फासेपारधी समाज हा एक भटका समाज… शिकार हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. पक्षी, ससे, तितिर यांची शिकार करून विकणे आणि आपला उदरनिर्वाह चालवणे हा त्यांचा पारंपरिक उद्योग. शिकारीवर बंदी आल्यानंतर काही बेड्यांचे पुनर्वसन सरकारने केले. त्यांना घरे बांधण्यासाठी जागा दिली, मात्र उदरनिर्वाहासाठी काही मदत मिळाली नाही. पोटापाण्यासाठी कापूसवेचणीच्या कामावार काही कुटुंबे स्थलांतर करतात, तर काही कुटुंबे पश्चिम बंगाल, ओरिसा अशा दूरच्या राज्यांमध्ये जाऊन कटलरीचा व्यवसाय करतात. त्यांच्या कामांच्या ठिकाणी त्यांचे अतोनात शोषण होते. अपुरी मजुरी, निवासाची सोय नाही, आणि कुठेही चोरीमारी झाली की विनाकारण पाठीमागे लागणारा पोलिसांचा ससेमिरा. अन्न-वस्त्र-निवारा या जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टींची भ्रांत असताना, मुलांचे शिक्षण दुर्लक्षित राहणे साहजिकच आहे.

साहेबराव राठोड अशाच एक कुटुंबात वाढला. साहेबरावच्या आजोबांच्या पिढीपर्यंत हा व्यवसाय सुरू होता. शिक्षणाचे महत्त्व समजल्याने, अशा परिस्थितीतून कसेबसे, धडपडत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. तो त्यांच्या समाजातला पहिला पदवीधर ठरला. पदवीधर झाल्यानंतर आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून विचार करताना त्याला हे प्रकर्षाने जाणवले की आपल्या समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याने आपल्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले.
हे काम अतिशय अवघड होते /आहे. कारण पालक भटके, स्थलांतरित जीवन जगतात, मुलेही त्यांच्याबरोबर भटकत असतात, त्यामुळे शाळेत नियमित जाऊ शकत नाहीत. भाषेचाही प्रश्न येतो कारण या मुलांची मातृभाषा वाघरी आहे. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे हे काम तसा कुठलाही अनुभव नसताना करणे त्याच्यासाठी कठीण होते आणि आहे. या कामात त्याला त्याचा मित्र मंगेश पवार, जो आता द्विपदवीधर झाला आणि त्याची पत्नी सकीना यांची साथ मिळाली. घरची जबाबदारी सांभाळून त्याचे हे काम सुरू आहे.
अकोला जिल्ह्यातल्या टिटवा (बेडा) मध्ये अक्षरभूमी नावाचे अभ्यासकेंद्र तात्पुरते उभारले आहे. गेल्या वर्षी आणि याही वर्षी झालेल्या गारपीटीमुळे हे केंद्र कोलमडले. पण पुन्हा मदत मिळवून जिद्दीने काम सुरू आहे. या कामासाठी झेप नावाची संस्था सुरू केली. या संस्थेद्वारा चालवल्या जात असलेल्या या केंद्रात सुरुवातीला मुलांना वाघरी भाषेतून शिक्षण दिले जाते, त्यासाठी या उपक्रमशील युवकांनी मुलांसाठी शिक्षण साहित्य तयार केले आहे. त्याच्या या प्रयत्नातून टिटवा बेड्यावरची सुमारे 40 मुलं मुख्य प्रवाहातल्या शाळेत जोडली गेली आहेत. सध्या ते झेप संस्था आणि अक्षरभूमी शाळेच्या माध्यमातून वडाळा आणि टिटवा या बेड्यावरच्या सुमारे 107 मुलामुलींबरोबर काम करत आहेत.

