'सामान्य' या शब्दाच्या चौकटबद्ध व्याख्या असलेल्या आपल्या समाजात या चौकटीबाहेरचे असे काही चटकन स्वीकारले जाणे अंमळ कठीणच असल्याने चौकटीबाहेरच्यांसाठी संघर्ष अटळच. मात्र जिद्दीने असा संघर्ष करून यश ऑजळीत पडल्यानंतर त्याचा आनंद काय असतो ते गुजरातमधील डॉ. गणेश बरैया हे अगदी नीटच सांगू शकतील.
वय वर्षे 25 असलेले डॉ. बरैया यांची नुकतीच गुजरातच्या भावनगरमधील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रीतसर नियुक्ती झाली. 'वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्तीत काय कौतुक', असा प्रश्न मनात उभा राहिलास त्यांचा प्रवास डोळ्यांखालून घालावा.
27 नोव्हेंबरपर्यंत जामनगरमधील तख्तसिंहजी हॉस्पीटल हे फक्त भावनगरमधील सर्वात मोठे हॉस्पीटल आणि मृतदेह दान करण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. पण, आता हेच हॉस्पीटल सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. याचे कारण म्हणजे 3 फूट आणि अवघ्या 18किलो वजनाचा डॉक्टर गणेश बरैय्या. 25 वर्षांच्या गणेशची आतापर्यंतची संघर्षमय वाटचाल थक्क करणारीच आहे.
उंची 3 फुट, वजन 18 किलो आणि शरीराचा 72 टक्के भाग विकलांग, तरीही
गणेश बरैया यांचा जन्म गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील गोरखी गावातला. त्यांचे घर शेतकऱ्याचे. गणेश यांना सात बहिणी आणि एक भाऊ. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच. साध्या कच्च्या भिंतींच्या घरात राहणारे हे कुटुंब. पण या आर्थिक अडचणींच्या पलीकडची, गणेश यांचा संघर्ष कमालीचा तीव्र करणारी गोष्ट म्हणजे त्यांची अतिशय कमी उंची आणि कमी वजन…गणेश यांची उंची आहे फक्त 3 फुट आणि वजन फक्त 18 किलो, शिवाय दृष्टीही पुरेशी नाही. आयुष्यात इतक्या साऱ्या कमतरता असताना आणखी एक आजार म्हणजे त्यांचा शरीराचा 72 टक्के भाग लोकोमोटर विकलांगतेमुळे (locomotor disability) प्रभावित आहे.
तरीही लहानपणापासूनच गणेश यांनी स्वप्न पाहिले होते ते डॉक्टर होण्याचे. सन 2018 मध्ये ते मेडिकल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले खरे; मात्र कमी उंचीमुळे त्यांना एमबीबीएसला प्रवेश नाकारण्यात आला. NEET परीक्षा पास झाल्यानंतर, गणेश भावनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले, तेव्हा वैद्यकीय मंडळाने त्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला. 'इतक्या कमी उंचीमध्ये तुम्ही रुग्णांची तपासणी आणि ऑपरेशन थिएटरमधील काम कसं करू शकाल?' असे कारण देत, मंडळाने त्यांची शारीरिक मर्यादा दाखवली.
'इतक्या कमी उंचीमध्ये तुम्ही रुग्णांची तपासणी कसं करू शकाल?'
पण गणेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी हार मानली नाही. त्यांनी पहिल्यांदा गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिथे दिलासा न मिळाल्याने त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालय) गाठले. गणेश यांच्या बाजूने प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला आणि महाविद्यालयाला प्रवेश देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे गणेश यांच्या डॉक्टर बनण्याच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण दूर झाली.
सर्वोच्च न्यायालयाने मात्र अनुकूल निवाडा दिल्याने त्यांना एमबीबीएस शिक्षणाची दारे खुली झाली. हा मोठा विजय मिळाल्यानंतर गणेश यांनी भावनगर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पाच वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर इंटर्नशिपच्याकाळातही त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही. ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भावनगरमध्ये त्यांची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली. गणेश यांचा आता जगातील सर्वात कमी उंचीच्या डॉक्टरांच्या यादीत समावेश झाला आहे.
