उत्तरप्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील आरती, बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेऊन सध्या देशात परतली आहे. शेजारी, स्थानिक पुढारी, राष्ट्रीय मीडिया, जिल्ह्याच्या या पहिल्या पिंक-ई रिक्षा ड्रायव्हरचं स्वागत करण्यासाठी रांगेत उभे आहेत. जिनं अलिकडेच प्रतिष्ठेचा ‘अमल क्लुनी महिला सक्षमीकरण पुरस्कार,’ जिंकला आहे. आता प्रत्येकाला या 19 वर्षीय लोकल सेलिब्रिटीला भेटायचं आहे आणि रिक्षा चालवताना तिचा फोटो आणि व्हिडीओ काढायचा आहे. पण नेहमीच होणाऱ्या लोडशेड़िंगमुळे रिक्षा चार्ज न झाल्यामुळे घरातच पडून आहे. तरीही आरती आणि तिच्या घरच्यांना आनंद आहे कारण लवकरच तिच्या घराकडे जाणारा रस्ता आरतीच्या नावाने पक्का होणार आहे.
बहराईचच्या जिल्हा मॅजिस्ट्रेट मोनिका रानी म्हणतात, “हा रस्ता केवळ आरतीच्या यशाचं, मेहनतीचं प्रतीक नसेल, तर गावातील अन्य बायकांनाही तिच्याप्रमाणे घरातून बाहेर पडून आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रेरीत करेल.”

…आणि खेड्यातली आरती बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांना भेटली
आरतीला मिळणारं हे स्वातंत्र्य आणि लोकप्रियता नवीन आहे. वयाच्या 13व्या वर्षीच लग्न झाल्यानंतर, वर्षभरातच ती आई झाली आणि त्यानंतर लगेचच नवऱ्यापासून वेगळं होऊन ती माहेरी परत आली. आगा खान फाऊंडेशनच्या मदतीने मिशन शक्ती योजना अंतर्गत युपी सरकारच्या पिंक-ई रिक्षा योजनेत तिला काम मिळालं आणि त्यातूनच अमल क्लुनी पुरस्कारासाठी तिची निवड झाली. पण त्यासाठी लंडनला जाण्याचा प्रवास सोपा नव्हता. घरच्यांना त्यासाठी तयार करणं, पासपोर्ट काढणं, विमानाचं तिकीट घेणं, मुलाखत देणं, यातून बाहेर पडत ती शेवटी 21 मे रोजी किंग चार्ल्स तृतीय यांना भेटू शकली. एका जुन्या स्टिलच्या पेटीत ठेवलेलं प्रमाणपत्र आणि पुरस्कार दाखवत आरती म्हणते, “जे माझ्यासोबत झालंय ते सारं एखाद्या स्वप्नासारखं आहे. मी लंडनला जाईन असं कधीच वाटलं नव्हतं. मी तर युपीच्या बाहेरही गेले नव्हते आजवर.”
जेव्हा तो फोन आला…?
आता अनेकांना आरती व तिच्या गावाची माहिती झाली आहे. रिसिया ब्लॉकच्या मुख्य रस्त्यावरच्या एका लहानशा दुकानाचे मालक, बिट्टू लोकल गाईड झाले आहेत. बाहेरून येणारे लोक त्यांना आरतीचा पत्ता विचारतात आणि ते त्यांना आरतीकडे घेऊन येतात. आरतीचं घर दोन खोल्यांचं आहे. त्यात ती तिची मुलगी, आई-वडील आणि पाच भाऊ-बहिणींसोबत राहते. पुरस्कार मिळाल्याचा फोन आल्यावर घरी खळबळ उठली होती. कोणाला आनंद झाला, कोणी साशंक, कोणाच्या मनात प्रश्न होते. फेब्रुवारीत तिला आगा खान फाऊंडेशनच्या प्रोग्राम कन्व्हेनर सीमा शुक्ला यांचा फोन आला. त्यांनी तिला पुरस्कार आणि लंडन भेटीची माहिती दिली. आरतीचा विश्वास बसला नाही. उप्र सरकारने ई-रिक्षा प्रोत्साहन कार्यक्रमाअंतर्गत तिच्यासहीत दहा बायकांना याचं प्रशिक्षण दिलं होतं. आरतीनं शुक्लांना सांगितलं की तिला घरच्यांशी याविषयी बोलावं लागेल. आई रीना देवीची संमती मिळवण्यासाठी फाऊंडेशनच्या अनेकांनी त्यांची समजूत काढली. पुरस्काराचं महत्त्व सांगितलं. त्यांना किंवा घरातल्या कोणालाच चार्ल्स किंवा बकिंगहॅम पॅलेसची माहिती नव्हती. मुलगी अशीच गेली तर लोक काय म्हणतील याची त्यांना जास्त काळजी होती. “मुलगी दोन दिवस जरी बाहेर कुठे गेली तर गावातले लोक बोलू लागतात. तिनं काहीतरी चुकीचं काम केलंय असं त्यांना वाटतं,” रीना देवी सांगतात.

