मुलगा काय करतो या वधूपक्षाच्या प्रश्नावर ‘शेती’ हा शब्द ऐकताच मुलींच्या पालकांचे एकच उत्तर असते…. बघतो, सांगतो..’ शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या सध्या ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत आहे. प्रत्येक गावात लग्न रखडलेल्या 30 ते 40 वयोगटांतील किमान 20-25 तरुण सध्या आहेत. तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात एक अनोखा मोर्चा काढण्यात आला होता.
शेतमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी पुत्रांना लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला भाव द्या, या मागणीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांचे लग्नाळू तरुण विधानभवनावर धडकले होते. त्यांच्या हाती असलेले फलक लक्षवेधी होते. “माझ्या शेताला भाव मिळत नाही, म्हणून मला लग्नासाठी मुली मिळत नाही”, “मला शेतीसाठी.. वीज पंपासाठी वीज मिळत नाही… अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळत नाही… तरीही ताठ मानेनं शेती. पण माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही. पैशा अभावी जगता येत नाही, लग्नाशिवाय मरता येत नाही , काय करू? – एक लग्नाळू शेतकरी ”, असे फलक तरुणांच्या हाती होते.
नोकरी नसलेल्या, शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे. ग्रामीण भागात ‘मुलगी पसंत आहे’ म्हणण्याची वेळ शेतकरी मुलाच्या पित्याला मिळेनासे झाले आहे तर ‘शेतकरी मुलगा नको गं बाई’ अशी मुलगी उघडपणे सांगत आहे. त्यामुळे ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मुलाच्या लग्नासाठी पै-पाहुण्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकरी मुलास मुली मिळेणे कठीण होत असतानाच शेतकरी असलेल्या मुलीच्या पित्याला आपल्या मुलीसाठी नोकरदारचं मुलगा हवा असतो. मुलीसाठी मुलगा शोधताना नोकरी असणाऱ्यांनाच प्राधान्य देतो. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो मुलीचे वडील नोकरदारांना पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा आपल्या मुलाच्या लग्नासाठी वणवण फिरताना आपल्या मुलीसाठी मात्र नोकरदार जावयाचा शोध घेतो.

अतिशय महत्वाच्या अशा या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गंभीर चर्चादेखील घडली होती. शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली न मिळणं याचा दोष छोट्या शहरातल्या, गावातल्या मुलींनाच देण्यात येत असतो आणि नेमक्या या मुद्द्याच्या विरोधातच छोट्या शहरातील काही स्त्रीवादी मुलींनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत.
संस्कृतीचा सगळा भार तिच्यावर टाकणाऱ्या पुरुषांनो जरा बदला…
युवा कवयित्री श्वेता एस. व्ही. यांनी यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. त्या लिहितात की,
गावात चांगली बागायती शेती असलेला शेतकरी नको, अन् शहरातला कमी पगारावर का असेना नोकरी करणारा नोकरदार हवा, ह्यात मुलींकडून शेतीची कामं होत नाहीत, शेफारल्या, आळशी झाल्या असा निष्कर्ष काढून मोकळं होण्याआधी तिला शहरात का जाऊ वाटतं याची कारणं समजून घ्या.
- ज्या मुलींना लग्न करायचं असतं त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्या लग्न झालेल्या बहिणी, मैत्रिणी असतात. आणि आता सोशल मीडियामुळे त्यांचं लग्नानंतरचं आयुष्य ह्या मुली बघू शकतात. त्यांना दिसतं की त्यांची शहरात लग्न झालेली मैत्रिण नवऱ्यासोबत छान जीन्स वगैरे घालून फिरायला जाते, कधीतरी हॉटेल मध्ये जेवायचे फोटो, तिच्या वाढदिवसाचे फोटो फोटो त्या बघतात. त्याउलट गावात अगदी श्रीमंत वगैरे घरात लग्न करून गेलेल्या मुलींचे फोटो असतात, सतत कुठल्यातरी लग्नात, पूजेत दागिने, साडी घालून काढलेले वगैरे एवढेच फोटो दिसत राहतात.
- तिची एखादी मैत्रिण एकत्र कुटुंबात असते. एकत्र कुटुंब असेल तर या आधी घरात कुणाचाच वाढदिवस साजरा झाला नाही, फक्त लहान मुलांचे वाढदिवस साजरे करतात गावात वगैरे म्हणून साधा केक आणायचा नाही (अन् त्याचवेळी तिच्या दुसऱ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिच्या नवऱ्याने केलेलं decoration, केक, गिफ्ट हे सगळं तिने व्हॉट्स अप स्टेटस ला पाहिलेलं असतं..) ही यादी वाढतच जाते.
