पांडू नरोटे वयाच्या 35 व्या वर्षी वारला… वारला नाही, मारला गेला खरंतर. तसाच मारला गेला जसं स्टेन स्वामीला मारण्यात आलं होतं. स्टेन स्वामी तरीही खूप जगले होते, पण नरोटे भर तारुण्यात मारण्यात आला. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर भारतीय राजसत्तेनं त्याचा निर्दयीपणे खून केला. खूनाच्या उलट्या करतच मेला तो. तो जेव्हा मेला तेव्हा त्याच्या लघवीतून इतकं रक्त वाहिलं की त्याची लघवीची पिशवी रक्तानेच भरली होती. त्याच्या डोळ्यांतूनही रक्त वाहायचं. तो एका सामान्य भारतीय नागरीकाप्रमाणे जनरल वॉर्डात भारतीय शासकीय संस्थांच्या उपेक्षेनं, उपहासानं, उपद्रवानं मेला.
त्याने अनेक गुन्हे केले होते. त्याचा पहिला गुन्हा होता आदिवासी असण्याचा… दुसरा गुन्हा होता की तो गडचिरोलीचा रहिवाशी होता ज्याला भारत सरकारने नक्षली-माओवादी इलाका म्हणून घोषित केलं होतं… त्याचं गाव अहेरी याच भागात होतं… 8 मार्च 2024 पर्यंत त्याच्याविषयी कोणालाच फारशी माहिती नव्हती. पण त्याआधीच 25 ऑगस्ट 2022 रोजी नागपूरच्या तुरुंग प्रशासनाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्याला ठार केलं होतं. तसंही दिल्लीपासून हजारो किमी दूर असलेल्या मागास भागातील एक नगण्य आदिवासी मेला किंवा मारला गेला म्हणून कोणाला फरक पडत नाही. त्याचा पहिला उल्लेख जी. एन. साईबाबा यांच्या पत्रकार परिषदेत आला होता. साईबाबांनी त्याची गोष्ट सांगितली तेव्हा ऐकणारा प्रत्येकजण हादरला होता. त्यानंतर तो ऐकणाऱ्याच्या मनात रुतून बसला. जीवंत असताना त्याच्याविषयी कोणाला काही माहिती नव्हती, निदान मेल्यानंतर तरी त्याची गोष्ट जगाला कळावी म्हणून कदाचित तो तडफडला असेलच. त्याची गोष्ट या देशातल्या प्रत्येक नागरीकानं ऐकायलाच हवी.

या देशातल्या प्रत्येक नागरीकाने पांडू नारोटची गोष्ट ऐकायलाच हवी…
8 मार्चच्या पत्रकार परिषदेत साईबाबांनी पहिल्यांदाच पांडू नरोटेविषयी सांगितलं. ते म्हणाले, “एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. माझ्यावरच्या खटल्यात एक सहआरोपी असा होता ज्याच्याविषयी मला आधी काहीच माहिती नव्हती. त्यालाही माझी माहिती नसेल. आम्ही एकदुसऱ्याला पाहिलं ते आरोपी म्हणून. आम्हाला एकाच तुरुंगात एकाच खोलीत डांबण्यात आलं तेव्हा. पांडू नरोटेचा तुरुंगात एका साध्या तापामुळे मृत्यू झाला. माझ्या डोळ्यांसमोरच तो मेला. तुरुंगातील अधिकाऱ्यांना मी वारंवार सांगत राहिलो की त्याला दवाखान्यात भरती करा, पण कोणीच ऐकलं नाही. जेव्हा त्याच्या डोळ्यांतून आणि लघवीतून रक्त बाहेर पडू लागलं आणि तो आता वाचणार नाही याची खात्री झाल्यानंतर आणि त्याच्या सोबत्यांनी आरडाओरड केल्यानंतरच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथं तो मेला. पण ती एक राजकीय हत्या होती. तो एखाद्या तापानं आजारी पडून मेलाय असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण शेवटपर्यंत त्याला स्वाईन फ्लू झालाय असा कोणताही टेस्ट रिपोर्ट आम्ही पाहिला नाही. मृत्युनंतरच सांगण्यात आलं की त्याला स्वाईन फ्लू झाला होता म्हणून. पण आम्हाला माहिती नाही की खरंच असं झालंय.”
