महाराष्ट्रातील मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढीला लागल्या असून त्यात होणारी जीवित हानी चिंतेचा विषय बनली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 22 इतकी होती तर यावर्षी आत्तापर्यंत आठ मृत्यूंची नोंद झाली आहे. वाघांच्या मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. वाघ हा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या अनुसूचित वर्गीकृत असलेला प्राणी आहे. त्यामुळे त्याला विशेष संरक्षण प्राप्त आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प व त्या आसपास असलेला वन प्रदेश हा महाराष्ट्रातील बहुतांश वाघांचा अधिवास आहे. या प्रदेशातील वाढते औद्योगिकीकरण, खाणी, राष्ट्रीय महामार्गाची व इतर रस्त्यांची वाढवलेली रूंदी यांमुळे वन प्रदेशात घट होत आहे. परिणामी वाघांची स्थलांतर हे मानवी वस्तीकडे होत आहे. असे हल्ले रोखण्यासाठी शेताच्या आसपास कुंपण करून त्याला वीज प्रवाह जोडला जातो. या तारांच्या संपर्कात आल्याने वाघांचा देखील मृत्यू होत आहे. चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील उथळपेठ या गावातील अशी एक घटना नुकतीच उघड झाली आहे. या सगळ्या वाढत्या मृत्यंबद्दल वन विभागाकडून ठोस अशा उपाययोजना व अस्तित्वात असलेल्या उपायांची अंमलबजावणी प्रभावी रीतीने होताना दिसून येत नाही. वाघांच्या हल्ल्यापासून बचावासाठी स्थानिक लोकांकडून थेट त्यांना मारण्याची कृती व तसे प्रयत्न होतात.

मानव वन्य जीव संघर्ष हा केवळ वाघ आणि चंद्रपूर पुरताच मर्यादित राहिलेला नाही. वाघाच्याच मार्जार कुळातील दुसरा प्राणी म्हणजे बिबट्या. अतिशय लाजाळू व मानवाच्या आवजालाही भिऊन राहणारा बिबट्या पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी मात्र चिंतेचा विषय बनला आहे. जुन्नर शेजारीच असलेल्या अकोले तालुक्यातील पिंपळदरी गावात शेतात काम करणाऱ्या नानुबाई कडाळे यांचा दोन दिवसांपूर्वी बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. जुन्नर मध्ये तर पिंपरी पेंढार, काळवाडी, पिंपळवाडी, शिरोली या गावांच्या परिसरात बिबट्याची फारच दहशत आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचे प्रमाण हे तेथील भौगोलिक रचना व पीकपद्धती यांमुळे वाढल्याचे दिसत आहे. ऊसाच्या पिकाचे प्रमाण जुन्नरमध्ये अधिक आहे. उसाच्या शेतातच बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा अधिवास तयार केला आहे. परिसरातील डोंगर कपाऱ्या,माळराने या ठिकाणी असलेली पाण्याची टंचाई देखील बिबट्यांना मानवी वस्तीकडे व उसाच्या शेतीकडे घेऊन येते. परिणामी बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण जुन्नर परिसरात वाढत चालले आहे. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हान येथे बिबट सफरीची घोषणा केली आहे. याने हा प्रश्न सुटणार नसून स्थानिकांकडून आपत्ती क्षेत्र जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
केवळ वाघ आणि बिबटेच नव्हे तर रानटी हत्तींच्या हल्ल्यात देखील वाढ झालेली आहे. मागच्या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हिदुर या गावी हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. कळपातून बाजूला पडलेला हा हत्ती जास्त उग्र होऊन त्याने हा हल्ला केला होता. परंतु शेतीचे नुकसान व मानवी वस्तीत घुसून हल्ले व त्यातून होणारे मृत्यू हत्तींचा घटता अधिवासाचे लक्षण आहे. हा प्रश्न जामनगरमध्ये वनतारा बनवून सुटेल असे वाटत नाही. त्यासाठी ठोस कृती आराखडा व वन विभाग व अन्य विभागांच्या एकत्रित प्रयत्नांतून केलेली अंमलबजावणी आवश्यक आहे. महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी बांधवांना आणखी एका प्राण्याशी कायम झुंजत रहावे लागते. तो प्राणी म्हणजे, रानडुक्कर. रानडुकरांचा हल्ल्यात पिकांची व माणसांची अशी आर्थिक व जीवित हानी होते. रानडुकरे सध्या वन्य जीव संरक्षण कायद्याच्या तिसऱ्या अनुसूचित येतात. त्यामुळे त्यांची शिकार करण्यावर बंदी आहे. परिणामी रानडुकरांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ती आणखी त्रासदायक ठरत आहेत. यावर 1972 साली बनवल्या गेलेल्या वन्यजीव कायद्यांत बदलाची मागणी होताना दिसत आहे मात्र यावर सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. सद्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील मानव वन्यजीव संघर्षाचा हा मुद्दा कुठेच दिसून येत नाही ही बाब आणखी काळजी वाढवणारी आहे.






