सकाळी सहा-सातच्या सुमारास पुणे शहराच्या अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मजूर अड्ड्यावर एक वेगळंच दृश्य दिसतं. यात्रा असल्यागत लोक जमलेले असतात. पण, ही यात्रा नसते तर, पोटा-पाण्यासाठी जमलेला गराडा असतो… जेवणाचा डब्बा, कामासाठी लागणारं साहित्य, भरलेली वायरची पिशवी एका हातात घेऊन चहुबाजूने रोजगाराच्या आशेने डोळे भिरभिरत असंख्य लोक उभी राहिलेली असतात. ही लोकं कुठून आलेत? का आलेत? रोजगार मिळतो का? असे असंख्य प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मजुरांची मांडलेली कैफियत…
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने शहराच्या कात्रज, कोंढवा, आंबेगाव, धनकवडी, उत्तमनगर, वारजे आदी भागात येतात. त्यातील मराठवाडा आणि विदर्भातील लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. यात अनेकजण अशिक्षित असल्याने रोजगार मिळावा, यासाठी हे लोक मजूर अड्ड्यांचा आधार घेत असतात. शहरात कात्रज परिसरातील दत्तनगर रस्ता, कात्रज चौक, गोकुळनगर चौकाजवळ मजूरांचे अड्डे आहेत. तसेच वारजे नाका येथेही एक मोठा मजूर अड्डा आहे. या मजूर अड्ड्यावर तास अन् तास प्रतिक्षा करुन देखील मजूरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे दिसून येते.

मजूर अड्ड्यावरील काही मजुरांशी बोलताना समजलं की, महिला मजुराला चारशे ते पाचशे रुपये तर पुरुष मजुराला सहाशे ते आठशे रुपये अशी हजेरी आहे. त्यापेक्षा कमी दरात काम करायला तयार आहोत, पण कामच मिळत नाही. दररोज आम्ही मजूर अड्ड्यावर येतो. आठवडाभरातून तीन ते चार दिवसच काम मिळत. कधी-कधी दुपारपर्यंत कामाची वाट पाहून घरी जाव लागतं. ही सर्वच मजुरांची परिस्थिती असल्याचे तेथील मजूर सांगतात.
वीस ते पंचवीस वर्षांच्या युवकांपासून ते साठ ते पासष्ठ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मजूर या अड्ड्यावर दिसून येतात. हाताला काम मिळावं, या आशेने सकाळपासून रस्त्त्यावर उभी असतात. एखादा गा़डी घेऊन माणूस आला की, काम मिळावं म्हणून मजूरांचा घोळका होतो. सगळ्यांनाच कामाची गरज असते. परंतु एखाद्यालाच काम मिळतं. उरलेले मजूर पुन्हा कुणाची तरी वाट पाहत बसतात. बिहार, उत्तरप्रदेश या भागातून आलेल्या मजुरांची संख्या वाढलेली दिसते. कमी पैशात काम करतात म्हणून मागणी पण जास्त आहे. सध्या वातावरणाचा परिणाम हा सतत मराठवाडा, विदर्भ या भागात दिसून येतो. त्यामुळे या भागातून येणाऱ्या लोकांची संख्या मजूर अड्ड्यावर वाढलेली दिसते. कामासाठी स्पर्धा वाढल्याने मजुरांना कमी पैशात मिळेल, ते काम करावं लागतं. त्यात महिला कामगारांना मिळणारे पैसे अल्पच.
सोलापूरहून कामासाठी आलेल्या सुनीता चव्हाण सांगतात, ‘कमी वयात लग्न झालं, दोन मुलं झाली. काही दिवसांनी नवरा सोडून गेला. पदरात दोन मुलं होती, काम करून पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता. गावामध्ये कामधंदा नाही. शेती असून काय पिकत नाही. म्हणून कामासाठी पुण्याला आले. मुलं शाळेत जातील म्हटलं, तर जवळ कुठे शाळा नाहीत. घरी सोडून जावं तर भीती वाटते. त्यामुळे दोन्ही मुलांना कामाला घेऊन जावं लागतं. सकाळी आठ वाजता मजूर अड्ड्यावर जाऊन उभं राहावं लागतं. काम मिळालं तर बरं नाहीतर परत यायचं. आठवड्यातील दोन -तीन दिवस तर कामच मिळत नाही. गवंड्यांच्या हाताखाली विटा उचलणे, माल देणे हे काम करावं लागतं. दिवसभराची मजुरी चारशे किंवा पाचशे रुपये देतात. ‘ ठेकेदारांकडून रोजच काम मिळतं. पण कमी पैशात राबावं लागत. काही ठेकेदार बाहेरील राज्यातले असल्यामुळे त्यांचं काम झाल्यावर निघून जातात. त्यामुळे आमचे पैसे बुडतात. माझे तर दहा हजार रुपये दिले नाहीत. काम केलं तर मुलांचं भविष्य आहे. त्यामुळे राबावं लागतं.’

