‘अग्निपथ’ या सिनेमामध्ये खलनायक डॅनी हा अमिताभ बच्चनला मारायचा आटोकाट प्रयत्न करतो पण प्रत्येकवेळी अमिताभ तो हाणून पाडतो. मग डॅनी त्याला घरी वाटाघाटीसाठी बोलावतो, त्यावेळी त्याचे चमचे आश्चर्यचकित होऊन डॅनीला याचे कारण विचारतात. तेव्हा डॅनी एक बढिया आणि फेमस डायलॉग मारतो, “जब दुश्मन की उम्र बढ जाए तो उससे दोस्ती कर लेनी चाहिए, अपनी उम्र बढ जाती है।” यालाच मराठीत शब्द आहेत ‘यशस्वी माघार ‘, हिंदीत ‘सर सलामत तो पगडी पचास’.
अगदी शब्दशः नाही तरी बर्याच प्रमाणात आजकालच्या घडामोडींना हा डायलॉग लागू पडतोय. आज विकास परम सीमेवर आहे. तो अंधाधुंद ओसंडून वाहतोय. मोठमोठ्या फैक्ट्रीज्, रिफायनरीज, खाणकाम, महामार्ग इ. इ.


आपला आजचा विषय आहे ‘रस्ता’ (महामार्ग)… चौपदरी, सहा पदरी, अष्ट पदरी असे महाकाय रस्ते अक्राळ विक्राळपणे सगळीकडेच चौफेर बनत चाललेत. गरज असो वा नसो, लोकांची मागणी असो वा नसो, दोन दोन पर्यायी मार्ग असून देखील धडाधड नवे महामार्ग मंजूर होताहेत आणि ते मार्गीही लागताहेत. यात घरे, दुकाने, व्यवसाय, शेती, जंगल इ इ वर सरळसरळ हातोडा पडत आहे. पर्यावरण, वन्यजीव, मानवाधिकार इ इ सर्व कायद्यांना अगदी उन्मादाने अश्व लावून धाब्यावर बसवले जात आहे. या रस्त्यांना गावोगावी विरोध होतो. मग उड्डाणपुल, बायपास सारखे मार्ग काढून पुढे चाल दिली जाते. घर, दुकान, शेती इ इ ला सरकार तर्फे दुप्पट, चौपट भरपाई दिली जातेय. साम दाम दंड भेद सर्व वापरून सगळ्यांना सरळ केले जात आहे.
परंतू वनजमीनीचे काय? तर जितकी वनजमीन अधिग्रहण केली जाते तितकीच जमीन इतरत्र कोठेही वनविभागाला दिली जाते आणि फाॅरेस्ट क्लियरेंस घेतला जातो. परंतू त्या जमिनीत असलेल्या झाडाडझुडपांचे, वन्यजीवांचे कोणत्याही प्रकारचे मुल्यमापन योग्यरित्या होत नाही किंबहुना वन्यजीवांना तर गृहितच धरले जात नाही! रस्ते चौपदरी होतात, गुळगुळीत होतात आणि त्यावरून वाहने सुसाट धावतात. मग वन्यजीव जीव मुठीत घेऊन हा रस्ता ओलांडून जायचा प्रयास करतात. यात कित्येक जीव हकनाक बळी पडतात. वाघासारखे संवेदनशील प्राणी तर तो प्रदेशच सोडून जातात. हे रस्ते बनल्यानंतर जोपर्यंत वनजमिनीत जंगल शिल्लक आहे आणि रस्ता चालू आहे तो पर्यंत वन्यजीवांचे हत्याकांड हे होतच राहणार. विषेशतः पावसाळ्यात तर साप, बेडुक, खेकडे, किटक इ इ च्या रक्तामांसाचा चिखलच झालेला असतो. वन हद्दीतील रस्त्यांवरील हे फार भयानक वास्तव आहे.
