पुनर्वापर हा शब्द जितका सरळ सोपा वाटतो तेवढा हलका नाही, याचे महत्त्व आता जगाला कळत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातल्य द्विपक्षीय महत्त्वाच्या चर्चेतही हा मुद्दा आला. यावरून या पुनर्वापराचा विषय किती महत्त्वाचा आहे, भविष्यातली ती एक मोठी व्यवस्था असेल हे आता अधोरेखित होत आहे. हे अधोरेखित करत असताना अमेरिकेने हेही मान्य केलं की जगात भारत हा असा एक देश आहे ज्याला अनादी काळापासून अनेक गोष्टींचा पुनर्वापर करण्याचे तंत्र माहित आहे. त्याचं महत्त्व माहीत आहे आणि म्हणून जगातल्या विशेषत: मोठ्या लोकसंख्येच्या देशांनी पुनर्वापर हे तंत्र खूणगाठ बांधून पाळायला हवं. भविष्यात अनेक वस्तूंचा, गोष्टींचा शास्त्रशुद्धरित्या पुनर्वापर झाला तर वाढत्या जगाला त्याचा फार मोठा फायदा होईल, ही चर्चा आता 21व्या शतकात मूळ धरू लागली आहे. भारत या चर्चेत सर्वोत्तम स्थानात असेल, असं म्हणत असताना भारतातच काही गोष्टींच्या बाबतीत मात्र जगानं दुषणे दिलेली आहेत, हे विसरता कामा नये.

विशेषतः अन्नपदार्थांच्या बाबतीत इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश जो गरिबीतून विकसनशीलतेकडे आणि विकसनशीलते कडून विकसित देशांच्या स्पर्धेत धावतो आहे. त्या देशात अन्नाची नासाडी आणि तिचं प्रमाण, तिची पद्धत पाहिली तर मात्र पुनर्वापर म्हणजे काय रे भाऊ, असं म्हणावं लागेल. की ज्या देशात अनेक वर्ष भूक बळी गेले, आजही आदिवासी वाड्यावस्त्यांवर दर दिवशी कुपोषणामुळे मरणार्यांची संख्या मोठी आहे. आदिवासी विद्यार्थी वाड्यापाड्यावरील कमी वजनाची मुलं यांचं होणारे कुपोषण आणि त्यावरून येणारा मृत्यू, सोबतच योग्य आहार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पावणार्या माता यांचे प्रमाण पाहिलं तर एकट्या मुंबईत दर दिवशी जितक्या अन्नाची नासाडी होते, तेवढ्या अन्नावरती एक जिल्हा दररोज ताव मारून जेवू शकतो. हे प्रमाण माणूस म्हणून मन खिन्न करणारं आणि दुःखद वेदनादायक आहे.
देश स्वतंत्र्याच्या वेळात नांगराचे फाल बनवण्यासाठी लोखंडाची गरज होती. कारण या देशात नांगराचे फाल बनतील एवढेही लोखंड नव्हतं. अखेर जाणता राजा छत्रपती शाहू महाराजांनी किल्ल्यांवरच्या तोफा गोळा केल्या आणि त्या सरकारला दिल्या. आणि सांगितलं याचे नांगर बनवा. किर्लोस्कर कंपनीत पहिले नांगर बनले. ज्या देशांमध्ये गुंजभर लोखंड तयार होत नव्हतं त्या देशात आज इस्पातचे शेकडो कारखाने उभे आहेत. या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात भगारांमधून धातूच्या पुनर्वापरातून जर धातू मिळाला तर ते सोन्याहून पिवळं होईल.
