जेव्हा गाझियाबादच्या मोरटा येथे राहणाऱ्या सुबोधच्या आईला एका लहानशा सापाने दंश केला तेव्हा त्याच्या मनात आईला रुग्णालयात घेऊन जाण्याचा विचार आला नाही. तो तिला मुराद नगर येथील एका मांत्रिकाकडे घेऊन गेले. त्यानं आईच्या हातावर छड़ीनं मारलं, सापानं मात्र पायाला चावा घेतला होता. गाजियाबाद येथील राज नगर एक्सटेंशन मधल्या मोरटा गावात आपल्या दुकानात बसून बोलताना सुबोध म्हणतो, “आमचा हॉस्पिटलवर भरोसा नाही. आम्ही मांत्रिक, आयुर्वेद, जडी-बुटीवाल्यांवर विश्वास ठेवतो.”
भारतात सर्पदंशाच्या घटनांकडे ग्रामीण, गरीब लोकांच्या समस्या म्हणून दुर्लक्ष केलं जातं. प्रत्यक्षात कोणत्याही प्राण्यामुळे किंवा मलेरीया, डेग्यू या रोगांपेक्षाही साप चावण्यामुळे भारतात सर्वांत जास्त लोक मारले जातात. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं की, देशात दरवर्षी सर्पदंशामुळे 50 हजार लोक मरतात. प्रत्यक्षात हा आकडा 58 हजारापर्यंत पोहोचतो.
भारत सध्या जगात चर्चेचा विषय आहे पण ही सापाने होणारे मृत्यू ही गोष्ट मात्र चर्चेत नाही. 2020 च्या राष्ट्रीय मृत्यू आकडेवारीतून दिसतं की सर्पदंशाच्या 94 टक्के घटना ग्रामीण भागात होतात आणि 77 टक्के मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर होतात. पौरोणिक कथा, अंधश्रद्धा, सार्वजनिक आरोग्याची वाईट अवस्था यांची ही कथा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंशावर उपचार करणारे प्रशिक्षित डॉक्टर्स नसतात.
एन्टी-वेनम इंजेक्शन्सही नसतात. सुबोधची आई सर्पदंशातून वाचली. कारण तो साप बिनविषारी होता. पण घरच्यांनी याचं श्रेय मांत्रिकाला दिलं. सुबोध म्हणतो, “साप तर साप असतो. मग त्याच्यात कितीही विष का असेना. तो लहान असो, मोठा असो, त्याचा प्रभाव एकसारखा असतो.” अशा अंधश्रद्धेमुळे सर्पदंशाची तीव्रता आणखी वाढत आहे. गावात अजूनही डॉक्टरांपेक्षा मांत्रिकावरच विश्वास ठेवला जातो.

दरवर्षी सर्पदंशाने होतात 50 हजारपेक्षा अधिक मृत्यू
यावर्षी सरकारने राष्ट्रीय स्तरावर सर्पदंश उच्चाटन आणि उपचार यासाठी अभियान सुरू केलं आहे. 2030 पर्यंत या अंतर्गत मृत्यू दर अर्ध्यावर आणायचं लक्ष्य आहे. ‘स्नेकबाईट हिलिंग अँड एज्युकेशन सोसायटी’च्या संस्थापिका, डॉ. प्रियंका कदम सांगतात की ही कालमर्यादा फार महत्त्वाकांक्षी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णांना तात्काळ मदत, मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. यामुळे प्रत्यक्षात फार कमी बदल घडला आहे. यात लोकांच्या मनातील सापांची भीती, मांत्रिकांवरील विश्वास, अंधश्रद्धा अशा गोष्टी बाधक ठरत आहेत.
कदम सांगतात की, एन्टी-वेनम इंजेक्शन्सची कमतरता नाही पण वितरणात उणीवा आहेत. ते मिळवण्याची एक चांगली व्यवस्था अद्याप निर्माण झाली नाही. 2015 च्या सरकारी आकडेवारीनुसार 55.69 टक्के प्रकरणांत, सर्पदंश झाल्याच्या 4 तासांच्या आत रुग्णालयात उपचारांची मागणी करण्यात आली होती. रुग्ण घाबरले होते कारण सर्पदंशाची लक्षणं दिसत नव्हती. कदम म्हणतात, “भारत श्रद्धावान देश आहे. इथं अनेक शिक्षित लोकही मिळतात ज्यांना वाटतं की यावर श्रद्धेतूनच उपचार होऊ शकतो. लोक जर सापांची ओळख करू शकले तर अर्ध काम तिथेच होईल.”
