आपल्याकडची यंत्रणा फार मजेशीर काम करते आणि गेल्या एकदोन आठवड्यात घडलेल्या घटनानंतर तर अधिकच…म्हणजे बघा, घाटकोपर येथे भलेमोठे अनधिकृत होर्डिंग कोसळून 17 जणं दगावले आणि शहरातील सगळ्या होर्डिंगविरुद्ध कठोर कारवाई करायला यंत्रणेने सुरूवात केली… पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण घडलं आणि लगेचच यंत्रणेने अल्पवयीन मुलांना मद्य देणाऱ्या पब, बार आणि वाईन शॉपवर कारवाई करायला सुरूवात केली… डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात लागलेल्या आगीत 12 जण दगावले आणि यंत्रणेने एमआयडीसी परिसरातील अनेक रासायनिक कंपन्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली… गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनला लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आणि यंत्रणेने अनधिकृत गेमिंग झोन चालकांविरुद्ध मोहीम सुरू केली… दिल्लीत बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयाच्या आगीत सात नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आणि यंत्रणेने परवाना नसणाऱ्या खासगी रुग्णालये बंद करण्याचा धडाका लावला…

जिप्सींनी घेरलेली वाघीण
आता याच शृंखलेत आणखी एक घटना नुकतीच घडली आणि तिथेही सरकारी यंत्रणेला घटना घडल्यानंतर जाग आली. दोन दिवसांपूर्वी एक संतापजनक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. ताडोबा अभयारण्यात टी-114 ही वाघीण कच्च्या रस्त्यावर दिसताच आसपासच्या जिप्सींनी तिला घेरले. वाघिणीला मागेपुढेही जाणे शक्य नव्हते. अनेक वाहनांनी कोंडी केल्याने गोंधळलेल्या या वाघिणीचे छायाचित्र व्हायरल झाले आणि हा प्रकार उघड झाला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) ‘टी 114’ ही वाघीण रस्त्यावर आली असता जिप्सी वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली. वाघिण वाहनाच्या गर्दीत पूर्णतः अडकल्याने वाघिणीच्या भ्रमणमार्गांत अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे ताडोबातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यंत्रणा लगेगच कामाला लागली आणि याप्रकरणी ताडोबा प्रशासनाने 25 जिप्सी चालक व मार्गदर्शकांवर कारवाई केली. त्यानंतर आता जिप्सींना ‘रिव्हर्स’ आणि ‘यू-टर्न’ घेण्यावर बंदी घातली आहे.
केवळ ताडोबाच नाही तर देशातल्या कोणत्याही व्याघ्रप्रकल्पातील पर्यटकांचे अनुभव अभ्यासा. ते याच पद्धतीने व्यक्त होताना दिसतील. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात पर्यटन सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विस्तृत नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेत वाहन चालक, मार्गदर्शक आणि पर्यटकांनी या नियमांची पायमल्ली केल्याचे आणि वाघासोबतच आपलाही जीव धोक्यात घातल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पर्यटक वाहनांमध्ये ही वाघीण पूर्णत: अडकली होती. तिच्या देहबोलीवरून ती अस्वस्थ आणि घाबरलेली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर ताडोबा व्यवस्थापनाने वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहनांवरील पर्यटक मार्गदर्शकांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, तर चालकांवर कायमची बंदी लादण्यात आली आहे. प्रत्येक वाहनावर तीन हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ताडोबातील जिप्सीसाठी नवा नियम जारी करण्यात आला आहे.

