गेली अनेक दशके यादवी युद्धाच्या चरकात पिळून निघालेला आफ्रिका खंडातील कोंगो हा देश. दुसर्या महायुद्धानंतर ते आजवरच्या काळात यादवी युद्धामुळे सगळ्यात जास्त मानवी संहार जिथे झाला तोच हा देश. आजपावेतो तेथील 54 लाख लोक या संघर्षात ठार झाले आहेत. या यादवीमुळे काँगोमध्ये जवळजवळ तीस लाख लोकांचा भूकबळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वांशिक हिंसाचार, लोकांचे विस्थापित होणे, साथींनी घातलेले थैमान या संकटाच्या घेर्यात अडकलेल्या कोंगोमध्ये सगळ्यात जास्त धूळधाण उडाली आहे ती तेथील महिलांची. तिथे आजवर हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आले, प्रसंगी ठारही मारण्यात आले. यादवी युद्धाला या देशात जी लैंगिक अत्याचारांची काळी किनार आहे, ती कोणाचेही मन सुन्न करणारी आहे.
अशा परिस्थितीत कांगोच्या महिलांना आधार देण्यासाठी, त्यांना आवाज मिळवून देण्यासाठी भारतातातून एक महिला पुढे येते आणि त्या कामाता स्वत:ला इतकी झोकून देते की तिच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते आणि ‘युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट’ पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात येते.

मेजर राधिका सेन… कांगोमधील शांतीदूत!
मेजर राधिका सेन हे त्या कर्तबगार महिलेचे नाव… मेजर राधिका सेन यांना नुकतेच ‘युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांतून लैंगिक समता प्रस्थापित करण्यात वैयक्तिकरीत्या महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांना 2016 पासून या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. युनायटेड नेशन्सच्या मते, राधिका सेन यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्र मिशनबरोबर काम केले, जिथे त्यांनी एक अलर्ट नेटवर्क तयार करण्यात मदत केली. त्यांनी समर्पणाच्या भावनेने महिला आणि मुलींसह संघर्षग्रस्त समुदायांचा विश्वास जिंकला. उत्तर किवूमध्ये वाढत्या संघर्षाच्या वातावरणातही सेन यांच्या सैनिकांनी त्याच्याबरोबर काम केले. राधिका सेन म्हणाल्या की, “शांतता निर्माण करणे हे प्रत्येकाचे काम आहे. शांततेची सुरुवात आपल्या सर्वांच्या सहकार्याने होते.” हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या आव्हानात्मक वातावरणात कार्यरत असलेल्या सर्व शांती सैनिकांचे कठोर परिश्रम आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळेच मला हा पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी अधोरेखित केले.
राधिका या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या बायोटेक इंजिनीअर. संशोधन क्षेत्रात काम करून मानवाच्या कल्याणात योगदान द्यावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून त्या मुंबईतील आयआयटीमध्ये मास्टर्स करत होत्या. मास्टर्सच्या शेवटच्या वर्षाला असताना सहज भारतीय लष्करात भरती होण्यासाठीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाल्या. मात्र आता संरक्षण की संशोधन असे द्वंद्व लढावे लागणार होते. त्यांनी संरक्षण क्षेत्र निवडले. 2023 मध्ये ‘मोनस्को’ म्हणजेच ‘युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्टॅबिलायझेशन मिशन इन द डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’मध्ये एंगेजमेंट कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

