निवडणूक जवळ आली, की काही घटना मुद्दामहून घडवून आणल्या जातात. त्यांचा उद्देश मूलभूत प्रश्नांवर लोकांनी चर्चाच करू नये आणि लोकांनी भावनिक मुद्यांच्या आहारी जावे, असा असतो. गेल्या आठवड्यात सोलापूर येथे घडलेली घटना आणि आता अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठातील घटना एकाच वृत्तीतून घडल्या आहेत. एखाद्याने गुन्हा केला असेल, तर त्याला शिक्षा द्यायला राज्यघटनेने व्यवस्था निर्माण केली आहे; परंतु आता कथित संस्कृतीरक्षणाचा ठेका घेतलेले घटनेपेक्षा मोठे झाले असून, ते कायदा हातात घेऊन न्यायाधीशांच्या भूमिकेत गेले आहेत.
देशात अशा कथित संस्कृती रक्षकांच्या भूमिकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे न्यायव्यवस्थेला आव्हान देणारी धर्माची समांतर न्यायालये बंद करण्यासाठी सामाजिक संस्थांचा दबाव वाढत असताना दुसरीकडे धर्माचे ठेकेदार कायद्याच्या राज्यालाच आव्हान देत आहेत. धर्म कधी विद्वेष करायला शिकवत नाहीत. माणसाचा नाही, तर त्याच्यातील अपप्रवृत्तींचा नाश करायला सांगितले जाते. हिंदू धर्म तर त्याग आणि संयम आणि सर्वसमावेशकतेची शिकवण देतो; परंतु कथित धर्मरक्षकांना खरेच धर्म समजला आहे का, हा खरा प्रश्न आहे. सर्वंच धर्मात आता कडवटांची संख्या वाढली आहे. त्यांच्यामुळे मानवतेसमोरच हे आव्हान उभे राहिले आहे.
सोलापूर आणि अहमदाबादमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ज्या पद्धतीने अंगावर लघुशंका करण्यात आली आणि नमाज पठण करणाऱ्यांवर हल्ले करण्यात आले, ते पाहता हे उन्मादी वर्तन आहे. सोलापूरमधील युवकाने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसे असेल, तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे, कथित रक्षकांना नव्हे. अहमदाबादमधील घटनेने तर गुजराच्या दंगलीनंतर पुन्हा भारताची प्रतिमा जगात मलीन व्हायला कारण मिळाले आहे.

सर्व धर्मांच्या सूत्रांचा अभ्यास केला, तर त्यातून एकच सार निघतो, तो म्हणजे देव, अल्ला, येशू आदी दैवते चराचरात भरली आहेत. प्रार्थनेसाठी मंदिरात, प्रार्थनास्थळात किंवा चर्चमध्ये जाण्याची गरज नसते. भक्तीत एवढी ताकद पाहिजे, की ज्याच्यावर श्रद्धा आणि भक्ती आहे, तोच आपल्या भेटीला आला पाहिजे.
सावता माळ्यासारखे संत कधीच पंढरपूरला गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या विठ्ठल भक्तीत कुठे कमतरता होती, असे नव्हे, संत गाडगेबाबांनी तर कितीतरी उदाहरणातून देव देवळात नाही, माणसांत आहे, हे सांगितले. देव भावाचा भुकेला असतो. इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने पूजा, प्रार्थना केली, तरच ती पावते. गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी नमाज पठण केले, तर त्याचा पोटशूळ बाहेरच्यांना उठण्याचे काहीच कारण नव्हते; परंतु द्वेषाची मशाल घेऊन फिरणाऱ्यांना कायम पेटवायचे असते.
“आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे राहणे मोठे आव्हान आहे’’
गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज पठण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. 25 जणांच्या गटाने शनिवारी रात्री अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, आफ्रिका आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या ए ब्लॉकमध्ये हल्ला केला, त्यात काही विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली, तरी या घटनेमुळे परदेशात भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही भारतात शिकायचे, की नाही असा जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे.
या घटनेचा परिणाम भारतात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर जसा होणार आहे, तसाच तो भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही होणार आहे. त्या देशात भारतातील विद्यार्थ्यांवर हल्ले झाले, तर त्यांचे तिथले शिक्षणही बंद पडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला या घटनेत हस्तक्षेप करावा लागला, त्यावरून उन्मादींच्या कृत्याची किंमत कशी देशाला मोजावी लागते, हे दिसले. दिल्लीत रस्त्यावर नमाज करणाऱ्यांना नमाज पठण करण्यापूर्वी परावृत्त करायला हवे होते किंवा नमाज झाल्यानंतर तरी शिक्षा करायला हवी होती; परंतु नमाज करणाऱ्यांना लाथ मारण्याचा उन्मादीपणा जसा खाकीत भरला होता, तसाच तो गुजरात विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या कथित धर्मरक्षकांत भरला होता.
