‘मृग’ हे विशेष देखणं नक्षत्र. हरिणाचे चार पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा, असा भासणारा हा तारकासमूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो. माऊलीच्या दुग्धापरी /आले मृगाचे तुषार / भुकेजल्या तान्ह्यासम / तोंड पसरी शिवार… ही ग.दि. माडगूळकरांची कविता बर्याच जणांनी शाळेत असताना वाचली असेलच, किंवा सत्तावीसातून नऊ गेले उरले शून्य ही अकबर बिरबलाची कथा पण आठवतच असेल. तर त्या नऊ नक्षत्रापैकी पहिले नक्षत्र म्हणजे मृग नक्षत्र!
भारतात पावसाच्या आगमनाची बातमी हवामानशास्त्र विभाग देत असतो. वैज्ञानिक निकषांची पूर्तता झाली की, पाऊस कधी येणार? हे जाहीर केलं जातं. पण जसं वैज्ञानिकांचे काही निकष असतात तसेच काही नैसर्गिक निकष देखील असतात जे पूर्ण झाले की पावसाच्या आगमनाची वार्ता सर्वांना मिळते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जंगल, माळरान, शेते तुडवीत असताना पावशा (कॉमन हॉक कक्कू) नावाचा एक पक्षी दिवसभर ओरडताना आढळतो- ‘पेरते व्हा, पेरते व्हा.’ बळीराजाही जणू काही त्या पक्ष्याच्या सांगण्यावरून शेतीच्या कामांना सुरुवात करतो. ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात! बळीराजा पेरणीला सुरुवात करत असतो. मात्र पेरणीला नक्की सुरुवात केव्हा करायची, हे समजण्यासाठी आणखी एक महत्वाचा घटक कारणीभूत ठरतो. तो म्हणजे… ‘मृग किडा’.

लाल मखमली माइट लहान कीटक आणि त्यांची अंडी अन्न म्हणून खातात.
अवघ्या 4 मिमी. लांबीचा रंगाने लाल व अंगावर मखमल पांघरलेला, मऊ, चमकदार असा हा मृग किडा वर्षभर सुप्तावस्थेत असतो आणि मृग नक्षत्राला सुरूवात झाली की हा किडा बघायला मिळतो म्हणूनच या दुर्मीळ अशा किड्याला मृगाचा किडा म्हटलं जातं. इंग्रजीत ‘रेड वेलवेट माईट’ असं नाव असलेल्या या किड्याला भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जसे की महाराष्ट्रात मृग नक्षत्र किडा, गोसाई(गोसावी) गडचिरोली बोली भाषेत लाल बोआ, मिरगाचा किडा, छत्तीसगड मध्ये राणी किडा, ओरिसामध्ये साधव बाव, राजस्थानमध्ये तीज आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सावन की बुढ़िया, संस्कृत मध्ये बिरबहूटी अशी या किड्याची नावं आहेत.
पहिल्या पावसाच्या सरींनंतर वर्षभर सुप्तावस्थेत असलेला मखमली असा ‘मृगाचा किडा’ दिसू लागतो. तापलेल्या जमिनीवर पाऊस पडू लागला की, जमिनीत एक ओलावा निर्माण होऊ लागतो. तेव्हाच हा किडा दिसू लागतो. त्या किडयाचे दिसणे म्हणजेच त्याचा अर्थ शेतकरी असं लावतात की पेरणीसाठी जमिन शेती पिकवण्यास सज्ज झाली आहे. आणि तेव्हा पेरणी सुरु करायला हरकत नाही!

सूर्यप्रकाश आणि उष्णता वाढली की ते जमिनीत लपतात.
पहिल्या पावसानंतर केवळ तीन आठवडे हा जमिनीवर राहून नंतर वर्षभरासाठी गायब होतो. पहिल्याच पावसात या किड्यांचा प्रजननाचा, मिलनाचा काळ असतो. म्हणून हा किडा मृगाच्या पावसात मादीला आकर्षित करण्यासाठी जमीनीवर येतो. मृगाचा पाऊस सुरू झाला की, मृग किड्यांचा प्रजनन काळ सुरू होतो. या किड्याची मादी ओल्या मातीत अंडी घालते. दोन महिन्यांत या अंड्यांतून लहान किडे बाहेर पडतात. मादी किडा सुमारे 60 हजार ते एक लाखांपर्यंत समूहाने अंडी घालते आणि टप्प्याटप्प्याने त्यांची वाढ होत जाते. पूर्ण वर्षात पावसाच्या पहिल्या नक्षत्राच्या वेळी फक्त 15 ते 20 दिवस हा किडा दिसतो. जस-जसं मृग नक्षत्र संपत जाऊन आद्रा नक्षत्र सुरु होतं, पावसाचा जोर वाढू लागतो, सूर्यप्रकाशाची तीव्रता संपल्यानंतर ते पुन्हा जमिनीत गाडून घेतात.
लहान वयाचे किडे मोठ्या किड्यांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांची अन्न भक्षण करण्याची पद्धतदेखील इतरांपेक्षा प्रचंड वेगळी असते. हे किडे एखादा लहानसा जीव जंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करुन त्याच्या शरीरातले रक्त पिण्यास सुरुवात करतात. मोठ्या किड्यांना साधारणपणे आठ पाय असतात. तर लहान किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत यांना सहा पायच असतात. पुढे तरुण झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणारे बदलांसोबत हे जास्तीचे दोन पाय दिसू लागतात. पण यांना कावळा, मैना, चिमणी अशा पक्ष्यांपासून जपून राहावे लागतं. कावळा, मैना, चिमणी, अन्य पक्ष्यांचे हा मृग किडा भक्ष्य आहे. या किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीचंच असतं. साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत.

