मुस्लिम व्यक्तीने त्याचा धर्म सोडल्यानंतर किंवा ती व्यक्ती नास्तिक झाल्यानंतर त्याच्यावर शरिया कायदा लागू असावा की नाही? आता या मोठ्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रश्न असा आहे की 1937 च्या शरियत कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीने धर्म सोडल्यानंतर त्याला शरियत कायद्याचे नियम चालू राहणार की त्यांना भारताचा धर्मनिरपेक्ष कायदा लागू होईल? विशेषतः मालमत्तेच्या संबंधात…
हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे केरळच्या एका महिलने केलेल्या याचिकेमुळे. केरळमधील एका महिलेने दाखल केलेल्या रिट याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. केरळमधील अलप्पुझा येथे राहणारी आणि ‘एक्स-मुस्लिम्स ऑफ केरल’ या संघटनेची महासचिव साफिया पी.एम. हिने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साफिया पीएम यांनी ही याचिका दाखल केली आहे. सफिया यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की, ज्यांनी इस्लाम धर्म सोडला आहे आणि ज्यांनी शरियतऐवजी भारताच्या धर्मनिरपेक्ष कायद्याखाली येऊ इच्छित आहे, त्यांना परवानगी द्यावी. म्हणजेच, मालमत्ता आणि इच्छापत्राच्या बाबतीत, ते भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 अंतर्गत समाविष्ट केले जावे.

हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ॲटर्नी जनरल यांना सर्वोच्च न्यायालयाला मदत करणारा कायदेशीर अधिकारी नेमण्यास सांगितले. याआधी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांवर सुनावणीस नकार दिला होता. न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी असे सांगितले होते की जोपर्यंत मुस्लीम धर्म सोडलेला व्यक्ती ‘मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत) ऍप्लिकेशन ऍक्ट, 1937 च्या कलम 3 अंतर्गत स्वतः घोषणा करत नाही, तोपर्यंत हा कायदा लागू होईल. दत्तक घेतानाही शरिया लागू होईल. कोणतीही घोषणा न केल्यास वैयक्तिक कायद्यानुसारच गोष्टींचा निर्णय घेतला जाईल. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचाही या खंडपीठात समावेश होता.
साफिया म्हणते की, मी इस्लाम धर्म सोडला आहे. कारण या धर्माचे नियम आणि चालीरिती महिलांच्या विरोधात आहेत. आता मी इस्लाम धर्माचा त्याग जरी केला असला तरी मला माझ्याच संपत्तीचा अधिकार मिळण्यासाठी हा धर्म आडवा येत आहे आणि म्हणूनच त्यावर तोडगा निघणे अत्यावश्यक आहे.
मुस्लिमांमध्ये शरियत कायदा 1937 अंतर्गत संपत्तीचा वाद निकाली काढला जातो. त्यानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती मुलगा, मुलगी, पत्नी व आई-वडिलांना विभागून दिली जाते. कायद्यानुसार मुलीला एक तृतियांश संपत्तीचा अधिकार मिळतो आणि जर ती एकुलती एक मुलगी असेल तर तिला संपत्तीमध्ये निम्मा वाटा मिळतो आणि निम्मा वाटा त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिला जातो. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला संपत्तीचा 6 वा भाग दिला जातो. त्याचबरोबर पालकांसाठीही एक ठराविक वाटा निश्चित करण्यात आला आहे.
साफिया फक्त कागदावर मुस्लिम आहे. तिचे वडीलदेखील नास्तिक होते. ती सांगते की, माझ्या आईचा धर्मावर विश्वास होता परंतू माझ्यावर कोणत्याही धर्माचे पालन करण्यासाठी कधीच दबाव आला नाही. माझा मार्ग निवडण्याची मला कुटुंबाकडून पूर्ण मुभा होती.

काय आहे एक्स मुस्लिम चळवळ?
केरळमध्ये इस्लाम सोडण्याची एक योजना सुरू आहे. इस्लाम धर्म सोडणाऱ्यांचा एक वेगळा समुह तयार करण्यात आला असून याला ‘एक्स मुस्लिम ऑफ केरळ’ असे नाव दिले जात आहे. इस्लाम धर्म सोडू इच्छीत असलेल्यांसाठी मदत करणे हे या समुहाचे उद्दीष्ट्य आहे. संघटनेने दर वर्षी 9 जानेवारी हा एक्स मुस्लीम दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
एक्स मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष लियाक्कथली सी एम म्हणतात की, “अशाप्रकारे मुस्लीम धर्म सोडणाऱ्यांची संघटना होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अशा संघटना तयार झालेल्या नाहीत. सुरुवातीला आम्ही 300 अशा मुस्लीमांची ओळख पटविली की, ज्यांनी इस्लाम धर्म सोडला आहे. ही संघटना इस्लाम सोडणाऱ्यांना नैतिक समर्थन देतो. मात्र, इथे कुणीही मुस्लीम नाही. मुस्लीम धर्मातील त्रुटी ओळखून त्यांनी धर्म सोडला आहे. मात्र, ही बाब समाजाला घाबरून ते उघडपणे मांडू शकत नाहीत. सार्वजनिक जीवनात मुस्लीम असल्यासारखेच वावरावे लागते. मुस्लीम धर्म सोडल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकल्या जाण्याची भीती आहे. कुटूंबातील व्यक्तीही त्यांच्या बाजूने उभ्या राहत नाहीत. ज्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतो, अशांना आम्ही धीर देतो. तसेच स्वतःहून धर्म सोडू इच्छीत आहेत, त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देतो. धर्म सोडणाऱ्या मुस्लीमांना मानवाधिकार आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढता यावी म्हणून आम्ही आहोत. आम्ही धार्मिक परंपरा आणि प्रथांच्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात न्यायालयात जाण्याचाही विचार करत आहोत






