आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नाऐवजी इतर प्रश्न आणि टीका-टिप्प्णीला कसे महत्त्व आले आहे, हे या निवडणुकीत दिसले; परंतु ज्यामुळे जगणेच अवघड होणार आहे, अशा हवामान बदलाकडे आणि त्याच्या परिणामाकडे कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते दुर्लक्ष करीत आहेत. हिवाळ्यात न पडलेली थंडी, कमी पाऊस, अंग भाजून काढणारे ऊन यासोबत आता जगण्याची सवय करताना हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून त्यावर काही धोरणात्मक निर्णय होणार आहेत, की नाहीत हा खरा प्रश्न आहे.
संपूर्ण हिमालय पर्वत परिसरात एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे परिवर्तन होत आहे. बर्फाची रेषा कायमस्वरुपी शंभर मीटर मागे सरकली आहे. शंभर मीटर बर्फरेषा मागे सरकली, तर काय फरक पडतो, असे वाटणारा वर्ग असेल; परंतु त्याचे परिणाम काय होतील, याच्या अज्ञानापोटी त्याची तशी मानसिकता झालेली असेल. हिवाळ्यात तापमानात एक अंश वाढ झाल्यामुळे हिमखंड तीन किलोमीटरने कमी झाले आहेत. त्यामुळे बर्फवृष्टीचा हंगाम दीड महिन्याने पुढे सरकला आहे. हिमालयीन भागात जी बर्फवृष्टी डिसेंबर-जानेवारी महिन्यात व्हायची, ती या वर्षी फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झाली आणि मार्चपर्यंत सुरू राहिली.

उत्तराखंडमधील ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी 1901 ते 2018 पर्यंतच्या हवामान संशोधन युनिटच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास हिमालयातील हिमवर्षाव हंगाम आठ ते दहा वर्षांत पूर्णपणे बदलू शकतो किंवा हिमवृष्टीचे प्रमाण कमी होईल, असा निष्कर्ष त्यातून निघाला आहे. डिसेंबर-जानेवारीतील बर्फवृष्टी कमी तापमानामुळे गोठून जायची; पण या वेळी पडणारा बर्फ जास्त तापमानामुळे वितळला आणि वाहून गेला. या वेळी हिमालयाची बर्फाची शिखरे लवकरच रिकामी होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दशकात हिवाळ्याच्या तापमानात वाढ झाली आहे, तर उन्हाळ्यात तापमान स्थिर राहिले आहे. त्यामुळे हिमालयात बराच काळ उष्णता कायम राहते. ही बदलती परिस्थिती हिमालयातील जीवजंतू आणि वनस्पतींसाठी धोक्याची घंटा आहे. हिमालयाच्या चार ते पाच हजार मीटर उंचीवर कायम बर्फाची रेषा आहे. त्याच्या खाली तीन हजार मीटरपर्यंत झाडे नाहीत. ही रेषा मागे पडल्यामुळे जिथे पूर्वी कमी तापमानात बर्फवृष्टी होत होती, तिथे आता पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हिमालयाच्या अनेक किलोमीटर भागातून बर्फ गायब होऊ लागला आहे.
बदलत्या हवामान चक्राचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या उत्तर-पूर्व भागात जाणवला आहे. ‘रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट डेटा’ दर्शवितो, की 1971 ते 2021 दरम्यान अरुणाचल प्रदेशातील बहुतेक हिमखंड प्रतिवर्षी सरासरी नऊ मीटर वेगाने २१० मीटर मागे सरकले आहेत, तर लडाखमध्ये हा वेग वर्षाला चार मीटर इतका आहे. काश्मीरमधील हिमनद्या वितळण्याचा वेगही जवळपास सारखाच राहिला आहे. आज जिथे गंगोत्री मंदिर आहे, तिथे पूर्वी हिमखंड होता; पण जसजसे तापमान वाढले आणि ऋतूचक्र बदलले, तसतसे हिमखंड आकुंचन पावू लागले. 1817 पासून ते आतापर्यंत अठरा किलोमीटरहून अधिक मागे सरकले आहे. 1971 पासून, हिमखंडांच्या मागे जाण्याचा दर दरवर्षी बावीस मीटर आहे.