- त्या दोघांना स्वतंत्र वेळ घालवता यावा अशी व्यवस्था असते का? एकत्र फिरायला जाणं वगैरे तर विषयच नाही. गावातलं शेतकरी जोडपं असच काही कारण नसतांना कुठेतरी भटकायला निघालय हे घडण्याचं प्रमाण किती?
- सणवार, यात्रा जत्रा, लग्न मरण धरण सगळी जबाबदारी गावाकडे राहणाऱ्या जोडप्यावर. त्याचाच एखादा भाऊ शहरात राहत असेल तर तो अन् त्याची फॅमिली आली की त्यांची वरवर करावी लागते. अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात.
- छोट्या छोट्या प्रश्नावर कुणीही लुडबुड करतं. साधं रात्री झोपताना गाऊन घालायचा की नाही यावर चर्चा सत्र भरतं.
- सासरे, जेठ ओट्यावर बसलेले असताना ओट्यावर बसू नये, दुपारचं घरी कुणी नसलं तरी हॉल मधे झोपू नये (अचानक कुणी आलं तर!) अशा बालिश गोष्टी अजूनही नीट पाळाव्यात अशा अपेक्षा
- गावाकडे अचानक कुणीही घरी येतं. घरी जास्त शेती, मोठा परिवार असेल ना मग तर येणाऱ्या जाणाऱ्यांची नेहमी सरबराई करावी लागते. समाजात कुणाचं लग्न, कुणाचं मरण, कुणाची सोयरिक जोडायची तर येणाऱ्या पाहुण्यांचा डेरा आधी यांच्याकडे पडणार. आपलं खानदान नावजलेलं, सगळे आपल्याकडेच येतात ह्या सगळ्याचं घरातल्या पुरूषांना कोण कौतुक असतं. आज रात्री 10 लोक जेवायला असतील ही ऑर्डर किती सहज दिली जाते अशावेळी. मग कितीही थकलेली असली, आजारी असली तरी तिला ह्या येणाऱ्या पाहुण्यांचा मानपान निभावून न्यावा लागतो. (बाहेरून कुठून जेवण आणून घेऊ वगैरे व्यवस्था नसते) कारण इज्जतीचा हा डौल सांभाळायची जाबाबदारी ह्या व्यवस्थेने तिच्यावर टाकलेली असते.
- ती शहरात जाऊन खुप मोठं करियर करेलच असं काही तिलाही माहीत नसतं. पण निदान तिला कधीतरी घराबाहेर पडून चार पैसे कमावता येतील ही शक्यता दिसत असले, हवे ते कपडे घालण्याचं, कुणालाही न घाबरता चार चौघात त्याचा हात हातात घेण्याचं , स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बाहेर जाऊन खाण्याचं स्वातंत्र्य असतं.
- गावात राहतो म्हणुन असं असं वागवंच लागेल असं सांगून जुन्या नव्या सगळ्या परंपरा पार पाडायची जबाबदारी पुरुष तिच्यावर ढकलून मोकळे होतात. तिने घरात पदर घेऊन रहावं म्हणणारे पुरुष स्वतः मात्र बर्मुडा शॉर्ट्स वर शेती करतांना दिसतात. संस्कृती रक्षण तिनेच कुठवर करायचं? गावपण जपायची जबाबदारी तुमची आहे की नाही थोडीफार?
- तुम्ही गावं बदलावा… द्या तिला संधी अन् मोकळेपणा…संस्कृतीचा सगळा भार तिच्यावर टाकून उंडारत फिरणाऱ्या पुरुषांनी जरा बदला…
मुली खूप शिकल्या अन् शिकलेली मुलं बघून शहरात उडून गेल्या…
हर्षाली घुले या आयआयटी मुंबई येथे पीएचडी करत आहेत. मध्यंतरी त्यांनी नेमक्या याच विषयावर विस्तृत लिखाण केले होते. त्या लिहितात की, चांदवड. नाशिक जिल्ह्यातील सामान्य तालुका. तसा दुष्काळीच. पण तरीही कांद्याच्या उत्पन्नात आघाडीवर.पण या तालुक्यात प्रत्येक गावात भेडसावणारी समस्या काही वेगळीच. आणि समस्येच्या खोलात शिरावं तर अनेक प्रश्न आणि वाढत जाणारी वास्तवाची दाहकता अगदी दुष्काळाप्रमाणेच. चांदवडच्या गावागावात आज तिशीला टेकलेले, तिशी ओलांडलेले तरुण बघायला मिळतात, जे किमान 3-4 वर्षांपासून मुलगी शोधत आहेत.
