नुकतेच मध्य प्रदेशातील इंदुरच्या एका कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश एन. पी. सिंह यांनी एका आदेशात म्हटलं की, “कपाळावर सिंदूर लावणे हे विवाहित हिंदू महिलेचं धार्मिक कर्तव्य आहे. कारण त्यातून तिची वैवाहिक स्थिती दिसून येते.” आपल्या आदेशात सिंह यांनी संबंधीत महिलेला तिच्या नवऱ्याकडे जायला सांगितलं. लग्न आणि परंपरा यातून केवळ स्त्रियांवरच निर्बंध लादले जातात हे नेहमीच दिसून येतं. लग्न झाल्याचा पुरावा बाईकडेच मागितला जातो. सण-उत्सव साजरे करण्याची जबाबदारी बाईवरच असते. व्रत-वैकल्ये पण बाईनेच करायची असतात. तसंच बायकोनं नवऱ्याचं जेवण झाल्यावरच जेवायचं, डोक्यावर नेहमी पदर घ्यायचा, कितीही गर्मी असो वा अडचण होवो, तरीही नव्या नवरीनं सोळा श्रृंगार केलेच पाहिजेत, अशा गोष्टी पितृसत्ताक समाजात बायकांवरच लादल्या जातात. त्या अशा रिती पाळतात तेव्हाच त्यांना आदर्श गृहिणी, पतिव्रता समजलं जातं. प्रश्न हा आहे की एका विवाहित बाईला ती विवाहित आहे हे दिसण्याची गरजच का आहे आणि तिच्या नवऱ्यावर मात्र असं बंधन का नाही? हिंदी आणि उर्दूचे सामाजिक कथाकार, मुंशी प्रेमचंद म्हणायचे की, “एखादी अन्यायी गोष्ट केवळ यामुळे मान्य होऊ शकत नाही की ती सामाजिक परंपरा आहे.”

काही बायका लग्न झाल्यानंतर सिंदुर, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण असं सारं घालतात. तर काही बायकांना असं घालायला आवडत नाही. काय घालायचं, काय नाही घालायचं ही पूर्णपणे वैयक्तिक इच्छा असते. समाजानं यात खरं तर हस्तक्षेप करण्याची गरज नाही. परंतु ज्या बायका या परंपरा नाकारून, आपल्या इच्छेला प्राधान्य देतात, त्यांचं सहसा चारित्र्यहनन केलं जातं. हिंदू धर्मात कर्माच्या सिद्धांतानुसार असं म्हणतात की सारं काही पहिलेच निश्चित झालेलं आहे. कोण कुठे जन्माला येईल, कधी येईल, कुठे त्याचा मृत्यु होईल, कसा होईल सारं काही आधीच सटवाईनं लिहून ठेवलं आहे. मग प्रश्न असा आहे की वटसावित्रीची पूजा करून, कपाळावर कुंकु भरून, नवऱ्यासाठी उपास करून, त्याचं निर्धारीत आयुष्य बदलता येऊ शकतं का? माथ्यावर कुंकु लावण्याचा हा प्रश्न नाही. ज्यांना आवडतं त्यांनी ती भरावी, ज्यांना नाही आवडत त्यांनी भरू नये. पण कुंकवाचा मळवट भरणं न भरणं कोणावर लादण्यात येऊ नये. असं म्हणतात की कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, व्रत-उपवास यातून बायकोचं आपल्या नवऱ्यावरचं प्रेम आणि निष्ठा दिसून येते. ठीक आहे. मग ही गोष्ट नवऱ्याकडूनही व्हायला नको का? प्रेम आणि निष्ठा एकतर्फी आणि बायकोकडूनच का अपेक्षली जावी?
बॉलिवूडमधून या परंपरा मोठ्या नाट्यमय पद्धतीने प्रेक्षकांच्या माथी मारण्यात आल्या आहेत. भावना व जबाबदारी यांच्यासोबत त्यांतून चमत्कारही घडवण्यात आले आहेत. पण यातून पितृसत्ताक विचारांचं ओझं बायांवर लादण्यात येतं आणि त्यांच्या इच्छांना मात्र डावलण्यात येतं. त्यांनी परंपरेचा आदर करावा, त्यांचं पालन करावं, त्या पुढे चालवाव्यात, ही त्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे असं सातत्यानं सांगण्यात आलं आहे. कुंकू आणि मंगळसूत्र यातून नवऱ्याचं जगणं-मरणं जोडलेलं बॉलिवूडनं अनेकदा दाखवलं आहे. अर्थात काही चित्रपटांतून याचा विरोधही करण्यात आला आहे. अलिकडेच ‘बुलबुल’ या चित्रपटातील एका प्रसंगातून पितृसत्तेवर टीका करण्यात आली आहे. यात एक लहान मुलगी विचारते की पायांत जोडवी का घालतात? तिची मावशी तिला सांगते की “तिथे एक नस असते. ती दाबली गेली नाही तर मुली उडून जातात.” मुलगी विचारते, “अगदी चिमणीसारख्या?” “नाही, नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी असते ही जोडवी,” मावशी सांगते. जोडवी घातल्याने पायाची नस दबते आणि त्यामुळे गर्भातील बाळ सुदृढ राहतं, चांदीच्या जोडव्यांमुळे जमिनीतली उर्जा अंगात येते, इत्यादी अनेक भाकडगोष्टी अलिकडे सांगितल्या जात आहेत. कधी सौंदर्य, कधी परंपरा, कधी निराधार शास्त्रीय कारणं देऊन बायकांना दागिणे घालायला भाग पाडलं जातं आणि नकळत परंपरेत बांधलं जातं. माझ्या आजीनं माझ्या लहानपणी एक किलो गहूच्या बदल्यात माझं नाक-कानात भोक पाडून घेतलं होतं. मी खूप रडले होते तेव्हा. एखादा मुलगा जर कानात भोक पाडायला गेला तर त्याला मात्र रागावण्यात येतं, परवानगी मिळत नाही. सांगितलं जातं की ही सारी मुलींची कामं आहेत. शहरात सध्या असे प्रकार कमी झाले असले तरी गावांमध्ये अजूनही मुलींना हे नियम पाळावे लागतात, मग त्यांची इच्छा असो वा नसो.