काही वर्षांपूर्वी गोमुखाच्या प्रचंड हिमखंडाचा काही भाग तुटून भागीरथीवर म्हणजेच गंगा नदीच्या उगमस्थानावर पडला होता. अशा प्रकारे हिमालयातील हिमखंड तुटणे हे निसर्गाचे अशुभ लक्षण मानले जाते. गोमुखापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगोत्री, भागीरथीच्या जोरदार प्रवाहात हे तुकडे तरंगताना दिसले. गंगोत्री नॅशनल पार्कच्या वन अधिकाऱ्यांनी या हिमखंडाच्या तुकड्यांचे फोटो घेऊन हिमखंड तुटल्याची पुष्टी केली होती. तेव्हाही हिमनदीचे शास्त्रज्ञ या घटनेच्या पार्श्वभूमीवर कमी बर्फवृष्टी झाल्याचे सांगत होते. या कमी बर्फवृष्टीचे कारण पृथ्वीचे वाढते तापमान असल्याचे सांगितले जात आहे.
कालांतराने पृथ्वीवरील तापमान असेच वाढत राहिल्यास आणि धूप होऊन हिमखंड तुटत राहिले, तर त्याचा परिणाम समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि नद्यांच्या अस्तित्वावर होणार हे निश्चित. हिमखंड तुटण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यास समुद्राची पातळी वाढेल. त्यामुळे अनेक लहान बेटे आणि किनारपट्टीवरील शहरे पाण्याखाली जाऊ लागतील. आतापर्यंत हिमनग वितळल्याची माहिती येत होती; मात्र कोणताही हिमखंड तुटण्याची घटना अपवादानेच घडते.
काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशांत महासागरातील पाच बेटे पाण्याखाली गेल्याचे समोर आले होते. सुदैवाने, या बेटांवर मानवी वस्ती नव्हती. त्यामुळे जगाला विस्थापन आणि निर्वासितांच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. जगाच्या नकाशावरून गायब झालेली ही बेटे म्हणजे केल, रेपिटा, कलाटिना, झोलिम आणि रेहाना. गेल्या दोन दशकांपासून या भागातील समुद्राची पातळी दरवर्षी दहा मिलीलीटरने वाढत आहे. सध्या, भारतीय शास्त्रज्ञ गोमुखातून गंगेच्या अवतरणासाठी पाण्याचा स्त्रोत असलेल्या हिमालयावरील हिमखंड तुटणे ही एक सामान्य घटना मानतात. कमी बर्फवृष्टी आणि जास्त उष्णतेमुळे हिमखंडांमध्ये भेगा निर्माण झाल्या होत्या. पावसाचे पाणी तुंबल्याने हिमखंड तुटू लागले. सध्या गोमुख हिमखंडाच्या डाव्या बाजूचा भाग तुटला आहे.
उत्तराखंडच्या जंगलात दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे हिमनगही कमकुवत झाले आहेत. ज्वाला आणि धुरामुळे बर्फाळ खडकांवरील कच्चा बर्फ वेगाने वितळू लागला. त्यामुळे तडे भरता आले नाहीत. आता धुरातून तयार होणारा कार्बन खडकांवर असाच जमा होत राहिला तर भविष्यात नवीन बर्फ तयार होणे कठीण होईल, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. हिमखंड तुटणे ही नवीन गोष्ट आहे; परंतु त्यांचे वितळणे नवीन नाही.
शतकानुशतके, हिमखंड नैसर्गिकरित्या वितळत आहेत आणि नद्यांमध्ये सतत पाण्याचे प्रवाह तयार करत आहेत; परंतु जागतिकीकरणानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोषणावर आधारित औद्योगिक विकासातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनमुळे त्यांच्या वितळण्याची तीव्रता वाढली आहे. एक शतकापूर्वीही हिमखंड वितळत असत; परंतु बर्फ पडल्यानंतर त्यांचे क्षेत्रफळ सतत वाढत गेले. त्यामुळे गंगा, यमुना या नद्यांचा प्रवाह चालू राहिला. 1950 पासून त्यांची व्याप्ती वर्षाला तीन ते चार मीटरने कमी होऊ लागली.
