दक्षिण फ्रान्समधील अविग्नोन शहरातील न्यायालयात सुरू असलेल्या एका न भूतो आणि अनोख्या अशा बलात्कार खटल्याने सर्वाधिक खुल्या लैंगिक संबंधांचा महामेरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युरोपीय देशात गेले तीन आठवडे मोठे काहूर माजले आहे.
पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठापुढे 2 सप्टेंबर रोजी सुनावणी सुरू झाल्यापासून या खटल्याशी संबंधित बातम्या, लेख, मुलाखती व छायाचित्रे यांनी देशातील सर्व छापील वृत्तपत्रे ओथंबून भरली गेली आहेत आणि सर्व वृत्तवाहिन्यांवर या एकाच विषयावर गदारोळ सुरू आहे. समाजमाध्यमांमध्येही मत-मातांतरांचा महापूर आला आहे.
पीडित महिलेच्या अब्रूरक्षणासाठी तिची ओळख उघड न करण्याची आणि असे खटले बंद दरवाज्याआड (In Camera) चालविण्याची फ्रेंच कायद्यातही तरतूद आहे. परंतू खटला खुल्या पद्धतीने चालविण्याची स्वतः पीडितेने केलेली मागणी न्यायालयाने मान्य केल्याने खटल्याचे नवनवीन धक्कादायक तपशील दररोज समोर येऊन समाजात भावनोद्रेक सुरू आहे.
परिणामी एखाद्या जेत्याच्या आविर्भावात उजळमाथ्याने आणि ताठ मानेने दररोज न्यायालयात येणारी ही पीडित महिला पुरुषी वर्चस्वास पार धुळीस मिळवून त्यावर स्त्रीहक्कांचा झेंडा रोवणारी म्हणून राष्ट्रीय नायिका ठरली आहे. शिवाय या खटल्याने बलात्कारित स्त्री आणि बलात्कारी पुरुष यांच्या समाजमनातील ठाम प्रतिमांची अदलाबदल झाली असून शरमेने तोंडे लपविण्याची वेळ बलात्कारी आरोपींवर आली आहे.

पत्नीवर 72 जणांनी 92 वेळा केला बलात्कार
या खटल्यातील पीडित महिलेचे नाव गिझेल पेलिकॉट असे आहे. गिझेल 71 वर्षांची आहे. तिला तीन मुले आणि सात नातवंडे आहेत. तिने ज्याच्यासोबत तब्बल 50 वर्षे संसार केला तो तिचा पती डॉमिनिक पेलिकॉट याच्याखेरीज 26 ते 74 वयोगटातील आणखी 50 पुरुष खटल्यातील आरोपी आहेत. हे आरोपी ट्रक ड्रायव्हर, बांधकाम कामगार, प्राध्यापक, व्यापारी, पत्रकार, व्यावसायिक, सुरक्षा रक्षक आणि परिचारक अशा समाजातील विविध थरांतील आहेत.
एकूण 10 वर्षांच्या कालावधीत डॉमिनिक पेलिकॉट याने निरनिराळ्या वेळी आपल्या पत्नीला अन्न व पेयांतून गुंगीचे औषध देणे आणि ती शुद्धीवर नसताना, आपल्याच घराच्या बेडरूममध्ये आपण स्वतः बाहेरून बोलावून आणलेल्या अन्य पुरुषांसह तिच्याशी संभोग करणे तसेच अशा प्रत्येक कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते इतरांना पाठविणे असे खटल्यातील मुख्य आरोप आहेत.
डॉमिनिक यांच्यासह 72 आरोपींवर गिझेल हिच्यावर जबरी बलात्कार केल्याचे आरोप आहेत. एका आरोपीवर गिझेलवर लैंगिक अत्याचाराचा तर आणखी एका आरोपीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आणखी एका आरोपीने डॉमिनिकचा कित्ता गिरवत आपल्या पत्नीला गुंगीचे औषध देवून त्याच्यासह तिच्यावर बलात्कार केला, असेही अभियोग पक्षाचे म्हणणे आहे. फ्रेंच कायद्यानुसार पतीने पत्नीच्या संमतीविना तिच्याशी संभोग करणे हाही बलात्कार मानला जातो, हेही येथे नमूद करायला हवे.
दि. 12 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी डॉमिनिक याने त्याच्यावर आरोपित सर्व गुन्ह्यांची न्यायालयात कबुली दिली. त्यावेळी न्यायालयात समोरच्या बाकावर बसलेली आपली पत्नी गिझेल हिला उद्देशून तिची माफी मागताना तो म्हणाला: माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुझ्याबाबतीत मी असे करायला नको होते.
माझे हे कृत्य सर्वस्वी अक्षम्य आहे. तरीही मी तुझी माफी मागतो. जमल्यास मला क्षमा कर! हे बोलत असताना डॉमिनिकला हुंदके आणि अश्रू अनावर झाले होते. आणखीही सुमारे दोन डझन आरोपींनी आपापल्या गुन्ह्यांची कबूली दिली.