शहरी भागात साप निघाला तर लगेच लक्ष दिलं जातं. लोक घाबरतात. भीती वाटते. सर्पमित्रांना लगेच फोन केले जातात. हैदराबाद येथे दोन दशकांपासून साप पकडणारे अन्नकन्ना सांगतात की, साप रस्त्यावर असो किंवा लोकांच्या बेडरूममध्ये, ते लगेच फोन करतात. ते ‘फ्रेंड्स ऑफ स्नेक्स’ या स्वयंसेवी संस्थेत काम करतात. इथे रोज 200-300 कॉल येतात. या संस्थेने हैदराबाद मध्ये 10 हजारांहून जास्त सापांना वाचवलं आहे. तेलंगणा वन्य विभागाच्या सहकार्याने हे साप जंगलात सोडले जातात. अन्नकन्ना सांगतात की, जी नवीन बांधकामं होत आहेत ती सापांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर होत आहेत.
‘फ्रेंड्स अव्ह स्नेक्स’ची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक साप वाचवण्यासाठी समावेश होण्याची शक्यता आहे. अन्नकन्ना यांनाही अनेकदा सर्पदंश झाला, पण त्यात विषारी साप नव्हते. या संस्थेने 2014 मध्ये हैदराबाद येथे ‘इंडियन एग इटर’ सापाला वाचवलं तो क्षण संस्थेसाठी अभिमानाचा होता. कारण 1969 नंतर हा बिनविषारी, काळा-पिवळा साप नाहीसा झाला असं मानण्यात येत होतं. हा साप त्यांनी वाचवला नसता तर लोकांनी त्यालाही मारून टाकलं असतं.
जागतिक आरोग्य संघटनेने 2017 मध्ये सर्पदंशाला पुन्हा एकदा उष्णकटीबंधीय रोगांच्या सूचीत समाविष्ट केलं. तज्ञांचं म्हणणं आहे की गरीबांची समस्या असलेला सर्पदंशाचा प्रश्न अजूनही परिघावरच आहे. मुख्य प्रवाहात क्वचितच त्याची चर्चा केली जाते. डॉ. कदम सांगतात, “याचा थेट प्रभाव समाजातील गरीब वर्गावरच पडतो. त्यामुळेच याकडे इतरांनी दुर्लक्ष केलं आहे. गरीबांसाठी कोण लढणार ज्यांच्याकडे आरोग्य सुविधा नाहीत ते दैववादी होतात. त्यांना ही रुग्णालयात जाऊन उपचार करण्याची अवस्था वाटत नाही.”

सर्पदंशाला नैसर्गिक आपत्ती म्हणून चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत केलं आहे
कदम मागील 14 वर्षांपासून सर्पदंश रुग्णांसोबत काम करीत आहेत. राज्य सरकार आपत्ती नियोजन अधिनियमा अंतर्गत मोबदला देतात. पण जंगली जनावरांकडून मारले गेल्यावर मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा आठ पट कमी मोबदला यात मिळतो. याचं कारण सर्पदंशाला नैसर्गिक आपत्ती म्हणून चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत करण्यात आलं आहे. सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून वर्गीकृत करणारं कर्नाटक हे पहिलं राज्य झालं आहे. यामुळे याच्या दस्तावेजीकरणात मदत मिळू शकेल.
राजस्थान आणि गुजराथ मध्ये 2001 ते 2014 दरम्यान सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या. उत्तर प्रदेशात दरवर्षी 8700 लोक सर्पदंशामुळे मरतात. कर्नाटकच्या निर्णयामुळे आता इतर राज्येही त्याचं अनुकरण करतील असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे.
