युक्रेन विरुद्ध युद्ध, विरोधकांचे संशयास्मद मृत्यू, अध्यक्षपदी तहहयात राहता यावे म्हणून केलेली घटनादुरुस्ती अशा अनेक कारणांमुळे रशिया आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कायम चर्चेत असतात. परंतू यावेळी मात्र रशिया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, ते कारण म्हणजे जगभरातून होणारी पुस्तकांची चोरी…
रशियासारख्या महासत्तेला पुस्तकांची चोरी करावी इतकी काय भीक लागली आहे असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात येईलच, परंतू ही पुस्तकांची चोरी साधीसुधी नसून त्या पुस्तकांच्या चोरीला एक ऐतिहासिक महत्व असल्यानेच रशिया हे कृत्य करत आहे. रशिया पुस्तकांची चोरी का करतोय, असं काय आहे त्या पुस्तकांमध्ये आणि नेमक्या कोणत्या पुस्तकांची चोरी होतेय याचा शोध घेतला असता जी माहिती उपलब्ध झाली ती थक्क करणारी होती.
19व्या शतकातील पहिल्या चार दशकांमध्ये ज्याने काव्य निर्मिती केली, त्या अलेक्सांद्र पुश्किनला आजही रशियाचा सर्वोत्तम कवी मानले जाते. पुश्किनने रशियन साहित्यिक भाषेचा आणि आधुनिक रशियन वांड्मयाचा पाया घातला. ज्या भाषेत जगप्रसिद्ध लेखकांनी स्वतःची साहित्यनिर्मिती केली, त्या भाषेला आकार देण्याचं, तिला घडवण्याचं काम पुश्किनने खर्या अर्थाने केले म्हणूनच त्याला रशियन साहित्यिक भाषेचा जनक म्हणून गौरविले जाते.
झार कालीन रशिया, सोवियत रशिया किंवा आजचा भांडवली व्यवस्थेतील आधुनिक रशिया, काळ कोणताही असो, पुश्किन आणि त्याचं काव्य हे रशियन समाजमनात खोलवर रुजलं आहे, नव्हे पुश्किन हे रशियाचं चैतन्य आहे! कदाचित असा एकही रशियन सापडणार नाही की ज्याला पुश्किनच्या कुठल्यातरी काव्यपंक्ती तोंडपाठ नसतील. त्याने काव्यात लिहिलेल्या परिकथांवर तर अख्ख्या रशियन पिढ्यांचं बालपण पोसलं गेलं आहे.
बऱ्याच रशियनना त्या संपूर्ण तोंडपाठ असतात. लोकप्रियतेच्या बाबतीत बोलायचं झालं, तर शेक्सपियर इंग्लंडमध्ये् जितका जनमानसात रुजला त्याच्या कित्येक पटीनं पुश्किनचे काव्यविश्व रशियात जनमानसात रुजले आहे. कोणत्याही दुसऱ्या देशात तिथल्या जनतेने स्वतःच्या कवीवर जितके प्रेम केले, त्यापेक्षा अधिक प्रेम रशियामध्ये पुश्किनला तेथील जनतेच लाभले आहे.

हे इतकं ‘पुश्किन पुराण’ सांगण्याचे कारण म्हणजे जगभराच्या लायब्ररीमधून या महान लेखकाची अनेक दुर्मिळ ग्रंथ चक्क चोरीला गेल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत आहेत आणि तपासाअंती पुश्किनने लिहिलेले हे ग्रंथ चक्क रशिया चोरतेय असे सिद्ध झाले आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, फिनलंड, पोलंड, इतकेच नव्हे तर लाटव्हिया, लिथुआनिया यांसारख्या देशांतील सार्वजनिक लायब्ररीमधून केवळ पुश्किनच्याच पुस्तकांच्याच जुन्या प्रतींची चोरी गेल्या दोन वर्षांत झाली.
सन 1800 ते 1850 या काळात ही पुस्तके छापली गेली होती आणि म्हणूनच या दुर्मीळ प्रतींचे मोल अधिक होते. आकडयांतच सांगायचे तर, एकटया लिथुआनियातून गायब झालेल्या पुश्किनच्या फक्त 17 जुन्या रशियन पुस्तकांची किंमत आहे 4,40,000 युरो म्हणजे 39 कोटी 45 लाख रुपये. याचा अर्थ असा की सर्व देशांतल्या वाचनालयांतून गेल्या दोनच वर्षांत चोरीस गेलेला पुश्किनच्या पुस्तकांचा ऐवज तब्बल 100 कोटी इतका आहे. हे कारस्थान मोठे असल्याचा सुगावा लागताच ‘युरोपोल’तर्फे संघटित तपासही सुरू झाला आणि या मोहिमेला नावही देण्यात आले ‘ऑपरेशन पुष्किन’!