तपास टाळण्यासाठी तो पत्नीला देत असे ड्रग्ज
ज्या आरोपींनी गुन्हे कबूल केलेले नाहीत त्यांचा बचाव थोडक्यात असा: आम्ही गिझेलशी संभोग केला हे मान्य. परंतू तो बलात्कार नव्हता, कारण त्यास गिझेलची संमती होती. माझ्या पत्नीला एकाच वेळी एकाहून अधिक पुरुषांकडून लैंगिक भूक भागवून घेणे आवडते, असे सांगत तिचा पती डॉमिनिक यानेच आम्हाला मुद्दाम बोलावून घरी नेले. अभियोग पक्षाने पुरावे म्हणून सादर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये लैंगिक संबंधाच्या वेळी गिझेल निपचित पडून राहिलेली दिसते.
पण त्यावरून त्यावेळी ती शुद्धीवर नव्हती, हे सिद्ध होत नाही. माझी पत्नी लाजरी आहे. ती लैंगिक संबंधामध्ये स्वतःहून पुढाकार घेत नाही किंवा प्रतिक्रियाही देत नाही, असे डॉमिनिकने सांगितल्याने आम्ही गिझेल निपचित असूनही तिच्याशी संभोग केला.
न्यायालयात प्रत्येक आठवड्याला सहा-सात आरोपींना हजर करून त्यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने सुनावणी केली जात आहे. रोज न्यायालय दर्शकांनी खच्चून भरलेले असते. आरोपींचे सुमारे 40 वकील उलटतपासणीच्या वेळी आळीपाळीने गिझेलवर तुटून पडतात. एरवी सर्वच बलात्कार खटल्याप्रमाणे ते पीडीत महिलाच कशी बदफैली आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. परंतू या सर्वांना पुरे पडत गिझेल जराही न डगमगता, धीरोदात्तपणे आपल्या पतीसह सर्वच आरोपींच्या विरोधात साक्ष देते आहे.
गेल्या 20 दिवसांत तिचा संयम फक्त एकदाच सुटला. त्यावेळी तिने आवाज चढवून आरोपींच्या वकिलांना दोन गोष्टी निक्षून सांगितल्या: एक, तुम्ही कितीही उलट-सुलट विचारलेत तरी, माझ्या संमतीशिवाय माझ्याशी कोणालाही शारीरिक संबंध न ठेऊ देण्याचा माझा अधिकार तुम्ही मला नाकारू शकणार नाही. आणि दोन, उलट मलाच दोषी ठरविण्याचा तुमचा मनसुबा कदापि यशस्वी होणार नाही, मी तो तसा होऊ देणार नाही!

पत्नीवर बलात्कार करण्यासाठी अनोळखी पुरुषांची करत असे भरती
आरोपींवरील आरोपित गुन्ह्यांचे पराकोटीचे विकृतीपूर्ण स्वरूप, त्यांची भयावह गंभीरता आणि आरोपींची अर्धा शेकडा एवढी मोठी संख्या एवढ्यापुरतेच या खटल्याचे आगळे-वेगळेपण मर्यादित नाही. हा खटला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उभा राहिलेला नाही, हे त्याचे आणखी एक अनोखेपण आहे. अन्य तीन महिलांनी केलेल्या वेगळ्याच प्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गिझेलचा पती आणि मुख्य आरोपी डॉमिनिक याला सन 2020 मध्ये प्रथम अटक केली.
आम्ही सुपरमार्केटमध्ये गेलो असता, खाली आमच्या पायापाशी पडलेली वस्तू उचलण्याचा बहाणा करत, डॉमिनिक याने आमच्या स्कर्टच्या खाली मोबाईलचा कॅमेरा धरून आमचे फोटो काढले, अशी त्या महिलांची फिर्याद होती. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी डॉमिनिकच्या घराची झडती घेतली. त्यात त्याची मोबाईल, संगणक, कॅमेरा अशी इलेक्ट्रोनिक उपकरणे जप्त केली. त्या उपकरणांच्या तपासणीमधून त्यातील एकाच महिलेशी डॉमिनिकसह इतरही पुरुष एकच वेळी संभोग करत असताचे निरनिराळ्या वेळचे फोटो आणि व्हिडीओ मिळाले.
त्यांची संख्या 20 हजारांहून अधिक होती. त्या सर्वांमध्ये नको त्या अवस्थेत दिसणारी महिला एकच म्हणजे डॉमिनिकची पत्नी गिझेल हिच होती. पोलिसांनी ते फोटो व व्हिडीओ दाखवून तिच्याकडे चौकशी केली तेव्हा तिने त्याविषयी पूर्ण अनभिज्ञता व्यक्त केली. दोन वर्षांच्या अथक तपासातून पोलिसांनी त्या फोटो व व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या मुसक्या आवळल्या आणि हे महाभयंकर गुन्हेनाट्य उघड झाले.
अभियोग पक्षाने हे सर्व फोटो व व्हिडीओ पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले. प्रचलित पद्धतीनुसार असे पुराव्याचे फोटो खुल्या सुनावणीत न्यायदालनातील स्क्रीनवर प्रदर्शित केले जातात. परंतू हे फोटो आणि व्हिडीओ एवढे बिभत्स आणि शिशारी आणणारे होते की त्यापैकी त्यातल्यात्यात कमी अश्लील असे निवडक फक्त 20 फोटो/व्हिडीओच्या जाहीर प्रदर्शनास न्यायालयाने परवानगी दिली. नाके मुरडत ते पाहणाऱ्या उपस्थितांच्या चेहऱ्यावरचे अगतिक लज्जेचे भाव लपून राहिले नाहीत.
फ्रान्समध्ये फौजदारी खटले ज्युरी नेमून चालविले जातात. परंतू गंभीर गुन्ह्यांचे खटले `ज्युरी`विना फक्त न्यायाधीशांनी चालविण्याची कायदा दुरुस्ती सन 2016 मध्ये केली गेली. त्यामुळे `ज्युरी`विना चाललेल्या या खटल्याचा निकाल लवकर म्हणजे कदाचित डिसेंबरपर्यंत लागण्याची अपेक्षा आहे. सर्व आरोपींवरील सर्व गुन्हे सिद्ध झाले तरी त्यांना कमाल 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकेल.