अनेक पर्यावरणप्रेमी नेहमीच या वनहद्दीतील रस्त्यांना अभ्यासपूर्ण विरोध करत आले आहेत. यापूर्वी देखील विरोध होत होते आणि भविष्यातही विरोध करत राहतील. परंतू यापूर्वी अनेकदा काही पर्यावरणप्रेमींनी घेतलेल्या आडमुठेपणामुळे, हेकेखोरपणामुळे, सर्वच पर्यावरणप्रेमींची ‘विकास विरोधक’, ‘सर्वत्र खो घालणारे’ अशी प्रतिमा तयार झालीय वा जाणीवपूर्वक बनविण्यात आली आहे. अनेकदा रस्ता रूंदीकरण आवश्यक असतो त्यावेळी वृक्षांचा बळी हा ठरलेलाच असतो. रस्त्यांवरील वृक्ष तोडल्यानंतर नवीन रोपे लावून त्यांची योग्य जोपासना करने ही रस्ता महामंडळ व कंत्राटदार यांची जबाबदारी असते. सरकारचा पर्यावरणाबाबत बेपरवाही, बेदरकारपणा फारच वाढत चालला आहे. त्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. प्रशासन सुद्धा प्रकल्पांसाठी फार आग्रही झाले आहे. लाखों-लाख करोडों रूपयांचे कंत्राट निघत आहेत. पाण्यासारखा पैसा ओतला जातोय या रस्त्यांवर व त्याच्या निर्माणावर. म्हणजेच डॅनीच्या डायलॉग नुसार दुश्मन की उम्र बढ रही है. तर अश्या वेळी पर्यावरणप्रेमींनी सरकार, प्रशासन बरोबर वाटाघाटीचा मार्ग अवलंबिला पाहिजे. कोणीही कीतीही विरोध केला तरी रस्ते हे होणारच. त्यामुळे तकलादू, हट्टी, वास्तवाशी फारकत घेणारा, नाकाम विरोध करून अपयश पदरात पाडून घेण्यापेक्षा सरकारशी, प्रशासनाशी तडजोड करून सरसकट सर्व रस्त्यांना विरोध न करता योग्य पर्यायावर सरकारला आणावे लागेल. जेथे जेथे रस्ते वन हद्दीतून जातात वा घनदाट वनातून जातात, तेथे खास करून घाटातील रस्ते हे पूर्णपणे मुंबईत जसे अखंड फ्लायओवर बनविले आहेत तसे बनविले पाहिजेत. यासाठी आग्रह धरला पाहिजेल. सरसकट सर्वच रस्त्यांना विरोध करून चालणार नाही, तर त्यासाठी योग्य पर्याय द्यायला हवा. अखंड फ्लायओवर हा पर्याय थोडा जास्त खर्चीक आहे परंतू त्याचे फायदे अनगिनत आहेत.

- यामुळे वन्यजीवांची रस्त्यांवर होणारी हत्या जवळपास नगण्य असेल.
- वन्यजीवांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागणार नाही.
- वन्यजीवांचे काॅरीडाॅर (भ्रमणमार्ग) अखंडित राहतील आणि ते मानवी वस्तीत शिरणार नाहीत.
- वाघ, गवे, सांबर तसेच हत्ती सारखे प्राणी देखील या फ्लायओवर खालूनच आरामात ये जा करतील.
- पावसाळ्यात साप, बेडूक, किटक, खेकडे इ इ जी हत्याकांड होतात ती जवळपास बंदच होतील.
- फ्लायओवर मुळे जे जुन्या रस्त्यांवर जे पाण्याचे स्रोत अडवून पुल बांधले आहेत ते मोकळे होऊन पाणी विना अडथळा वाहू लागेल. त्यामुळे पाण्यातील मासे, जलचर इ चे आपोआपच संवर्धन होईल.
- फ्लायओवर सरळसोट असल्यामुळे जंगलात घुसून होणारी चोरटी शिकार, लाकुडतोड इ गोष्टी बर्याच अंशी कमी होतील.
- घाटातील वळने कमी होऊन घाटांची लाबी कमी होईल पर्यायाने वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होईल.
- दरडी कोसळून जे घाट रस्ते दर वर्षी बंद पडतात ते घडणार नाही.
या फ्लायओवरसाठी अधिकचा खर्च हा मुद्दा पुढे केला जाईल परंतू सध्याच्या सरकारी महत्वकांक्षी योजनांसमोर पैसा हा प्रश्न गौण आहे, नगण्य आहे. उलट पक्षी कंत्राटदार अधिकचे काम मिळाले म्हणून खुश होतील.
आपण लोकांच्या सोईसाठी अगदी समुद्रावर कित्येक किलोमीटर लांबीचे पुल बांधतोय, कित्येक किलोमीटर लांबीचे बोगदे खणतोय मग या पृथ्वीच्या फुफुसांसाठी इतकेसे करू शकत नाही? प्रस्तावित रस्त्यांमुळे भविष्यकाळात वन, वन्यजीव, पर्यावरण, निसर्ग यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे पुढील पिढीला निश्चितच पश्चाताप होईल. त्यापेक्षा आज खर्चीक बाजूचा विचार न करता वन हद्दीत जर फ्लायओवर बनविले तर आपण स्वतःला खुप चांगले पर्यावरण प्रेमी शाबित करू शकतो आणि त्याचे मानसिक समाधान पण नक्कीच मिळेल.