मोरटाच्या लोकांसाठी साप हा त्यांच्या जगण्याचाच भाग आहे. ते त्याच्यापासून सावध राहतात पण त्याचं असणं त्यांनी स्वीकारलं आहे. मात्र या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्याविषयी ते निराश आहेत. उत्तर प्रदेश आपत्ती नियोजना अंतर्गत सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 4 लाख रुपये मिळतात. 2019 ते 2023 दरम्यान इथे सर्पदंशामुळे 3348 लोक मारले गेले आहेत. मोरटाच्या एका युवतीला सापाने दंश केला. तिच्या बहिणीने सांगितलं की त्यांनी स्वतःच इलाज केला. पण त्यांना सरकारकडून काही नाही मिळालं.
मागील महिन्यात मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील धनोरा गुसाई गावात दोन मुलांना सापाने दंश केला. यातील पाच वर्षांची मुलगी मेली पण दहा वर्षांचा मुलगा मात्र वाचला. मिळालेल्या आकडेवारीनुसार 2024 च्या पहिल्या आठ महिन्यात नागपूर रुग्णालयात सर्पदंशाचे 200 रुग्ण भरती झाले, यातील दोघांचा मृत्यू झाला. पण ही आकडेवारी फसवी आहे कारण अनेक घटनांची नोंदच केली जात नाही. डॉ. कदम सांगतात की कोणताही आकडा विश्वसनीय नाही. आपली सिस्टिम पूर्णपणे स्वयंचलित नाही. कोणी रुग्णालयात जाण्याआधी मेलं तर त्याची नोंद केली जात नाही.

सर्पदंशाची फसवी आकडेवारी
कायद्यानं सर्पदंशातून होणाऱ्या मृत्यूची माहिती पोलिस स्टेशनमध्ये द्यायची असते. मात्र पोस्टमॉर्टेम आणि मृत्यू प्रमाणपत्र यासाठी यंत्रणा घरच्यांचा छळ करते. अनेक लोकांना खात्रीही नसते की साप चावल्यामुळेच मृत्यू झाला आहे की नाही. सर्पदंशाने होणारे 97 टक्के मृत्यू गावात होतात. नागपूर जवळच्या कट्टा गावात एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने एक स्टिंग ऑपरेशन केलं. त्यांनी सर्पदंश झाल्याचं नाटक केलं आणि गावातल्या एका मांत्रिकाकडे गेले. तो एका मंदिरात राहत होता.
मंदिरातून तो सरपटतच बाहेर आला. आपल्या अंगात साप संचारला आहे असं त्याचं म्हणणं होतं. लाल बनियान घातलेल्या त्या मांत्रिकानं साप चावण्याचं नाटक करणाऱ्या माणसाचा घाव चोखायला सुरूवात केली. त्यातून तो विषही चुसणार होता. तो स्वतःला साप समजत होता आणि ते विष पुन्हा मूळ जागी तो पाठवत होता. संस्थेच्या लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय दुष्ट अघोरी प्रथा उन्मूलन आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात आला. तो सध्या तुरूंगात आहे.
स्टिंग ऑपरेशन करणारे नितेश भंडकर म्हणतात की, शासनाला अजून जाग आली नाही. आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो, त्यासाठी शाळा-कॉलेजेसमध्ये जातो. पण आम्हाला शासनाकडून मदत मिळत नाही. त्यांना याविषयी अधिक जागरूक होण्याची गरज आहे. जागरूकता कार्यक्रमांत, उंदरांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं जातं कारण त्यांच्यामुळे साप आकर्षित होतात.
गावकऱ्यांना सांगण्यात येतं की घराच्या भिंती व खालची जमीन यांच्यात फटी नसाव्या आणि शेतातील धान्य घरात साठवू नये. अशा मांत्रिक-बुवांच्या बाजूने एकच गोष्ट सकारात्मक आहे ती म्हणजे, बिनविषारी सर्पदंशाच्या घटना. कारण भारतातील 300 सापांपैकी केवळ 17 सापच विषारी असतात आणि ज्यांच्यामुळे गंभीर इजा पोहोचते, उदा. दृष्टिदोष, अतिरिक्त रक्तस्त्राव, मूत्रपिंडाला हानी इत्यादी.
