युएपीए (UAPA) सारख्या मोठ्या गुन्ह्याखाली पंजाबच्या तुरुंगात असलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यापैकी एक असणाऱ्या बेअंत सिंगचा मुलगा सरबजीत सिंग खालसा या दोघांच्या लोकसभा निवडणूकीतील विजयामध्ये एक साम्य आहे… या दोघांच्या विजयामुळे शिख समाजाच्या राजकारणाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.
काही दशकांपासून पंजाबमध्ये असे अनेक मुद्दे आहेत जे अद्याप सुटलेले नाहीत. शिख समाजाचा एक मोठा वर्ग कॉँग्रेस, शिरोमणी अकाली दर, आप आणि भाजप यासारख्या पारंपरिक राजकीय पक्षांवर अद्याप विश्वास ठेवत नाही हेच अमृतपाल आणि सरबजीत सिंग यांच्या विजयानंतर दिसून येत आहे.

पंजाब राज्यात 13 पैकी 7 जागा काँग्रेसने जिंकल्या असून आम आदमी पक्षाने 3 जागा जिंकल्या आहेत. शिरोमणी अकाली दलाने एका जागेवर तर दोन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. येथे भाजपचा सफाया झाला आहे. या सर्वांत अमृतपाल सिंग आणि सरबजीत सिंग खालसा या अपक्षांची चर्चा रंगली आहे. खादूर साहिब आणि फरीदकोट हे दोन्ही मतदार संघ पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील असल्याने दहशतवादाला बळ मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमृतपाल आणि सरबजीत यांच्या विजयानंतर पंजाबचे राजकारण ढवळून निघेल अशी शक्यता आहे.
अमृत पाल सिंग हा खलिस्तानी समर्थक ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आहे. तर सरबजीत सिंग खालसा हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेक-यापैकी एक असणा-या बेअंत सिंगचा मुलगा आहे. खादूर साहिब (पंजाब) येथून अमृतपाल सिंग तर फरीदकोट (पंजाब) येथून सरबजीत सिंग खालसा यांनी निवडणूक जिंकली. पण या विजयाने इथल्या पारंपरिक राजकीय पक्षांविरोधात शीख समाजात नाराजी आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथे फुटीरतावादाची नवी आघाडी फोफावण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे.
कोण आहे अमृतपाल सिंग?
अमृत पाल सिंग हा केवळ खलिस्तानी समर्थक नाहीत, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही आहे. अमृतपालवर एनएसएसह 16 गुन्हे दाखल आहेत. पंजाब पोलिसांनी त्याला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भिंद्रनवालेच्या रोडे गावातून अटक केली होती. तो सध्या आसाममधील दिब्रुगढच्या तुरुंगात एका वर्षाहून अधिक काळ कैदेत आहे. अशा परिस्थितीत त्याचे वडील बापू तरसेम सिंग आणि आई बलविंदर कौर यांनी प्रचार केला.
अमृत पालने खदूर साहिब लोकसभा मतदार संघात 404430 मते मिळाली. त्याने 197120 मताधिक्याने विजय मिळवला आहे. येथील गुरुद्वारा अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की गुरु नानक देव येथे सुमारे 5 वेळा आले होते. या महत्त्वाच्या जागेवर अमृतपालचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने तुरुंगातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली. पंजाबला ड्रग्जमुक्त करणे हा त्याचा मुख्य निवडणुकीचा मुद्दा होता.
2023 मध्ये केंद्रीय एजन्सी आणि पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. मार्च 2023 ते एप्रिल 2023 पर्यंत ही मोहीम सुरू राहिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अमृतपाल स्वत:ला खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले सारखा सादर करायचा आणि तो ड्रग्जच्या विरोधात मोहीम चालवत असल्याचा दावा करत असे. त्याने आपले हजारो समर्थक तयार केले होते. तसेच त्याने लोकांना लढण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारले होते. त्याला 4 लाखांहून अधिक मते मिळणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अजिबात चांगले लक्षण नसल्याचे बोलले जात आहे.

कोण आहे सरबजीत सिंग खालसा?
