‘अॅमेझॉनच्या जंगलात एलन मस्कने पोहचवले इंटरनेट… आदिम जमाती पाहू लागले पॉर्न’… तसं बघायला गेलं तर ही बातमी रोचक आणि चमचमीत वाटू शकेल परंतू या बातमीचा अर्थ नीट लक्षात घेतला तर जंगलात राहणाऱ्या आदिम जमातींना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याच्या नादात आपण नेमकं काय करू पाहतोय याची जाणीव तुम्हा-आम्हा सगळ्यांना होईल जी ‘धंदेवाईक’ एलन मस्कला होणार नाही…
सुरुवात अॅमेझॉनच्या जंगलात नेमकं काय घडलं यापासून करू. अॅमेझॉनचं जंगल हा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. बाहेरील लोकांसाठी अॅमेझॉनचं गुढ आणि रहस्यानं भरलेलं जंगल नेहमीच खुणावत असतं. जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल अशी संपन्न जैवविविधता अॅमेझॉनच्या खोऱ्यात आहे. या जंगलाचा अवघा काही टक्के भागही आपण पाहिला नसेल. इथे दरदिवशी नव्यानं काहीतरी सापडतं असतं, म्हणूनच हजारो रहस्य आपल्या पोटात लपवलेलं हे जंगल अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत चाललं आहे.

याच अॅमेझॉनच्या खोल जंगलात हजारो वर्षांपासून ‘मारूबोस’ ही आदिम जमात राहते. फक्त 2000 लोकांचा हा एक आदिम समूह. एलन मस्कची इंटरनेट सेवा पुरवणारी स्टार लिंक ही कंपनी ‘मारूबोस’ जमातीपर्यंत पोहचली. ब्राझीलमध्ये स्टारलिंक कंपनीने काही महिन्यांपूर्वी इंटरनेट सेवा द्यायला सुरूवात केली होती आणि त्यामुळेच हळूहळू सरकत एलन मस्कची ही कंपनी पार अॅमेझॉनच्या जंगलापर्यंत पोहचली. स्टारलिंकने ‘मारूबोस’ जमातीच्या लोकांना इंटरनेट सेवा द्यायला सुरूवात केली.
आदिम जमातीला पॉर्न बघण्याचे व्यसन लागले
सुरुवातीला जंगलातील आदिवासी इंटरनेट मिळाल्यामुळे प्रचंड खुश झाले. 73 वर्षीय त्सेनामा मारुबो म्हणाले की, इंटरनेटमुळे आमच्या वस्तीवर आनंदाचे वातावरण होते. इंटरनेटचे अनेक लाभ असल्याचे आम्हा लोकांच्या लक्षात आलं. आम्हाला अधिक सुविधा मिळायला लागल्या आणि आमच्या दैनंदिन जिवनात फरक पडायला लागला. परंतू हळूहळू स्थिती बदलायला लागली आणि फार लकरच इंटरनेटचे दुष्परिणाम लक्षात यायला लागले.
इंटरनेटमुळे ‘मारूबोस’ ही आदिम जमातीवर कसा फरक पडला हे सांगताना त्सेनामा मारुबो पुढे म्हणाले की, दिवसभर इंटरनेटवर वेळ घालवल्यामुळे आमचे तरुण आता आळशी बनत चालले आहेत आणि ते गोऱ्या लोकांची लाईफस्टाईल कॉपी करायचा प्रयत्न करू लागलेत. दिवसभर सतत तरुणांच्या हातात मोबाईल, मित्रांशी चॅटिंगवर गप्पा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘पॉर्न’ बघण्याचे व्यसन.. आमची आदिम संस्कृतीच्या मुळावरच इंटरनेटने घाला घातला आहे.