कोल्हापूर जिल्ह्यातून कोंकणात जायला आंबा घाट, अनुस्कुरा घाट, भुईबावडा घाट, गगनबावडा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट, तिलारी घाट असे सात घाट रस्ते सध्या पूर्णपणे डांबरीकरण करून तयार आहेत, वापरात आहेत. तर कुंभवडे-खडपडे घाट आणि पारगड घाट हे दोन घाट कच्चे रस्ते तयार आहेत. या नऊ घाटांव्यतिरीक्त शिवडावचा घाड, काजिर्डा घाट तयार होणार आहेत. म्हणजेच फक्त कोल्हापूर जिल्ह्यातूनच कोंकणात जायला जवळपास 11 घाट रस्ते आहेत. जूनही काही घाट विचाराधीन आहेत. हे सर्व घाट फार सुंदर अशा घनदाट सदाहरित आणि नीम सदाहरित जंगलातून जातात. यापैकी पहिल्या सात घाटात नेहमीच अनेक वन्यजीव अपघातात मरतात, जखमी होतात. पावसाळ्यात तर तेथे फारच वाईट अवस्था असते. तसेच ही हत्याकांडे या रस्त्यांवर होतच राहणार आहेत. जे दोन घाट कुंभवडे-खडपडे घाट आणि पारगड घाट अजून कच्चे रस्तेच आहेत व वनविभागच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत तेथे शक्य तिथे आणखी जास्तीत जास्त लांबीचे फ्लायओवर बनविले पाहिजेत. तसा प्रस्ताव वनविभागाने मंजूर करावा. इतर घाटांसारखी परवानगी अजिबात देऊ नये.
भविष्यात जे जे घाट रूंदीकरणात प्रस्तावित आहेत तेथेही फ्लायओवर हाच पर्याय अवलंबित आणावा. त्याशिवाय रूंदीकरणास वनविभागाने परवानगीच देऊ नये.
या दोन्ही घाटात प्रवाशांना अनेकदा वाघाचे दर्शन झाले आहे. अस्वल, रानकुत्री, गवे, सांबर इ अनेक प्राण्यांचा वावर येथे भरपूर आहे. तसेच या पूर्ण झालेल्या घाट रस्त्यातून आडवे जाणारे जे नाले, ओढे आहेत त्यावर जे पुल बांधले आहेत, बहुतांश ठिकाणी तेथे नळ लावण्यात आले आहेत. ही पद्धत जरी कंत्राटदाराच्या फायद्याची असली तरी जलचर वन्यजीवांसाठी फार चुकीची आहे. ये नळे नाले, ओढे यांच्या तळापासून खुप उंचावर घातलेले असतात आणखीन पावसाळ्यात त्यातून पाणी खुप वेगात वहात असते. जे लहान लहान मासे, खेकडे, बेडूक मासे यांना पार करणे अशक्यच असते. त्यामुळे हे जलचर त्यांच्या प्रजनन स्थळापर्यंत पोहचूच शकत नाहीत. परिणामस्वरूप यांची संख्या दिवसेंदिवस खुप कमी होत आहे. काही प्रजातींचे मासे तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच वन हद्दीतील नाले, ओढे इ वर पुल बांधताना या ठिकाणी नळे अजिबात घालू नयेत, जुन्या पद्धतीचेच (आर्क) कमान पद्धतीचेच पुल बाधावेत. तशी तरतूद वनविभागाने त्यांच्या मंजूरी प्रस्तावात करावी.


उत्तर-कर्नाटक, गोवा आणि तिलारी या परिसरात वाघांचे प्रजनन होतयं आणि हे वाघ उत्तरेकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यंत येत असल्याचे अभ्यासातुन सिद्ध झाले आहे. अस्वल, रानकुत्रे, बिबटे देखील असेच स्थलांतर करतात असे आढळून आले आहे. त्यांच्या या स्थलांतरणास हे घाट रस्ते खुप मोठा अडथळा ठरले आहेत. वेळीच योग्य उपाययोजना नाही केली तर हे स्थलांतर बंद होईल. हा आपल्या जैवविविधतेला आणि सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाला धोका आहे. वनविभाग, सामाजिक बांधकाम विभाग व महामार्ग महामंडल व संबंधित सर्व विभागांनी वेळीच या समस्येकडे लक्ष्य घालून योग्य ती तरतूद करावी. तसेच सर्व पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमींनी यासाठी आग्रह धरावा. अनावश्यक रस्त्यांना ठामपणे विरोध करावा. लोक प्रतिनिधिंनी सुद्धा यात विषेश लक्ष्य घालावे. जर यात आपण नाकाम राहिलो तर निसर्गाची पर्यायाने आपली उम्र नक्कीच कमी होईल !!!!






