दुसऱ्या महायुद्धाची ही गोष्ट… एकदा व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या आधी, दिल्लीतील ब्रिटीश अधिकाऱ्यांकडे निजामाची एक तार गेली. त्यात लिहिलं होतं, दुसरं विश्वयुद्ध सुरू आहे. बाजारात महागाई वाढली आहे. अशा कठीण काळातही व्हॉईसरॉय यांना शँपेन प्यायला आवडेल का? निजामाचे असे अनेक किस्से आहेत. काही त्याच्या अपार संपत्तीचे तर काही कंजूशीचे.
त्यातील एक किस्सा मोठा प्रसिद्ध आहे. ज्यामुळे भारतातच नव्हे तर ब्रिटनमध्येही खळबळ माजली होती. हे होतं एक सेक्स स्कँडल... हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशानं एका इंग्रज बाईशी लग्न केलं. त्यातून असा विवाद झाला की प्रकरण न्यायालयात पोहोचलं, सुनावणी सुरू झाली आणि त्याच्या बातम्या राणी व्हिक्टोरियापर्यंतही पोहोचत होत्या.
(एलन डोनेली)
काय होती कहाणी?
1892 साली या गोष्टीची सुरूवात होते. काँग्रेसची स्थापना होऊन 7 वर्षे उलटली होती. याच काळात एका वृत्तपत्रात एक पत्रक आलं. ज्यानं देशात गदारोळ उठला. यात एक ‘मिसेस मेहदी खान’ नामक बाईचा उल्लेख होता. तिच्यावर तीन आरोप होते. ती लग्नाआधी वेश्या होती. लग्न न करताच ती मिसेस खान झाली आणि तिचा नवरा आपली कामं करण्यासाठी तिला दुसऱ्या लोकांकडे पाठवायचा.
एका बाईच्या चारित्र्यावर यातून जाहिरपणे आरोप करण्यात आले होते. ती कोणी साधी बाई नव्हती. तिचा राजदरबाराशी संबंध होता. हैदराबाद तेव्हा भारतातील सर्वांत श्रीमंत संस्थान होतं. महबूब अली खान इथला निजाम होता. मिसेस मेहदीचा नवरा मेहदी हसन खान हा निजामाच्या दरबारात होम सेक्रेटरी आणि हैदराबाद उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशही होता. त्याच्या बायकोवर हे आरोप होते. चर्चा होणारच होती... झाली देखील! त्याला स्कँडल म्हटलं जाऊ लागलं. लंडनपर्यंत गोष्टी गेल्या. कारण मेहदी हसन खान हा राणी व्हिक्टोरियाचा पाहुणा राहिला होता.
उटाह विश्वविद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक, बेन्जामिन कोहेन यांनी यावर एक पुस्तक लिहिलं – अपील टू द लेडीज ऑफ हैदराबादः स्कँडल इन द राज. यात ते म्हणतात की हे ब्रिटीश राजमधील सर्वांत मोठं सेक्सस्कँडल होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत याच्या बातम्या यायच्या. जॉन सीमोर नावाचे ब्रिटीश संसद सदस्य यात खास रस घेत होते. मिसेस मेहदी यांचं खरं नाव होतं, एलन डोनेली. ती ब्रिटीश नागरिक होती.

(महबूब अली खान)
1872 मध्ये दोघांची ओळख लखनऊला झाली आणि वर्षभरानंतर त्यांनी लग्न केलं. मेहदी तेव्हा सर सय्यद अहमद खान यांच्याकडे कामाला होते. जेव्हा हैदराबादचे प्रधानमंत्री, सर सालारजंग सय्यद यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी मेहदीची खूप प्रशंसा केली. सालारजंग यांनी मेहदीला हैदराबादला नेण्याचा निर्णय घेतला. मेहदीला राजदरबारात नोकरी मिळाली. लवकरच तो यशाच्या पायऱ्या चढू लागला.
निजाम त्याच्या कामानं इतका प्रभावित झाला की त्यानं मेहदीला होम सेक्रेटरी बनवलं. त्यानंतर मेहदी उच्चकुलीन झाला. राणी व्हिक्टोरीयालाही तो जाऊन भेटला. 1892 पर्यंत सगळं चांगलं सुरू होतं. मग सुरू झालं एक षडयंत्र. ज्याची दोघांनाही खबर नव्हती. काही लोक मेहदीच्या यशावर नाराज होऊन जळत होते. त्यांनी मेहदीवर वार करण्यासाठी एलनचा उपयोग केला.
पत्रकात असं काय लिहिलं होत?
त्या काळी भारतीय आणि इंग्रज यांच्यातील लग्न असामान्य गोष्ट होती. एलन लग्नानंतर मुसलमान झाली आणि परदा करू लागली. पण हैदराबादला गेल्यावर तिनं परदा काढला. तिथल्या ब्रिटीश बायकांसोबत ती राहू लागली. विदेश दौऱ्यातही ती मेहदीसोबत गेली होती. यामुळे कट्टरवाद्यांना तिचा राग येत होता.
मेहदी आणि एलन यांना याचं काही वाटत नसलं तरी लोकांना या गोष्टी खूपत होत्या. पण मेहदी आता हैदराबादचे नामीगिरामी असामी होते. त्यांच्याविरोधात थेट काही बोलणं शक्यच नव्हतं. म्हणून बेनामी पत्रकाचा आधार घेतला गेला. त्यात एलनविरोधात अनेक नको त्या गोष्टी लिहिण्यात आल्या. मेहदीची बदनामी आणि निजामाच्या नजरेत त्याला पाडण्यासाठीच हे करण्यात आलं हे उघड होतं.

(मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी)
इंग्रजी भाषेतील हे पत्रक आधी 300 कुटुंबांना वाटण्यात आलं. त्याच्या आठ पानांमध्ये मेहदीवर आरोप लावण्यात आले की पदं मिळवण्यासाठी त्यानं एलनला दुसऱ्या लोकांकडे पाठवलं होतं. मेहदीला हे पत्रक मिळालं तेव्हा त्यानं तपास सुरू केला पण काही फायदा झाला नाही. पत्रक बेनामी होतं. म्हणून मेहदीनं प्रिटिंग प्रेसचा मालक एस. एम. मित्रा याच्यावर खटला केला.
तेव्हाच्या ब्रिटीश रेसिडेन्सी कोर्टात खटला सुरू झाला. मेहदीची अपेक्षा होती की एलन इंग्रज असल्यानं त्यांना ब्रिटीशांची सहानुभूती मिळेल. खटल्यासाठी दोन्ही पक्षांनी महागडे इंग्रज वकील लावले. पण वकीलांनी केसचा निकाल लावण्याऐवजी पैसे कमावण्याची तयारी सुरू केली. बेंजामिन कोहेन आपल्या पुस्तकात लिहितात की दोन्ही पक्षांनी खोटे साक्षीदार उभे केले. जे पकडल्या गेले.
खटल्याची इतकी चर्चा का झाली?
केस 9 महिने चालली. यावर हैदराबाद सरकार, ब्रिटनचं सरकार आणि ब्रिटीश-इंडियाचं सरकार सर्वांची नजर होती. शेवटी निकाल आला तेव्हा कोर्टाने मित्राला निर्दोष सोडलं. त्यानं पत्रक छापलंय हे देखील न्यायालयानं मान्य केलं नाही. केसच्या दरम्यान एलनवर लावलेल्या आरोपांवरही चर्चा झाली. पण त्याविषयी कोर्टाने निकालात काहीच म्हटलं नाही.
मेहदी केस हरला. त्याची इतकी बदनामी झाली की त्याला नोकरीवरून काढण्यात आलं. तो बायकोसोबत पुन्हा लखनऊला गेला. पण तिथेही त्याला नोकरी मिळाली नाही. ब्रिटीश सरकारनेही त्याला सहानुभूती दाखवली नाही. त्याला पेंशनही मिळाली नाही. गरीबीत दिवस काढत, हैदराबादचा हा होम सेक्रेटरी 52 व्या वर्षी वारला. एलनला त्याच्याकडून काहीच मिळालं नाही. तिनं काही वर्षं कसेतरी काढले. म्हातारपणी जेव्हा कोणीच मदत करत नव्हतं

(मेहदी हसनने रेसिडेन्सी कोर्टात पत्रक प्रकाशकाविरुद्ध खटला दाखल केला)
तेव्हा ती पुन्हा हैदराबादला गेली. निजामाला तिनं विनंती केली. त्यानं दया येऊन तिला काही पेंशन सुरू केली. पण लवकरच एलनचा प्लेगमध्ये मृत्यू झाला. एलन आणि मेहदीची ही गोष्ट काही वर्ष चर्चेत राहिली. याच काळात काँग्रेसचा उदय झाला. पुढे महात्मा गांधी भारतात आले आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांत मुख्य जागा घेतली. निजाम किंवा संस्थानांच्या गोष्टीत कोणाला रस उरला नाही. हैदराबादचं हे तथाकथित स्कँडल लोकांच्या विस्मृतीत गेलं.
(सौजन्य - लल्लनटॉप)
अनुवाद - प्रतिक पुरी