निकाल ऐकायला नरोटे जीवंत नव्हता…
नरोटे भोळा होता. आपल्यासोबत काय घडतंय, का घडतंय हेच त्याला समजत नव्हतं. त्याला कायदे माहित नव्हते, खटला समजत नव्हता, न्यायालय म्हणजे काय हेही त्याला माहित नव्हतं. आरोपांचीही त्याला माहिती नव्हती. तो या देशातील आदिवासी जमातीतून आला होता. गडचिरोलीच्या बाहेर एखादं जग आहे हेही त्याला माहिती नव्हतं. 2013 साली त्याला त्याच्या दोन सोबत्यांसह गडचिरोलीच्या अहेरी गावातून अटक करण्यात आली. त्याच्यावर दिल्ली विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा, पत्रकार प्रशांत राही, जेएनयूचा माजी विद्यार्थी हेम मिश्रा आणि बाकी जणांसहीत माओवाद्यांशी संबंध ठेवण्यात आल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलं होतं. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं. नागपूर उच्च न्यायालयाने 6 मार्च 2024 रोजी सर्व लोकांना निर्दोष मुक्त केलं. त्यात नरोटेही होता. उच्च न्यायालयाने म्हटलं की, नरोटेच्या विरोधात पोलिसांना असा कोणताही पुरावा सादर करता आला नाही ज्यावरून हे सिद्ध होईल की त्याचे किंवा अन्य आरोपींचे माओवाद्यांशी संबंध होते, त्यांनी बेकायदेशीर गोष्टी केल्या किंवा हिंसाचारात सहभाग घेतला. न्यायालयाने म्हटलं की, सरकारी पक्षाने यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. पण हा निकाल ऐकायला नरोटे जीवंत नव्हता. निकालाच्या दोनेक वर्षांआधीच तो मेला. नरोटेच्या वकीलांचं म्हणणं आहे की त्याच्या मृत्युआधी महिनाभर त्याचा भाऊ अजित त्याला भेटला होता. नरोटे तेव्हा पूर्णपणे बरा होता.

नरोटेला 20 ऑगस्ट 2022 रोजी नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्याची परिस्थिती गंभीर होती. 21 ऑगस्टला अजितला पोलिसांकडून एक पत्र मिळालं ज्यात नरोटेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं म्हटलं होतं. अजित भावाला भेटायला गेला तेव्हा त्याची परिस्थिती फारच खालावली होती. पांडूनं भावाला सांगितलं की तो पाचसहा दिवसांपासून आजारी पडला होता. नरोटेचे वकील सोरटे सांगतात की, त्याआधी वकील सोरटे किंवा नरोटेच्या घरच्यांनी पोलिसांनी किंवा तुरुंग प्रशासनाने त्याच्या आजाराविषयी कोणतीही कल्पना दिली नव्हती.
सोरटेला दुसऱ्या एका कैद्याच्या घरच्यांकडून समजलं की नरोटेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. सोरटे जेव्हा नरोटेला हॉस्पिटलमध्ये भेटले तेव्हा त्यानं सांगितलं की पाचेक दिवसांपासून त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि लघवीतूनही रक्त जात होतं. नरोटेला सामान्य विभागात ठेवण्यात आलं होतं. त्याच्या लघवीची पिशवी रक्ताने भरली होती. पण डॉक्टरांनी सांगितलं की त्याला फ्लू झालाय आणि व्हायरस त्याच्या शरीरात पसरला आहे म्हणून. याच प्रकरणात तुरुंगात असलेल्या प्रशांत राही यांच्या मुलीप्रमाणे नरोटेची मुलगीही त्याची वाट बघत होती. पण तिला प्रशांत राहीच्या मुलीप्रमाणे आपल्या वडिलांना जीवंत बघता आलं नाही. तो कधीच मेला होता. पांडू नरोटेची ही गोष्ट अपूर्ण आहे. तो गेल्यानंतर पेपरमध्ये त्याच्या नावानं एक लहानशी बातमी तेवढी छापून आली होती.