त्यांच्या अंगावरील अतिशय बारीक फर मुळे ते मखमली दिसतात म्हणून त्यांचे नाव लाल मखमली माइट आहे.
शेतकऱ्यांचा मित्र
मृग किड्याची पिल्ले गोचिड माशा, नाकतोडे, इतर निरुपद्रवी किटकांना चिकटून पोषण करतात. पूर्ण वाढ झालेले मृग किडे पालापाचोळा आणि मातीवरील बुरुशीची अंडी खाऊन टाकतात. मातीतील बुरशी नष्ट झाली की, पिके चांगली येतात. शेतकऱ्यांचा हा मित्र आहे, तो यासाठीच.
वैज्ञानिकदृष्ट्या देखील या किड्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या किड्यांमध्ये हजारो वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ज्या संपूर्ण जगभर सापडतात. विशेषतः कॅनडा ते आफ्रिका इथल्या भूभागांमध्ये हे किडे मोठ्या प्रमाणात दिसतात. विविध भूभागांनुसार यांच्या आकारातदेखील फरक पडत असतो. या प्रकारचा सापडलेला सर्वात लहान किडा दोन सेंटीमीटर लांबीचा आहे. मात्र या किड्याची भारतात सापडणारी प्रजाती दुर्मिळ आहे. म्हणून त्याचं जास्त अप्रूप आहे.

लाल मखमली माइट ओल्या मातीत शेकडो अंडी घालते.
मात्र हे किडे आता इतके दुर्मिळ होतील की, खूप कमी प्रमाणात बघायला मिळतील, अशी शंका उपस्थित होतेय. गावात हे किडे दिसणं तुलनेनं कमी झालंय. तर पूर्वी शहरातील काही ठिकाणी हा आढळत होता पण वाढलेलं जमिनीचं प्रदूषण, प्लास्टिकचा वारेमाप वापर, यामुळे शहरात याचे दर्शन क्वचित झालं आहे. उनांमध्ये, शेतात अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे 1990 ते 2020 या दरम्यान किड्यांच्या 25 टक्के प्रजाती पृथ्वीवरून दिसेनाशा झाल्या आहेत.
मृगाच्या किड्याला निसर्गतः जास्त शत्रू नसले तरी, मानव हा आता त्याचा मुख्य शत्रू झाला आहे. वंशपरंपरेने आदिवसींना ज्ञात असलेले त्याचे औषधी गुणधर्म आता बहूराष्ट्रीय कंपन्यांनाही माहित झाले आहेत. त्यामुळे किडे गोळा करणे हे आदिवासींच्या अर्थाजनाचे साधन झाले आहे. पूर्वांपार या किड्याचा उपयोग अतिसारा वरील औषधात होतो. या किड्याचे तेल अर्धांगवायूत (paralysis) रामबाण उपाय म्हणून वापरतात. त्याचा उपयोग लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी देखिल होतो. याच कारणासाठी छत्तीसगड मधील आदिवासी नवपरीणीत दांपत्याला मृगाचा किडा भेट म्हणून देण्याची परंपरा आहे. गडचिरोली मध्ये हा किडा रक्त वाढ करण्यासाठी, दमा साठी, त्वचा रोग, चेहऱ्यावर येणाऱ्या पुरड साठी ह्या किडयाना खाल्ले जाते.

प्रौढ लाल मखमली माइट.
जैवविविधतेवर परिणाम
जमिनीची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या मृगाचा किडा किंवा राणी किडय़ाला रासायनिक खते, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे अधिवासाला फटका बसून त्यांचे दर्शन दुर्मीळ होऊ लागले आहे. यंदाही त्याचे अस्तित्व फारसे जाणवले नाही. हा किडा जमिनीत एक विशिष्ट प्रकारचा स्राव सोडतो. त्यामुळे मातीला बुरशी लागत नाही. तसेच पालापाचोळा कुजण्याच्या प्रक्रियाला हातभार लावत त्याचे खत बनवून जमिनीची सुपीकता वाढवतो. हिवाळय़ाच्या सुरुवातीपासून हा किडा समाधी घेऊन थेट मृगाचा पाऊस झाला की पुन्हा अवतरतो. मात्र रासायनिक खते, कीटकनाशकांचा वाढता वापर, नष्ट होणारे गवताळ प्रदेश याचा फटका मृगाच्या किडय़ाला बसत आहे. या किडय़ाच्या संवर्धनासाठी प्रयत्न न झाल्यास त्याचा जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
छायाचित्रः डॉ. धर्मेंद्र खांडल






