कला सगळ्यांना समान संधी देते, पण कला घटकांचा वापर करून प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक करणाऱ्यांना ती उघडही पाडते. चित्रपटकर्त्याचा प्रामाणिकपणा आणि कलेप्रती बांधिलकी प्रत्येक फ्रेममधून झळकत असते. मात्र, अलीकडे एकामागोमाग एक अशापद्धतीने प्रदर्शित होणाऱ्या प्रचारकी स्वरूपाच्या चित्रपटांत पहिल्या फ्रेमपासूनच आशय-विषयाशी असलेला अप्रामाणिकपणा उघड होत जातो. कलेपेक्षाही विशिष्ट पक्ष-संघटनेशी असलेली कर्त्यांची बांधिलकी प्रेक्षकांना खुपत राहते. माध्यम तंत्रावर पूर्ण पकड आणि दिमतीला सारे स्रोत, सोयी-सुविधा असूनही सृजनात उणावलेला चित्रपट प्रेक्षकांच्या नशिबी येतो. “पॉलिटिकल नरेटिव्ह’ सिनेमॅटिक नरेटिव्हला समांतर असल्यानेच वर्तमानातले राजकारण वगळून प्रस्तुत सिनेमाची चर्चा-चिकित्सा संभवत नाही…
भारतीय राष्ट्रवादाला ज्या घटकांनी आकार दिला, त्यामध्ये हिंदी सिनेमांची भूमिका फार मोठी आहे. स्वातंत्र्य चळवळीशी तुलना करावी, एवढे योगदान बॉलिवूडचे आहे. बॉलीवूडची मुळे बहुसांस्कृतिक, बहुआयामी, सेक्युलरिझमची आहेत, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. मात्र अलीकडे प्रोपगंडा म्हणजे प्रचारकी फिल्म्स हा शब्द वारंवार कानावर पडतोय. प्रोपगंडा फिल्म्स म्हणजे प्रचारकी सिनेमा. एखाद्या विशिष्ट विचारसारणीच्या प्रचारासाठी आणि त्यासाठी जनमत तयार करण्यासाठी जो सिनेमा बनवला जातो त्याला प्रपोगंडा फिल्म असं ढोबळ अर्थानं म्हटलं जातं.

हिटलर आणि प्रोपगंडा फिल्म्स
1933 ते 1945 हा नाझी राजवटीचा काल. हिटलरला सिनेमा माध्यम खूप आवडायचं. ते सर्वात प्रभावशाली आहे हे हिटलरनं ओळखलं होतं. उमेदीच्या काळात हिटलर वेगवेगळ्या कॅफेमध्ये प्रक्षोभक भाषण द्यायचा. तेव्हा तिथल्या लोकांची नाटक आणि सिनेमासंदर्भातली क्रेझ त्याच्या लक्षात आली. यातूनच पुढे मग या दोन्ही माध्यमांचा वापर त्यानं आपल्या राजकीय फायद्यासाठी केला. वर्नर क्राऊससारखे कलाकार त्याच्या या मनसुब्यात नेहमी साथ देत राहिले. मग त्यांनी त्या काळातल्या गाजलेल्या नाटककारांच्या नाटकांचा वापर करत आधी रंगमचावरुन आणि नंतर सिनेमातून ज्यू विरोधात रान उभं केलं.
आपल्याकडेही आता प्रोपगंडा फिल्म्सचे पीक निर्माण झालयं. 2019 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उरी, द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर, पॅडमॅन, ‘सुई धागा’, ‘परमाणू’ सारखे चित्रपट आले आणि आता यंदाची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन द काश्मीर फाईल्स, केरळा फाईल्स, व्हॅक्सिन वॉर, ‘बस्तर: एक नक्षल कथा, सावरकर असे चित्रपट येत आहेत ते पाहता अशा प्रचारकी स्वरूपाच्या चित्रपटांवर आसपासच्या राजकीय-सामाजिक-धार्मिक घडामोडींचा परिणाम दिसून येणे अपरिहार्य आहे.