रशियाची पुस्तक चोरी कशी पकडली गेली?
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरची ही घटना आहे. दोन वर्षांपूर्व इस्टोनिया या युरोप खंडातील टार्टू विद्यापीठाच्या ग्रंथालयात दोघेजण आले. आम्ही युक्रेन देशातून आलोय आणि युद्धासंबंधी संशोधन करण्यासाठी आम्हाला पुश्किन आणि निकोलाई गोगोल या रशियन लेखकांच्या साहित्याचा अभ्यास करायचा आहे, असे या दोघांनी ग्रंथपालाला सांगितले. त्यासाठी त्यांना पुश्किन आणि गोगोल यांनी लिहिलेल्या 19व्या शतकातील पहिल्या आवृत्तीचा संदर्भ हवा होता.
ग्रंथपालाने या दोघांना मदत करून ग्रंथांचा तो दूर्मीळ खजिना उपलब्ध करून दिला. हे दोघे सलग दहा दिवस त्या ग्रंथालयामध्ये येत होते. ग्रंथपालाचा विश्वास संपादन केल्यानंतर एकेदिवशी त्यांनी चोरलेल्या प्रत्येक पुस्तकाची जशीच्या तशी दिसणारी पण नकली प्रत वाचनालयात ठरल्या जागी ठेवून दिली! या नक्कलप्रती अगदी हुबेहूब दिसत असल्या कारणाने, आधी तर संशयही आला नाही.
पण वार्षिक नोंदी करण्याच्या वेळी म्हणा अथवा अन्य कारणाने त्या पुन्हा हाताळल्या गेल्या, तेव्हा मात्र बिंग फुटले. ही वार्ता कानोकानी होताच फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांनी आपापल्या ग्रंथालयामध्ये तपासणी केली आणि पुश्किनची अनेक दूर्मीळ ग्रंथ चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

मुळात पुश्किनच्या पुस्तकांच्या जुन्या आणि अस्सल प्रती चोरीला जातात कारण हा ‘असली माल’ प्रचंड किमतीला विकला जातो म्हणून! ‘ख्रिस्टीज’ या प्रख्यात लिलावगृहाने 2022 मध्ये अशा एकंदर 170 रशियन पुस्तकांचा लिलाव पुकारून 21 अब्ज 69 कोटी रुपयांची विक्री केली होती. पुश्किन हा राष्ट्रपुरुष. म्हणून तो आपल्या संग्रहात हवा, अशी हाव अनेक रशियन धनाढयांची आहे आणि म्हणूनच अधिकृत लिलावाऐवजी काळया बाजारात ही चोरीची पुस्तके विकण्यामध्ये रशियाला अधिक रस आहे.
पुश्किनचीच पुस्तके का चोरीला जातात?
या संदर्भात लोकसत्ताच्या अग्रलेखात असे म्हटले आहे की, पुश्किनचे लिखाण इतके विपुल आहे की, त्यातून कुणालाही हवी ती विधाने उद्धृत करता येतात. उदाहरणार्थ ‘माझे नाव गाजेल युरोपच्याही पल्याड। साऱ्या सागरांच्या काठी.. माझी गाणी सर्वांसाठी असतील। रुळतील साऱ्या लोकांच्या ओठी’ अशा अर्थाच्या ओळी पुश्किनने एका कवितेत (इंग्रजी शीर्षक ‘मेमोरियल’) लिहिल्या होत्या.
किंवा ‘सत्ता निसर्गनियमाने नव्हे, लोकेच्छेने मिळते’ यासारखे विधान ‘ओड टु लिबर्टी’ या लोकशाहीच्या साऱ्याच तत्त्वांचा उद्घोष करणाऱ्या कवितेत पुश्किनने केले होते, ते आता पुतिनसुद्धा सहज वापरतात- अगदी जाहीर भाषणातसुद्धा पुष्किनचा हवाला देऊन पुतिन म्हणू शकतात की मी रीतसर निवडून आलो आहे! किंवा युक्रेनयुद्ध कसे जगाच्या भल्यासाठीच आहे, हे सांगतानाही पुश्किनच्या ‘मेमोरियल’मधल्या आकांक्षेला पुतिन वेठीस धरू शकतात!