‘मारूबोस’ जमातीचे प्रमुख अल्फ्रेडो मारुबो यांनी तर इंटरनेट आल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केलाय. ते म्हणतात की, पॉर्न बघण्याच्या व्यसनामुळे आमची संस्कृती धोक्यात आली आहे. आमचे आदिवासी तरुण फक्त पॉर्न बघतच नाहीत तर त्यात जे दाखवण्यात येतं ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा प्रयत्न करू लागलेत आणि हे आमच्यासाठी धोकादायक आहे.
फायदा आणि नुकसान… आता काय करायचं?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कने अॅमेझॉनच्या जंगलातील ‘मारूबोस’ जमातीला मोफत इंटरनेट सेवा पुरवली होती. त्या परिसरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीने जवळपास 20 टॉवर उभारले. इंटरनेटचे आगमन झाल्यामुळे लोकांना फायदादेखील झाला होता. विशेषत: वैद्यकीय मदतीसाठी इंटरनेट वरदान ठरत होते. एका तरुणाला साप चावल्यानंतर याच इंटरनेटमुळे हेलिकॉप्टरची सेवा मिळवता आली होती. या आदिम समाजाला संगीताचा प्रचंड शौक आहे, इंटरनेटमुळे त्यांना आपला शौकही पूर्ण करता येत आहे. मात्र याच इंटरनेटचा दुष्परिणाम जो फाल लवकर दिसून आला त्यामुळे अॅमेझॉनच्या जंगलातील ‘मारूबोस’ जमातीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
आता पुढचे प्रश्न…आदिम जमातींना मुख्य धारेत का आणायचं?
चाकाचा आणि बंदुकीचा शोध लागण्याच्याही हजारो वर्षे अगोदर स्वअस्तित्वाची सहजप्रेरणा घेऊन आफ्रिकेतला माणूस जेव्हा जगभरातली भूमी पादाक्रांत करीत होता, त्या वेळी काही आदिमानव समूह अॅमेझॉनच्या जंगलापर्यंत येऊन पोहोचले आणि सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी पहिल्या मानवी वस्त्यांपैकी एक वस्ती अॅमेझॉनच्या या जंगलात आकारास आली. अॅमेझॉनचे हे आदिवासी मानवाच्या या जनुकीय विविधतेच्या मुळाशी असलेल्या काही मूलभूत जमातीपैंकी आहेत. मुळात, हा प्रदेश नैसर्गिक संपत्तीने नटलेला असल्याने या समूहाची प्रगती अश्मयुगीन प्रगतीच्या पलीकडे झालेली नाही.

जगाच्या इतिहासात जिथे कुठे म्हणून अप्रवासी लोक क्षेत्रविस्ताराच्या कारणाने नव्या भूप्रदेशातील आदिवासींच्या संपर्कात आले, तिथे तिथे त्यांनी आदिवासींच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावरच गदा आली. यात एरवी स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी अमेरिका, समतेच्या पुरस्काराची वल्गना करणारे जमिनीवरचे धर्म आणि पैशांच्या नशेला हपापलेले भांडवलवदार सर्वात पुढे येतात. अमानुष वा जंगली म्हणून आदिवासींच्या हत्या करणे, त्यांच्या जमिनी बळकावून त्यांना गुलाम करणे, त्यांच्या मूळ संस्कृतीचे विसर्जन करून त्यांच्यावर आपला धर्म लादणे, त्यांच्या प्राकृतिक आवासांना नष्ट करून तिथे कंपन्या, पाम तेलाची झाडी, खाणी आणि टुरिस्ट स्पॉट्स विकसित करणे आणि संकल्पना राबवून जगातल्या आधुनिक मानवाचे हात अशा शेकडो संस्कृतींच्या हत्येमुळे रक्ताने माखलेले आहेत. जगातले जवळजवळ सगळे भूभाग आधुनिक अर्थव्यवस्थेचे पाईक बनल्यानंतर, या मुख्य धारेपासून अजूनही दूर स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या आदिवासींची संख्या आता काही लाखांवर आलेली आहे. अॅमेझॉनच्या अत्यल्प लोकसंख्येचाही अत्यल्प भाग आहेत, त्यांना समाजाच्या “मुख्य धारेत’ आणण्याचा जुनाच मतप्रवाह येथेही लागू पडू शकतो.
