‘बी कॉन्फिडेन्ट’, ‘आत्मविश्वासी व्हा!’, ‘आत्मविश्वासानं भरपूर प्रतिमा’, आत्मविश्वास असणं ही आपल्या काळाची एक मोठी गरज झालेली आहे. आपण सध्या आत्मविश्वासाच्या स्वर्ण युगात जगतोय असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बाजारातून आम्हाला आत्मविश्वासी होण्याचे आदेश दिले जात आहेत. सौंदर्य प्रसाधनाच्या कंपन्या आम्हाला आपल्या शरीरावर प्रेम करायला सांगत आहे, जशी की त्यांची इच्छा आहे.
त्यांनी याचा संबंध आत्मविश्वासाशी जोडला आहे. लहानसहान गोष्टीही आता आत्मविश्वासाशी जोडून जाहिरातींमधून आणल्या जात आहेत. एकीकडे लैंगिक, वर्गीय आणि वांशिक भेदभाव वाढत असताना, स्त्रियांना वारंवार स्वतःवर विश्वास ठेवायला सांगितलं जात आहे. स्त्रियांमध्ये आत्मविश्वास कमी असतो किंवा त्यांना सांगितलं जातं की त्यांच्यात तो नाही आहे. बाजारू पुरुष व्यवस्थेनं स्त्रियांना आत्मविश्वासी करण्यासाठी एक नवीन संस्कृतीच तयार केली आहे.
‘कॉन्फिडेन्स कल्चर’ हे एक शक्तिशाली आकर्षण आहे जे समाजात स्त्रिया, परिघावरील समुदाय, अल्पंसख्यक लोक यांना कमी महत्व देतं. ते असं दाखवतं की आत्मविश्वास असणं हेच प्रत्येक समस्येवरचं उत्तर आहे. स्त्रियांना सांगितलं जातं की त्यांच्यात आत्मविश्वास नाही.
जाहिराती, सेल्फ-हेल्प पुस्तकं, संगीत आणि इतर माध्यमांतून स्त्रियांना हा संदेश पाठवला जातोय की त्यांच्या सर्व समस्येवर एकच उत्तर आहे, ते म्हणजे आत्मविश्वास. कॉन्फिडेन्स कल्चरमध्ये हा तर्क दिला जातो की स्त्रियांच्या सर्व समस्या या त्यांच्यातील उणीवांमुळेच आहेत. या वैयक्तिक उणीवा आणि विशेषतः आत्मविश्वासाची कमतरता यामुळेच त्या मागे राहतात. त्यामुळे त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जगाला नाही.
समाजशास्त्रज्ञ शानी ओर्गड आणि रॉसलिंड गिल म्हणतात की कॉन्फिडेन्स कल्चरचं महत्त्व वाढवून सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर त्याचा उपयोग मोठ्या, गुंतांगूतीच्या व्यवस्थेतील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी केला जातोय. आम्ही आत्मविश्वासाची चिंता करतोय पण या व्यवस्थांची चिंता करत नाही की त्या अशा का आहेत, ज्या आम्हाला परिघावर ठेवतात.

आत्मविश्वासाच्या आडून स्त्रियांनाच त्यांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक मागासलेपणासाठी दोषी ठरवलं जातंय. स्त्रियांना स्वतःला बदलण्यास सांगणं सोपं आहे, पण या व्यवस्था आणि समाज यांना बदलायला सांगणं कठीण आहे. काही लोक याला आत्मविश्वासाची उणीव म्हणतात पण प्रत्यक्षात सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थाच स्त्रियांना मागे ठेवण्यासाठी कारणीभूत असतात.
कॉन्फिडेन्स कल्चरमध्ये स्त्रियांच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आत्मविश्वास आहे असं सांगितलं जातं. कामाच्या ठिकाणी भेदभाव, देह-निंदा, नात्यांमधील तणाव इत्यादी प्रत्येक गोष्टीसाठी आत्मविश्वास असणं हेच उत्तर दिलं जातं. स्त्रियांना कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम करायला सांगितलं जातं.
प्रचलित सौंदर्य निकषांत तुम्ही बसत नाही तर तुमच्यात आत्मविश्वास असणार नाही इतकंच नाही तर, आयांना देखील आत्मविश्वासी होऊन आपल्या आत्मविश्वासी मुलांना वाढवण्याचे धडे दिले जातात. यातून आत्मविश्वास ही इतकी सहज सामान्य गोष्ट झाली आहे की ज्यात कोणत्याही तर्काला, वादाला स्थानच उरत नाही. इतकंच नाही तर याला एक स्त्रीवादी हस्तक्षेप म्हणून सादर केलं जातं आणि स्त्रियांना सक्षम करण्याच्या स्पष्ट ध्येयानुसार याची आखणी केली जाते.