रशियन साहित्यातला प्रत्येक शब्द हा क्रांतिकारी ठरतो
पुश्किनचे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य झाले, आज त्या सर्व जागांचे स्मारक, संग्रहलयामध्ये रूपांतर झाले आहे. कित्येक रस्त्यांना, वास्तूंना, वस्तुसंग्रहालयशै, शैक्षणिक संस्थांना, साहित्यिक पुरस्कारांना पुश्किनचे नाव देण्यात आले आहे. त्सारस्कये सेलो, या गावाचे नाव पुश्किन असे करण्यात आले; कारण काय तर त्या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले होते. ‘पूश्किन आमच्या कल्पनाशक्तीचा केंद्रबिंदू आहे.
तो आमच्या जनतेचा आत्मा आहे, आमच्या मानसिकतेचा; नव्हे, तर आमच्या जीवनाचाच एक अविभाज्य भाग आहे! याप्रसंगी त्याचे स्मरण करण्याची तशी काही गरज नाही, कारण तो आमच्या सोबत एक जिवंत माणूस म्हणून अजूनही जगत आहे,’ 1962 साली पूश्किनच्या 125 व्या मृत्युतिथिप्रसंगी सोवियत कवी व संपादक अलेक्सांद्र त्वारदोव्सकीने काढलेले हे उद्गार रशियावर असलेल्या पुश्किन प्रेमाची साक्ष देतात.
त्याच्याही शंभर वर्ष अगोदर 1859 मध्ये दुसरा एक तत्कालीन लेखक ऐपोलोन ग्रिगोरीएव याने मोजक्या शब्दात पूश्किन हा रशियासाठी काय आहे, याचं वर्णन केलं होतं. तो म्हणाला होता, “पुश्किन – नाशे फ्स्यो ! – पुश्किन आमचं सर्वकाही आहे”.
रशियामध्ये साहित्य हे केवळ साहित्य बनून राहत नाही. ग्रंथालयातील पुस्तकातून बाहेर पडून हे साहित्य राजकीय क्षेत्रात उडी मारतं. रशियाच्या एकाधिकार राज्यव्यवस्थेत नागरी स्वातंत्र्य आणि राज्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी पोलिटिकल स्पेस ही कधीच अस्तित्वात नव्हती. त्याची जागा रशियन साहित्यकारांच्या साहित्यकृतींनी भरून काढली. त्यामुळेच रशियामध्ये लेखक किंवा कवी हा केवळ साहित्यिक राहत नाही, (आणि रशियन वाचक वर्गाने देखील त्याच्याकडे कधीही केवळ साहित्यिक म्हणून पाहिले नाही) तर तो एक प्रेषित- प्रोफेट बनतो, क्रांतिकारी विचारवंत बनतो.
त्याच्या शब्दांचे मूल्य हे केवळ साहित्य न राहता साहित्याच्या पल्याड जाऊन जनमानसात तो एक क्रांतिकारी शब्द ठरतो; समाजात सामाजिक प्रश्नांचं मंथन घडवून आणणारं सर्वात मोठं साधन ठरतं.

वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी हाताने ओढवलेल्या या अकाली अंताने रशिया आपल्या महाकवीला कायमचा पारखा झाला. पुश्किन कलंदर वृत्ती, स्वतंत्र बाणा, संवेदनशीलता, बेफिकीर मनस्वी वृत्ती अशा गुणांनी युक्त असा अलौकिक प्रतिभेचा महाकवी होता. झारने अवघ्या 3-4 जणांच्या उपस्थितीत पुश्किनचा देह मातीखाली दडवला, तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त झालेली अफाट व चिरंतन लोकप्रियता तो रोखू शकला नाही.
रशियन साहित्याच्या आजवरच्या सर्व वाटा-वळणांची बीजं पुश्किनच्या साहित्यातच सापडतात. रशिया बदलला; परंतु त्याच्या मनातील महाकवी पुश्किन अढळ राहिला. पुश्किनची जीवनश्रद्धा आणि प्रेम आजही रशियन माणसाला जगण्याची प्रेरणा देत आहे.






