जगभरात बायका आपल्या आरोग्याची चिंता वाहण्याऐवजी कुटुंबाची काळजी घेण्यात मग्न असतात. यात त्या आपल्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नांकडेही दुर्लक्ष करतात आणि वर्षानुवर्षे त्याचे परिणाम सोसत राहतात. स्त्रियांसाठी यौनिक आणि प्रजनन आरोग्याच्या आजारांवर चर्चा करणं आजही कठीणच आहे.
मासिक पाळीसारखे विषय देखील अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यातच आहेत. अशात योनीविषयी काही बोलणं तर स्त्रियांसाठी अधिकच कठीण गोष्ट होऊन बसते. कोरडी योनी ही अशीच एक समस्या आहे ज्याचा अनेक स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी अनुभव घेतलेला असतो.
हार्मोन्सची उणीव किंवा असंतुलन, स्तनपान किंवा औषधांच्या प्रतिक्रियेमुळे ही समस्या निर्माण होते. मेनोपॉज (मासिक पाळी थांबणे) याचं महत्त्वाचं कारण समजलं जातं.
सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा कधी ना कधीतरी दिसून येतो. महिलांमधील याचं प्रमाण आकड्यांच्या हिशोबात बघायला गेलं तर ते 50 ते 90 टक्क्यांपर्यंत दिसून येतं.
पण या आकड्यांमध्ये अचूकता आढळत नाही. यामागे कोणतं कारण असावं? तर प्रत्येक स्त्री याविषयी उघडपणे बोलतेच असं नाही. बऱ्याचदा स्त्रियांच्या योनीमार्गात कोरडेपणा असल्यामुळे संभोग करताना त्रास होतो. याविषयी त्या डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळतात.
कोरडी योनीचे उपचार हे त्याच्या कारणावर अवलंबून असतात. मेनोपॉजच्या वयात गेल्यानंतर स्त्रियांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. गर्भाशयातील सर्वायकल ग्रंथीमुळे योनीत चिकटपणा तयार होत असतो. योनी साफ आणि ओली ठेवण्यासाठी याची मदत होते.

वैद्यकीय परिभाषेत कोरडी योनी म्हणजे ‘व्हजायनल एट्रोफी’. त्यामुळे योनीतील उती कोरड्या, कमकुवत आणि कठोर होतात. त्यामुळे योनीत खाज सुटणे, सूज चढणे, लघवीच्या वेळी जळजळ होणे, लैंगिक संबंधात वेदना होणे अशा समस्या येतात. कोरडेपणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो.
मुलींना ज्याप्रमाणे आपल्या मासिक पाळीची निट माहिती नसते, तशीच मेनोप़ॉजच्या दरम्यान प्रौढ स्त्रियांनाही यौनिक आजारांची फारशी माहिती नसते. या काळात, 50 ते 59 वयातील 16 टक्के महिलांना लैंगिक संबंधात वेदना होत असतात. 18 ते 50 वयोगटातील 17 टक्के महिलांनाही असाच त्रास होतो.
कोरड्या योनीची कारणे आणि धोका
कोरडी योनी ही हार्मोन्सच्या बदलत्या स्थितीमुळे निर्माण होते. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तसेच स्तनपानामुळेही समस्या वाढते. एंटी-एस्ट्रोजन औषधी तसेच मधुमेही स्त्रियांनाही याचा त्रास होतो. कर्करोगी रुग्णांनाही याचा त्रास होतो. योनीमध्ये मोठ्या प्रमाणावर साबण, जेल, पावडर, स्प्रे यांचा उपयोग केल्यानंही योनी कोरडी होऊ शकते किंवा अन्य आजार होऊ शकतात.
2018 मध्ये ‘द गार्डियन’ मध्ये आलेल्या एका बातमीनुसार योनीच्या भागात जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा उपयोग केल्याने 22 स्त्रियांना ओवरीयन कँसर झाला होता. त्यानंतर या स्त्रियांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने स्त्रियांच्या बाजूने निकाल दिला आणि कंपनीला त्यांना नुकसानभरपाई म्हणून करोडो रुपये द्यावे लागले.
या पावडरमध्ये एस्बेस्टॉस असतो ज्यामुळे हा कँसर झाला होता. भारतात 2012-13 च्या दरम्यान व्हजायनल वॉश किंवा इंटिमेट वॉश यांच्या उत्पादनाच्या मोठमोठ्या जाहिराती येऊ लागल्या. बॉलिवूड तारका या उत्पादनाच्या जाहिराती करत होत्या. त्यांनी सांगितलं की स्त्रियांच्या गुप्तांगांच्या स्वच्छतेसाठी ही उत्पादनं किती आवश्यक आहेत.
