अभिजीत तांगडे
- ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे.
- प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांबद्दल "दगलबाज" हा शब्द का वापरला असावा?
- ‘दगलबाज’ हा शब्द का वापरला यावर खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या आत्मकथेत सविस्तर दिलेलं आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार असं म्हणत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकासोबतच उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या 'दगलबाज शिवाजी' या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रबोधनकारांच्या ‘दगलबाज शिवाजी’ पुस्तकावर बंदी घाला - संजय गायकवाड
संजय गायकवाड म्हणाले, ' शिवाजी कोण होता? या पुस्तकाबद्दल वक्तव्य केलं होतं जी शिवीगाळ केली होती त्याबद्दल मी आधीच दिलीगीरी व्यक्त केली आहे.कोर्टाने जे आदेश दिलेत त्याचा मी सन्मान करतो. पोलिसांना जो काही तपास करायचा आहे त्यासाठी मी तयार आहे.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'यापुढेही शिवाजी महाराजांचा अपमान करणारा विषय असेल तर त्या भूमिकेवर मी कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत देखील मी 'दगलबाज शिवाजी', 'शिवाजी कोण होता?' या सगळ्या पुस्तकांवर माननीय मुख्यमंत्र्यांनाना, सभागृहाला बंदी आणण्यासाठी विनंती करणार आहे. तो माझा विषय राहणार आहे.'
शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून आमदार गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा न्यायलयात अर्ज करत आमदार गायकवाड यांच्या चौकशीची मागणी केली होती. न्यायलयाने ही मागणी मान्य करत चौकशीला परवानगी दिली आहे.
संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर पाहतात - अंबादास दानवे
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर पाहतात, पण आत काय लिहिलं आहे हे ना वाचतात ना समजून घेतात. फक्त कव्हर पेज पाहून प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे.” दानवे यांनी पुढे सांगितलं की, “गायकवाड यांनी किमान पुस्तकांची प्रस्तावना तरी वाचायला हवी होती. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या पुस्तकांमधून कोणते विचार मांडले आहेत, हे त्यांना माहितीच नाही.” अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
संजय गायकवाड यांच्या नव्या भूमिकेमुळे प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘दगलबाज शिवाजी’ हे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांवर तीन दीर्घ लेख लिहिले. शिवजन्म तिथीच्या उद्भवलेल्या वादावर एक लेख, प्रबोधनकारांनी रायगड भेट दिली त्यावर एक आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा पुस्तिकावजा दीर्घ लेख म्हणजे "दगलबाज शिवाजी".
प्रबोधनकार ठाकरेंनी शिवाजी महाराजांबद्दल "दगलबाज" हा शब्द का वापरला?
शिवाजी महाराजांच्या नावासमोर दगलबाज हा शब्द वाचून, शिवाजी महाराजांना कोणीतरी दगलबाज म्हणावं आणि महाराष्ट्रानं ते ऐकून घ्यावं हे कसं काय घडलं असावं?? हा पहिला प्रश्न पडतो. तर दुसरा प्रश्न पडतो तो म्हणजे प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांबद्दल "दगलबाज" हा शब्द का वापरला असावा?
१९२६ साली केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी भोरमधील वसंत व्याख्यान मालेत 'दगलबाज शिवाजी' या विषयावर व्याख्यान द्यायचे जाहीर केले तेव्हाही अनेकांना असाच धक्का बसला होता. पण प्रबोधनकारांनी जेव्हा व्याख्यान संपवले तेव्हा सर्वांनी एकमुखाने गर्जना दिली 'दगलबाज शिवाजी महाराजांचा विजय असो'. ते व्याख्यान इतके गाजले की, लोकांच्या आग्रहास्तव प्रबोधनकारांनी त्या व्याख्यानाची ४० पानी छोटेखानी पुस्तिका काढली. ती पुस्तिका म्हणजेच 'दगलबाज शिवाजी'. दगलबाज म्हणजे दगाबाज नव्हे. दगलबाज हा शब्द प्रबोधनकारांना The Diplomat अर्थात मुत्सद्दी या अर्थाने अभिप्रेत आहे. प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांना दगलबाज का म्हंटले आहे हे तुम्हाला पुस्तक वाचूनच समजेल.

भोरच्या सभेत नेमकं काय घडलं?
‘दगलबाज’ हा शब्द का वापरला यावर खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या आत्मकथेत सविस्तर दिलेलं आहे. या संबंधावर स्वतःच्या आत्मचरित्रात प्रबोधनकार म्हणतात,
१९२६ च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेसाठी प्रबोधनकारांचे एक स्नेही कै. गोपीनाथराव पोतनवीस आणि भोरचे शिवप्रेमी शेटे बंधू त्यांच्याकडे आले. भोरला वसंत व्याख्यानमाला सुरु केली आहे. त्यात आपलं व्याख्यान तिथं व्हावं अशी इच्छा आहे. त्यासाठी निमंत्रण द्यायला आलोय, विषय तुम्ही ठरवा. असं त्या दोघांनी प्रबोधनकारांना सांगितलं. प्रबोधनकार म्हणाले "दगलबाज शिवाजी".