लग्न करायचं ठरवल्यानंतर जवळपास 4-5 वर्षे तरी मुलीचा शोध घ्यावा लागतो, तरी मुलगी काही मिळत नाही. हवे तर घरातून पैसे देतो, तुम्ही फक्त मुलगी द्या अन् तुमच्या दारासमोर मांडव टाका, असे संवाद येथे कानी पडतात. आज मुलगी उचलून आणण्याची पद्धतही रुजून 4-5 वर्षे झाली. कित्येक जणांच्या लग्नात जेवणावळी, मांडव, बस्ता, बँड इतकंच काय तर पुजार्याची देणगीसुद्धा मुलाकडच्या मंडळींनी दिली. पण आता पैसे देऊन, लग्नाचा खर्च करूनही मुलीच मिळत नाहीत. आणि याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणेही आहेत.
समस्येचे मूळ जाणवते ते इथल्या संघर्षात. कायम दुष्काळी तालुका. पिण्यापुरते पाणी. एक हंगामी उत्पन्न. 4 महिने खूप कष्ट आणि उरलेले 8 महिने त्यावर उपजीविका. म्हणून आपल्या पुढच्या पिढीचे दिवस सुखात जावे, त्यांनी सुखानं आयुष्य जगावं, यासाठी शेतकर्यांनी, मजुरांनी दुष्काळातही मुलं शिकवली. आजही शिकवत आहेत. पण या संधीचा अधिक फायदा मुलींनी उचलला. मुली खूप शिकल्या. ज्या घरात मुलगा बारावी किंवा बीए, आयटीआय, त्या घरात मुलगी एमए, बीएड, डीएड, पोलिस, बीएस्सी झाली.
मग या सगळ्या चिमण्या शिकलेली मुलं बघून शहरात उडून गेल्या. आता मुलांना मुली कशा मिळणार? त्यात ज्या मुली कमी शिकल्या, त्याही दुष्काळी तालुका, उत्पन्न कमी, आणि ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ या मानसिकतेत. मग चांगला शेतकरी पाहिजे म्हणून शेजारच्या संपन्न तालुक्यातील तालेवार शेतकरी मुलींच्या वडिलांना खुणावू लागले. आज इथे कित्येक मुलींचे वडील आपल्या तालुक्यातलं स्थळ नको, निफाड-दिंडोरी भागातच मुलगी देऊ, असं सांगताना दिसतात.

या भीषण समस्येचा उपाय शोधण्याचा कुणीच प्रयत्न करतानाही दिसत नाही. काही मुलं औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर जातात व नोकरीला असल्याचं भासवून लग्न करतात. कित्येक मुलींची तर फसवणूकसुद्धा झाली आहे. 5-6 हजार रुपये कमावणारी ही मुले शेतीला-निसर्गाला आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुष्याची माती झाली या शेतीपायी, आता शहरात मिळेल ते काम करू, अशी धारणा तयार होते आहे. सोयरीक जमवताना शेतीचे उतारे मुलींच्या वडिलांकडून तपासले जातात आणि खात्री करून घेतली जाते. या पडताळणीची मुलांना आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना सवय झाली आहे. त्यातच मोठ्या सुनेला बिनलग्नाची बहीण असेल तर शोधण्याचा त्रास वाचावा म्हणून व्याहीमंडळींवर वा सुनेवर दडपण आणण्याचा एक दुसरा प्रकार घडतो.
जोपर्यंत व्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत खुशाल नाही म्हणावं मुलींनी…
पत्रकार प्राजक्ता जोशी लिहितात की, नाती जपण्याची, गावाकडचा ओलावा जपण्याची, समाजव्यावस्था जपण्याची जबाबदारी फक्त बायकांवरच? आणि अनेक महाशयांच्या मते त्यासाठी त्यांनी गावातल्या मुलांशी लग्न केलंच पाहिजे, घर, शेती सांभाळलीच पाहिजे. मग अशा वेळी मुलांना नाही म्हणणाऱ्या मुलींविषयी त्या व्हिलन असल्यासारखं लिहिलं जातं.