त्यांनीच आरतीला रिक्षा ड्रायव्हर होण्यासाठी प्रेरणा दिली होती. गावात, नातेवाईकांमध्ये या कामाला विरोध होता. चांगल्या घरातील बायका कामासाठी बाहेर पडत नाहीत. पण रीना देवी ठाम होत्या. त्यांना फक्त चिंता होती की बाकीचे पुरुष ड्रायव्हर्स तिला त्रास देतील. ही चिंता अनाठायी नव्हती कारण इथले रस्ते पुरुषांसाठीच आहेत. आरतीला रस्त्यावर आपली जागा मिळवण्यासाठी लढावं लागलं. रिक्षा लावण्यासाठी तसंच उतारू मिळवण्यासाठीही. पुरस्कार मिळाल्यानंतरही हा त्रास कमी झालेला नाही. बहराईचमध्ये 10 वर्षांपासून रिक्षा चालवणारा मोहम्मद आसिद म्हणतो, “बायकांचं काम घराची देखभाल करणं आहे. रस्त्यावर रिक्षा चालवणं नाही.”
रिक्शा कशी मिळाली?
जुलै 2023 मध्ये आरतीला पिंक-ई रिक्षा मिळाली. या योजनेत बायकांना कमी व्याज दरावर 1.66 लाख रुपये देण्यात येतात. प्रशिक्षण घेतल्यानंतर आरतीनं रिक्षा चालवणं सुरू केलं. आता ती महिन्याला 15 हजार कमावते आणि साडेचार हजाराचा ईएमआय भरते. सर्व दहा महिला रिक्षा चालक एकल माता आहेत किंवा नवऱ्याशिवाय राहत आहेत. आज आरतीमुळे तिच्या घराला पुन्हा आधार मिळाला आहे. आरतीला आता आपल्या मुलीला शिकवायचं आहे. ती स्वतः फक्त आठवीपर्यंत शिकू शकली. तिला आपलं स्वतःचं घरही घ्यायचं आहे. जिथं तिला आपल्या मुलीसोबत आनंदानं राहायचं आहे. आरतीच्या कामाच्या पहिल्या दिवशी इतर पुरुष ड्रायव्हर्सच्या नजरांमुळे ती विचलीत झाली होती.
‘ही काय रिक्षा चालवणार,’ ‘स्वतःच काही दिवसांत काम थांबवेल’ असा त्यांचा काहीसा दृष्टीकोन होता. काही अन्य महिला ड्रायव्हर्सनी सांगितलं की इतर पुरुष ड्रायव्हर्स त्यांचे व्हिडीयो बनवायचे आणि मित्रांमध्ये शेअर करत त्यांची थट्टा करायचे. 30 वर्षीय शिव कुमारी सांगते, “घरी आम्हाला नातेवाईक टोमणे मारायचे तर बाहेर पुरुष ड्रायव्हर्सनी सुरूवातीला आम्हाला उतारू घेऊन जाण्यापासून थांबवलं. अनेक दिवस आम्हाला हात हलवतच यावं लागलं.” काहींनी त्यांना रिक्षा स्टँडवर जागा मिळू दिली नाही. कुमारी म्हणते, “एकदा मी जेव्हा बहराईच बस स्टॉपवरून प्रवासी घेऊन येत होते तेव्हा काही बस ड्रायव्हर्सनी मला थांबवलं आणि प्रवाशांना उतरायला सांगितलं. त्यांनी म्हटलं की रिक्षा ड्रायव्हर्सना इथं उतारू घेऊन जाण्याची परवानगी नाही. इथं फक्त बसेस चालतात.”
पण यात तिला व अन्य बायकांना अनेक प्रवाशी बायकांचं समर्थन मिळालं, त्यापैकी एक होती रुची. ती आता आरतीची रेग्युलर कस्टमर आहे. रुची सांगते, “एका महिला ड्रायव्हरसोबत कामाला जाताना अधिक सुरक्षित वाटतं. आणखी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही प्रवासात गप्पाही मारू शकतो.”

घरात नातेवाईकांचे आणि बाहेर पुरुष रिक्शा चालकांचे टोमणे
सध्या अनेक पिंक-ई रिक्षा ड्रायव्हर्स महिला प्रवाशांनाच घेऊन जाणं पसंत करतात. यामुळे त्यांनाही सुरक्षित वाटतं. इतर पुरुष ड्रायव्हर्सही यात हस्तक्षेप करत नाहीत. आरतीच्या घरच्यांप्रमाणे शिव कुमारीला घरून पाठींबा मिळत नाही. तिचा नवरा अजूनही तिच्यावर भडकतो. तिचा नवरा घरकामातही तिला मदत करत नाही. तिच्या कामावरही तो नाराज आहे. पण आपल्या चार मुलांच्या भविष्याचा विचार करून तिनं आपलं काम सुरूच ठेवलं आहे. ती म्हणते, “आम्हा बायकांना आयुष्यात काहीच सहजपणे मिळत नाही. ना घरात ना घराबाहेर. आमची जागा मिळवण्यासाठी आम्हाला प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो.”