सरबजीत सिंग खालसा हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा आहे. त्याने फरिदकोर्टमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून 70,053 मतांनी विजय मिळवला. त्याला 298062 मते मिळाली. सरबजीत सिंगने आप उमेदवार करमजीत अनमोलचा पराभव केला. 2015 मध्ये गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करून तो चर्चेत आला होता. खरेतर तो इंदिरा गांधी यांच्या मारेक-याचा मुलगा असल्यामुळे वादात सापडला होता. पण शीख संगतच्या सांगण्यावरून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्याने म्हटले होते. अमली पदार्थांचे सेवन, गरीब शिक्षण, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवरून त्याने निवडणूक लढवली.
45 वर्षीय सरबजीत सिंग खालसा हा मोहालीचा रहिवासी आहे. त्याला राजकीय वारसा आहे. 1989 मध्ये त्याची आई बिमल कौर खालसा या रोपरमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. तर आजोबा सुचा सिंग यांनी भटिंडा मतदारसंघातून विजय मिळवला होता. दोघेही शिरोमणी अकाली दल (अमृतसर) तिकिटांवर लढले होते. हाच वारसा पुढे चालवत सरबजीत सिंगने 2004, 2007 आणि 2014 मध्ये निवडणूक लढवली. त्यावेळी त्याला दोनदा शिरोमणी अकाली दल (अमृतसर) आणि एकदा बहुजन समाज पार्टीने तिकिट दिले होते.
कट्टरपंथीयांची वाढती लोकप्रियता वाढत असल्याचे निवडणूक निकालांवरून दिसते आहे. ही राज्यातील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारसाठी सर्वात मोठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री मान यांच्याकडे अशा विघातक मानल्या जाणा-या शक्तींचा उदय रोखण्याची बुद्धिमत्ता आणि राजकीय परिपक्वता आहे का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, निवडणूक निकालातील या घडामोडीचा पंजाबच्या राजकारणावर तात्काळ प्रभाव पडेल अशी अपेक्षा नसली तरी, पंजाबमध्ये काँग्रेसने आप सोबत युती न केल्याचा हा थेट परिणाम आहे. असे विश्लेषकांचे मत आहे.
पंजाबमधील प्रश्न
सतलज यमुना नदीच्या कालव्याचा वाद, 1984 च्या शीख विरोधी हत्याकांडातील पीडितांना न्याय आणि 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगलेल्या शीख राजकीय कैद्यांची सुटका यासह अनेक प्रश्नांचे अद्याप निराकरण झालेले नाही. या समस्यांमुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलनेही होत आली आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्या नेतृत्वातच बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे, या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये अमृतपाल सिंहचा शोध सुरूअसताना 300 हून अधिक तरुणांना अटक करण्यात आली होती. या तरुणांवर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती, केवळ अमृतपाल सिंहशी संवाद साधला म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. अनेकांची नंतर सुटका करण्यात आली असली तरी, या अन्यायाबाबत लोकांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या व्यतिरिक्त, शोधमोहिमेदरम्यान आठवडाभर इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती, याचाही राग लोकांमध्ये होता.

प्रचारात खलिस्तानऐवजी अंमली पदार्थाविरोधी मोहिमेवर भर
अमृतपाल सिंह यांनी सुरुवातीला अंमली पदार्थाविरोधी लढ्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. या निवडणुकांमध्ये मतदार त्यांच्या फुटीरतावादी वक्तृत्वापेक्षा त्यांच्या अंमली पदार्थाविरोधी भूमिकेवर भर देत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या मित्रांनी खलिस्तानचा उल्लेख टाळला आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या संकटावर इतर राजकीय पक्षांनी बोलणे टाळले आहे. परिणामी मतदारांनी पारंपारिक पक्षांच्या विरोधात मतदान केले आहे.
तीन वेळा निवडणुकीत अयशस्वी झालेल्या सरबजीत सिंग खालसा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येसाठी वडिलांना मिळालेल्या फाशीमुळे मतदारांची सहानुभूती मिळवली आहे. विशेषत: शीख पंथांचा सरबजीत यांना पाठिंबा मिळाला असल्याचे चित्र आहे. प्रचारातील ऑपरेशन ब्लूस्टारचा मुद्दाही सरबजीतसाठी फायद्याचा ठरताना दिसत आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका वाढला?