प्रबोधनकारांचे शब्द ऐकून शेटे बंधू उडालेच. तुम्ही शिवरायांचे अट्टल भक्त असूनही शिवाजी महाराजांबद्दल दगलबाज शब्द कसा काय वापरला याचा ते जाब विचारू लागले. प्रबोधनकारही त्याच नावावर अडून बसले. भोरवरून आलेले पाहुणे आणि प्रबोधनकार यांच्यात बराच वेळ खल चालला पण प्रबोधनकार काही त्यांचा हेका सोडेनात. आलेले पाहूणे नाराजीने माडीतून खाली उतरले. दोनच मिनिटात गोपीनाथराव परत वर आले. त्यांनी प्रबोधनकारांना विचारलं काय हे नावातलं "शिक्रीट". तेंव्हा प्रबोधनकार उत्तरले, जे प्रचंड महत्वाचं आहे.
"अर्जुन बगलबाज होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता. "दगलबाज" नी "दगाबाज" यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे "डिप्लोमॅट", दगाबाज म्हणजे "ट्रेचरस". इरसाल मुत्सद्दी दगलबाजच असावा लागतो. कळले?"
गोपीनाथरावांना विषय मनापासून पटला. त्यांनी शेटे बंधूंना वर बोलावलं आणि व्याख्यान ठरवून टाकलं असं जाहीर केलं. शेटे बंधू चपापले. "अरे गोपीनाथ तु पण बाटलास? बरं होऊन जाऊद्या तुमच्या मनासारखं. भाषण ऐकणारे देतील न्याय. आमचं काय !" असं म्हणून त्यांनीही हात टेकले.
भोरची मंडळी भोरला परतली. त्यांनी व्याख्यानाची तयारी सुरु केली. त्याकाळी काही फ्लेक्स वगैरे नसायचे. व्याख्यानाची माहिती फळ्यावर खडूने लेखून प्रचार प्रसार केला जायचा. व्याख्यानमालेच्या बोर्डावर "वक्ते: प्रबोधनकार ठाकरे, विषय: दगलबाज शिवाजी" असं लिहिण्यात आलं. बोर्ड वाचून अनेकांचा पारा चढला. त्यांनी क्रम बदलला आणि "वक्ते: दगलबाज ठाकरे, विषय: प्रबोधनकार शिवाजी" असं शीर्षक केलं. आयोजकांनी नाव ठीक करायचं आणि चिडलेल्या जनतेनं ते परत बदलायचं असा खेळ बराच वेळ चालला.
दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’, मुत्सद्दी…
श्रीराम मंदिरात चिकार गर्दी जमलेली. नावामुळं जाहिरातच तशी झालेली. शिवछत्रपतींच्या चरित्राचं मुद्देसूद विश्लेषण करून झाल्यावर प्रबोधनकारांनी व्याख्यानाचा समारोप केला तो असा,
"बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो, काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचें कोडे थोडे तरी सुटेल. अफझुलखान ठार मारल्याशिवाय किंवा त्याच्या हाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्याशिवाय; त्या मुकाबल्याचा निर्णयच लागणारा नव्हता. अर्थात शिवाजी मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेंच प्रतापगड चढला; आणि त्याच्या अलौकिक प्रसंगावधानाने त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, `योगः कर्मसुकौशलम्’ या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणा-या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यांत मुळीच संशय नाही. अर्थात ``यत्न योगेश्वर: कृष्णः’’ हा श्लोक या पुढे – यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपति ।। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।। असाच वाचला पाहिजे, बोला – दगलबाज शिवाजीचा जयजयकार!!

…आणि श्रोत्यांनी दगलबाज शिवाजी महाराजांचा जयजयकार केला
प्रबोधनकारांच्या मागोमाग जमलेल्या यच्चयावत गर्दीनेही दगलबाज शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. ही होती प्रबोधनकारांच्या शब्दांची ताकद. जे शेटे बंधू व्याख्यानाचं नाव ऐकून व्याख्यान नाकारत होते. तेच प्रबोधनकारांना भेटून म्हणाले, "खरोखर केशवराव, दगलबाज नि दगाबाज या दोन शब्दातला भेदच आजवर आमच्या नजरेत कोणी आणला नव्हता. छत्रपती शिवरायांच्या राजकारणी चारित्र्यातील कर्मयोगाचं अस्सल स्वरूपच तुम्ही आज आम्हाला समजावून दिलंत. हे व्याख्यान छापून आलंच पाहिजे."
अनेक स्त्री पुरुषांनीही तशीच मागणी केली. पुण्यात परतल्यावर प्रबोधनाच्या अंकात तो लेख समग्र लिहून त्यांनी छापून घेतला. अंक बाहेर पडताच प्रचंड मागणी येऊ लागली. जी लोकं प्रबोधनकारांचं तोंडही कधी पहात नव्हती ती स्वतः छापखान्यात येऊन अंक मागू लागली. वाढती मागणी बघून प्रबोधनकारांनी दगलबाज शिवाजी या लेखाची एक छोटी पुस्तिका छापून घेतली. पुस्तिका ४० पानांची भरली. पाच हजार प्रती काढून एक आणा या किमतीला ती त्यांनी विक्रीला काढली. उत्तर हिंदुस्थानातल्या एका उर्दू पुस्तकातल्या शिवाजी महाराजांच्या बदनामीकारक मजकुरानं देशभर तेंव्हा काहून उठलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर दगलबाज शिवाजी विक्रीस आलेलं. पुण्यात एकाच दिवशी पाच हजार प्रती विक्री गेल्या. विक्रीचे विक्रम मोजण्याची तेंव्हा प्रथा नव्हती. नाहीतर प्रबोधनकारांच्या या छोटेखानी पुस्तिकेच्या विक्रीच्या विक्रमानं आजही अनेकांचे डोळे दिपवले असते.