या सर्व कामकाजी महिला असल्या तरी त्यांच्या घरच्या कामात त्यांची मदत करणारं कोणी नाही. कुमारी, मेघा या महिलांना अनेकदा घरातल्या कामासाठी, तसेच मुलांसाठी रिक्षा चालवणं सोडून घरी यावं लागतं. त्यानंतर परत आल्यावर रांगेत सर्वांत शेवटी उभं राहावं लागतं. आरतीच्या घरी तिची आई आणि बहिण तिच्या मुलीची काळजी घेतात. ती म्हणते, “मी मध्येच घरी गेले तर माझी मुलगी रडू लागते. त्यामुळे मी जात नाही.”
कुमारीला मात्र अनेकदा घरी जावंच लागतं, कधी मुलांना जेवण देण्यासाठी, कधी त्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी. ती म्हणते, “आमच्यापैकी अनेकींना दहा वर्षांहून लहान वयाची मुलं आहेत. त्यामुळे घरी यावंच लागतं आणि त्यात रिक्षा स्टँडवरची जागा सोडावी लागते.” पण यापैकी एकीलाही रिक्षा ड्रायव्हर झाल्याचा पश्चाताप नाही. त्या स्वतंत्र आहेत आणि त्यासाठी मोजावी लागणारी ही किंमत फार कमी आहे. कुमारीच्या कमाईवर तिचं घर चालतं आणि मुलं खासगी शाळेत शिकत आहेत. 35 वर्षीय मेघासाठी तिची कमाई तिच्या पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत खूप जास्त आहे जेव्हा तिचा नवरा वारला होता आणि तिला आपल्या चार मुलांच्या भरणपोषणासाठी मजूरीवर काम करावं लागलं होतं. ती सांगते, “मला असं वाटतंय की मी रोजच एक लढाई लढत आहे. पण यामुळे मी स्वतंत्र आहे. मुलांची काळजी घेऊ शकते. हवं तेव्हा कामावर जाऊ शकते.” आता तिची तीन मुलं शाळेत शिकायला जातात. जिल्हा प्रशासनाला आशा आहे की आरतीची लंडनवारी बघून इतर बायकांनाही पिंक-ई रिक्षा योजनेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. त्याची सुरूवात झाली आहेच. आणखी 18 महिला या योजनेत सहभागी झाल्या आहेत. मोनिका रानी सांगतात, “बहराईच ते लंडनच्या यात्रेमुळे आरतीला प्रसिद्धी मिळाली आणि आता तिची कथा इतर बायकांना प्रेरीत करत आहे, त्याही आता या योजनेत भाग घेण्यासाठी पुढे येत आहेत.”

‘’महिलांना कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही’’
आरती आपल्या फोनवर लंडन प्रवासाचे फोटो बघते आहे. लंडनच्या एका रस्त्यावर उभी राहून ती पोज देत आहे. 18 ते 24 मे या सहा दिवसांचा लंडन प्रवास तिच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. ती म्हणते, “माझा विश्वासच बसत नव्हता की मी लंडनमध्ये आली आहे म्हणून.” तिच्या घरच्यांनी परवानगी दिल्यानंतर प्रशासन कागदपत्रं गोळा करण्यामागे लागलं. आगा खान फाऊंडेशन आणि बहराईच जिल्हा प्रशासनाने आरतीला पुढच्या कामासाठी मदत केली. आरती सोबत आगा खान फाऊंडेशनच्या सीईओ टिन्नी साहनी होत्या ज्यांनी तिची अनुवादक म्हणूनही काम केलं. आरती म्हणते, “पुरस्कार समारंभासाठी तयार होताना दोन माणसांनी मला मदत केली. एकजण माझे केस विंचरत होता, दुसरा मेकअप करत होता. मी असं काही फक्त टिव्हीवर पाहिलं होतं. मला वाटलं की मी हिरोईन झाले आहे आणि सर्वांच्या नजरा माझ्यावरच आहेत.” आरती पिंक ऑटोरिक्षात बसूनच बकिंगहॅम पॅलेसला पोहोचली. तिथं खुद्द किंग चार्ल्स तृतीय यांनी तिचं व इतरांचं स्वागत केलं. पुरस्कार समारंभानंतर तिनं लंडन ब्रिज पाहिला. ती आयुष्यात प्रथमच इतकी दूर, तिच्या मुलीशिवाय आली होती जिची तिला खूप आठवण येत होती. ती म्हणजे, “मला माझ्या मुलीची खूप आठवण येत होती. हे जेवढं माझं यश आहे तितकंच तिचंही आहे. मी तिच्यासाठी लंडनहून चॉकलेट्स आणि जोडे आणले आहेत.”
सौजन्य – द प्रिंट
अनुवाद – प्रतिक पुरी