पूर्णपणे भिन्न संस्कृती, परंपरा असलेल्या तणावग्रस्त प्रदेशात लोककल्याणाचे काम आव्हानात्मक असते. मोनस्कोविषयी काँगोमधील रहिवाशांत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्थानिकांशी संवाद साधण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असे. कधी घोषणाबाजी, तर कधी थेट दगडफेकही होत असे. याविषयी एका मुलाखतीत राधिका सांगतात की, ‘आम्ही सुरुवातीला तेथील पुढाऱ्यांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढारी त्यांच्या सोयीचे चित्र उभे करत होते. त्यामुळे थेट स्थानिक महिलांशी संवाद साधू लागलो. या महिलांमध्ये प्रचंड भीती होती. त्यांच्या घरातही त्या उघडपणे बोलत नसत. मग महिन्यातून दोनदा कॅम्प आयोजित केले. त्यांना बोलण्यासाठी जागा मिळवून दिली. तेव्हा माहिती मिळू लागली. समस्या कळू लागल्या.’
राधिका सेन यांनी कांगोमध्ये महिलांसाठी काय केले?
मुळात आपल्यावर अन्याय होत आहे, तो योग्य नाही आणि त्याचा प्रतिकार केला पाहिजे याची जाणीवच अनेकदा अशा संकटग्रस्त महिलांना नसते. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाचा अभाव ही महिलांच्या दुरवस्थेमागची प्रमुख कारणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मोनस्कोने काँगोमधील रहिवाशांचे लहान गट करून महिलांना स्वसंरक्षण, शिवणकाम, बेकिंग, बालकांची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले. लहान मुलांना स्वसंरक्षण व इंग्रजी संभाषण आणि तरुणांना वाहन दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले. जेणेकरून हे सर्व जण मोनस्कोच्या अनुपस्थितीतही स्वसंरक्षण करू शकतील, पायांवर उभे राहू शकतील. त्यांच्या या प्रयत्नांना लक्षणीय यश मिळाले. आज तेथील महिला स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करू पाहत आहेत. राधिका या पुरस्काराने सन्मानित झालेल्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या. त्यांच्याआधी 2019 मध्ये सुमन गवाणी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. ‘लैंगिक संवेदनशीलता, समता प्रस्थापित करणे हे केवळ महिलांचे काम नाही, ती आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ याची आठवण त्यांनी पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर करून दिली.
कांगोत नेमकं काय सुरू आहे?
वांशिक हिंसाचार, लोकांचे विस्थापित होणे, साथींनी घातलेले थैमान या संकटाच्या घेर्यात अडकलेल्या कोंगोमध्ये सगळ्यात जास्त धूळधाण उडाली आहे ती तेथील महिलांची. तिथे आजवर हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आले, प्रसंगी ठारही मारण्यात आले. यादवी युद्धाला या देशात जी लैंगिक अत्याचारांची काळी किनार आहे, ती कोणाचेही मन सुन्न करणारी आहे. कोंगोमध्ये मौल्यवान खनिज संपत्तीचे प्रमाण लक्षणीय आहे. विविध खनिजांच्या खाणी आपल्या कब्जात कशा राहतील, यासाठी कोंगोचे लष्कर, तेथील सत्ताधारी, तसेच परस्परविरोधी गट यांच्यात साठमारी चालते, एकमेकांवर सूड उगवण्यासाठी विरोधी गटातल्या बायकांना पळवले जाते. कोंगोमध्ये दर तासाला किमान 48 महिलांवर बलात्कार होतात. लैंगिक अत्याचारांना आजवर या देशातील चार लाख महिला बळी पडल्या आहेत. ही आकडेवारी व स्थिती कोणाही सुबुद्ध माणसाला हादरवून सोडेल. लैंगिक अत्याचार करताना ती महिला लहान मुलगी आहे की वृद्धा, हे काहीही पाहिले जात नाही. अशा भयंकर दुर्दशेतून जावे लागलेल्या महिलांपैकी अनेक जणी मनोविकारग्रस्त झाल्या आहेत.

ज्या महिलांवर बलात्कार होतो, त्यांना आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्य मिळणे दूरच; पण अवहेलनेचे क्षणच अधिक वाट्याला येतात. आपल्या कुटुंबातील महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने आपली प्रतिष्ठा बुडीत खाती गेली आहे, अशी कोंगोतील बहुतांश कुटुंबांची विचारसरणी असते. अशा पीडित महिलेला पुन्हा कुटुंबात सामावून घेतले गेले तरी तिला एक तर हलक्या दर्जाची वागणूक दिली जाते किंवा तिच्या नवर्याने केलेला पुनर्विवाह तिला नाइलाजाने सोसावा लागतो. बलात्कार झालेल्या अविवाहित मुलींची अवस्था तर त्याहूनही वाईट असते. जगात मातृदिन उत्साहाने साजरा होतो. पण असे अनेक दिवस येतात, जातात; कोंगोमधील मातांच्या ललाटी असलेला दुर्दशेचा शाप काही पुसला जात नाही.
बाईला बाईपण निभवणेही या देशात कठीण होऊन बसले आहे. महिलांच्या प्रगतीची ऐशीतैशी झालेलीच आहे. त्याशिवाय कोंगोतील पुरुषप्रधान संस्कृतीने माता बनू इच्छिणार्या महिलांच्या मार्गातही अनेक काटे पसरलेले आहेत. कोंगोतील फक्त सहा टक्के महिलाच संततिनियमनाची आधुनिक साधने वापरतात. महिलांना कुटुंब नियोजनासंदर्भातील उपचार करून घेण्यासाठी आपल्या नवर्याची परवानगी घ्यावी लागते. महिलांच्या स्वत:च्या इच्छेला काडीचीही किंमत देण्यात येत नाही. या देशातील 64 टक्के महिलांना हिंसाचाराची या ना त्या कारणाने झळ लागलेली आहे. या महिलांच्या हक्करक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरही हल्ले चढवण्यात येतात. कोंगोतील सरकार वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्यात जसे अयशस्वी ठरले आहे, तसेच आपल्या देशातील महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार रोखण्यातही…जगात कुठेही संघर्षाची ठिणगी पडली की पहिला बळी जातो तो महिला व लहान मुलांचा… कोंगोसह आफ्रिकेतील काही देश तोच कित्ता दशकानुदशके गिरवताना दिसत आहेत.