मोरटामध्ये सापांची संख्या जास्त आहे. तिथले लोक सापांना ओळखतात पण ते विषारी की बिनविषारी ते सांगू शकत नाहीत. साप सगळीकडेच आहेत आणि सर्पदंशाच्या घटना नेहमीच घडतात. जवळचं सरकारी रुग्णालय 20 मिनिटांच्या अंतरावर आहे पण मागच्या वर्षी जेव्हा एका मुलीला तिथं भरती करण्यात आलं तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की त्यांच्याकडे एन्टी-वेनम इंजेक्शन्स नाहीत. त्यामुळे मुलीला 40 किमी दूर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात न्यावं लागलं. गावकरी आणि रुग्णालयांतील या अंतरामुळे आणि अविश्वासामुळे मांत्रिक-बुवा यांचं दुकान तेजीत सुरू असतं.

शासकीय रुग्णालयात एन्टी-वेनम इंजेक्शन्सची कमतरता
डॉ. कदम सांगतात की, चार मुख्य विषारी सांपापैकी एक असलेला चष्माधारी कोब्रा देखील काहीवेळेस कोरडा दंश म्हणजे विषरहीत दंश करू शकतो. जर स्पष्ट लक्षण आढळलं नाही तर इलाज करणारा मांत्रिक रुग्णाला वाचवण्याचं श्रेय आरामात घेतो. नागपूरचा एक मांत्रिक, गोलू याला सर्पदंश झाल्यानंतर त्याला आपल्या चूकीची जाणीव झाली. तो म्हणतो, “मी अनेकांना जडी-बूटी आणि वनस्पतींपासून बनवलेली पेस्ट दिली आहे. पण मला एकदा रसेल वायपर सापाने चावा घेतला. त्यावेळी मी रुग्णालयात गेलो. तिथे पॉलिवेलेंट एन्टी-वेनम इंजेक्शन्स दिल्यानंतरच माझा जीव वाचला. मी तोवर बिनविषारी सर्पदंश समजूनच उपचार करत होतो. आता मला हा फरक लक्षात आला आहे.”
सापांविषयी अनेक दंतकथा, अंधश्रद्धा आहे आणि श्रद्धाभावही आहे. त्यांना देव आणि शैतान अशी ओळख आहे. सामान्य लोकांमध्ये मात्र साप हा दुष्ट, लबाड, दीर्घद्वेषी, सूड घेणारा अशी समजूत आहे जी दूर करणं कठीण आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणंही कठीण जातं. भंडकर सांगतात की, लोकांना रुग्णालयात जाण्यास तयार करणं सर्वांत अवघड गोष्ट असते.
काही लोकांनी त्यांना सांगितलं की त्यांना विचित्र स्वप्नं पडतात, चवीतही फरक जाणवतो. विष अंगात पसरल्यामुळे असं झाल्याचा त्यांचा दावा असतो. पण ही लक्षणं भीतिमुळे येऊ शकतात. भंडकर आरोप करतात की, चित्रपटांनी सापांविषयी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली आहे. मनोरंजनासाठी सापाचं खेळण्यात रुपांतर करण्यात आलं आहे.
काही वेळेस दवाखान्याचा खर्च फार जास्त होतो. नागपूरच्या कविता सेलोकर यांना रसेल वायपरने चावा घेतला. त्यांचे पति, दशरथ सेलोकर, जे पदवीधर आहेत, त्यांचा व कविता यांचाही मांत्रिकावर विश्वास नसल्याने त्यांनी कविता यांना सरकारी रुग्णालयात नेण्याआधी एका प्रायवेट डॉक्टरकडे नेलं. तिथं प्राथमिक उपचारानंतरच 40 हजाराचं बिल त्यांना मिळालं. जे त्यांच्या कुवतीपलिकडचं होतं. त्यामुळे कविता यांना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण त्यांना तीव्र ताप आहे.
डॉक्टरांनी त्यांना दहा इंजेक्शन्स दिले आहेत आणि महिन्याभरात त्या पूर्ण बऱ्या होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मोरटाचे लोक सांपाविषयी स्वयंसेवी संस्थाची जी विचारसरणी आहे त्यामुळे हैराण आहेत. कारण तिथल्या लोकांसाठी साप ही समस्या नसून रोजच्या जगण्याचा भाग आहे. एकाने सांगितलं, आम्हाला इथं कुत्र्यांमुळे खूप जास्त त्रास होतो. त्यांच्यामुळे घराच्या बाहेर पडणं कठीण झालं आहे.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