2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर संपूर्ण कलाविश्व ढवळून निघाले. अभिव्यक्तीची गळचेपी सुरू होते, तेव्हा कलामाध्यमे अधिक रसरशीत होतात. कलेचे नाते अवघ्या मानवी मूल्यांशी असते. त्यामुळे हे जग सुंदर करण्याचा प्रयत्न कला करत असतेच. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कलामाध्यमे थेटपणे भूमिका घेताना दिसत आहेत. चित्रपट, नाटक, साहित्य, शॉर्टफिल्म्स अशा अनेक माध्यमांतून ते ठळकपणे जाणवत आहे. कालपर्यंत ज्यांना आवाजच नव्हता, असे अनेकजण आता मुख्य प्रवाहात आलेले आहेत.

निव्वळ प्रचारकी चित्रपटांनी व कलाकारांनी कला भ्रष्ट केली.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयदेव डोळे म्हणतात की, गेल्या नऊ वर्षांत हिंदी चित्रपट उद्योगाचा एक चापलूस, चतुर आणि चंगळवादी उद्योग असा चेहरा बनला. तो चतुर अन चंगळवादी त्यापूर्वीही होता. पण चापलूसी तो करत नसे. करणार तरी कोणाची? ना पंतप्रधान त्यात रस घेत, ना कोणी सत्ताधारी पक्ष. वाजपेयी सरकार असताना भरपूर चित्रपट राष्ट्रवाद, पाकिस्तानविरोध व मुस्लिमांना खलनायक कथानके असणारे आले. पण त्या निर्मितीत चातुर्य असायचे. पंतप्रधानांना व त्यांच्या पक्षाला तसा या उद्योगाचा आधार थेट घ्यावा, असे कधी दिसले नाही. महत्त्वाचे म्हणजे वाजपेयी व त्यांच्या आघाडीतील नेते स्वयंभू आणि कर्तृत्ववान असल्याने त्यांना कोणा चौथऱ्याची गरज भासली नाही. नरेंद्र मोदी मात्र सर्वग्रासी व सर्वंकष नेते निघाले. त्याला अर्थात त्यांची हुकूमशाही वृत्ती, तसेच कटकारस्थानांशिवाय राजकारण यशस्वी होत नसते, याचा पाठ त्यांना देणाऱ्या संघ परिवाराची शिकवण जबाबदार आहे.
‘पॅडमॅन’, ‘सुईधागा’, ‘मिशन मंगल’ असे सरकारी कार्यक्रमांवर चित्रपट काढायला लावणे, प्रचारासाठी हिंदी चित्रपट कलावंतांचा ताफा बाळगणे, कलाकारांना भाजपमध्ये प्रवेश देणे, उमेदवारी देताना त्यांची संख्या वाढवणे, छायाचित्र काढून घेण्यासाठी कलाकारांना आपल्या घरी आमंत्रण देणे, सेन्सॉर बोर्डसह चित्रपट उद्योगाशी संबंधित संस्थांवर दुय्यम दर्जाचे मात्र आपल्याशी इमानदार व्यक्तींची निवड करणे असे कार्यक्रम त्यांनी राबवले. मोदी स्वत: प्रतिमाप्रिय, प्रसिद्धीपिपासू व आत्ममुग्ध. त्यामुळे एकाला सुखावले की आपले भागते हे या बॉलीवूड उद्योगाने जाणले आणि तिथेच बॉलीवूडचा तोल गेला.
सत्ताधाऱ्यांशी अतिलगट नेहमीच भोवते. कलाक्षेत्राला तर फारच! हिटलरच्या जवळ गेलेल्यांची पुढे फार परवड झाली. कम्युनिस्ट राजवटीतही असेच घडत गेले. निव्वळ प्रचारकी चित्रपटांनी व कलाकारांनी कला भ्रष्ट केली. त्यांचा गैरफायदा निव्वळ धंदेवाईक व केवळ कलावादी मंडळींनी घेतला. आपली जबाबदारी झटकण्याचा स्वान्तसुखाय मार्ग त्यांनी ‘तटस्थते’च्या सिद्धान्तामधून पुढे सरकवला. मनोरंजनाला विचार नसतो असे ठरवून त्यांनी कला काबीज केली. लोकही आपली सुटका करवून घ्यायला या प्रकारात सामील झाले.