खासदार झाल्याने या फुटीरतावाद्यांना केंद्र सरकारशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे मिळतील. अशा माहितीचा उपयोग जनभावना प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही खासदारांनी त्यांचे पासवर्ड अनधिकृत व्यक्तींसोबत शेअर केल्याचे पुरावे आहेत, महुआ मोइत्रा यांचे उदाहरण आहे. ज्यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. सुरक्षिततेचे अनेक स्तर असूनही, दस्तऐवजांमध्ये या प्रकारचा प्रवेश धोकादायक असू शकतो.
लोकशाही व्यवस्थेत पक्ष आणि विचारसरणीची पर्वा न करता अपक्ष उमेदवारांचे यश हे निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचा पुरावा आहे. तथापि, फुटीरतावादी नेत्यांचा असा विजय धोक्याची घंटा वाजवतो आणि राष्ट्रीय सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण करू शकतो. या नेत्यांच्या फुटीरतावादी आणि खलिस्तान समर्थक विचारधारा प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समतोल बिघडवू शकतात. या विजयांकडे देशासाठी एक इशारा म्हणून पाहिले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया टिकवून ठेवतानाच फुटीरतावादी आणि दहशतवादी विचारसरणीला फोफावणाऱ्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरबजितसिंग खालसा आणि अमृतपाल सिंग यांचे विजय हे देखील स्पष्ट संकेत आहेत की लोकशाही स्वातंत्र्याचा आधारस्तंभ असताना, सतर्क सुरक्षा उपायांशिवाय राष्ट्रीय सुरक्षेसाठी दुधारी तलवार देखील असू शकते.
शपथविधी घेता येईल का ?
तुरुंगात असलेल्या अमृतपालच्या निवडणुकीने एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्यााना खासदारकीची शपथ घेता येईल का आणि तो संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकेल का?

कायदेशीररित्या, अमृतपाल सिंगला 18व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे, तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. घटनातज्ज्ञ आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस पीडीटी आचारी यांनी या प्रकरणाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. निवडणूक जिंकल्यानंतर शपथ घेणे हा घटनात्मक अधिकार असल्याचे ते म्हणाले. परंतु जर विजयी उमेदवार तुरुंगात असेल तर त्यांनी अधिकाऱ्यांना शपथविधीसाठी संसदेत नेण्यास सांगितले पाहिजे. परंतु त्यांनी शपथ घेतल्यावर त्यांना तुरुंगात परतावे लागेल.
त्यांनी पुढील तरतुदी स्पष्ट केल्या. त्यांनी घटनेच्या कलम 101 (4)चा उल्लेख केला. ज्यात दोन्ही सभागृहांतील खासदारांच्या अनुपस्थितीबाबत अध्यक्षांना माहीत नसल्यास असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख आहे. सर्व खासदारांच्या शपथविधीनंतर अनुपस्थित असलेल्या खासदारांबाबत सभापतींना कळवले जाईल. त्यानंतर सभापती खासदारांच्या सभागृहात उपस्थित राहण्याबाबतच्या असमर्थतेबद्दल, सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल सभागृह समितीला कळवतील. खासदारांना सभागृहाच्या कामकाजात उपस्थित राहू द्यायचे की नाही, अशी शिफारस समिती करते. नंतर ही शिफारस पुढे नेली जाते आणि सभापतींद्वारे सभागृहाचे मत जाणून घेण्यासाठी ते खासदारांसमोर मांडले जाते.
अमृतपाल सिंग दोषी ठरल्यास?
अमृतपाल सिंग दोषी ठरून त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास झाल्यास लोकसभेतील त्यांची जागा गमावतील. सन 2013 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्यानंतर समिती सदस्याला सभागृहाच्या कामकाजात अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी की नाही, यासाठी मत मागितले जाईल. याबाबतचा प्रस्ताव सभापतींद्वारे सभागृहासमोर मांडला जाईल. अमृतपाल सिंग यांना दोषी ठरवले गेले आणि त्यांना किमान दोन वर्षांचा तुरुंगवास झाला, तर त्यांना लोकसभेतील त्यांची जागा ताबडतोब गमवावी लागेल. सन 2013 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा प्रकरणांमध्ये खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवले जाईल.