जगातील सर्वात कमी उंचीच्या डॉक्टरांच्या यादीत समावेश
‘बाईमाणूस’ने जेव्हा डॉ. गणेश बरैया यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, परमेश्वर जर तुमचं काही हिरावून घेतो तर दुसऱ्या बाजूने त्याची परतफेडही करत असतो. दिव्यांग असणं हे तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा असतो परंतू पुढच्या प्रवासात काय लिहून ठेवलं आहे हे आपल्याला माहित नसतं.
मला फक्त इतकचं सागायंच आहे की, ठाम आत्मविश्वास असेल आणि आपलं लक्ष्य गाठण्याचा नेक इरादा असेल तर सफलता नक्कीच मिळते. मेडिकल असोसिएशनमे जेव्हा मला नाकारलं तेव्हा मी निराश जरुर झालो होतो, परंतू माझ्या शिक्षकांनी मला पुढचा मार्ग दाखवला. माझे शिक्षक माझ्या आयुष्यात कृष्ण बनून आले, कृष्णानेच अर्जुनला मार्ग दाखवला होता.
“मी माझ्या उंचीमुळे कधीच घाबरलो नाही. फक्त लोकांच्या चुकीच्या मानसिकतेचा शिकार होत गेलो. सर्वांसाठी वेदना या सारख्याच असतात, त्यामुळे माझी उंची ही कधीच अडथळा बनली नाही,” असेही डॉ. गणेश आत्मविश्वासाने सांगतात.
रुग्णांची तपासणी अशा पद्धतीने करतात डॉ. गणेश
रुग्णालयाचे बेड उंच असल्यामुळे ते तपासणीसाठी स्टूल ठेवून चढतात. रुग्णांची तपासणी करताना ते आपले पाय लांब करून काम करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. सुरुवातीला रुग्ण त्यांना पाहून थोडे आश्चर्यचकित होतात, पण नंतर त्यांच्या प्रेमाच्या आणि आत्मविश्वासाच्या उपचारांमुळे समाधानाने उपचार करून घेतात.
वैद्यकीय अधिकारीपदाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडताना डॉ. बरैया यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसतो. त्या आनंदावर त्यांचा पूर्ण हक्क आहे. 'आपल्या संघर्षात कुटुंब, शिक्षक, प्राध्यापक यांची मोलाची मदत झाली,' असे ते कृतज्ञतेने नमूद करतात.
आता गणेश बरैया यांची एमबीबीएसची पदवी पूर्ण झाली आहे. सरकारी नियमांनुसार, बॉन्डनुसार त्यांना काही काळ सरकारी रुग्णालयात नोकरी करायची आहे. यावेळी गणेश यांनी आपले सर्वात मोठे ध्येय सांगितले आहे. गणेश याबाबत बोलताना म्हणाले की, मला ग्रामीण भागातील गरीब लोकांवर उपचार करायचे आहेत. तिथेच चांगल्या डॉक्टरांची सर्वात जास्त गरज आहे."
डॉक्टर बनल्यानंतर आता त्यांचे एक सर्वात मोठे वैयक्तिक स्वप्न आहे, ते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी पक्के घर बांधणे. ‘’आम्ही आजही कच्च्या घरात राहतो. अनेक वेळा पैशांची कमतरता आल्यामुळे घराचे बांधकाम थांबले होते. आता मला मिळणाऱ्या वेतनातून मी हे स्वप्न पूर्ण करू शकेन," असे त्यांनी सांगितले. पुढे ग्रामीण भागात बालरोगतज्ज्ञ वा रेडिओलॉजीत विशेष काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांची जिद्द पाहता ही इच्छापूर्ती देखील होईल, यात शंका नाही.