लहानपणापासून मी मुलींना कसं गावाकडे राहून शेती, बागायती सांभाळणारी मुलं आता लग्नासाठी नको आहेत, हे ऐकत आलेय. गावाकडची मुलं लाखो रुपये कमवत असतील, पण या ‘आजकालच्या मुलींना’ शहरात राहणारी, महिना 10,000 कमावणारी, छोट्याशा भाड्याच्या घरात राहणारी, नोकरी करणारी मुलंच कशी पाहिजे असतात, हे काही आता नव्यानं बोललं जात नाहीये, अनेक वर्षांपासून तोच पट्टा सुरु आहे, आणि अजूनही लोक, भले-भले, जाणते मानणारे लोकसुद्धा आज पुन्हा तेच बोलतायत.
मुलींना गावाकडे का नाही राहायचंय? जर गावाकडे खरंच जास्त पैसा, जास्त चांगलं घरदार असेल, तर मुली का शहरातल्या, आपापलं राहणाऱ्या मुलांशी लग्न करू पाहतात? प्रश्न इतका कठीण नाहीये. गावात, मोठ्या कुटुंबात, राहणं म्हणजे मुलींवर काय काय बंधनं लादली जातात, हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. काही अपवाद वगळता बहुतांश मुलींची गोष्ट एकसारखीच असते.
मग आता मुली म्हणत असतील, की आम्हाला स्वयंपाकघरात बंदिस्त होऊन नाही जगायचं, किंवा आम्हाला शेतावर काम नाही करायचं, आम्हाला मोठ्या कुटुंबात दररोज सगळ्यांची काळजी घेत नाही राहायचं, तर त्याच्याकडे फक्त ‘मुलींचे नखरे कसे वाढलेत’, ‘मुलींना अजिबात कष्ट नको आहेत’, याच अँगलनं बघता येऊ शकतं का? कपड्यांपासून, चालणं-बोलणं, काम करणं, ते अगदी दिवसातून किती आराम मिळेल, यातल्या प्रत्येक गोष्टीवर जर गावाकडे बंधनं येणार असतील, तर का वाटू नये मुलींना की नाही राहायचं गावात?
बरं आणि या लग्नाळू मुलांच्या नखऱ्यांचं काय? गोरीचं मुलगी पाहिजे, बारीक पाहिजे, तिला स्वयंपाक आला पाहिजे, मोठ्यांसमोर साडी नेसलीच पाहिजे, सगळ्यांचं सगळं निमूट ऐकून घेणारी पाहिजे, हे सगळे नखरेच नाहीत का? आणि या क्रायटेरियामध्ये न बसणाऱ्या मुलींना, म्हणजे काळ्यासावल्या मुली असतील, जाड मुली असतील, अशा मुलींना लग्नासाठी मुलं न मिळणं, हे अशा क्षुल्लक कारणांसाठी वर्षानुवर्षं सहन करावं लागतंय, त्याचं काय?
कदाचित काही मुलींचे नखरे असतीलही, चला मान्य करूया. पण मुलींना असणारी स्वातंत्र्याची ओढ, आणि त्यासाठी शहरात, कुटुंबापासून दूर राहण्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पर्यायाचा अभाव, हे सगळं खोटं आहे का? आणि शहरात राहणं म्हणजे मुलींना स्वतःचं करियर आणि स्वतःच्या पॅशनचासुद्धा विचार करता येतो, जे अनेक जणींना गावातल्या बंधनांमध्ये शक्य नसतं, त्याचं काय? त्यामुळं गावाकडच्या मुलांनी मुली लग्न करत नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा ज्या व्यवस्थेमुळं मुलींना लग्न करून गावात, मोठ्या कुटुंबात राहावंसं वाटत नाही, त्या व्यवस्थेशी फारकत घ्यावी आणि त्यात बदल करावे. मुली शेतकरी असतात, मुली कष्टकरी असतात.
सर्वच मुलींचा काही कष्टांना नकार नसतो. आणि ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न काही मुली करतातही आहेत. पण स्वातंत्र्याची किंमत जर गावाबाहेर पडणं असेल, तर जोपर्यंत ही व्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत खुशाल नाही म्हणावं मुलींनी वाट्टेल तेवढ्या गावाकडच्या मुलांना…






