छत्तीसगड परिसरात एकीकडे सुरक्षा दलांच्या आक्रमक कारवाईत माओवादी चळवळ पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या हालचाली वाढत असताना दुसरीकडे माओवादीदेखील शांत बसायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली… छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात कैक वर्षांपासून स्थानिक आदिवासींवर देशी औषधांच्या सहाय्याने उपचार करणाऱ्या हेमचंद मांझी यांच्यासंदर्भात ही बातमी आहे…
72 वर्षीय हेमचंद मांझी हे वैद्यराज या नावाने पंचक्रोशीत ओळखले जातात. गेल्याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता याच हेमचंद मांझी यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच, देशी औषधांनी केले जाणारे उपचारही थांबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे.

‘पद्मश्री’ परत करण्याचा निर्णय
रविवारी रात्री माओवाद्यांनी नारायणपूर जिल्ह्यातील चमेली आणि गौरदंड गावांतील बांधकाम सुरू असलेल्या दोन मोबाइल टॉवरना आग लावली होती. त्याचवेळी त्यांनी मांझी यांना धमकी देणारे फलक आणि पत्रके टाकली. पत्रकात मांझी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करतानाचे छायाचित्रही होते. नारायणपूरच्या छोटेडोंगर परिसरात आमदई घाटी लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यात मांझी यांनी मदत केल्याचा आणि त्यासाठी त्यांनी भरपूर पैसे घेतल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. मात्र मांझी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
खनिज प्रकल्पाला मदत केल्याचा माओवाद्यांचा आरोप
याही आधी माओवाद्यांनी मांझी यांच्यावर हे आरोप केले होते आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती. मात्र मांझी यांनी सोमवारीदेखील माओवाद्यांचे हे आरोप फेटाळून लावत या खाणीशी आपला काहीही संबंध नसल्याचे आपण आधीच गावकऱ्यांना स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा आणि पारंपरिक उपचार पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
‘माओवादी विचारतात, मला राष्ट्रपतींकडून पुरस्कार कसा काय मिळाला. मी पुरस्कार मागितला नव्हता. हा पुरस्कार मला लोकांची सेवा केल्यामुळे मिळाला आहे. मी 20 वर्षांचाही नव्हतो, तेव्हापासून आजारावर औषधे देत आहे,’ असे मांझी यांनी सांगितले. ‘त्यांनी खोटे आरोप करून माझ्या पुतण्या कोमल मांझी याची हत्या केली. माझे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहेत,’ असेही ते म्हणाले.

यापूर्वीही मिळाल्या होत्या धमक्या
गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी नारायणपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी दूर असलेल्या छोटेडोंगर भागार माओवाद्यांनी आमदई घाटी लोह खनिज प्रकल्पासाठी एंजट म्हणून काम केल्याचा आणि त्यासाठी भरपूर पैसे कमवल्याचा आरोप ठेवत कोमल मांझी याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी हेमचंद मांझी यांना नारायणपूर शहरात आणले होते. तिथे ते तीन पोलिसांच्या संरक्षणाखाली कुटुंबीयांसह एका भाड्याच्या घरात राहात आहेत. आमदई घाटीमध्ये जयस्वाल नेको इंडस्ट्रीज लिमिटेडला लोहखनिज प्रकल्प देण्यात आला आहे. मात्र नक्षलवादी दीर्घकाळापासून या योजनेला विरोध करत आहेत.
15 वर्षांचे असल्यापासून देशी इलाज
हेमचंद मांझी हे छत्तीसगडमध्ये वैद्यराज म्हणून ओळखले जातात. ते म्हणतात की, आमच्या भागात माझ्या लहानपणी ॲलोपॅथी फारशी प्रचलित नव्हती. जिल्ह्यात रुग्णालये नव्हती, त्यावेळी लोक फक्त घरगुती औषधांवर अवलंबून असायचे. त्यामुळे लहान वयातच मी जडीबुटींचे ज्ञान प्राप्त केले आणि देशी औषधांच्या सहाय्याने उपचार करू लागलो. सुरुवातीला तर मी उपचारासाठी कोणाकडूनही पैसै घेत नव्हतो आणि आताही मी फक्त नाममात्र दरात उपचार करतो.