बायकांना नेहमी हे सांगितलं जातं की त्यांनी डोक्यात माथ्यावर कुंकू लावलं पाहिजे, कारण त्यामुळे त्या सुंदर दिसतात. पण सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. सौंदर्याच्या नावाखाली पुन्हा बायकांवरच परंपरा लादल्या जातात. आम्ही बायका खरंच फसवल्या गेल्या आहोत. मी एका लग्न झालेल्या बाईला विचारलं होतं की ती माथ्यावर कुंकू का भरते? यावर ती म्हणाली की माझं सौभाग्य दीर्घकाळ जगावं म्हणून. मी जेव्हा विचारलं की मग पुरुष असं का नाही करत त्यांच्या बायकांसाठी? यावर तिनं म्हटलं की पुरुषांना हे करण्याची गरज नाही. ते तसेही सुंदरच दिसतात. दोन विवाहीत बायका एकमेकांसमोर उभ्या असतील तर त्यांतली मंगळसूत्र घातलेली आणि कुंकू लावलेली बाई जास्त सुंदर दिसते. स्त्रियांना दागिन्यावरून अपमानित करणं तर जुनी परंपरा आहे. समर्पणाच्या नावावर पितृसत्ताक विचाराला महत्त्व दिलं गेलं आहे. खरं तर कोणी काय घालावं हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आणि विचार असला पाहिजे. एखाद्या बाईला कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून नवऱ्याविषयी समर्पित भावना वाटत असेल तर तिनं ते जरूर करावं. पण ज्या बायकांना असं करायचं नाही, ज्यांना या गोष्टी आवडत नाहीत, त्यावरून त्यांच्या नवऱ्याप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमावर किंवा निष्ठेवर संशय व्यक्त करणं चुकीचं आहे. अनेक बायका म्हणतात की पुरुषांवर तर कोणत्याही गोष्टीची बंदी नाही. तो मग काहीही करो.

मी ज्या बायकांना विचारलं की तुम्ही असा विचार का करता तर यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही. त्यांनी फक्त याविषयी ऐकलं आहे, पाहिलं आहे म्हणून त्यांना तसं वाटतं. हे सारं देवानं बनवलं आहे असंही त्यांना वाटतं. मासिक पाळी, गरोदरपणा, घरकाम, लहान वयातील लग्न, नवऱ्याच्या नावानं कुंकू भरणं व मंगळसूत्र घालणं, या सर्व गोष्टी देवानं बायकांसाठी तयार केल्या आहेत. अनेक बायकांना लग्नानंतर त्यांचं लग्न झालेलं आहे असं दाखवण्याची गरज वाटत नाही. तर दुसरीकडे अशाही बायका आहेत ज्यांचे नवरे मेले असले तरीही त्या कुंकू भरतात. प्रसिद्ध अभिनेत्री रेखा याचं गाजलेलं उदाहरण आहे. अनेकदा दोन पुरुषांमध्ये जेव्हा भांडण होतं तेव्हा एक वाक्य नेहमीच बोललं जातं – मी काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. मीही मारू शकतो. या वाक्यावरून हेच दिसतं की बांगड्या हे दुबळेपणाचं लक्षण समजलं जातं. त्यांतून बाईला अबला म्हटलं जातं. त्या पुरुषांवर कशा अवलंबून आहेत त्यांच्या रक्षणासाठी. पुरुष बांगड्या घालत नाहीत म्हणून मुक्त आहेत, सशक्त आहेत, त्यांना कोणाच्या मदतीची गरज भासत नाही.
कुंकू भरण्याचं वैज्ञानिक कारण सांगण्याचीही टुम सध्या निघाली आहे. प्रश्न असा आहे की हा जर विज्ञानावर खरा उतरलेल्या निष्कर्ष असेल तर त्याचा फायदा पुरुषांनाही व्हायलाच पाहिजे. त्यांनीही डोक्यात पिंजर भरायला हवी. पण इथं विज्ञानाचा आधार केवळ सुशिक्षित लोकांना बहकवण्यासाठी घेतला जातो. त्याच्याआडून पितृसत्ताक विचारच पेरले जातात आणि स्त्रीवादाला थोपवलं जातं. मंगळसूत्र, जोडवी, पिंजर, बांगड्या या सर्व गोष्टी परंपरेच्या, सौंदर्याच्या, देवाधर्माच्या नावावर बायकांवर लादण्यात आल्या आहेत. ही सारी बंधनं आहेत. पण बायकांना त्याचा पत्ता देखील नाही. आम्ही आता प्रश्न विचारायला हवेत की बायकांनाच दरवेळी त्यांच्या विवाहीत असण्याचे, त्यांच्या पतिनिष्ठेचे पुरावे का द्यावे लागतात आणि पुरुषांना यातून सवलत कशी काय मिळते? त्यांना याची गरज का भासत नाही?
अनुवाद – प्रतिक पुरी