अशा वेळी शिकारी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या या स्वयंपूर्ण लोकांना आधुनिक अर्थव्यवस्थेत आणून त्यांचे जीवन सुखमय करण्याचे स्वप्न कुठल्याही व्यवस्थेला पडू शकते. मुळात सुखाची मुख्य धारेतली व्याख्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेने गरीब माणसाला कितपत सुखी केले आहे, याचा शोध घेतला, तर हाती येणारी उत्तरे मन विदिर्ण करणारी आहेत. वेगाने नष्ट होत चाललेली जंगले आणि शेतीच्या वाढत्या औद्योगिकरणाने आता कुठेही स्वयंपूर्णता उरलेली नाही. कित्येक जातींचे पारंपरिक व्यवसाय पूर्णतः बंद झालेले आहेत. या जातींमध्ये जन्माला येणाऱ्या लोकांना शहरीकरणाने तयार केलेल्या कनिष्ठ आणि कष्टाच्या रोजगार संधीशिवाय दुसरे कुठले मार्ग नाहीत.

या भयानक परिस्थितीशी पूर्णतः अनभिज्ञ राहून स्वत:च्या जंगलात सुखनैव जगणाऱ्या आदिम जमातींना देण्यासाठी मुख्य भूमीवरच्या देशांकडे काहीही नाही. शहरीकरण आणि चंगळवादात कुठलीही मूलभूत संधी न देता आणखी काही हजार जिवांना आपण सहभागी करून घ्यावे का? हा गंभीर प्रश्न येथे उपस्थित होतो आहे. एकीकडे हजारो वर्षांनंतर अजूनही अश्मयुगीन अंधारातूनही बाहेर न पडू शकलेल्या या आदिवासींना नव्या युगातील मानवाने केलेल्या प्रगतीचा उपभोग घेण्याची संधी उपलब्ध आहे, तर त्यांच्या जैविक मर्यादा आणि अत्यल्प लोकसंख्या पाहता त्यांचे मुख्य धारेत येऊन टिकून राहणे कितपत शक्य होईल, यावर साशंकताही आहे. याशिवाय मुख्य धारेत येण्यासंबंधी त्यांचे स्वतःचे मत काय आहे, यासंबंधी आपल्याला काहीही माहिती नाही.
यानंतरही आदिम जमातींना आपल्याशी संपर्क करायचाच असेल, तर त्याबद्दल आपण त्यांना आडकाठीही करू नये, इतपत जाणीव आपण ठेवायला हवी. त्यांच्या आयुष्यात बाह्यजगातल्या लोकांचा हस्तक्षेप रोखणे आणि जंगलाचे बाह्यभागातून संरक्षण करणे, ही कामे व्यवस्था बरीच वर्षे व्यवस्थित करीत असले, तरी आदिम जमातींची लोकसंख्या आणि परंपरा लक्षात घेता कुठल्याही नाजूक क्षणी ही जमात संकटात येऊ शकते. त्यामुळे शक्य त्या उपाययोजना करून या जमातींचे पूर्ण संरक्षण करणे, हे व्यवस्थेचे कर्तव्य आहे. निरनिराळ्या मुखांमधून ऐकू आलेल्या निरनिराळ्या इतिहासाच्या पलीकडे, आदिम जमाती हे आपल्या सर्वांत प्राचीन पूर्वजांपैकी एक आहेत, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. या पूर्वजांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करणे ही आपली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. सद्य:स्थितीत ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांच्या आयुष्यात कसलाही संपर्क वा हस्तक्षेप न करणे, हा एकच मार्ग आपल्याजवळ उपलब्ध आहे.