पुनर्वापर ही जर एक इंडस्ट्रीज म्हणून तिच्याकडे पाहिलं तर सर्वात मोठा उत्पन्नाचा टक्का देणारा पुनर्वापरचा घटक म्हणजे कचरा. खरंतर कचरा हे सर्वोत्तम सोनं आहे. ते विपुल प्रमाणात आहे. भारतात कचर्याला तोड नाही. काही इलाज नाही भारतीय माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावरती कचरा निर्माण करतो आणि तो बेमालूमपणे स्वतःच्या घराच्या बाहेर टाकतो. जी जगभरातल्या इतर राष्ट्रांमध्ये कचर्याच्या बाबतीतला समजूतदारपणा आहे, जी जबाबदारी आहे, जी सार्वजनिक जबाबदारीचा घटक आहे, ती कचर्याच्या विल्हेवाटीची संस्कृती आजही भारतात नाही. 300 वर्षांपूर्वी युरोपियन देश विशेषत: सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पुढे गेले आणि म्हणून आज जेव्हा भारतातला माणूस भारताबाहेर जातो तेव्हा तिथले स्वच्छ रस्ते, स्वच्छ चौक आणि स्वच्छ गाव, राष्ट्र बघून हैराण होतात. कारण त्यांच्यावरती हे गर्भसंस्कार जवळजवळ तीन-चारशे वर्षांपासूनचेच आहेत. की जेव्हा नुकतंच जग आधुनिकतेकडे सरकत होतं त्याच काळात त्यांनी कचरा ही स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे, हे बिंबवलं होतं. आजही कचर्याचा पुनर्वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसा खत देईल. स्वच्छतेवरती होणारा खर्च अर्ध्यावर आणेल आणि अस्वच्छतेपासून कचर्यापासून निर्माण होणार्या अनेक संकटांना आळा घालेल. ही एवढी मोठी इंडस्ट्रीज केवळ पुनर्वापर या घटकावर अवलंबून आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती भारतासारख्या सर्वात जास्त कचरा तयार करणार्या देशांमध्ये कचर्यावरती प्रक्रिया आणि पुनर्वापर करून त्या पासून खत, वीज अनेक गोष्टी तयार होतील. हा पुनर्वापर भारतासारख्या देशाला निश्चित प्रगतीच्या नव्या संध्या उपलब्ध करेल.

पुनर्वापराच्या यादी कडे पाहिलं तर ती मारुतीच्या शेपटासारखी आहे. जिथे बघाल तिथे पुनर्वापराची संधी दिसेल. या संधीत पाणी हे पुनर्वापरातलं सगळ्यात मोठे सोनं आहे, पाणी हे जीवन आहे. जगभरातल्या अनेक राष्ट्रांमध्ये पिण्याचे पाणी नाही. आखातांमधली गल्फ कंट्रीज ज्यांना संबोधलं जातं त्या अरेबियन देशांमध्ये एक थेंबही गोड पाणी शक्यतो मिळत नाही. अगदी सिंगापूर, मलेशिया, थायलंड सारख्या देशांमध्ये देखील पिण्याचे पाणी नाही. दुबई, कुवेत, कतार, अबुधाबी सारखी प्रगत राष्ट्र समुद्राच्या पाण्याचा प्रक्रिया करून पुनर्वापर करतात आणि पिण्यायोग्य पाणी बनवून संपूर्ण राष्ट्र त्या पाण्यावरती पोसले जातं. हा पाण्याचा पुनर्वापर आहे. तेवढी परिस्थिती भारतासारख्या जल, जमीन आणि वन या गोष्टीने संपन्न असणार्या देशांना त्याची जास्त झळ बसत नाही. मात्र तरीही दिवसेंदिवस पाण्याचे साठे माणसाला डोळे वटारून दाखवत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती सांडपाण्याचा मलमूत्र ज्याला वेस्टेज पाणी म्हणतो, टाकाऊ पाणी म्हणतो त्याचा पुनर्वापर जो जगात मोठ्या प्रमाणावर होतो आहे. भारतासारख्या शहरी भागांमध्ये तो ताकदीने व्हायला हवा.
दुबई सारख्या देशांमध्ये वापरलेलं एक थेंब भरही पाणी नाल्यात जात नाही. या पाण्यावरती दर किलोमीटर, पाच किलोमीटरच्या परिसरात प्रक्रिया केली जाते आणि ते सर्व पाणी रेतीमध्ये उगवलेल्या कृत्रिम वनसंपदेवरती खर्च केला जातो. रेताळ देशांमधल्या रेतीच्या वाळवंटात आता मोठ्या प्रमाणावरती बगीचे उभे राहत आहेत. यांना लागणार सर्व पाणी हे याच पाण्यावरती पुनर्वापर होईल अशी प्रक्रिया करून तयार केली जातात. सांगण्यासारख्या शेकडो गोष्टी आहेत. फक्त पुनर्वापर कुठल्या कुठल्या गोष्टीचा कसा करू शकतो आणि जास्त प्रमाणात कसा होईल याचाच विचार होणं जास्त गरजेचे आहे.






