1972 ची गोष्ट आहे. अमेरिकेतून मेक्सिकोला जाणारे एक विमान हायजॅक करण्यात आले. हायजॅकर्स विमानाला क्युबाला घेऊन गेले. बँक दरोडेखोरीतील आपल्या साथीदारांना सोडवण्याची त्यांची मागणी होती. शिवाय एक कोटी डॉलर्सची खंडणीही हवी होती, तरच विमान प्रवाशांना सोडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला होता.
इतकं सगळं गंभीर सुरू असताना आणि विमानातील 104 प्रवासी जेव्हा आपल्या जीवाची चिंता करीत होते, तेव्हा त्यांच्यात असलेला, एक वैज्ञानिक मात्र कुतूहलानं भरलेला होता. वर्षभरानंतर हाच वैज्ञानिक अशाच एका कैदेच्या परिस्थितीत अडकला. यावेळची कैद मात्र त्यानं स्वतःच ओढवली होती. याच हायजॅकींगच्या घटनेनं त्याला एक कल्पना सुचली होती, एका प्रयोगाची... काय होता हा प्रयोग? जर 10 लोकांना 100 दिवस समुद्रात सोडून दिलं तर काय होईल? प्रयोगातून त्याला माणूस हिंसा का करतो हे शोधायचं होतं.
विमान अपहरणातून सँतियागो जिनोव्जला प्रयोग सुचला
या प्रयोगाची सुरूवात होते दुसऱ्या एका गोष्टीनं. 1954 साल… नोबेल पुरस्कार विजेता ब्रिटीश लेखक विल्यम गोल्डींग यांनी एक कादंबरी लिहिली. नाव होतं – लॉर्ड ऑफ द फ्लाईज. यात एका विमान अपघातानंतर काही मुलं एका बेटावर अडकतात. त्यातील एक मुलगा स्वतःला नेता घोषित करतो. मग इतरांसोबत मिळून तो एक व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करतो. पण लवकरच त्यांच्यात भांडणं सुरू होतात.

हिंसाचार होतो. काही मुलं मारलीही जातात. गोल्डींगची कादंबरी एक कथाच होती. पण दुसऱ्या विश्व युद्धानंतर ती लिहिली गेली होती त्यामुळे तिला एका रुपकाचं स्थान मिळालं. माणूस मुळातच हिंसक, स्वार्थी असतो असा निष्कर्ष यातून निघतो. पण तो खरंच तसा असतो का हा प्रश्न काही वैज्ञानिकांच्या मनात डोकावला. यापैकी एक होता, मेक्सिकोचा सँतियागो जिनोव्ज. 1973 मध्ये त्यांनी एक प्रयोग करण्याचं ठरवलं.
सँतियागो विख्यात मानववंशशास्त्रज्ञ होते. माकडांवरील संशोधनातून त्यांना लक्षात आलं होतं की त्यांच्यात हिंसा आणि सेक्स यांचा खोल संबंध असतो. उंदरांच्या बाबतीतही हेच दिसून आलं. त्यानंतर जिनोव्ज यांनी असाच प्रयोग माणसांवर करण्याचं ठरवलं.
10 जणं, 100 दिवस आणि एक बोट…
जिनोव्जने एक लांबलचक, बिना इंजनाची होडी तयार केली. यात 11 लोक आरामात राहू शकत होते. होडीचं नाव होतं – acali. या शब्दाचा अर्थ आहे पाण्यावरचे घर… त्यानंतर प्रयोगाची सुरूवात झाली. प्रयोगासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक निवडायचे होते. त्यासाठी जिनोव्ज यांनी जाहिरात दिली, ज्याला जगभरातून प्रतिसाद आला. यातून 10 जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर 13 मे 1973 रोजी अटलांटिक महासागरातील कॅनरी बेटापासून मेक्सिकोकडे या एकैलीची यात्रा सुरू झाली. होडीत जिनोव्जसहीत 11 लोक होते.

