शिक्षणही सुटले. मागून खाण्याची वेळ आली. हिमांगी यांच्या घराशेजारी एक पंजाबी कुटुंब राहत होते. त्यांनी त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला. हिमांगी त्यांच्याकडे घरकाम करायला जायच्या. त्या बदल्यात ते रात्री त्यांना आणि माझ्या बहिणीला प्रत्येकी दोन रोट्या द्यायचे. त्यांच्या घरात काम इतकं होतं की अनेकदा त्या रात्री तिथेच झोपायच्या. हिमांगी सांगतात की, एका रात्री त्यांचा मुलगा खोलीत आला आणि तोंड दाबून माझ्यावर बलात्कार करू लागला. त्याची आई आवाज ऐकून खोलीत आली. लाईट लावला, बघितले आणि निघून गेली. त्या दिवसानंतर रोज रात्री माझ्यावर बलात्कार व्हायचा, पण दोन वेळच्या भाकरीसाठी मला विरोध करता येत नव्हता. त्यावेळी माझे वय 12 वर्षे असेल. मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रास होत होता, पण कोणाला सांगणार. कुठेही मार्ग दिसत नव्हता.
काही कालावधीनंतर हिमांगी यांच्या आईचेही निधन झाले आणि दोन्ही बहिणांचा एकमेव आधारही गेला. छोटीमोठी कामं करून थोडेफार पैसै साठवून हिमांगी यांनी त्यांच्या छोट्या बहिणीचे लग्न लावून दिले. पैशांची चणचण होती, घरभाडे न दिल्याने घरमालकाने घरातून हाकलून दिले. त्या म्हणतात,’’ माझ्यासाठी ती काळी रात्र होती. शेजाऱ्याने माझे सर्व सामान फेकून दिले आणि मला घराबाहेर हाकलून दिले. रात्री एकटीला कुठे जायचे तेच कळत नव्हते. त्याच वस्तीत एक म्हातारे काका एकटेच राहत होते. मी त्यांच्या घरी गेले. त्यांनी मला रात्री आसरा दिला, पण बदल्यात त्यांनी माझ्यावर बलात्कारही केला. यानंतर मी माझ्या एका ओळखीच्या आंटीच्या घरी गेले. आंटी ने मला कोणाच्या तरी घरी पाठवले आणि म्हणाली की ते तुला नोकरी लावून देतील. तिथे गेल्यावर मला कळले की त्या काकूने मला सेक्स वर्कसाठी विकले होते. मी खूप रडले, माझी संपूर्ण गोष्ट त्या मध्यमवयीन माणसाला सांगितली. तो चांगला माणूस होता. मला सोडले आणि मदत म्हणून 10 हजार रुपयेही दिले.

इस्कॉन मंदिराने दिला आसरा
हिमांगी सखी आता हरल्या होत्या. अखेर त्या मुंबभईतील इस्कॉन मंदिरात भगवान श्रीकृष्णाला शरण गेल्या. तिथेच राहून त्यांनी दीक्षा घेतली. शास्त्राचा अभ्यास सुरू केला. भक्तीवैभव कोर्स केला, भागवत गीता कोर्स केला. पूजा आणि ब्रजभूमीत त्या रमल्या इस्कॉनची पुस्तकं वाटायचे, मंदिराची कामे करायचे, भजन-कीर्तन करायचे. तिथे राहणे आणि खाणे मोफत होते. पण त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी त्यांच्या वडिलांचे संपर्क तपासले. त्याच्या ओळखीच्या लोकांशी बोलले. त्यांना कामासाठी विचारले. त्यांनी मदत केली आणि काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी हिमांगी यांना मिळाली. डाउन-टाउन, मुंबई-125 किलोमीटर, द गिनीज ऑफ ब्युटी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. हॉलिवूड चित्रपटही त्यांनी भूमिका केली., ज्यासाठी त्यांना 20 दिवस काम केल्यानंतर 2 लाख रुपये मिळाले. एवढी मोठी रक्कम मिळाल्यावर त्यांनी वेडी वृंदावनात जाऊन जमीन विकत घेतली.
वृंदावनमध्ये सगळं काही सुरळीत चाललं होतं, परंतू मी माझी किन्नर असल्याची ओळख लपवून ठेवली होती. काही वेळानंतर गुरुजींना कळले की मी किन्नर आहे. त्यांनी मला ताबडतोब आश्रम सोडण्यास सांगितले. मी त्यांच्यासमोर हात जोडले की अर्जुनाने वनवासाच्या वेळी किन्नर रूप धारण केले होते. शिखंडीचाही उल्लेख केला, पण त्यांनी काहीएक ऐकले नाही. हिमांगी यांनी तिथेच शपथ घेतली की, जोपर्यंत माझा मान-सन्मान व्याजासह परत मिळत नाही तोपर्यंत मी वृंदावनात परत येणार नाही.

आज आहे किन्नर निर्मोही आखाड्याची देशातील पहिली ‘महामंडलेश्वर’
आपल्या आयुष्याचा दुसरा टप्पा उलगडून सांगताना हिमांगी म्हणाल्या, ’मी मुंबईत आले. येथे इस्कॉनच्या साथीदारांसोबत भजन-कीर्तन आणि सत्संग करायला सुरुवात केली. पहिल्यांदा मी बोरिवलीत नवरात्रीच्या वेळी भगवद्गीतेचे पठण केले. त्यानंतर मीरा रोडवर पठण केले. हळूहळू माझा संप्रदाय वाढत गेला. भागवत कथा सांगण्यासाठी मॉरिशस, बँकॉक, सिंगापूर आणि दुबई येथे जायला लागले. जन्माष्टमीला माझे खास कार्यक्रम होऊ लागले. 2019 मध्ये पशुपतीपीठाचे महाराज गौरी शंकर यांनी मला प्रयागराज कुंभ येथे महामंडलेश्वर ही पदवी दिली. मी धन्य झाले. अशाप्रकारे मी जगातील पहिली किन्नर भागवत आचार्य महामंडलेश्वर हिमांगी सखी झाले. जगभरातील मीडिया मुलाखती घेण्यासाठी येऊ लागला. माझे फोटो हिंदी-इंग्रजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. दोन दिवसांनी मला किन्नर आखाड्यानेही बोलावले. त्या कुंभानंतर जेव्हा मी ब्रजला गेले तेव्हा ब्रजच्या लोकांनी मला खांद्यावर उचलून घेतले. मी बांकेबिहारीकडे गेले आणि खूप रडले. त्यांना सांगितले की, तू माझा सन्मान व्याजासह परत केला आहेस. यानंतर निर्मोही आखाड्याने मला हरिद्वार कुंभमध्ये महामंडलेश्वर घोषित केले. त्यांच्यासोबत छत्राखाली बसवले.’’