पण यातून व्यवस्थेच्या त्या भेदभावांवर उजेड पडत नाही ज्यामुळे प्रत्यक्षात स्त्रियांना अनंत अडचणी सोसाव्या लागत आहेत. आत्मविश्वासाला अनेक क्षेत्रांतील व्यापक प्रश्नांवरील उत्तर म्हणून सादर केलं जातं. ही संस्कृती सामाजिक असमानतेला व्यक्तिगत अडचणी आणि उणीवा म्हणत सादर करते. उदा. कोविड साथीमध्ये स्त्रियांवर अनेक पातळ्यांवर प्रभाव पडला.
त्यांना बेकारी, कमी मोबदला, लैंगिक भेदभावाला सामोरं जावं लागलं. पण या अडचणी दूर करण्याऐवजी त्यांना कॉन्फिडेन्स ट्रेनिंग कोर्स घेण्यासाठी सांगितलं गेलं. पण हे काही त्यांच्या अडचणींवरचं उत्तर नव्हतं. कॉन्फिडेन्स कल्चर अशाप्रकारे शासन, संघटन, कॉर्पोरेशन आणि व्यवस्थेला उत्तरदायित्वापासून वाचवतं. यांना प्रश्न विचारण्याऐवजी ते स्त्रिया आणि परिघांवरील समुदायांनाच जबाबदार ठरवतं.
व्यवस्थेच्या उणीवांवर मौन साधून स्वतःमध्ये त्यांनी बदल करावेत अशी अपेक्षा ठेवतं. ही संस्कृति प्रश्न विचारू देत नाही. ती अन्यायाला वैयक्तिक अटींशी जोडून घेते ज्यात लैंगिक भेदभावाला जबाबदार व्यवस्थेच्या अपयशाऐवजी, स्त्रियांच्या तथाकथित उणीवांवर बोट ठेवलं जातं.
शानी ओर्गड सांगतात की या नवउदारवादी स्त्रीवादाला कॉर्पोरेशन्सकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. कारण कॉन्फिडेन्स कल्चर सामूहिक प्रश्नांसाठी वैयक्तिक उत्तर शोधण्यावर भर देतं आणि सामाजिक भेदभावाला वरवरचं महत्त्व देतं. ज्यामुळे स्त्री-केंद्रीत जाहिरातींमधून सेल्फ-हेल्प, सेल्फ-लव्ह आणि सेल्फ-इम्प्रुवमेंट यांच्या माध्यमातून सामाजिक भेदभाव दूर करण्याऐवजी त्यांचं अस्तित्व नाकारून त्यांना वाढवलंच जातंय.
कॉन्फिडेन्स कल्चर सामाजिक प्रश्नांची सर्व जबाबदारी आणि दोषांना वैयक्तिकपणे स्त्रियांच्या खांद्यावर टाकतं. ते ताणतणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आत्मविश्वास आणि सेल्फ ऐप्स यांचा उपयोग करण्यावर भर देतं. ही ऐप्स स्त्रियांना पुढे ठेऊनच तयार केली जातात. बाजार त्यांची जाहिरात करत असतं.
अनेक अभ्यासातून हे समोर आलंय की सेल्फ ऐप्सची वाढती संख्याच महासाथीच्या सर्वांत मोठ्या आरोग्य आणि उपभोग्य कलांपैकी एक आहे, जी मुख्यतः स्त्रिया आणि मध्यमवयीनांकडून वापरली जाते.

लैंगिक भेदभावाच्या समाजात खोलवर रुजलेल्या मूळ्या उपटण्यासाठी आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील आणि भेदभाव करणाऱ्या प्रथा-परंपरा मोडाव्या लागतील. सेल्फ-केयर आणि सेल्फ-लव्ह यामागील बाजारू मानसिकता ओळखावी लागेल.
तरच स्त्रियांची आणि अल्पसंख्यकांची सामाजिक स्थिती बदलू शकेल. स्वतःची काळजी घ्यावीच आणि स्वतःवर प्रेमही करावं पण बाजाराच्या गरजांमधून नाही तर स्वतःच्या गरजेतून. त्यातून व्यवस्थेचे दोष आपल्यापासून लपवले जात नाही यावरही लक्ष ठेवावं लागेल. खासगी आणि मानसिक कॉन्फिडेन्स कल्चरऐवजी आपल्याला सामाजिक व्यवस्था आणि नीतिमत्तेत गुंतवणूक करावी लागेल ज्यातून स्त्रियांची सुरक्षा, हित, सक्षमतेला पाठबळ मिळेल.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