जयदेव डोळे पुढे असेही म्हणतात की, राज कपूर व दिलीपकुमार यांचे बरेच चित्रपट नेहरू यांचा समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांवर आधारलेले असत. मनोजकुमार उघडपणे गांधी-नेहरू-शास्त्री यांची तरफदारी करत. त्यांचाही राष्ट्रवादच होता, मात्र तो थेट हिंदुत्ववादी नव्हता. सौम्य होता. एकंदर हिंदी चित्रपटसृष्टी उदार, सहिष्णू व समतावादी वातावरण निर्मिण्याचा प्रयत्न करत होती. तीत संघ परिवार कोठेच नव्हता. असेल कसा? ताठर व तटबंद विचार प्रक्रियेतून माणसे घडवणाऱ्या संघटनेला कलेचे वावडे असते. कारण कला स्वातंत्र्याशिवाय जन्मू शकत नाही.
अभिव्यक्तीला जखड बंद विचारधारा नेहमीच अधू करत असते. म्हणून संघात ना कलावंत असतात, ना संघाची एखादी कला ‘शाखा’ असते! हिंदी चित्रपटाच्या उद्योगावर धाडी, खटले, आरोप, संशय, अटक, अफवा असे सारे प्रकार करून पाहिले. बिहार विरुद्ध महाराष्ट्र अशी दोन राज्ये भिडवून पाहिली. पण हाती काय लागले? छळला गेलेला हा चित्रपट उद्योग आता तरी भानावर येईल काय? आपण राष्ट्रवाद, हिंदुत्व, वर्णवर्चस्व यांत फार वाहवत गेलो, असे त्याला जाणवेल काय? साहित्यक्षेत्र कधीचेच सावरले. भारतात कोणताही नामवंत व विचारी साहित्यकार संघाच्या आसपासही फिरकत नाही.
संघाजवळ जाण्याने आपली स्वायत्तता आपण गमावतो अन आपली निर्मिती संघ विद्वेष व घृणा पसरवायला वापरतो, हे त्यांना समजून चुकले आहे. यास्तव या उद्योगातील म्होरक्यांनी आणि कर्तृत्ववानांनी आपला स्वातंत्र्यानंतरचा राजकीय वारसाच पुढे नेत राहिला पाहिजे. तो काँग्रेस अथवा गांधी-नेहरू यांच्याच नावे असावा असे कोणी म्हणणार नाही. संविधानातील मूल्ये प्रत्येक कलाकृतीतून कशी पाझरतील हे समजण्याएवढे कलाभान त्यांना असले म्हणजे पुरेसे आहे.

मोठ्या पडद्यावर राजकीय युद्ध
बॉलीवूड पुन्हा लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय संदेशावर आधारित चित्रपट तयार येत आहे. नक्षलवादावर आधारित ‘बस्तर: एक नक्षल कथा’ चित्रपट 15 मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नक्षलवादी चळवळीत 15,000 नागरिक आणि 74 सुरक्षा कर्मचारी मारले गेल्याचा उल्लेख आहे. या हत्या झाल्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उत्सव साजरा केल्याचेही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते रनदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यांनीच केले आहे. गेल्या वर्षी ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता.
2023 मध्ये ‘द व्हॅक्सिन वॉर’ ही वेब मालिका प्रदर्शित झाली; ज्याचे दिग्दर्शन ‘द काश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले. या वेब मालिकेत कोव्हिड संकट काळात स्वदेशी लस आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांची कहाणी दाखवण्यात आली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. यात गोध्रा कांड आणि 1975 पासून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारचे कार्य, आणीबाणी सारखे विषय दाखवण्यात आले आहेत.