‘वेबएमडी’ वर आलेल्या एका लेखानुसार व्हजायनल एरियाचा पीएच 3.8 ते 4.5 या दरम्यान असतो. वाढत्या वयात तो 5 पर्यंत वाढतो. अशात साबण, जेल, पावडर यांच्यामुळे तो अकाली वाढला तर त्यामुळे योनीच्या अनेक समस्या वाढतात.
ही आहेत लक्षणे…
शारीरिक संबंधांदरम्यान योनिमार्गात कोरडेपणा आणि वेदना जाणवणं सामान्य लक्षणं आहेत.90% स्त्रिया जेव्हा वैद्यकीय सल्ला घेतात त्याचवेळी त्या योनीमार्गातील कोरडेपणाविषयी बोलतात. पण शारीरिक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदना लपविल्या जातात.
अनेक स्त्रियांना संभोगादरम्यान अती वेदना होतात पण त्या मदत मागत नाहीत. कारण या विषयावर बोलणं निषिद्ध मानलं गेलंय. शारीरिक संबंधांदरम्यान जर योनीमार्ग कोरडा असेल तर त्या भागात खाज सुटते, चिडचिड होते किंवा रक्तस्त्राव होतो. इतर लक्षणांमध्ये अतिसार, वेदना आणि अपूर्ण लघवी आदी लक्षणं दिसून येतात. शिवाय यामुळे स्त्रियांमधील लैंगिक इच्छा देखील कमी होते.
यामुळे स्त्रियांमध्ये निराशा, चिंता दिसून येते आणि जोडप्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. शारीरिक संबंध ठेवताना मला वेदना होतील या भीतीने स्त्रिया चिंताग्रस्त होतात.

निगा कशी राखायची?
योनी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्याही बाह्य उत्पादनांची गरज नसते. योनीत स्वतःलाच स्वच्छ ठेवण्याची क्षमता व यंत्रणा असते. व्हजायनल एरियामध्ये वरती वल्वा असतो आणि खाली व्हजायना असते. वल्वा म्हणजे योनी झाकणाऱ्या त्वचेच्या पाकळ्या. आंघोळ करताना स्वच्छ पाणी वापरल्यानेही योनी व योनी पाकळ्या साफ होतात.
योनीचा कोरडेपणा रोखण्यासाठी स्वतः काही उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं, योनीची स्वच्छता ठेवणं, त्याच्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करणं व वेळीच डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करणं यामुळे योनीचं आरोग्य निट राहण्यास मदत मिळते.
‘हॉर्वर्ड हेल्थ पब्लिशिंग’ने कोरड्या योनीवर काही घरगुती उपाय सांगितले आहेत. त्यानुसार स्त्रिया योनीच्या अवतीभवती खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल, एलोव्हेरा जेल वापरू शकतात. त्यामुळे कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते. एस्ट्रोजेन क्रिम्सही उपयोगी पडू शकतात.
व्यायामामुळेही मदत होते. केगल एक्झरसायझेस (कंबरेचे विभिन्न व्यायाम) पेल्विक फ्लोर (गर्भाशय, योनी, मूत्राशयाचा परिसर) यांच्या दरम्यान रक्तप्रवाह वाढवतो त्यामुळे योनीत चिकटपणा वाढतो.
काही वेळेस घरगुती उपाय व व्यायामामुळे मदत मिळेलच असं नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला बायकांनी लाजू नये. वरील उपचार करण्याच्या आधीही डॉक्टरांकडे एकदा नक्कीच जाऊन यावे. कोरड्या योनीची समस्या लाजून दूर होणार नाही. त्यावर मोकळी चर्चा आवश्यक आहे.
ही एक गंभीर समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. योग्य माहिती आणि योग्य उपचार वेळीच केल्याने ती दूर होऊ शकते. स्त्रियांना आपल्या आरोग्याच्या समस्यांविषयी नेहमीच सजग राहणं गरजेचं आहे. पितृसत्तेच्या दबावाला बळी न पडता आपल्या आरोग्यासाठी योग्य ते उपचार करून घेणं, त्याविषयी बोलणं हा त्यांचा जैविक आणि घटनात्मक हक्क आहे.
अनुवाद - प्रतिक पुरी