‘बघिरा अॅप’ काय फक्त शोभेसाठी आहे का?
खरं म्हणजे हे असे प्रकार टाळण्यासाठीचे सगळे उपाय आपल्याकडे आहेत. वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटनदरम्यान पर्यटक वाहनांकडून होणाऱ्या वाहनाच्या गतीचे उल्लंघन, एकापेक्षा अधिक वाहनांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी, ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ थांबणारी वाहने या गोष्टी टाळण्यासाठी ‘बघिरा अॅप’ या नावाची एक यंत्रणा आहे. व्याघ्रप्रकल्पात रोज किती वाहने सोडावीत, त्यांच्यात अंतर किती असावे, वाहनांची गर्दी होणार नाही यासाठी वेळा कशा निश्चित कराव्यात यासंबंधीचे नियम राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने कधीचेच तयार केले आहेत. त्यांचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आल्यावर प्रत्येक वाहनावर ‘बघिरा ॲप’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा सर्वप्रथम उपयोग सुरू झाला तो मध्य प्रदेशात व नंतर महाराष्ट्रात. यावरून कोअर व बफर क्षेत्रात वाहनांची गर्दी कुठे झाली, कुणी नियम मोडले हे पटकन कळते. या ॲपवर नियंत्रण असते ते प्रकल्पातील अधिकाऱ्यांचे.
वाहनांचा वेग आणि गर्दीचा मागोवा घेण्यास हे ‘अॅप’ अतिशय उपयुक्त आहे. वाहनचालक, पर्यटक मार्गदशक यामुळे प्राधिकरणाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू शकणार नाही. कारण या ‘अॅप’च्या माध्यमातून व्यवस्थापनाची नजर त्यांच्यावर असते. सीमा नसलेला भ्रमणध्वनी पर्यटक मार्गदर्शकाकडे दिला जातो. त्यात हे ‘बघिरा अॅप’ अंतर्भूत असते. या अॅपमध्ये वाहनांची गती, ते वाहन कुठून जात आहे, किती वेळ थांबले आहे, या सर्वाची नोंद होते. मात्र असे असले तरी ताडोबाच्या या ताज्या घटनेतून हे ॲप केवळ शोभेची वस्तू ठरल्याचेच सिद्ध झाले आहे.

गंमत म्हणून वाघ ‘बघायला’ जाणाऱ्या पर्यटकांना आडकाठी करण्याची वेळ आली आहे.
12-15 वर्षांपूर्वी ‘वाघ दिसणे’ इतके सहजसाध्य नव्हते. पण वनविभागाचे योग्य नियोजन आणि संरक्षण, संवर्धन यातून वाघांची संख्या वाढली. पूर्वी फक्त ताडोबाच्या गाभा क्षेत्रातच दिसणारे वाघ आज बफर झोनसह चंद्रपूरच्या इतर संरक्षित क्षेत्रातही दिसू लागले आहेत. त्यात वेगवेगळे इव्हेंट आणि पर्यटन वाढीच्या नावाखाली वाघ केंद्रस्थानी आला, वन पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढले. वन्यजीव पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरला वाघ. देशी-विदेशी पर्यटक वाघ बघण्यासाठी गर्दी करू लागले. सोशल मीडियावर वाघांचे वेगवेगळ्या मुडमधले फोटो झळकू लागले आणि यातूनच वाघ्र पर्यटन नको तितके फोफावले. खरंतर महाराष्ट्र हे तसे विस्तीर्ण राज्य. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या प्रांतातल्या वनांचे प्रकार, पर्जन्यमान हे विभिन्न आहे पण वन विभागाचे व्यवस्थापन सर्व ठिकाणी एकसारखेच! पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न आहे. पण इथल्या जैवविविधतेच्या संवर्धन, संरक्षणात अक्षम्य दुर्लक्ष झाले, का? – तर याठिकाणी व्याघ्र दर्शन नाही! व्याघ्र दर्शनासाठी विदर्भातील जंगलांवर पर्यटकांचा दबाव वाढला. वनस्पतींचे निरीक्षण करणे, त्या ओळखणे, त्यांचे महत्त्व समजून घेणे, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवणे यासारख्या आनंददायी तसेच संवर्धनात हातभार लावणाऱ्या उपक्रमांना म्हणावी तशी चालना देण्यात वनविभाग कमी पडला हेही खरेच!
ताडोबा हे काही प्राणी संग्रहालय नाही. घरातले मांजरदेखील धोका वाटल्यास आक्रमक बनते. ‘माया’सारख्या शांत वाघिणीने देखील एका महिला वनरक्षकाचा बळी घेतला होता. इतक्या गाड्यांनी घेरलेल्या वाघाने जर एखाद्या गाडीवर हल्ला केला असता तर? – मग त्या वाघाच्याच डोक्यावर नरभक्षक असल्याचा शिक्का मारला गेला असता. वन्य प्राणी आणि वने ही फक्त पर्यटनासाठी नसून या परिसंस्था आपल्या जगण्या-मरण्याचा अविभाज्य घटक आहेत. वनांमुळे शुद्ध हवा, पाणी, संसाधन मिळते आणि या वनांचा संरक्षणकर्ता वाघ आहे. त्याचा आदर करा. निसर्गात वाघांबरोबरच इतरही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत. गंमत म्हणून वाघ ‘बघायला’ जाणाऱ्या पर्यटकांना आडकाठी करण्याची वेळ आली आहे.






