31 वर्षीय उमा दास 10 वर्षांपूर्वी लग्न होऊन आपल्या सासरी आल्या तेव्हा त्यांच्या सासरच्या सर्व बायका ढाकी गटात काम करायच्या. त्या सांगतात, “त्यावेळी आमच्या कुटुंबियांना अनेक लोक विरोध करायचे, पण आता ढाकमुळेच आम्हाला मानमान्यता मिळत आहे. हीच आमची ओळख झाली आहे.”
दुसरीकडे मछलंदपुरच्या प्रोमिला दास या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या महिला ढाकवादक आहेत. 2017 मध्ये पहिल्यांदा त्या ढाक गटात सामिल झाल्या आणि त्याच वर्षी त्यांना दूर्गा पूजेत दिल्लीमध्ये ढाक वाजवण्याची संधी मिळाली. त्यांच्यासाठी हे त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठं यश होतं. उमा आणि प्रोमिला या बंगालमधील गोकुल चंद्र दास यांनी काढलेल्या, पहिल्या महिला ढाक गटाच्या, ‘मोतीलाल ढाकी’च्या सदस्या आहेत. आपल्या गटासोबत त्यांनी देशभरात ढाकवादन केलं आहे.

ढाक वाद्याची कथा
ढाक किंवा ढाकी वाद्य हे बंगाली संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. विशेषकरून दुर्गा पूजा उत्सवात ढाक कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं. ढाक हे बंगालमधील प्रसिद्ध आणि जुनं वाद्य असलं तरी त्याचा वापर आता केवळ पूजा उत्सव आणि काही समारंभापूरताच केला जातो. एक भलामोठा ढोल जो पुरुष वादक हातातल्या काठीने वाजवतात. अशा वादक कलाकारांना बंगालमध्ये ‘ढाकी’ म्हटले जाते.
दुर्गा पूजा सुरू आहे, अशावेळी हे ढाकी एका पूजा मंडपातून दुसऱ्या मंडपात जात ढाक वाजवून वातावरणात जोश भरतात. मात्र सध्या जर तुम्ही कोलकाता शहरात जर फेरफटका माराल तर तुम्हाला आतापर्यंत न दिसलेले चित्र दिसून येईल. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या ढाक वादन प्रकारात महिला ढाकींचे पथकही पाहायला मिळत आहे.
हे चित्र रातोरात बदललेलं नाही, त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि हे सारे श्रेय जाते ते गोकुल चंद्र दास या व्यक्तीला. बंगालमधील प्रख्यात ढाक वादक म्हणून गोकुल चंद्र दास यांचा दबदबा आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच बंगालमध्ये महिला ढाक पथक सुरू झाले…
गोकुल चंद्र दास सांगतात, “मी स्वतःला नशिबवान समजतो की मला माझ्या कुटुंबाची ढाकवादनाची परंपरा पुढे चालवायला मिळाली. त्याला आंतरराष्ट्रीय ओळखही देता आली. एरव्ही ढाकींना (ढाक वादक) केवळ दूर्गा पूजोत्सवातच काम मिळतं, त्यानंतर घर खर्च चालवण्यासाठी त्यांनी इतर कामं करावी लागतात.”
गोकुल चंद्र दास हे पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध ढाकी आहेत. पंडित रविशंकर, तबला उस्ताद ज़ाकिर हुसैन यांच्यासह अनेक कलाकारांसोबत त्यांनी ढाक वादन केलं आहे. त्याशिवाय महिलांना ढाक वाद्य शिकवण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.

ढाक वादनात महिलांचा शिरकाव
‘मोतीलाल ढाकी’ या गटाचे निर्माते आहेत, गोकुल चंद्र दास. ते मछलंदपूरचे रहिवासी आणि प्रसिद्ध ढाक कलाकार आहेत. ते सांगतात, “मी लहानपणापासूनच ढाक वाजवतोय. माझे आजोबा आणि वडिलही ढाकवादक होते.” गोकुल चंद्र दास यांच्या घरी, लॉस एंजेलिस मधील संगीत कार्यक्रमापासून देश-विदेशात केलेल्या कार्यक्रमांची अनेक छायाचित्रं लावलेली आहेत. पण त्यांना स्वतःला यापेक्षाही सर्वांत जास्त अभिमान या गोष्टीचा वाटतो की त्यांच्यामुळे अनेक महिला आज ढाक वादक म्हणून पुढे येत आहेत.
हे कसं घडलं याविषयी ते सांगतात, “मी 2010 साली तबला उस्ताद ज़ाकिर हुसैन यांच्यासोबत उत्तर अमेरिकेत एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं फिरतांना संगीत वाद्यांच्या एका दुकानात मी एका बाईला वेगवेगळी वाद्यं वाजवतांना पाहिलं, ऐकलं. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की माझ्या गावातील बायका असं करू शकणार नाहीत का? त्यांना ट्रेनिंग दिलं तर त्याही ढाकच नाहीतर इतर कोणतंही वाद्य आरामात वाजवू शकतील.”
परत आल्यानंतर त्यांनी आधी आपल्याच कुटुंबातील पाच बायकांना ढाक वादनाचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. ढाक हे वाद्य वजनाला भारी असतं आणि कित्येक तास गळ्यांत घालून ते वाजवायचं असल्यानं त्यासाठी जोर व जोश दोन्ही मोठ्या प्रमाणात लागतो. बायका त्यामुळेच याकडे वळत नाही किंवा त्या वळतील असं पुरुष वादकांना वाटत नाही.
पण गोकुल चंद्र दास यांनी या बायकांना प्रेरीत केलं आणि त्या बायकांनीही त्यांच्या प्रयत्नांना भरपूर साथ दिली. हे अर्थातच सोपं काम नव्हतं. सुरुवातीला त्यांना लोकांकडून विरोध झाला. पण आता मात्र ते आपल्या महिला ढाकींना घेऊन जातात तेव्हा त्यांच्या वादनाची चांगली प्रशंसा होते. २०११ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्या महिला ढाकींसोबत कोलकाताच्या दुर्गा उत्सव मंडळात कार्यक्रम सादर केला तेव्हा सारे चकीत झाले होते. त्यानंतर मात्र या महिला आत देशभरात ठिकठिकाणी आपलं ढाक वादन कौशल्य सादर करत आल्या आहेत.

काहींनी तर विदेशवारीही केली आहे. हळूहळू इतर बायकाही गोकुल चंद्र दास यांच्याकडे ढाक वादन शिकण्यासाठी येऊ लागल्या. 2010 मध्येच त्यांनी मोतीलाल ढाकी नावाची प्रशिक्षण अकादमी सुरू केली. त्यांतून गावातील महिलांना एका वेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली. गोकुल चंद्र दास यांनी या महिला वादकांसाठी विशेष हलक्या वजनाचे ढाक वाद्य तयार करवून घेतले. ज्यामुळे त्याही जास्त वेळ वादन करू शकतात.
दुर्गा पूजा उत्सवांदरम्यान या महिला ढाकी त्यांच्या वादनातून चांगले पैसे कमावू लागल्या आहेत. या काळात साधारणपणे 20-25 पंडालांमधून त्या आपलं ढाकवादन सादर करतात. त्यामुळे या काळात या ढाकी महिला चांगल्याच व्यस्त असतात. सहा महिलांपासून सुरू झालेल्या या महिला ढाकी गटात आज 90 महिला ढाकी आहेत. त्यांच्या ढाक वादनाचे स्वर आता देशात व विदेशांतही घुमत आहेत.