जिथे पुस्तक आणि वह्या दिसायला पाहिजेत, तिथे दगड विखुरलेले आणि अनेक तुटलेली वाहने दिसली, यावरून शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी धुडगूस दिसला. अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांपैकी एकाने, “आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे राहणे हे एक मोठे आव्हान आहे. हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे का, आहे याचा तपास व्हायला हवा. येथे बाहेरचे लोक येतात. ‘जय श्री राम म्हणा’ असे म्हणतात. आम्ही म्हटलो नाही, तर मारहाण करतात. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. इतर विद्यार्थ्यांसाठी येथे खूप धोका आहे.’’
विद्यार्थ्यांच्या मनातील ही भीती दूर करून त्यांना आश्वस्त कसे करणार, हा प्रश्न आहे. अहमदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. ‘सोशल मीडिया’वरील काही व्हिडिओत हल्लेखोर जमाव विद्यार्थ्यांच्या वाहनांवर दगडफेक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे हल्लेखोर धार्मिक घोषणा देतानाही दिसले. या विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीरजा यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे पूर्वी अशा घटना घडल्या होत्या, तर विद्यापीठ आणि पोलिस काय करीत होते, हा प्रश्न उरतो.
कुलगुरू म्हणतात, “विदेशी विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे’’
विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. नीरजा गुप्ता यांचे यासंदर्भात वेगळेच वक्तव्य पुढे आले आहे. त्या म्हणतात की, “फक्त नमाज हे हिंसेचं कारण असू शकत नाही. शाकाहारी विद्यार्थ्यांचा विचार करुन विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्तन हे अधिक परिपक्व आणि भान ठेवून केलं पाहिजे. जे काही घडलं ते एका विशिष्ट धर्माबाबत नाही. गुजरातमध्ये मुख्यतः शाकाहारी लोक राहतात. विद्यापीठातही त्याच विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. फक्त नमाज अदा करण्यावरुन हिंसाचार किंवा हाणामारी झालेली नाही.
या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी खाऊन त्याचं खरकटं इकडे तिकडे फेकलं. हा मुद्दाही कारणीभूत असू शकतो. हे सगळे विदेशी विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांना झालेली मारहाण ही चटकन समोर येते. मात्र नमाज अदा करणं हे एकमेव कारण असू शकत नाही. विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्तन आणखी जबाबदारीने केलं पाहिजे. आम्ही नमाज अदा करण्याच्या विरोधात जाऊ इतके असंवेदनशील आणि असहिष्णू नाही. मात्र विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्तन सुधारण्याची गरज आहे. त्यांनी आणखी जबाबदारीने वागलं पाहिजे.

अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मलिक यांच्या माहितीनुसार, या वसतिगृहात सुमारे 75 विद्यार्थी राहतात. रात्रीच्या वेळी काही विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीबाहेरच्या अंगणात नमाज अदा करत होते. त्याचवेळी काही लोक आले आणि त्यांनी विद्यार्थी इथे नमाज का अदा करत आहेत?”अशी विचारणा केली. त्यामुळे दोन गटांत वादावादी झाली, त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. घटनास्थळी एकूण 25 जणांनी दगडफेक केली. आता नऊ पथके तपासात गुंतली आहेत. रुग्णालयात दोन विद्यार्थी दाखल आहेत, त्यापैकी एक श्रीलंकेचा आणि दुसरा तजाकिस्तानचा आहे.
अमित शाह आणि नरेंद्र मोदी मजबूत संदेश देण्यासाठी हस्तक्षेप करतील का?
गुजरात हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य आहे. ते एक मजबूत संदेश देण्यासाठी हस्तक्षेप करतील का? परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गुजरात विद्यापीठात नमाज पठणावरून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भांडणावर वक्तव्य केले आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी याप्रकरणी कठोर कारवाई आणि सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालय गुजरात सरकारच्या संपर्कात आहे. सुमारे 300 परदेशी विद्यार्थी गुजरात विद्यापीठात शिकतात आणि सुमारे 75 परदेशी विद्यार्थी ए ब्लॉकमध्ये (वसतिगृह) राहतात.
नमाज पठण करण्यास विरोध करणाऱ्या तरुणांपैकी एकाला विद्यार्थ्याने थप्पड मारल्याने वाद आणखी वाढल्याचे सांगितले जाते. यानंतर तेथे बाचाबाची होऊन वसतिगृहात तोडफोड झाली. ज्या व्यासपीठावर बसून विद्यार्थी नमाज पठण करीत होते, त्याच व्यासपीठावर गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव संपून आठ महिने झाल्यानंतर तिथे नमाज पठण केल्याने काही बिघडणार नव्हते; परंतु उन्मादींना कारण पुरते. नमाज अदा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठाच्या भिंतीवर अरबी भाषेत काही लिहिले होते, ते गैर आहे.
विद्यपीठाने भिंतीवर लिहिलेले काय आहे, हे अरबी येणाऱ्यांकडून जाणून कारवाई करायला हवी होती. आता आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत; परंतु अगोदरच कारवाई केली असती, तर प्रकरण एवढे वाढले नसते. पोलिसांनी वसतिगृहातील दगडफेकीशी संबंधित अनेक पुरावेही गोळा केले असून त्याआधारे आरोपीची ओळख पटली आहे. तो एका संघटनेशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
(साभार – लोकमंथन)