मढेवाल नावाचे मजूर सांगतात, ‘गाव सोडून कामासाठी पुण्यात आलो. सकाळी आठ वाजता जातो. संध्याकाळी सहापर्यंत काम करावं लागतंं. कधी सात पण वाजतात. कधी-कधी काम असतं. कधी नसतं. काय करायचं मजबुरी आहे. काम करूनच खायचं, स्वतःचं घर नाही. महिना तीन-चार हजार रुपये भाड्याने खोली घेऊन राहतो. तीन पोरं आहेत मला. दोन पोरांची लग्न झालीत. एक पोरगा आणि मी वेगळं राहतो. पोरालाही कधी काम मिळतं, कधी नसतं. काम नाही मिळालं तर उपाशी राहावं लागत. लय कष्ट करावं लागतंय, शरीर साथ देत नाही, तरी पोटासाठी करावं लागतंय. पुण्यात आता पहिल्यासारखं काम मिळत नाही. कामच नाहीत. बिगारी म्हणून तीनशे -चारशे रुपयात काम करावं लागतं. जगणं लय मुश्किल झालंय. सरकारने काहीतरी आमच्या गरिबांसाठी करायला पाहिजे. नाहितर आमचं जीवन असंच.”
‘मी धुण्याभांड्याची काम करते. घरटी महिन्याचे दोन हजार मिळतात. महागाई इतकी वाढली. तेवढ्या पैशानं काय होणार. कधी कधी आजारपण येतं, खूप काटकसर करून पैसे खर्च करावे लागतात. मला दोन मूलं आहेत. त्यात एक मुलगा नाही राहिला. एक मुलगा वेगळा राहिला. त्याने स्वतःचं रेशनकार्ड काढलं. दुसऱ्या मुलाचं रेशनकार्ड आहे. तो गेल्यावर त्याच्या रेशनकार्डात माझी नोंद करून घेतली. पण त्यावर शिक्का नाही. म्हणून धान्य मिळत नाही. शिक्का मिळावा, म्हणून किती हेलपाटे घातले. अजून शिक्का मिळाला नाही. शिक्याचं आता बंद झालंय. म्हणून सांगतात. मग जे धान्य मोफत मिळतं, ते तर आम्हाला द्यावं ना.’ सुमनताई डोळे पुसत पुसत सांगत होत्या. बीडच्या नंदाताई सांगतात, ‘गावाकडं शेतात रोजगार मिळत होता. पण आता शेतीच पिकत नाही. त्यामुळे मुला-बाळांना घेऊन पोटासाठी शहरात यावं लागलं .शहरात मिळेल ते काम करावं लागत.’

पाण्याची टंचाई, सतत होणारी पीकांची नासाडी तर दुसरीकडे लागवडीमुळे मिळणारे कमी उत्पन्न यामुळे राज्यातील शेतीची अवस्था बिकट झाली आहे. दरवर्षी कोरड्या हंगामात (नोव्हेंबर ते मे) बीड जिल्ह्यातील गावांना तीव्र हंगामी बेरोजगारीचा सामना करावा लागतो. दुबळ्या हंगामात हजारो लहान आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबं साखर कारखाने आणि वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी राज्यातील इतर जिल्ह्यांत आणि राज्याबाहेरही स्थलांतर करत असतात. त्याचप्रमाणे बीडमधील ग्रामीण भागात शेतात काम करणारे पुरुष आणि महिला देखील शहरात स्थलांतर होतात. बदलत्या वातावरणामुळे शेतीच गणित तर बिघडतंच. त्याचबरोबर लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनावर परिणाम होतो.