पांडूचा मृत्यू हा माध्यमांसाठी, विचारवंतांसाठी चर्चेचा विषय का होऊ शकला नाही?
पांडू नरोटे कोण होता, कुठे राहत होता, काय करत होता, त्याला काय हवं होतं, तो कसा जगत होता, तो किती शिकला होता की निरक्षर होता, आणि का, त्याचं गावं कसं आहे, त्याचं कुटुंब कसं आहे, त्याचे आई-वडील, भाऊ-बहिण कोण आहेत, काय करतात, त्याची बायको कोण आहे, काय करते, कुठे राहते, कशी जगते, त्याच्या घरचे तो गेल्यानंतर कसे जगत आहेत, त्यांच्यावर काय संकट कोसळलं आहे, भारतीय तपास यंत्रणांनी त्याला, तो निर्दोष असूनही, तुरुंगात का टाकलं, त्याला का मरू दिलं, एवढ्या मोठ्या देशाच्या सत्तेला त्याच्यासारख्या एका माणसापासून नक्की काय धोका होता, आदिवासी जमातीच्या त्या एका भोळ्याभाबड्या तरुणापासून त्यांना कोणतं नुकसान होणार होतं, त्याच्या हत्येसाठी कोण जबाबदार आहेत, त्याच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा मिळेल की नाही, त्याचा मृत्यु जो एक खूनच होता, भारतीय माध्यमांसाठी, इथल्या विचारवंतांसाठी, सामान्य लोकांसाठी चर्चेचा विषय का होऊ शकला नाही?

पांडू नरोटेची गोष्ट, लिहिली जाण्यासाठी एका पत्रकाराची, एका लेखकाची वाट बघत त्याच्यासोबतच मरून गेली. ही गोष्ट भारतीय समाज आणि भारतीय राजसत्तेचं चरित्र दाखवत आहे. ही गोष्ट लिहिण्यातही धोका आहे, सांगण्यातही धोका आहे, ऐकण्यातही धोका आहे, त्यासाठी गडचिरोलीला जावं लागेल, भारतीय तपास यंत्रणांच्या नजरेत संशयीत म्हणून वावरावं लागेल, तुमच्यावरही माओवादी नक्षल-समर्थक असल्याचा ठपका लावला जाईल, तुमच्यामागे तपास यंत्रणा चौकशीचा ससेमीरा लावतील, एटीएस, एनआयए तुम्हाला प्रश्न विचारतील, तुमच्यावर खोटे आरोप ठेऊन तुम्हाला तुरुंगात टाकतील, तुमच्यावरही यूएपीए लावला जाईल, तुम्हालाही पांडू नरोटेप्रमाणे मरू दिलं जाईल, किंवा मग मरेपर्यंत तुम्हाला तुरुंगात सडावं लागेल, नंतर कदाचित कधीतरी तुमची निर्दोष सुटका होईलही, पण तोवर तुमचं जगणं संपलेलं असेल, तुम्हीही संपलेले असाल. काही गोष्टी सांगायला, लिहायला सोप्या नसतात. पांडू नरोटेची गोष्ट अशीच आहे. इथं पांडूची केवळ ऐकलेली गोष्ट सांगितली गेली आहे. पण त्याच्या या गोष्टीमागची कथा लिहिण्यासाठी कोणालातरी हिम्मत करावी लागेल आणि पूर्ण कथा सांगावी लागेल. कदाचित तोही कथा सांगता सांगता एक दंतकथा होऊन जाईल, साईबाबा यांचे वकील, सुरेंद्र गाडलिंग यांच्याप्रमाणे, जे सध्या तुरुंगात आहेत, जगण्या-मरण्याच्या सीमेवर झुलत आहेत, फक्त एवढ्यासाठीच की त्यांनी साईबाबा यांच्या बाजूनं न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पांडू नरोटेची गोष्ट सांगताना, आपण स्वतः एक गोष्ट होऊ शकतो हा धोका लक्षात घेऊनच त्याची गोष्ट सांगता येऊ शकेल. प्रश्न हा आहे की कोण त्याची ही विफळ, अपूर्ण गोष्ट सांगेल?
अनुवाद – प्रतिक पुरी
(साभार – जनचौक)