1990 नंतर हा वेग अधिक वाढला. तेव्हापासून गंगोत्रीचे हिमनग दरवर्षी पाच ते वीस मीटर वेगाने वितळत आहेत. उत्तराखंडच्या इतर पाच हिमशैलींमध्ये-सतोपंथ, मिलम, नीती, नंदादेवी आणि चोरमध्ये कमी-अधिक परिस्थिती अशीच आहे.

भारतीय हिमालयात एकूण 9,975 हिमखंड आहेत. त्यापैकी नऊशे उत्तराखंडमध्ये येतात. देशातील चाळीस टक्के लोकसंख्येला पिण्याचे पाणी, सिंचन आणि उपजीविकेची अनेक साधने पुरवणाऱ्या या हिमनद्यांमधून बहुतांश नद्या उगम पावतात; पण हिमनग वितळण्याची आणि तुटण्याची हीच प्रवृत्ती सुरू राहिली, तर या नद्यांमधून राहणाऱ्या पन्नास कोटी लोकसंख्येला रोजगार आणि उपजीविकेची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्याचा देशाकडे कोणताही मार्ग नाही. वाढत्या तापमानाला आळा घालणे सोपे नाही; परंतु औद्योगिक उपक्रमांना विराम देऊन ते काही प्रमाणात थांबवले जाऊ शकते.
पर्यटनामुळे हिमालयीन प्रदेशात मानवी क्रियाकलाप वाढत आहेत. त्यांना आळा घालण्याची गरज आहे. याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतील हिमनगांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजनांना महत्त्व द्यावे लागेल. सिक्कीममधील लाहोनक ग्लेशियर सरोवर फुटण्याची घटना जुनी नाही. त्यात 180 लोकांचा मृत्यू आणि पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याची बातमी आली होती. केदारनाथमधील चौराबारी हिमनदी तलाव फुटल्याने हजारो लोकांचा महापुरात मृत्यू झाला होता. 2021 मध्ये उत्तराखंडच्या नीती व्हॅलीमध्ये हिमनदी तलाव फुटल्याने 200 लोकांच्या मृत्यूसह 1,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. हिमालयीन प्रदेशात येणाऱ्या राज्यांमध्ये 188 धोकादायक हिमनदी तलाव तयार झाले आहेत.
मोठा भूकंप झाल्यास लाखो लोकांच्या जीवनावर घातक परिणाम होऊ शकतो. ईशान्येकडील सरोवरे सर्वाधिक धोक्याचे कारण असले, तरी काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्येही धोका कायम आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत कार्यरत आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि हिमालय अभ्यास तज्ज्ञांच्या पथकाने केलेल्या एक वर्षाच्या अभ्यासानंतर जे निष्कर्ष समोर आले आहेत, ते चिंताजनक आहेत. या संवेदनशील भागात सात रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यास हे तलाव पाण्याच्या बॉम्बप्रमाणे फुटू शकतात, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सहा राज्यांतील सुमारे तीन कोटी लोकसंख्येला फटका बसू शकतो.
जागतिक तापमानवाढीच्या संकटामुळे हिमालयीन प्रदेशांमध्ये 28 हजारांहून अधिक सरोवरे तयार झाली आहेत. त्यातील 188 अधिक धोकादायक ठरू शकतात. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळण्याचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढले असल्याची चिंता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. या भागात स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या धोकादायक तलावांचे पाणी आधुनिक पद्धतीने कसे सोडता येईल, यावर विचारमंथन केले जात आहे. एकीकडे तलावातील पाणी उपसण्याचे मार्ग शोधले जात आहेत, तर दुसरीकडे ड्रिलिंगद्वारे पाणी नियंत्रित करण्याचाही विचार केला जात आहे.