खाण्यापिण्याची सोय होती मात्र वीज नव्हती. 12 बाय 7 मीटर जागेत या 11 जणांना 100 दिवस राहायचं होतं. कमी जागेत जास्त लोक असल्यानं सर्वांनाच त्रास होणार होता. जिनोव्जचा हाच प्लॅन होता. त्याला वर्तणुकीचा अभ्यास करून शोधायचं होतं की माणूस हिंसा का करतो. पण या प्रयोगाला त्यानं ‘पीस प्रोजेक्ट’ असं नाव दिलं होतं. त्याला जगात शांततेची गुरूकिल्ली शोधायची होती म्हणे.
बोटीवरच्या 10 लोकांमध्ये चार अविवाहित होते. त्यांची निवड मुद्दाम केली होती जेणेकरून त्यांच्यात लैंगिक तणाव निर्माण व्हावा. कारण हिंसेमागे लैंगिकता असते असं जिनोव्जला वाटत होतं. त्यानं आणखीही काही गोष्टी केल्या. होडीत कामाची मुख्य जबाबदारी त्यानं स्त्रियांवर टाकली. पुरुषांना कमी हलकी कामं दिली. होडीचा नायकही एका स्त्रीला करण्यात आलं. पुरुष याला विरोध करतील अशी त्याची अपेक्षा होती. या प्रयोगाची माध्यमांमध्ये चर्चा होणारच होती. काहींनी तर याला ‘सेक्स राफ्ट’ असं नावच दिलं. याविषयी अनेक अफवा पसरू लागल्या.
प्रयोगासाठी करण्यात आलेली तयारी
होडीवर असताना जिनोव्ज तिथे तणाव व्हावा म्हणून मुद्दाम अनेक गोष्टी करत होता. आधी त्यानं पुस्तकं वाचण्यावर बंदी लादली. त्यामुळे वेळ घालवण्याचं एक कारण संपलं. अशात तरुण मुलं सेक्सकडे वळतात. पण होडीवर प्रायव्हसी मिळणं कठीणच होतं. सेक्सविषयी मनात खंत निर्माण व्हावी म्हणून होडीत एक पादरीही होता. शिवाय मेरी नावाची एक बाईही होती. तिची वेगळीच कथा. ती एका जहाजातून प्रवास करत असताना, तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं की तिला नवऱ्याला घटस्फोट द्यायचा आहे.
तिच्या नवऱ्यानं ही गोष्ट समजताच तिच्यावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी मेरीनं पाण्यात उडी घेतली. काही दिवसांनी तिनं ही जाहिरात वाचली आणि नवऱ्यापासून वाचण्यासाठी यात सामिल झाली. बाकीच्या लोकांच्याही अशाच गोष्टी होत्या. गर्मीच्या दिवसांच फारशी साधनं नसलेल्या त्रासदायक होडीत ते सारे जगत होते. पण त्यांच्यात अजून वाद सुरू झाले नव्हते. अनेक दिवस असंच वातावरण होतं.

जिनोव्जच्या अपेक्षा खऱ्या ठरण्याची चिन्हं दिसत नव्हती. मग एक दिवस समजलं की मोठं समुद्री वादळ येणार आहे. होडीच्या कप्तानानं जवळच्या तटावर होडी नेण्याचं ठरवलं. जिनोव्जनं याला विरोध करत कप्तानी आपल्या हातात घेतली. पण त्याला होडी चालवण्याचा अनुभव नव्हता. होडी एका जहाजाला टक्कर मारता मारता वाचली. जुन्या कप्तानानं पुन्हा होडीचं नेतृत्व स्वीकारलं. पण यानंतर होडीत काही बदल जाणवू लागले. जिनोव्जला वाटत होतं तसे वादविवाद झाले नाहीत उलट काही लोक जिनोव्जच्या विरोधात एकत्र आले.
त्यांनी संकटकाळात एकमेकांची मदत करत सर्व अडचणींचा सामना केला. सर्व कामं वाटून घेतली. लैंगिक तणावही यात निर्माण झाला नाही. पण सर्व लोक जिनोव्जमुळे त्रासले जो आता हुकुमशहाप्रमाणे वागत होता. 2018 मध्ये याच प्रयोगावर ‘द राफ्ट’ नावाचा माहितीपट तयार झाला. यात या प्रयोगातील लोकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की एकवेळ त्यांनी जिनोव्जला मारण्याचंही ठरवलं होतं.