हे काम करण्याचे प्रशिक्षण घेण्याचा त्याने प्रयत्न केला. 2018 मध्ये मिळालेल्या कोरो फेलोशिपमुळे खूप मदत झाल्याचे तो सांगतो. शिक्षणाच्या कामाबरोबरच आपल्या समाजाचे, अकोला जिल्ह्यातील शेतीच्या, शेतकर्यांच्या प्रश्नांवर तो नियतकालिकातून नियमित लिहीत असतो. आपल्या मुलांचं जगणं, शिकणं, त्यांना असलेल्या परंपरागत ज्ञानाचा उपयोग करून शिकवण्याचे त्याचे प्रयोग याबद्दल त्याचे लेखन प्रकाशित होत असतात. त्याच्या ब्लॉगवरही तो आपल्या प्रयोगांबद्दल नियमितपणे लिहीत असतो. त्याच्या समाजातील लोककथा, मुलांचे अनुभव वाघरी आणि मराठी अशी द्विभाषिक पुस्तके प्रकाशित करण्यासाठी तो प्रकाशक शोधत आहे.
आपल्या या प्रवासाबद्दल साहेबराव सांगतो की, शिक्षणावरचं हे काम 2019 पासून तांडाशाळेच्या माध्यमातून सुरू झालं. सुरुवातीला वडाळा आणि मग टिटवा (बेडा) वर तांडाशाळेचं काम सुरू झालं. तांडाशाळेचं हे काम करत असतांना आम्हाला मुलांकडून येणार्या प्रश्नांवर काम करणंही आवश्यक वाटलं. जसं की सतत गैरहजर राहणार्या मुलांची व शाळाबाह्य मुलांची नोंद करणे, मराठी न येणाऱ्या मुलामुलींना वागरी, पारधी भाषांतून शिक्षण देणे इत्यादी. मुख्य शाळेत जाण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून तांडाशाळेच्या माध्यमातून शिवारफेरीचं आयोजन केलं, खाद्यसंस्कृतीवर थाळी प्रकल्प राबवले, आपल्याच बेड्याचा इतिहास शोधणे, गवतांची, पक्ष्यांची-प्राण्यांची नोंद करणे, मुलांकडून हर्बेरियम बनवून घेणे, भोकर, चार, नीम, आंबा, आपटा, चिंच अश्या झाडांच्या बियांचं संकलन मुलांना करायला लावणे, पळसाच्या फुलापासून रंग तयार करायला लावणे असे अनेक प्रकल्प, उपक्रम राबवले गेले. परिणामी तांडाशाळांमध्ये मुलांचा सहभाग वाढला.
या द्विभाषिक पुस्तकांमुळे आपले अनुभव वाचताना मुलांना शिक्षण आपल्याही जीवनाशी जोडलेले आहे असे लक्षात येऊन मुलांना शिक्षणात गोडी वाटू लागेल. सर्वच समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगणारा, शिक्षण नसल्यामुळे अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकलेला, त्यांच्या भागातील नेत्यांकडून, राजकारण्यांकडून आश्वासानांशिवाय काहीही मिळत नाही. अशा परिस्थितीत त्याला आर्थिक मदतीचीही गरज आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचा सामाजिक जाणीव निधी मिळवण्यासाठी कराव्या लागणार्या खटपटीसाठीही मदतीची गरज आहे.

त्याच्या कामाची तळमळ आणि निष्ठा पाहून यावर्षीचा आनंद निकेतन या नाशिकच्या संस्थेतर्फे दिला जाणारा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार साहेबराव राठोडला जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या रुपाने मिळणारी मदत तुटपुंजी आहे याची आम्हाला जाणीव आहे, मात्र अशा या धडपडणाऱ्या तरुणांच्या कामाचे कौतुक, त्याच्या बाळपावलांना स्थिरावण्यासाठी थोडासा हातभार आणि नाउमेद न होता हे काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या वर्षीचा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार साहेबराव राठोड यांना देण्याचे निश्चित केले आहे, असे संस्थेच्या आयोजकांनी म्हटले आहे.