त्याला पाण्यात ढकलण्याचा त्यांचा विचार होता पण त्यांनी तो अंमलात आणला नाही. पण जिनोव्जला त्यांनी वेगळं ठेवलं. याच दरम्यान त्याला समजलं की त्याच्या विश्वविद्यालयाने या प्रयोगातून आपला सहभाग काढून घेतला आहे. जिनोव्ज म्हणतो की या प्रयोगात फक्त एकाच माणसाने आक्रमकता दाखवली, तो म्हणजे तो स्वतः.
एकांत मिळणार नाही अशी व्यवस्था
पुढच्या यात्रेत जिनोव्जने स्वतःला या प्रयोगातून बाहेरच ठेवलं. त्याला वाटलं की हा प्रयोग अपयशी ठरलाय. 101 दिवसांच्या प्रवासानंतर होडी मेक्सिकोला पोहोचली. जिनोव्ज दुःखी मनानं किनाऱ्यावर उतरला. बाकीचे लोक काही दिवस रुग्णालयात राहून आपापल्या घरी गेले. त्यांच्यासाठी हे एक साहस होतं. यातील एका बाईनं 2018 मध्ये ‘द गार्जियन’ला मुलाखत देतांना म्हटलं, “जिनोव्जला वाटतं तसं हा प्रयोग अपयशी ठरला नव्हता.

कारण यातून एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध झाली होती की, अनोळखी लोक अडचणीच्या काळात एकमेकांशी नाती तयार करतात, सहकार्य करतात. मतभेद दूर ठेवून उपाय शोधतात. हाच हिंसेवरचा उपाय आहे.” जिनोव्जला ही गोष्ट तेव्हा समजली नव्हती. पण नंतर त्याने हिंसेवर एक निबंध लिहिला जो युनेस्कोच्या १९८९ च्या कॉमन कॉन्फरन्समध्ये स्वीकारण्यात आला. यात तो लिहितो, “हिंसा माणसाच्या स्वभावात असते ही गोष्ट अवैज्ञानिक आहे. हिंसा जशी माणसाच्या मनात उत्पन्न होते, तशीच शांतीही.” युनेस्कोही याच्याशी सहमत आहे.
पण तुम्ही कदाचित या एका प्रयोगानं याच्याशी सहमत होणार नाही. पण तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला आयुष्यात हजारो माणसं मिळतात त्यांतील 99 टक्के चांगले किंवा कमी वाईट असतात. अनोळखी माणसंही चांगली वागणूक करतात. तरीही आमच्या मनाला ही शिकवण देण्यात आली आहे की माणूस वाईटच वागतो. कारण एक वाईट अनुभव शेकडो चांगल्या अनुभवांवर भारी ठरतो. दीर्घकाळ लक्षात राहतो. एरव्ही माध्यमांतून तर हेच सांगण्यात येतं की प्रत्येक समस्या ही तुमची व्यक्तीगत समस्या आहे.
रॉकस्टार चित्रपटात ढींगरा म्हणतोच की, “निगेटीव्ह बिकता है।” पण आम्ही हे म्हणत नाही. डच इतिहासकार रटगर ब्रेगमेन यांनी त्यांच्या, ‘ह्युमन काईंडः अ होपफूल हिस्ट्री’ या पुस्तकात सांगतात की जेव्हा त्यांनी ‘लॉर्ड अव्ह द फ्लाईज’ ही कादंबरी वाचली तेव्हा त्यांनी हे जाणण्याचा प्रयत्न केला की खरंच असं कधी घडलं असेल का? त्यांना समजलं की 1965 मध्ये 6 मुलं प्रशांत महासागरावरील एका बेटावर अडकले होते.
पण ते भांडले नाहीत. अनेक दिवस एकमेकांच्या मदतीनं ते तिथं जगले. त्यांना नंतर वाचवण्यात आलं. पण ही कथा ‘लॉर्ड अव्ह दी फ्लाईज’सारखी गाजली नाही. कारण निगेटीव्ह बिकता है, पॉझिटीव्ह नही!






